थोडं तरी दुसऱ्यांसाठी जगता आलं पाहिजे...
थोडं तरी इतरांसाठी जगता आलं पाहिजे.....
मनीषाने दहावी पास होऊन अकरावीला आमच्या महाविद्यालयामध्ये चार वर्षाआधी प्रवेश घेतला होता. वडील मूळचे छत्तीसगडचे मोल मजुरी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात आलेले.मनीषाच्या पुन्हा दोन बहिणी त्यातील मोठीच लग्न वयाच्या अठराव्या वर्षीच झालं होत. घरच्या बिकट परिस्थितीमुळे मनीषा व तिच्यापेक्षा दोन वर्षाने मोठ्या असलेल्या बहिणीच शिक्षण आजीकडे झाले होते .तिची बहीण दहावी होताच आईकडे छत्तीसगडला निघून गेली. तर सहावीनंतर मनीषाला दहावीपर्यंत वडिलांनी पुन्हा आश्रमशाळेत टाकले. मनीषाला घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे ती मन लावून शिकत होती.दहावीत तिला 60%गूण मिळाले होते.यानंतर तिला वडिलांनी छत्तीसगडला नेले. त्यामुळे मनीषाच शिक्षण बंद झालं व ती मोल मजुरी करू लागली. शिकण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या मनीषाचं मन मात्र शाळेत गुंतलं होत.तिच्यातली शिकण्याची जिज्ञासा तिला स्वस्थ बसू देतं नव्हती. एक वर्षानंतर पुन्हा वडील मोलमजुरी करण्याकरीता महाराष्ट्रात आले . पाचगाव खदाणीत ते काम करायचे.त्यांनी मनीषाला आमच्या कॉलेजला अकरावीला ला प्रवेश दिला.
तब्बल एक वर्षाचा शिक्षणात खंड पडल्यानंतर शिकण्याच्या ओढीने मनीषा मन लावून शिकू लागली. तिची मूळ भाषा छत्तीसगडी ल्यामुळे तिला शिकण्यात अडचण असतांनाही अभ्यासाच्या सरावाने अडचणीवर मात केली वर्गात सर्वात शांत,अभ्यासू वृत्ती असलेली मनीषा प्रत्येक तास लक्ष देऊन ऐकायची . दिलेला अभ्यास, वाचन ती निरंतर करायची. परीक्षा जवळ येताच बारावीच्या विद्यार्थांना निरोप देण्याची वेळ आली. दोन वर्षाच्या सहवासानंतर विदयार्थी सोडून जाण्याचे दुःख मनाला होतेच .पण पाखरांना आकाश झेप घेण्याकरीता कसं रोकणार.सर्व विद्यार्थांना निरोप दिला.
काही दिवसातच बारावीचा निकाल लागता. एक दोन दिवसांनी मला एक फोन आला.
"हॅलो मॅम में मनीषा सोरी !"
नावं एकताच बोल बेटा....
"मॅम तुमच्याशी मला बोलायचं आहे."
मनीषा 58%मार्क घेऊन बारावी पास झाली होती. मी प्रथमतः तीच अभिनंदन केलं.
पुढे ती बोलू लागली.
"मॅम मुझे पढना है."
पापा बोलत है..
"पढाई करके कोणसा मार नोकरी में लग जाबे ;अठरा साल तक जतना करेन ते बहुत हवे... अब तुमन खुद अपण कमाई से पढाई करो..नही तो में तोर शादी करावा दुहू l"
हं बोल मी ऐकत आहे .असं म्हणतं मी तिला पुन्हा बोलत केलं.
"मॅम मुझे शादी नही करना है... मै और पढना चाहती हू,अपने पैर पे खडा होना चाहती हू!"
तिचे हे शब्द ऐकून आपल्याकडून तिची काय अपेक्षा आहे. हे मी जाणून घेण्याचा मी पुन्हा प्रयत्न केला.
"मॅम आप पापा के साथ बात करिये ना.. ओ आपकी बात सुनेंगे.. मुझे बी ए को ऍडमिशन करना है.. आप मुझे अपने घर रखेंगे क्या ?"
आपल्या मुलीने आपल्या आईकडे जशी कळ्वळीने विनंती करावी तशी मनीषा आपल्या संवेदना शब्दा शब्दातून प्रकट करीत होती.तिची शिकण्याची तळमळ बघून मनीषासाठी आपण काही करू शकतो का...या विचारानेच मी लगेच मी दुसऱ्या दिवशी तिच्या वडिलांशी संवाद साधला.
