आसवांची आभाळमाया 📋🖋️

           आसवांची आभाळमया!  

           आसू भरी है, ये जीवन की राहे, कोई उनसे कहदे हमे..... रोते रोते हसणा सीखो, हसते हसते रोना.. रोना चाहे रोना पाये दिलं कितना... दिलं हुम हुम करे घबराये, एक बुंद पाणी की....अशा एक नव्हे अनेक गाण्यामध्ये मानवी मनाची आणि डोळ्यातील आसवांची सांगड व्यक्त केली आहे. डोळ्यातील अश्रू हे भावभावना व्यक्त करणारे जनू साक्षीदारच! मानवी भावभावनांचे जाळे इतके विस्तीर्ण अफाट आणि गुंतागुंतीचे आहे कि ते सोडवता येत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर... मन एवढं एवढं जसा खाकसाचा दाना...  किंवा..असं कसं घडलं कसं जागे पनी तुले असं सपन पडलं.... असचं काहीस हाती न येणार.अंदाज न लागणार मन फार व्यापक आहे.मनाच्या कोपऱ्यात कायम दडून बसतात ते अश्रू ! झरा जसा अलगदपने बेटाबेटातून , रानावनातून, डोंगरदर्यातून , कडेकपारितून आपल्याच मस्तीत बेधुंद वाहतो.तसा भावभावनांचा खेळ.... भावनाही अशाच स्वच्छंदपणे वाहणाऱ्या....भावनांचा तळ न गाठता येणाराच !

          भावनांच्या आश्रयाला कायम चिपकून असतात ते हास्य आणि अश्रू...अश्रुंचे वेगवेगळे  आयाम.त्याच्या विविध छटा. त्याच्या विविध तऱ्हा ...कधी ते आनंदाच्या श्रावणधारा बनून कोसळतात तर कधी नयन कपारीत लपून बसतात .कधी ते हृदयाच्या कोपऱ्यात कुढत बसतात तर कधी ते मुक्तपणे हुलकावण्या देतात. कधी ते  डोळयांच्या किनाऱ्यावर भरतीच उधाण आणतात तर कधी ओहोटी बनून पुन्हा मागे सरतात...... अश्रुंचे अनेक पैलू , अनेक लकबी... डोळ्यातील नितळ पाणी शुक्राच्या चांदण्यासारखं,काजव्याच्या प्रकाशाइतकं चमकणार .निर्भेळ, निसीम, निर्लॅप असणाऱ्या निर्जलाची खोली आपल्याला मापता येणार नाही.अशा या मृगनयनातील सौंदर्याने किती व्याकुळ झालेत, किती भावुक झालेत.

             कधी कधी किती महत्वाचे वाटतात हे अश्रू...ते नसते तर मानवी मनाचा ओलावा दिसला तरी कुठे असता... तो बघण्यातही आयुष्याचा किती मोठा आनंद साठवलेला आहे.गोजिरवान बाळ जेव्हा रडायला लागतं तेव्हा मायेचा धावा बघण्यात किती मोठं ओदार्य असते. हाताशी असलेले सर्व काम सोडून जेव्हा आई आपल्या हृदयाला कवटाळते तेव्हा मायेच्या सावलीने ते अश्रू क्षणात लुप्त होतात. क्षणात लुप्त होणाऱ्या ताऱ्याप्रमाणे....माणसाच्या वयाप्रमाणे अश्रूही उंचीही वाढत जाते .ते पुढे यायला धास्तावतात .त्यांना स्वच्छंद बागडायला  भीती वाटायला लागते.आपल्या हळवेपणाची चाहूल कुणाला लागू नये याची ते परिपूर्ण काळजी घेतात .काहींसे बंदिस्त झालेले अश्रू चार भिंतीआड पुन्हा मोकळे होतात. उंच कड्यावरून पडणाऱ्या धबधब्यासारख्या कोसळायला लागतात... यात आतून उचंबळून आलेलं मन पुन्हा न्हाहून निघत. मोकळ होत.उन्हाच्या झळा लागून  कोडमडलेल्या वेली पावसाच्या सरिंच्या स्पर्शाने  पुन्हा रोमांचित होऊन झुलायला लागतात.... तस पूर्णतः कोलमंडलेल मन पुन्हा उजळून निघत . उरात भावनांच्या गर्दीचा कल्लोळ  घेऊन अश्रुंची वाट मोकळी होते.पुन्हा जीवनाच्या मार्गक्रमावरून मार्गस्थ होण्यासाठी !

        नववधू जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा मेघातून दाटून आलेल्या सरी जशा कोसळाव्या तशा डोळ्यातील भावनांच्या सरी हुंदके देत मोकळ्या होतात .आनंदाच्या सोहळ्यात आईवडिलांना दुरावल्याच दुःख तिच्या काळजाला भेदून जाणार असतं . काळीज ओलावणार असतं . दिवसभराच्या आनंदसोहळ्याचे शेवट मात्र साश्रुंनी भरलेल्या डबडबल्या डोळ्यांनी होते.अश्रू हे मानवी मनाला जीवनभर साथ देतात. ते जीवनभऱ्याचे सोबती. आपल्याच आजूबाजूला कधी दुःखद तर कधी सुखद होऊन वावरतात. शेवटच्या क्षणाला चांगल्या वाईटच मूल्यमापन डोळ्यात साठवलेल्या स्मृतीतूनच होते. म्हणून हे जग सोडून जातांनाही आपण अश्रुंची ओटी डोळ्यात साठवून जातो आणि जन्माला येतांनाही अश्रुंची ओंजळ भरून  येतो.
.
            आयुष्यातील संघर्षच  माणसाला घडवत असतो. तावून सुलाखून तो आपल्या जीवनाला आकार देत असतो.जशी वाळवंटात हिरवळ दाटून यावी तशी दुःखाच्या  छायेतून जेव्हा सुख डोकावू लागतात.तेव्हा अश्रुंची फुले झालेली असतात.आसवांची निर्मिती ही मानवी देहाचा एक चमत्कारी साक्षात्कार आहे. बरेचदा आसवांची किंमतही मोजावी लागते.आवडत्या व्यक्तीच्या डोळ्यात आसवांची दाटी बघितली तर मनात प्रचंड काहूर माजायला लागतो.तिच्यासाठी वाटेल ते करण्याची उर्मी दाटून येते. डोळयांपुढे आकाशातील तारे तोडून आणण्याचे तरंग उठू लागतात.आकाश कवेत घेण्यायेवढे बळ अंगात संचारते अशा या आसवांची आभाळमया आयुष्यभराची आहे.


प्रा. वैशाली रितेश देशमुख
 9021172362
रा. कुही, नागपूर 

             

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?