ऐसे कैसे झाले भोंदू…!!

**ऐसे कैसे जाले भोंदू ..!!**

       

      **संत सज्जन दिसतील जेथे ; लाटांगने जावे तेथे**... असे आपले संत सांगून गेलेत , पण ते संत अखंड विश्वशांतीसाठी जप करणारे होते.मानवतेचे मंत्र देणारे होते , स्वत:च ऐहिक सु:ख  सोडून मानवतेच्या सेवेसाठी  जीवन अर्पण करणारे होते .पण ही मानवसेवा कलंकित करून अध्यात्माच्या नावाखाली ढोंगी,पाखंडी,स्वार्थी भोंदू बाबांची गर्दी समाजात वाढलेली आहे. अशाच एका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कोट्याधीश विकृत बाबाच म्हणजे अशोक खरात प्रकरण पुन्हा एकदा आध्यात्मिक क्षेत्राला धक्का देणार आणि कलंकित करणार ठरलेल आहे. त्याच्या विकृतीचा कळस असंख्य मानवजातीला शरमेने मान खाली करायला लावणार आहे.खर तर आपल्या देशात ही घटना काही नवीन नाही.याआधी आसाराम बापू प्रकरण,रामरहीम प्रकरण हे सुद्धा धक्कादायक होते.त्याचीच ही पुनरावृत्ती झाली आहे. महिलांचं शोषण करणाऱ्या या भोंदू बाबांना जेलची हवा खावी लागली . अध्यात्वाच्या दुवा पुढे ठेऊन दुकानदारी चालवणाऱ्या या विकृत बाबांनी असंख्य महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले.अनेक महिलांचे घेतले आहे . असले किळसवाने कृत्य करणारे नराधम समाजात असंख्य असतील यानिमित्ताने त्यांचाही शोध घेणे क्रमप्राप्त ठरते.यांना केवळ जेलबंद करून चालणार नाही तर  कठोर फाशीची शिक्षा व्हायला हवी.

     अध्यात्माची खोटी झूल पांघरून असंख्य घृणास्पद पाप करणारे लिंगपीसाट बाबांची मिरासदारी आणि दुकानदारी चालतेच कशी हा फार मोठा गहन प्रश्न आहे. अशा बाबांची पायधरणी करणारे आमच्याच समाजातील प्रतिष्ठित राजकीय लोकनेते असतात . हे चित्र पुन्हा एकदा प्रसारमाध्यमातून स्पष्ट झाले . यांना अभय देनारे त्यांची पूजा करणारे आमचेच प्रतिनिधी मग सर्वसामान्यांच दूषण का?देशात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असूनही यांची दुकानदारी खुलेआम चालतेच कशी ? खर तर ग्रामीण भागातील लोकांना अंधभक्क  मानले जाते .त्यांच्या अज्ञानाला, अशिक्षिततेला डिवचल्या जाते.पण आजच्या सुशिक्षित प्रतिष्ठित समाजाच काय? त्यात लोकनेतेही समाविष्ट...!!

आपले प्रतिनिधी लोकनेते जे समाजाचे मार्गदर्शक आहेत,रक्षक आहेत,नेतृत्व करणारे आहेत.तेच असल्या भोंदूबाबाचे सुमने उधळतात,त्यांच्या पदचरणावर नतमस्तक होतात तर सर्वसामान्यांच काय? ही बाब अत्यंत दुर्दैवी क्लेशदायक आहे .

        पण या सर्व गोष्टींला जबाबदार कोण? तर आम्हीच...आजच्या या आध्यात्मिक बाबांना सोन्याचांदीच्या रथात मिरवणारे आम्हीच...बंगल्याच्या ऐषोआरामात, एसी च्या थंड हवेत वैभवशाली जगण्याचा सन्मान देणारे आम्हीच.आणि मेंढराप्रमाणे यांच्या मागे कळपाने धावणारेही आम्हीच.त्यांना कोट्याधीश बनवणारे आम्हीच.आपल्यातली अध्यात्माच्या नावाखाली शिगोधराला जाणारी वृत्तीच या सगळ्या गोष्टींला जबाबदार आहे.

     समाजातील अंधश्रद्धारुपी अज्ञान, दूर व्हावा यासाठी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद अश्या अनेक थोर महंतांनी मानव सेवा हिच ईश्वर सेवा आहे,देव देवळात नाही तर माणसात आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला पण आपल दुर्दैवं असं की  तो देव शोधण्याचा कधी प्रयत्नच आपण केला नाही. आणि तोच परमेश्वरी अंश शोधण्याचा नादात राम रहीम, आसाराम बाबा सारखे विषारी नाग डोके वर काढू शकले.व त्यांनी अनेकांची शिकारही केली. याला जवाबदार कोण ?तर आपणच.. हे कुठे तरी थांबायला हवं !


        तुकारामांनी आपल्या परखड भाषेत भोंदुबाचा निषेध केला.गाडगेबाबांनी फाटकेतुटके कपडे घालून  समाजातील वाईट विचारांची धुळ साफ केली.अशा अनेक संतानी मानवतेची शिकवण दिली. रामराज्याची संकल्पना दिली.राष्ट्रीय एकता व अखंडता टिकविण्याचे मंत्र दिले.पण तरीही आपण कायम शिक्षित असूनही अशिक्षितच राहिलो.आपल्याला हा अविचारीपणा बाहेर काढायला जेव्हा  नरेंद्र दाभोलकरांची विचारसरणी पुढे आली  तेव्हा झोपलेला माणूस जागा होऊ नये म्हणून त्यांनाही संपविण्यात आले.त्यांनतर विचारप्रवर्तक गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलीबुर्गी याही समाजप्रबोधक बळी ठरले. असल्या भोंदूची दुकानदारी सुरू ठेवण्यासाठी चांगल्या विचारांना मारल जात गाडल जात आणि पुन्हा यांची दुकानदारी अशोक खरातांच्या नावासारखी ने पुढे येते हे सत्य नाकारता येत नाही.

        कुठल्याही वासनांध अघोरी प्रकाराला रोखण्यासाठी आपल्यातील सजगता,सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. माणसातला लोभीपणा ,अंधश्रद्धा,अज्ञान हा या मार्गावर त्याला घेऊन जातो.आणि मग तो  स्वतः मार्गक्रमिक होतोअसल्या कृत्याला बळी पडतो.असल्या गोष्टी पुन्हा घडू नये याकरिता तुकारामांच्या या ओळी कायम स्मरणात ठेवाव्यात.



ऐसे कैसे जाले भोंदू ।

कर्म करोनि ह्मणति साधु ॥१॥

अंगी लावूनियां राख ।

डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥

दावुनि वैराग्याची कळा ।

भोगी विषयांचा सोहळा ॥३॥

तुका ह्मणे सांगों किती ।

जळो तयांची संगती ॥४॥


प्रा.वैशाली रितेश देशमुख 

ग्रामविकास कनिष्ठ महा.कुही,नागपूर 

९०२११७२३६२


Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?