आठवणीतील भेट ...


      आठवणीतील भेट ....

      कूही ते नागपूर प्रवास करीत असतांना पाचगाव ते सुरगांवपर्यंत दोन्ही रस्त्याच्या कडेला मोठमोठया असलेल्या गिड्डी खदान लागतात . तिथे कामाला आलेल्या परप्रांतीय कुटुंबामुळे तिथे अनेक वस्त्या निर्माण झाल्या .त्यामुळे आठवडी बाजारात संसाराला लागणाऱ्या विविध वस्तूची खरेदी करण्याकरिता कुहीच्या बाजारात ग्राहकांची बरीच रेलचेल असते .त्यामुळे इथे अनेक बेरोजगार युवकांना रोजगार सुद्धा मिळालेले  आहेत .प्रवाशांना ने-आण करण्यास सरकारी बसेस व्यतिरिक्त दिवसभर ट्रक्स चालतात .अशाच काही कामानिमित्य मी  नागपूरला जायला निघाले  असता ट्रक्समध्ये दोन महिला त्यातील एकीच्या कडेवर एक वर्षाचं छोटं मुल तर दीड ते दोन वर्षाच्या फरकाने असलेल्या छोट्या तीन मुली एकापाठोपाठ ट्रक्स मध्ये येऊन माझ्या शेजारी येऊन बसल्या ..अर्थात त्या आठवडी बाजार करूनच आपल्या घरी जाण्यास निघाल्या असाव्यात  ...
अंगावर मळकटलेले कपडे ,हातात मळलेल्या पिशव्या त्यात ठासून भरलेलं सामान आणि नाकात ,कानात मोठमोठे विक्रती दागदागिने ,चेहऱ्यावरती थकलेले भाव ,कष्ट करून पडलेल्या कपाळावरच्या आठ्या ,घामाने भिजलेलं शरीर हे सर्व चित्र त्यांच्या दरिद्री भोगदानाच्या ग्वाही देतं होत्या .अजून प्रवासी भरायचे असल्यामुळे  गाडी सुटायला बराच वेळ होता .या  वेळात आलेल्या चिमुकल्या पोरी आणि त्या दोन महिलांनी माझं लक्ष वेधून घेतलं ...त्यांच्यासोबत असणाऱ्या  छोट्या तीन मुली आपल्या आईच्या पदराला हात पकडून आजूबाजूने भिरभिरत्या नजरेनं इकडे तिकडे बघत होत्या .सर्वात छोटा मुलगा आईचं दूध पीत आपले हातपाय लुटूलुटू हलवीत होता.हे सर्व दृश्य बघून मी त्या छोट्या छोट्या मुलींकडे बघू लागली. दिसायला मूर्तीसारख्या रेखीव ,
सुईच्या टोकाप्रमाणे सरळ नाक ,सुंदर पाणीदार टपोरे डोळे ,नाजूक आवाज आणि त्यात लाल रिबीन घालून असलेल्या त्यांच्या दोन घट्ट वेण्या....यात अजूनच त्या सुंदर दिसत होत्या. त्यांच्या अंगावरचे काळपट काहीसे फाटलेले कपडे आणि फ्रॉकच्या तुटलेल्या बटना  ,उन्हात जाऊन जाऊन काहीसे काळपट पडलेल शरीर  त्यांच्या गरिबीची साक्ष देतं होत्या ... या जगात गरिबी ,दारिद्र्य घेऊन जन्माला आलेल्या मुलांना कमनशिबी म्हणावं का ? स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मन हेलावून टाकणारे हे विदारक दृश्य किती काळ पुन्हा बघावं लागणार आहे...किती  निरागस ह्या मुली....त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्याशी बोलण्याची मनोमन इच्छा होत होती .शेवटी राहावल्या गेलं नाही आणि मी बोलायला लागली .
"कुठल्या वर्गात शिकता ग?"
असं म्हणताच भिरभिरत्या नजरेने तिघीही माझ्याकडे बघू लागल्या त्यातली एक म्हणायला लागली... "आम्ही शाळेत  जात नाही ...म्हशीकडे जातो!"
"तुम्ही तिघी पण का ?"
" हो आमचा बाप मेला, तेव्हापासून तिघीलेही जावा लागते!"
हे ऐकून तर मी थक्कच झाले. 45ते 47डिग्री तापमान असतांना या छोटया मुली आपल्या आईला मदत करतात ,दिवसभर उन्हात म्हशी सांभाळतात ,शाळा म्हणजे काय हे अजूनही यांना कळतं  नाही .इतकं छोटं वय ,खेळण्या-बागडण्याचे ,शिक्षण घेण्याचे   हे दिवस ..पण हे सगळं यांच्या नशिबात नाही .इतक्या छोटया वयात वाट्याला आलेलं दारिद्र्य आणि जीवाला न पेलणारं भोगदान ...हे देवा कसा रे तू न्यायदाता ? असे सर्व विचार मनात घर करू लागले ...मन काहीसं दुःखी झालं ....लगेच त्यांच्या आईकडे बघत विचारलं ...
