**वेदना मातृत्वाची !!**
चार दिवसानंतर सारिकाच लग्न होणार होत.घरात पाहुण्यांची बरीच वर्दळ सुरू होती.घरातील सर्व पाहुणे मंडळी आपापल्या कामात मग्न होते.मात्र सारिकाच्या मनाचे भाव काही वेगळेच होते.ती आपल्या बाळाला मांडीवर घेऊन लळीवारपणे गोंजारत होती.रात्रभर रडून रडून तिचे डोळे लाल झाले होते.आताही तिच्या डोळ्याच्या कडा ओलावत होत्या. राहूनराहून तिच उर भरून येत होत .आपल्या चिमुकल्या मोहितला आपण आपल्यापासून नेहमीसाठी दुरावत आहोत.ही अपराध्याची भावना तिला अधिकच अस्वस्थ करून जात होती.आपण मागील जन्मी कुठल पाप केल असाव म्हणून या भोगवाटा आपल्या वाट्याला आल्या असेल;नियती इतकीही निष्ठुर कशी असू शकते.यावर तिचा विश्वास बसत नव्हता.तिच्या मनात अनेक द्वंद्व सुरू होते.अशातच मोहितने तिला प्रश्न केला आणि ती भानावर आली."आई आपल्याकडे कुणाच लग्न आहे गं !" हे ऐकून ती स्तब्ध झाली.आपल्या मुलाला काय उत्तर द्याव ते तिला कळेना.डोळ्यातील अश्रू पुसून तिने मोहितला जवळ घेतले.मोहित अवघ्या पाच वर्षाचा होता. त्याचा तो अल्लड,निरागस चेहरा बघून तिला गहिवरून आल.मोहितने केलेल्या प्रश्नामुळे ती झंझावून गेली होती . कदाचित घरात पाहुन्यांची असणारी रेलचेल आणि कानावर आई बद्दल पडलेल्या शब्दांनी घरात आपल्या आईच्या लग्नाची तयारी सुरू आहे.याचा अंदाच त्याच्या कोवळ्या मनाला लागला असावा... पण त्याहीपुढे अजून काही कळाव याकरिता त्याच वय आणि समजही खूप लहान होती.पण सारिका मात्र नियतीपुढे हतबल झाली होती.मातृत्वाची वेदना तीच काळीज चिरत होती.तिच्या मनावर झालेल्या असंख्य जखमांना ती लपवू बघत होती.एखाद्या गाईला तिच्या वासरापासून दूर न्याव आणि तिच्या असाह्यतेचा फायदा घेत दुसऱ्याच्या दावणीला बांधाव अशी तिची स्थिती झाली होती.आपल्या काळजाच्या तुकड्याला घट्ट मिठी मारून ती शांतपणे बसली होती.घरात लग्नाची रेलचेल सुरू होती.पण सारिकाच्या चेहऱ्यावर कायम दुःखाचे भाव दिसत होते.हळूहळू ती भूतकाळात डोकावू लागली.
पाच वर्षा पूर्वी आपल्या अंगणात असाच लग्नाचा मंडप सजला होता.स्वप्नातील राजकुमार जसा असावा तसा देखणा,सुशील आणि श्रीमंत घरात तिची सोयरीक झाली होती.सारिका आपल्या संसाराचे गोड स्वप्न रंगवू लागली.लग्न मोठ थाटामाटात पार पडलं.बघितलेले आयुष्याचे ते रंगीत स्वप्न हळूहळू काळवंडायला लागले.घरातील लोकांचे खरे मुखवटे पुढे यायला लागले.सासू ,सासरे आणि नवरा सारेच छळू लागले.घरचे सगळे काम करून राबणारी मोलकरीण म्हणून येवढीच तिची घरात किंमत होती .अशातच तिला दिवस गेले.मी आई होईल या आनंदाने ती काहीशी सुखावली.मातृत्वाच्या आनंदात ती आपले सारे दुःख विसरू लागली.आता आपल्या मागचा वनवास संपेल अस तीच भाबड मन बोलू लागलं.पण भोगमान काही टळेना.त्रास कमी न होता वाढतच गेला.अशातच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला .घरात कुठलीच खुशी झाली नाही.छोट्या बाळाला कुणीही बघायला तयार नव्हतं.घरातील सर्व काम करतांना आपल बाळ सुरक्षित राहावं म्हणून ती त्याला वाशिंग मशीनमध्ये ठेवून काम करायची . एक दिवस शिल्लक कारणावरून घरामध्ये भांडण झाल.ते इतक विकोपाला गेल की सारिकाला बेशुद्ध होत पर्यंत घरातील सर्वानी मारल.ती जमिनीवर निपचित पडली होती.बेशुद्ध अवस्थेत असतांना अचानक तिला जाग आली.बेडच्या एका बाजूला कोपऱ्यात तिला तेलाची कॅन गुंडाळलेला दोर दिसला.क्षणात नजरेपुढे आपल्या पुढे साक्षात मृत्यू उभा याचा अंदाज येऊन चुकला होता. ती कशीबशी उठली आणि आपल्या बाळाला कवेत घेऊन सुसाट्याने पळत सुटली.बाहेर वादळ वारा सुरू होता.जीवात प्राण नसतांना ती धावत होती.अशातच पुढे तिला तिच्या नात्यातील जवळच घर आठवल तिने दरवाजा जोरात ठोकला.ती जोरजोरात ओरडू लागली.अशातच दार उघडले आणि क्षणात ती झालेली सर्व हकीकत सांगू लागली.आपल्या आईला एक फोन लावून तिने लगेच आईवडिलांना बोलवून घेतलं.सारिका तिच्या माहेरी गेली.झालेली घटना फार विलक्षण होती.असही आपल्यासोबत घडेल याचा अंदाज नव्हता.वडिलांनी लगेच पोलिसामध्ये तक्रार केली.सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात गेले.
