बाईपण भारी देवा!
अंधःकार दूर करणारा ज्ञानदाता!
5 सप्टेंबर देशभरात 'शिक्षक दिन'म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो.शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचा, गौरवाचा सन्मानाचा हा दिवस ! आपल्या समृद्ध संस्कृतीच्या जडण घडणीत ज्यांचा सिहांचा वाटा आहे अश्या संस्कृतीच्या रक्षकाच्या कर्तुत्वाला प्रणाम करणारा हा दिवस.ज्याच्या ज्ञानरुपी स्पर्शाने असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन सुवर्णमय होते, अशा ज्ञानपिपासू व्यक्तिमत्वाचा गौरवाचा हा दिवस!
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेवो महेश्वरा
गुरु :साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:
भारतीय संस्कृतीत गुरूला परमेश्वरापेक्षाही मोठं स्थान दिल्या गेले आहे.प्राचीन काळापासून आपल्या महान संस्कृतीला गुरु शिष्य परंपरा लाभली आहे. गुरु आणि शिष्याचं नातं हे निरंतर वाहणाऱ्या नदीसारखंच!पूर्वी शिक्षकास 'आचार्य ' म्हणतं, आचार्य म्हणजे आचारवान. स्वतः आदर्श जीवन आचरणात आणून विद्यार्थांकडून आचरवून घेणारा तो आचार्य. तर वेदामध्ये गुरूला अत्यंत शक्तिशाली मार्गदर्शक व अज्ञान दूर करणारा असं म्हटलं आहे.
खरा शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांच्या जीवनातला अंधकार दूर करतो. त्याच्या व्यक्तिमत्वला आकार देतो म्हणून राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचा महत्वाचा वाटा समजल्या जाते .आज शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले आहे. तांत्रिक शिक्षणाची जोड आपण कोरोना काळात अनुभवली पण शिक्षकांची जवाबदारी कुठलाही संगणक हाताळू शकतं हे याच काळात सिद्ध झालं.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भूक ही संगणक पूर्ण करू शकत नाही. संगणकाने ज्ञान, बुद्धी समृद्ध होते. पण त्या ज्ञानाला आकार देण्याचे व संस्काराची योग्य रुजवणूक करण्याचे काम शिक्षकच करू शकतात.
प्लेटो म्हणतो, "आदर्श राज्याच्या निर्मितीत शिक्षकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो."
मानवी जीवन अनुकरणशील असते इथे दिसतं तसं रुजतं म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात आवड, जिज्ञासा,आत्मविश्वासाची उर्मी निर्माण करू शकतो तो शिक्षकच .शिक्षकांवर विद्यार्थांना ज्ञानाबरोबरच मानवी मूल्यभाव देण्याची, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची त्यांच्या विचारविश्वाला आकार देण्याची महत्वपूर्ण जबादारी असते. शिक्षकाला केवळ ज्ञानदाता असून भागत नाही तर त्याला माणूस बनविणारा शिल्पकार सुद्धा व्हावा लागतो.. म्हणून विकसित राष्ट्र उभारण्यात शिक्षकाची महत्वपूर्ण जवाबदारी आहे.
आपला देश जागतिक विकासाच्या दृष्टीने मोठ्या झपाट्याने झेपावत आहे. चंद्रयाण 3 मोहीम नुकतीच यशस्वी करून आपण जगभरात मनाचे स्थान निर्माण केले आहे.पण दुसरीकडे मात्र मानवी मूल्य कामालीचे खालवत चाललेले आहे.माणसातील दुष्ट प्रवृत्ती वाढीस लागून प्रेमाचा ओलावा आटत चाललेला आहे. विद्यार्थी हा नकारात्मकता, नैराश्यवृत्तीकडे वाटचाल करून आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेण्यास तो प्रवृत्त होत आहे. असे विदारक चित्र असतांना संस्कारशील विद्यार्थी घडवणे,त्यांच्यात सकारात्मकदृष्टी निर्माण करण्याची जवाबदारी शिक्षकांची आहे.ती प्रत्येकाने पार पडायला हवी.
"जेथे जेथे शिक्षकाचा होतो बहुमान तो देश ठरतो महान. "
असे कुसुमाग्रजांनी सांगितले आहे. पण काही शिक्षकांच्या अविवेकी वागण्यामुळे शिक्षकांचा पदाचा बहुमान खालावत चाललेला आहे. मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी इथे व्यावहारिक विद्येची दुकानदारी सुरु झालेली दिसून येते.गुणवंत शिक्षकांपेक्षा धनवंत शिक्षक विद्यादानासाठी निवडला जातं आहे. असे चित्र असतांना देशात गुणवंत विद्यार्थी घडणार कसे ? हा सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न ऐरणीवर उभा आहे. पण येवढे मात्र नक्कीच सांगू शकते,जो शिक्षक वर्गातील पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकावरील विद्यार्थाच्या मनापर्यंत पोहचू शकतो तो शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनावर राज्य करू शकतो हे मात्र तितकंच खरे ! म्हणून आजचा शिक्षक विद्यादानाच्या बाबतीत प्रामाणिक असयला हवा,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता झटणारा हवा,विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिद्द निर्माण करणारा हवा, यशाची उत्तुंग झेप घेण्याची उर्मी निर्माण करणारा हवा, विकसित राष्ट्र निर्मितीचे स्वप्न बघण्यास प्रवृत्त करणारा हवा!!
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
9021172362
Comments
Post a Comment