स्त्री मना तुझी कहाणी!

            स्त्री मना तुझी कहाणी!
      
         मी एक स्त्री म्हणून जेव्हा जेव्हा स्त्री मनाला उलगडण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तेव्हा मला याची जाणीव होते. की, स्त्री मनाची खोली छेदन हे सहज शक्य नाही.जसे अथांग सागरातील पाण्याचा अंदाज घेता येत नाही. सागरामध्ये किती मौल्यवान वस्तू, माणिक मोती,वनस्पती दडलेल्या आहे याचा वेध घेणं  शक्य होत नाही.तसे स्त्री मनाच्या खोलीचा अंदाज घेणं अशक्यच म्हणावं लागेल!म्हणून मला सागर  आणि स्त्रीमनाशी तुलना करतांना बरीचशी साम्यता वाटते. खरं तर स्त्री मन हे नाजूक असते, संवेदनशील असते, कमजोर असते, हळव असते असा अनेकांचा अंदाज असतो.पण ते खरे नव्हे.जरी ती शरीराने नाजूक असली तरी मनाने मात्र कणखर असते,मजबूत असते, न खचणारी , अनेक संकटाना, अडचणीला तोंड देण्याची आत्मशक्ती  तिच्यात असते. तिची अंतर्मुखता इतकी प्रगल्भ असते की तिला स्वतःच्या भावना आवरता येते.नियंत्रित करता येते. आपले दुःख,आपल्या भावना, इच्छा बाजूला सारून  इतरांच्या भावनेला प्राधान्य देण्यात तिला समाधान,आनंद वाटतो.तिच्या आधी तीच घर, तीच कुटुंब, तिचा आप्तपरिवार  हेच तीच विश्व असते. आपल्या घरासाठी वाटेल ते करायची उर्मी तिच्यात असते. घरासाठी झिजायला, आपल्या सर्वस्वाचा त्याग करायला ती कायम तयार असते. सर्वांच्या भावनानेचा आदर करीत ती घरात वारा बनून वावरते. घरातल्या प्रत्येकांची काळजी घेत, प्रत्येकाला जपते.

         समाजमनाचा पगडा तिच्या आयुष्यभर असतोच.कुणाच्या नाही कुणाच्या नियंत्रणाखाली ती कायम आपलं जीवन जगत असते. खंत हीच आहे की मुक्तपणे ती वावरू शकत नाही.कायम तिच्या पंखाच्या टोकांना छाटले जातात .तीच अस्तित्व कायम जोखडाप्रमाणे जुपलेलं असते. कायम बेगडी दिखाव्यात ती वावरत असते .तिचे वरवर आनंदी दिसण आणि असणं यात फारच अंतर असते. तिच्या अदृश्य दुःखाच्या छटा कायम अंधुक असतात. धुक्यात लपलेल्या सृष्टीच्या अस्तित्वाप्रमाणे...!! स्त्री मनाची खोली इतकी गहरी असते की तिच्या मनाचा तळ गाठण सहज शक्य होत नाही. तिनी आयुष्यभर किती आवंढे गिळलेली असतात. किती अपमान पचवलेला असतो . कित्येक हुंदके दाबलेले असतात. कित्येक इच्छेचा त्याग केलेला असतो. कित्येक यातना लपवलेल्या असतात. हे आकाशाला स्पर्श करण्यासारखं सहज शक्य होणार नाही. तिच्या त्यागाच, समर्पनाच इतिहास नेहमीच साक्ष देतो.