नवरा बाहरख्याली असल्यामुळे तिला कायमच संपवाव याकरिता हा कट रचला होता.आता हळूहळू मोहित मोठा व्हायला लागला.एक छोटासा जॉब करून सारिका आईवडिलांच्या घरी राहू लागली.असेच हळूहळू वर्ष लोटले आणि मोहित पाच वर्षाचा झाला.वडिलांना आता सारिकाच्या आयुष्याचा विचार यायला लागला.आपली तरुण मुलगी आयुष्यभर अशीच राहणार का?या प्रश्नाने ते व्यथित व्हायला लागले.नात्यातील लोकांना मूल शोधण्यास सांगू लागले.सारिकाला दुसर लग्न करण्यास हट्ट करू लागले. माझ्यासोबत माझा मुलगा जर कुणी स्वीकारेल तर मी लग्नाला तयार होईल.ही अट ठेऊन सारिकाने आईवडिलांच्या इच्छेला होकार दिला.
एक चांगल पाटील घराण्यातील स्थळ लगेच चालून आल.मुलाची पहिली पत्नी गरोदर असतांना गेली होती.सारिका दिसायला गोरी गोमटी असल्यामुळे लगेच होकार आला पण एक अट मुलाने घातली आम्ही मुलाला स्वीकारणार नाही.जर हे मान्य असेल तरच ही सोयरीक होईल.आईवडिलांना प्रश्न पडला सारिका या गोष्टीला मुळीच तयार होणार नाही हे त्यांना माहिती होते. त्यामुळे आता ती सारिकाला तयार करू लागले.आम्ही तुझ्या मुलाला सांभाळू आणि तू मुलाच्या भेटीला नागपूरला असल्यामुळे येऊ शकते हे पटवून देऊ लागले.तुझ्यापुढे तुझ येवढ आयुष्य उभ आहे.तू होकार दे याकरिता तिला विवश करू लागले.एकीकडे आईवडिलांच्या भावना तर दुसरीकडे आपल्या काळजाचा तुकडा...किती मोठा यक्ष प्रश्न तिच्यापुढे उभा होता.एका असह्य अवस्थेतून सारिका जात होती.शेवटी आईवडिलांच्या अपेक्षेपुढे तीच मातृत्व दुबळ पडलं आणि तिने जड अंतःकरणाने होकार दिला.पण तीच मातृत्व मात्र तिला खुणावत होतं.स्वतःच्या सुखाकरिता आपण मोहितला दुरावत आहे.वडिलांची छाया नसतांना आपण ज्याला फुलाप्रमाणे जपल आता त्यालाच काट्यात लोटून जात आहो.त्याच्या हळव्या मनावर याचा काय परिणाम होईल?आपला मुलगा आपल्याशिवाय कसा राहील ?आईवडिलांना पारखा होणारा मोहित आज तिला अनाथ वाटायला लागला होता.ती स्वतःलाच कोसायला लागली होती.आई येवढी दुष्ट कशी होऊ शकते?आईच्या हृदयातील काळीज काढून कशी देऊ शकते ?इतकी असह्य,इतकी दुर्बल नियतीपुढे हतबल झालेली,आयुष्याच्या रणांगणात हरलेली, नशिबापुढे कमजोर पडलेली कशी पडू शकते?अशा अनेक प्रश्नात ती गुंतून गेली होती.
प्रा.वैशाली रितेश देशमुख
(ग्रामविकास कनिष्ठ महा.कुही)
९०२११७२३६२
Comments
Post a Comment