" ह्या शाळा शिकत नाही का ?"
तर तिच्या आधी त्या मुलींची आत्या बोलायला लागली ...
"बाई या पोरियलें बाप नाही आहे ,गेल्या महिन्यातच यायच्या  बापाचा मर्डर झाला ...आता एकली  बाई ...चार लेकराचं पोट भरन का शाळा शिकवण ? अन पोरी शाळेत गेल्या तर म्हशीले चारापाणी कोण करण? लहान पोराले कोण पायन ?" असे उत्तर ऐकताच यावर काय बोलावं मला समजेनासं झालं ...या वयात छोटया मुलींच्या हातात शाळेचं दप्तर असण्याऐवजी गाई म्हशींचं दोरखंड असावं ...रखरखत्या उन्हात शाळेत न जाता ,जंगलात ओसाड जागेत गाईम्हशींच्या मागे भटकाव हे सर्व  न समजण्याच्या पलीकडे होतं. मनाला फार वेदना होत होत्या शेवटी
तिच्या आईला हिंमत करून म्हटलं... "पोरीला शाळेत पाठवा. आता सरकार कपड्यापासून खिचडीपर्यंत सर्व मोफत देतात ,पैसे लागतं नाही ,तुमच्या मुली सुंदर आहेत .शिकतील तर तुमच्यासारखे हाल त्यांचे होणार नाही. तुमच्यासारखं संकट आलं तर त्या पेलण्यास समर्थ राहिल !"
ती डोळ्यात पाणी आणून बोलू लागली...
"बाई पोरीले शाळेत पाठवाले काही नाही ...माया पोरगा लहान आहे ,मी दिवसभर खदाणीत कामं करतो ...घरी बापानं म्हशी घेऊन ठेवल्या त्यांना चराले कोण नेईन ?मी घरी रायली त उपाशी मरावं लागन आम्हाले !"
यावर काय बोलावं मला शब्दच फुटेना ...यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार माझ्या मनात मधमाश्याप्रमाणे घोंगावू लागला आणि लगेच पुन्हा माझ्या तोंडून शब्द बाहेर निघाले ...एखाद्या काटेरी कुंपणातून बाहेर यावं तसे !
"बघा! म्हशी राखण्यापेक्षा या मुलींना शाळेत पाठवा, तुमचा लहान मुलगा आणि एक मुलगी अंगणवाडीत जाऊ शकतात .तिथे मॅडम त्यांचा सांभाळ करतील ,घर जवळ असल्यामुळे तुम्ही मधल्या सुट्टीत मुलाकडे लक्ष देऊ शकता...उरलेल्या दोन मुलींना जिल्हापरिषद शाळेत पाठवा त्यांचा सर्व खर्च आणि एक वेळचं खाणंपिणं तिथेच होईल ,राहिला म्हशींचा प्रश्न त्या विकून मुलांच्या नावावर पैसे टाकून ठेवा. तब्येतीत कामी येईल!"
ती हळुवारपणे माझे प्रत्येक शब्द ऐकू लागली ..तिला माझ्या बोलण्याचं महत्व पटू लागलं असे भाव तिच्या चेहऱ्यावर मला दिसू लागले ...लगेच मुलींकडे बघून मी म्हणाली,
" शाळेत जाणार न तुम्ही?"
त्या पण सहर्ष नजरेने मान डोलावू लागल्या ...यापुढे आता काय बोलावं सुचत नव्हतं ...लगेच त्यांचा स्टॉप आला आणि त्या उतरायला लागल्या ...एकापाठोपाठ मुली उतरल्यानंतर ती माझ्याकडे पाहून मला म्हणायला लागली,
"बाई देवासारख्या भेटल्या बघा ..
आजवरी असा रस्ता कोणी दाखविला नाही ...तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माया पोरीले शायेत पाठवीन मग माय काहीबी झालं तरी चालणं...!"
आता तिच्या नजरेत कमालीचा आत्मविश्वास जाणवत होता .मुलाला कडेवर घेत ती तिच्या वस्तीच्या वाटेने  चालू लागली ...तिच्या पाठोपाठ तिच्या मागे मुली झपझप चालू लागल्या ...माझी नजर त्या दिशेने त्यांना दूरवर बघू लागली ....लवकरच खदानीच्या धुळेनी त्यांची पाठमोरी आकृती अदृश्य व्हायला लागली .जीवन काय असतं याच काहीस कोडं आज उलगडू लागल होतं आणि मनात पुन्हा 'यांच्यासाठी काही करता येईल का ?' या विचारात मी समोरचा प्रवास करू लागली.

प्रा .वैशाली रितेश देशमुख
कनिष्ठ व्याख्याता ,ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय ,कूही
रा .नागपूर ,जिल्हा नागपूर
7420850376
  

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

बळीराजा सुखावेल का ?