        प्राचीन काळात स्त्रियांनवर अनेक बंधने होती. समाजात स्त्रियांचे स्थान गौण होते.तरीही तिचे नाव कुठे ना कुठे कोरल्या गेले आहे. रामायनामध्ये सीतेचा त्याग असो वा महाभारतामध्ये द्रौपदीचा अपमान... ती कायम समाजाकडून नडल्या गेली आहे. तरीही तिच्या नेतृवाच्या पाऊलखूना  पुसता आल्या नाहीत.शिवराज्यात जिजाऊंच्या नेतृत्वामध्ये शिवाजीराजे घडले त्या काळात स्त्रीचा सन्मान करण्याची शिकवण त्यांनी दिली. त्यांच्या राज्यात ठाणेदारीण सावित्रीबाईवर सखुजी गायकवाड या सरदाराने बलात्कार केला तेव्हा त्याचे डोळे काढण्याचा हुकूम त्यांनी दिला. त्यांनी दिलेली शिक्षा म्हणजे स्त्रीविषयी उद्दात दृष्टीने बघणे होय.अहिल्यादेवी होळकरांचं प्रतिनिधित्व तर समर्थ्यशाली,कणखर होतच.याचा पुरावा म्हणजे शूर मराठा सरदार दत्ताजी शिंदे जेव्हा नजीब आणि कुतूबशहा यांच्या हल्याने गतप्राण झाले . तेव्हा ही बातमी त्यांच्या नऊ महिन्याच्या गरोदर असलेल्या पत्नी भागीरथीबाईला कळली. तेव्हा त्यांना  सावरतांना अहिल्याबाई होळकर म्हणाल्या "बाई, रडू नका आपण मराठी सरदारांच्या बायका आपलं लगीन सरदारांशी नव्हे, तर त्यांच्या तलवारीशी लागलं." हे वाक्य त्यांच मनोधैर्य किती प्रगल्भ होत याची साक्ष देते.एक  स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या मनाला उभारी देण्यास किती महत्वपूर्ण ठरते.त्या काळात एक झुंजार कर्तबगार राज्यकर्ती म्हणून त्यांनी 28वर्ष राज्यकारभार सांभाळला.या सर्व गोष्टीमध्ये स्त्रियांच  संयम, त्याग, समर्पन, नेतृत्व आणि कणखरता दिसून येते. समाजात स्त्रियांना काडीमोल किंमत असूनही त्यांनी आपल नाव सुवर्णंकीत केलं.

     आज मात्र स्त्रिया पूर्णतः स्वातंत्र आहे. हे जरी खरे असले तरी ती स्वसामर्थ्याने आणि स्वनिर्णयतेने जगत आहे. असं म्हणणे काहीसे फोल ठरेल.कारण आजही ती मानसिक दडपणातून पूर्णपणे मुक्त झालेली नाही. समाजाला तिच्याकडून अपेक्षा काहीशा वेगळ्याच असतात. तिने फक्त एक स्त्री म्हणून जगावं. तिने पुरुषाची बरोबरी करू नये. स्वतंत्रपने निर्णय घेऊ नये. तिनी कुठल्याही क्षेत्राचे प्रतिनिधित्व करू नये आणि केलही तरीही कायम इतरांचा विचाराने तिनी निर्णय घ्यावा. प्रत्येक गोष्टीला तिने सहमती दर्शवावी, चुकीचं असलं तरीही मूकपणे स्वीकारावं  अशा अपेक्षा तिच्याकडुन केल्या जातात. स्त्री शिक्षित असो वा आशिक्षित या अपेक्षा तिच्या पाठीशी कायम चिपकल्या असतात.आणि म्हणून कायम तिच्या मनाचा कोंडमारा होतच असतो.. हे सगळं अदृश्यच पण एक स्त्री म्हणून तिच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात  नक्कीच आपण डोकावू शकतो .आपलं दुःख कायम ती आपल्या मनात साठवून ठेवते. त्याचे भाव ती इतरांना कळू देत नाही. मनातल्या भावनांची गर्दी होत असतांना तिला असह्य  वेदना होतात. पण ती कायम त्या वेदना पचवून घेते. तिच्या सागराएवढ्या मनाच्या खोलीत तिचे दुःख विरून जातात. तिच्या मनाच्या खोलीत ती असंख्य घुसमट पचवत असते.आपल्या आयुष्याची नाळ ही त्याग, समर्पण आणि जुळवाजूळव करण्यासाठी  जुळलेली असावी . असा स्वीकार जरी तिने केला असला तरीही तिच्या अपेक्षा, तीच मन, तिच्या वेदना कुणीतरी समजाव्या, ओळखव्या या अपेक्षेखाली ती वावरत असते. पण तेही स्वप्नवत असते.तिच्या भावनांचा आदर व्हावा, तीच मन कुणीतरी ओळखून घ्यावं, तीच दुःख कुणीतरी वाटून घ्यावं, तिच्या इच्छेची कुणीतरी कदर करावी पण असं होतांना दिसून येत नाही.  ती कायम समईप्रमाणे तेवत असते.


