श्वानमित्र
असे हे भूतदयावादी श्वानमित्र!
समाजात अनेक व्यतिमत्व असे असतात ज्यांची दखल खरंच घ्यावीशी वाटते. काल सहज एका बुटीक मध्ये एका मैत्रिणीसोबत गेली. गाडी थांबताच गेटपुढे किमान चार ते पाच श्वान थोडया थोडया अंतरावर बसले हॊते.कुत्रे दिसलें की जरा धस्स होतं. त्यात गावरानी कुत्र्यांच काही सांगता येत नाही.त्यांना बघताच तिथेच थबकली... हे कुत्रे याच घरापुढे का बसले असावे असा प्रश्न पडला...तेव्हा सोबत असलेली मैत्रीण म्हणाली, "ते काही करणार नाहीत.बस फक्त पुढे चलत रहा." मी एकदाचा सुस्कारा सोडला त्यांच्याकडे पुन्हा नजर टाकत चालत राहली.काही श्वान पोत्यावर आरामात ऐटीत बसलेले होते.तर काही दूध पोळीवर ताव मारत होते.त्यांना पार करतांना हृदयाचे स्पंदन अधिकच वाढलेले होते.कारण चौदा इजेक्शन घ्यावे लागतात याचे सावट मनावर होते . एकदाच मेन गेट आलं आणि मी सुटकेचा सुस्कारा सोडला. पण बघतेतर काय पुन्हा तेच दृश्य आता तर हे श्वान चिक्कार बेंच वर, बेंच खाली कुणी टेबलवर तर एक दोघे खुर्चीवर राजेशाही पद्धतीने ऐटीने बसले होते.हे सगळं चित्र बघताच आपण चुकून श्वानशॉपी मध्ये तर आलेलो नाही ना?याची खात्री करून घेतली . ते बुटीकच होते. आम्हाला बघताच बुटीकच्या ताई म्हणाल्या "घाबरू नका, ते काही करणार नाहीत."बाजूलाच दोन लेडीज कारागीर कपडे शिवण्यात गर्क होत्या. माझ्या मनात अजूनही हेच प्रश्न घोंघावत होते. इतके श्वानं इथे आलेत कुठून? यांना इथे ठेवण्यामागे काय उद्देश असावा? ताई आमच्याशी संवाद साधतांना त्या श्वानाशी संवाद साधत होत्या . "टॉमी चूप बस "," राणी बाहेर जा.", "ज्युली शांत बस" असे एक नव्हे अनेक संवाद. मला काही सुचेनास झालं....यातील कोड सोडवायचं ठरवलं.बुटीकचे काम होताच आम्ही निघालो पण माझं लक्ष त्याच गोष्टीमध्ये गुंतलेलं होत.काही प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळवायचे होते. मन कमालीचे अस्वस्थ झाले होते.शेवटी त्यांच्याशी सपंर्क साधून मी थेट संवाद साधला.
समाजात अनेक दानपुण्य करणारे लोक असतात. प्रसिद्ध मंदिरामध्ये कुणी हिरेजडीत मुकुट, कुणी नवलख्खा हार तर कुणी कोट्यावधी रुपयांची देणगी अर्पण करणारे हात दिसून येतात.भक्ती, विश्वास आणि श्रद्धा याची सांगड घालीत मोठया भक्तीभावाने हे दान मंदिरात दिल्या जाते. पण समाजात असे आगळेवेगळे व्यक्तिमत्व फार कमी बघायला मिळतात जे प्राण्यांवर निशीम प्रेम करतात.मालती राजू मैसवडे हे दांपत्य वीस वर्षांपासून ते श्वानाची सेवा करतात . जन्मजात प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा वारसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला होता. पेशाने अर्किटेक असणारे राजूदादा श्वानाची सेवा करतांना त्यांना आपल्या मुलाप्रमाणे जपतात, त्यांची काळजी घेतात,त्यांच्यावर उपचार करतात त्यांचे ऑपरेशन स्वखर्चाने करतात. त्यांच्याशी संवाद साधतांना "श्वान हा एकमेव प्राणी असा आहे जो अन्नावर जगतो, कुठलाही चारा खाऊ शकत नाही." त्यामुळे आम्ही त्यांची सेवा करतो. हे त्यांचे शब्द हृदयाला स्पर्शून गेले.एकीकडे आजच्या काळात आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकणाऱ्या मुलांची असंवेदनशीलता तर दुसरीकडे भटकणाऱ्या श्वानाची भूतदयावादी दृष्टीने येथोचित सेवा करणारे श्वानमित्र यांच्या किती विरोधाभास दिसून येतो. भूतदया बाळगून मुक्या जनावरावर प्रेम करणारे त्यांना दही भात, दूध पोळी खाऊ घालणारे प्राणीमात्रावर निर्व्याज प्रेम करणारे हे दांपत्य अनेकांना काही शिकवून जाणारे आहेत .दिसेल त्या श्वानाची सेवा करण्याचा वसा जोपसणाऱ्या या दांपत्याची दखल घ्यावीशी वाटली.कारण अशा कार्याची प्रचिती आजच्या आधुनिक काळात फार दुर्मिळच येईल.
अनेक अनुभव सांगतांना कुकी नावाची लाब्रा जातीची श्वानं किडनीच्या आजारामुळे गेल्यामुळे त्यांना डिफ्रेशनला कसे समोर जावं लागले,हेही त्या सांगून गेल्या. आजच्या काळात माणसाला माणूस म्हणून जोडून घेण्यास आपण कमी पडत आहोत. तिथे बेवारस श्वानांना प्रेम देत त्यांना अंगाखांद्यावर खेळवणे म्हणजे आश्चर्यच म्हणावं लागेल.घरात वावतांना त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे , हिवाळ्यामध्ये त्यांना पोत्यातून उब देत त्यांची काळजी घेणे यामुळे घराच्या आजूबाजूला हे श्वान बिनधास्त बसलेले असतात. आपलं दा्तृत्व स्वीकारणारे मायबाप आपल्याला गवसले आहे. जणू असेच काही हे मूकश्वान सांगून जातात."त्यांची सेवा करतांना आम्हाला दोघांनाही आतून समाधान मिळत,आम्हाला ते आमचे मुलंच वाटतात. " हे मोठया विश्वासाने त्या सांगतात . जातिवंत श्वान आपल्या घरी पाळणे,त्यांचा लाड पुरवणे ही आधुनिक काळाची फॅशन म्हणून समजू शकतो.पण खऱ्या अर्थाने रस्त्यावरील श्वानांची सेवा करणारे दांपत्य एकमेवाद्वितीय आहे. या गोष्टीची दखल घेत माणूस म्हणून आपणही काही शिकून जातो का याचे विवेचन निश्चितच प्रत्येकाने करायला हवं असं मला वाटते.
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
9021172362
Comments
Post a Comment