बळीराजा सुखावेल का ?
बळीराजा सुखावेल का ?
भारत हा कृषिप्रधान देश असून आपल्या देशात बळीराजाला सर्वांत महत्वाचं स्थान दिलं जातं...परंतु गेल्या काही वर्षांत , शेकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र अवाक करणारं आहे .रोजच वर्तमान पत्र उघडलं की त्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी असतेच ...हे सर्व दृश्य बघून मन सुन्न होत .मृत्यूला कवटाळणे हे या जगातील सर्वात कठीण काम आहे .कारण जीवन हे सर्वांना हवं हवंस वाटतं ..पण नियमितपणे निर्सगाने शेतकऱ्यांच्या नशिबाशी केलेला खेळ ,त्यातून उत्भवलेली आर्थिक परिस्थिती ,कौटुंबिक जवाबदारी ,बँकेचं कर्ज ,मुलांचं शिक्षण ,सावकारांचा तगादा ,शासनाची दिरंगाई यातून खजील झालेला शेतकरी ; रोजच मृत्यूला कवटाळतो आहे .हे आमच्या देशाचं भीषण सत्य आणि दुर्दैवं आपल्याला झाकून ठेवता येणारं नाही .
याहीवर्षी परतीच्या पावसाने संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्र झोडपून निघाला. शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक मातीमोल झालं ..यात आमचा शेतकरीराजा पूर्णतः कोलमडून पडला.. त्यांना सांत्वन देणारे अनेक राजकीय हातही त्यांच्या पाठीवरून हात फिरवून आलेत ,पण संपूर्ण कुटूंबाची जवाबदारी आणि घेतलेलं कर्ज आपण फेडणार कसं ?याच उत्तर मात्र त्याला सापडलं नसावं ...याच उत्तर जर वेळीच बळीराजाला मिळालं असत ,तर काही प्रमाणात आत्महत्येचं सत्र थांबू शकलं असत हे नक्की ...
आजच्या घडीला ,महाराष्ट्रात एकीकडे सत्तेसाठी भांडणारे विविध पक्ष आणि दुसरीकडे रोज जीवन संपवणारा आमचा दुर्दैवी शेतकरी ..याचे गंभीर चित्र बघायला मिळतं आहे .पण आत्महत्येची श्रुंखला अशीच जर सुरु राहिली तर भविष्यात शेती करण्याच धरिष्ठ कुणी करणारं का?हाही प्रश्न महत्वाचा आहे ,म्हणून
आजच्या घडीला ,या बिकट परिस्थितीला शेतकऱ्याला जीवनदान देणे ,त्यांना आर्थिक मदत करणे ,त्यांच्या भावना समजून घेणे महत्वाचे आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आज पूर्णतः कोलमडून गेलेला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र लक्षात घेतल तर 2014 ते 2018 या पाच वर्षांच्या काळात 14034 शेतकर्यांनी जीवन संपवले आहे. राज्य सरकारने 2017 साली जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या योजनेनंतरही 4500 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
सरासरी रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असल्याचे भीषण सत्य आपल्यासमोर आलेलं आहे .माहितीच्या अधिकारात राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली असून ,देशात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात, हे वास्तव संपूर्ण जगासमोर आलेलं आहे .हे सत्य आपल्या देशासाठी फारच लाजिरवाणं आहे .
‘लँड ऑफ सुसाईड’ असे भीषण वर्णन अभ्यासकांनी शेतकर्यांच्या आत्महत्येसंदर्भात केले असून ,आत्महत्या करणार्या शेतकर्यांमध्ये विदर्भातील शेतकर्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ मराठवाडा व इतर परिसर , पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांतील दुष्काळी माण-खटाव, तसेच सांगलीतील जत, आटपाडी कवठेमहांकाळ तसेच कोल्हापुरातही काही भागातील शेतकर्यांनी कर्जबाजारीपणामुळे मृत्यूस कवटाळले आहे.
दुष्काळामुळे शेतकरी पुरता पिचतो हे सत्य आहेच, याशिवाय उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी मोबदला मिळत असल्याने शेतकर्यांमधील कर्जबाजारीपणा वाढत चालला आहे. बँका, पतसंस्थांसह सावकारांचे व्याज शेतकर्यांच्या एकदा मानगुटीवर बसले की ते उभ्या आयुष्यात फिटत नाही. याचा परिणाम थेट मनावर होतो आणि शेतकरी क्षणार्धात मरणाला जवळ करतांना दिसते आहे .जानेवारी 2011 ते डिसेंबर 2014 या चार वर्षांत महाराष्ट्रात 6,268 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. तर 2015-2018 या चार वर्षांत शेतकरी आत्महत्यांचा आकडा जवळजवळ दुप्पट झाला आणि 11,995 पर्यंत इतका गेला आहे.जो चिंताजनक आहे .
तेव्हा आजच्या घडीला बळीराजाची फक्त सांत्वना करून चालणारं नाही तर तो आत्मविश्वासाने जगावा यासाठी खऱ्या अर्थाने सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवा . तसेच बळीराजानेही हवालदिल न होता .आत्मविश्वासाने आलेल्या संकटावर मात करायला हवे .. जीवन संपवल्याने कुठलेही प्रश्न सुटत नसतात .म्हणून आपल्या कुटूंबाला दुःख देऊन व पोरके करून जाऊ नका ...पुन्हा बहरतील मळे ,या आशावादावर आपलं जीवन पुन्हा आपण फुलवू शकतो, हा आत्मविश्वास निर्माण करा .
प्रा .वैशाली रितेश देशमुख
रा .नागपूर
90211 72362
Comments
Post a Comment