           आज ती नोकरी करते ,कमविते , तिला आर्थिक स्वातंत्र आहे. म्हणुन ती पुर्णतः स्वतंत्र आहे . असं म्हणता येणार नाही. तिच्या मनाची, भावनेची खऱ्या अर्थाने सर्वांग दृष्टीने विचार व्हायला हवा!  तिचा  हक्क ,तिचा अधिकार , तिचे निर्णय, तिचे स्वातंत्र हे कुठल्याही बंधनात गुरफटलेले नसावेत.प्रत्येक निर्णयामध्ये तिला बरोबरीचं स्थान मिळायला हवं!तिच्या निर्णयाचा आदर व्हायला हवा...या सर्व गोष्टी तिच्या सशक्तीकरणाकरिता महत्वाचे आहे.तेव्हाच ती तेवढ्याच निर्भयतेने , निढरतेने , धाडसाने समाजात वावरू शकेल.
स्त्रियांनीही आपल्या भावनांची कदर करायला हवी... तीही स्वतःसाठी जगायला हवी... तिच्या मर्यादेचं कुंपण तिला कळत त्यामुळे कुठलाही निर्णय जो  अन्यायकारक वाटतो त्यावर तिने आवाज उठवायला हवा.
तीच अंतर्मन ओळखण्याच सामर्थ्य तिनेच जोपासायला हवं!स्त्रियांमध्ये अपार धैर्य ,अपार कर्तृत्व अपार कर्तबगारी,अपार धाडस, अपार खंबीरपणा आणि अपार नेतृत्व करण्याची क्षमता आहे. मनात आलं तर असंख्य वादळवाऱ्यांचा सामना करू शकते.फक्त तिला तिची आत्मशक्ती ओळखता यायला हवी. ही आत्मशक्ती कुठलेही व्रत-वैकल्य करून  मिळणार नाही. तर आत्मचिंतनातून होईल. तिच्या उत्तुंग कर्तृत्वाचा कळस गगनभेदी आहे.हा आपला इतिहास आपल्याला सांगतो.अनेक स्त्रियांनी आपले सर्वस्व व कर्तुत्व पणाला लावून आपल्या राष्ट्राला घडविण्यासाठी मोलाचे कार्य केले. राष्ट्रमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई ,राणी लक्ष्मीबाई ,अहिल्याबाई होळकर अशा कित्येक महिलांनी आपल्या धैर्यशीलतेचे आणि वीरवृतीचे दर्शन देत आपला इतिहास सुवर्णमय केला आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी सावित्रीबाईंनी जो तत्कालीन समाज व्यवस्थेविरुद्ध धाडसाने लढा उभारला तो अवर्णनीय असाच आहे.हे सगळं आत्मशक्तीच्या बाळावरच तिनी साध्य केलं. ती निर्भयता प्रत्येक स्त्रियांमध्ये यायला हवी!मनाच्या एका कोपऱ्यात जरी दुःख साठवलं असेल तरी त्या दुःखाला बाजूला सारून आनंदाची उभारी आपण द्यायला हवी... समईच्या वाती  जरी जळत असल्या तरी तिच्यातल्या मंद प्रकाशाने अनेकांचे मन उत्साहित होत. तसेच स्त्री जीवनाच्या अस्तित्वामुळेच जीवनात आनंद, उत्साह संचारतो. ती घराचं घरपण असते. ती घराची शोभा असते. तिच्यात मातृत्वाचं दायित्व पूर्ण करण्याची क्षमता आहे.तिच्या सृजनतेमुळे सृष्टीच अस्तित्व कायम टिकून आहे. तिच्या अस्तित्वामुळे प्रत्येकांच्या जीवनात आनंद आहे. म्हणून स्त्रीमनाचा कायम आदर व्हायला हवा!!

        
प्रा. वैशाली रितेश देशमुख 
मु. कुही, नागपूर 
9021172362
        
      


    
         

Comments

Popular posts from this blog

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?