वडील म्हणाले," मॅडम हम गरीब लोग, मजुरी करके पेट भरते है... तीन बेटीयों की जवाबदारी है क्या करेंगे ?आपको मालूम है... आजकल लडकियों की कुछ ग्यारंटी नही..लडकीया भाग जाती है... उससे पहले उनकी शादी करावा देना ही ठीक है l"
मी शांततेने ऐकून त्यांना उत्तर दिले.
भैय्याजी आपकी लडकी वैसी नही है.. शांत है, सालस है,आगे पढी तो कुछ बन सकती है...
देखिये आपकी जिंदगी गिट्टी खदान में मजुरी करके गुजर गई... क्या आप चाहते है, आपकी लडकी की जिंदगी भी आपकी जैसी जाये.... आपकी बच्ची अच्छेसे पढेंगी तो उसको नोकरी लग सकती है.. क्या आप नही चाहेंगे की आपकी लडकी खुद के पैरो पे खडी हो जाये....
एवढे बोलून मी त्यांना म्हणाली देखिये मनीषा आपकी लडकी है.. आपही उसका निर्णय ले सकते है..... अगर आप तयार होंगे तो में सामने उसकी पढाई की जिम्मेदारी उठाणे के लिए तयार हू... लेकिन आप की सहमती उसके लिये जरुरी है...
असं म्हणतं मी फोन ठेवला.
खरं तर एका बरोबरीच्या मुलीची जवाबदारी घेणे खूप जोखमीदारीच काम होत. त्यामुळे आपण घेतलेला निर्णय योग्य ठरेल का ?याचा विचारही मनात घोळत होता. मनीषाला मी सांगितलं की तुझ्या वडिलांच्या सहमतीशिवाय मी तुझ्यासाठी काहीही करू शकतं नाही.
त्यानंतर मनीषाचा तब्बल आठ दिवसांनी फोन आला. ती खुशीत सांगायला लागली
"मॅम पापा आपके यहा भेजने तयार हो गये है.. में कल यहांसे निकल रही हू !"
ठरल्या प्रमाणे माझं कॉलेज सुटताच ती माझ्यासोबत सर्व सामान घेऊन नागपूरला आली.मी घरच्यांनाही या बाबतीत सांगितलेच होते. माझ्या मिस्टरांनी पण त्याकरिता होकार दिला होता. "आपली तिसरी मुलगी म्हणून आपण तीच शिक्षण पूर्ण करू "हे त्यांचे शब्द मला पुन्हा बळ देऊन गेले होते.शिवाय माझ्या दोन्ही मुलींनी तिच्या प्रेमळ स्वभामुळे तिला जुळवून घेतले होते.
ती येताच तिच्या सर्व प्रवेशाची जवाबदारी मी पार पाडली...
बी ए प्रथम वर्षाचा प्रवेश फॉर्म भरून त्यासोबतच आय टी आय ला फॉर्म भरला.ती आदिवासी वर्गातील असल्यामुळे लवकर एखाद्या कंपनीत तिला नोकरी लागावी व स्वतःच्या पायावर उभी राहावी हा उद्देश होता.अपेक्षेप्रमाणे आय टी आय मध्ये तिचा पहिल्याच यादीत नंबर लागला पण काही कागदपत्र तयार नसल्यामुळे तिला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे बी ए प्रथम वर्षाला प्रवेश घेतला.मनीषा कुहीला मुलींच्या वसतिगृहात राहू लागली. दिवाळी, पोळा, दसरा व इतर सर्वच सुट्यात ती माझ्याकडे यायची. आता तिचे आईवडील, पालक तीचे सर्वस्व आम्हीच होतो. बी ए प्रथम वर्षाला चांगल्या मार्कानी ती पास झाली. नंतर कोरोनाचा काळ सुरु झाला. त्यामुळे कॉलेज, कॉम्युटर क्लास बंद झाले.आता ती माझ्याकडे राहायला लागली. तीच पालकत्व स्वीकारून ती माझी तिसरी मुलगी झाली होती. माझ्या मुलींनीही तिला बहीण म्हणून स्विकारलेल आहे. आपल्या स्वप्नांना उभारी देतं आपल्या पंखावर प्रबळ इच्छाशक्तीचे बळ घेत ध्येय गाठण्याची गगनभरारी घेण्याची इच्छा बाळगणारी मनीषा नक्कीच एक दिवस आपलं स्वप्न पूर्ण करेल याचा मला ठाम विश्वास होता.मनीषाला पुन्हा आय टी आय ला नंबर लागला.ती आय टी आय करू लागली.या दोन वर्षात तिने कुठेही माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नव्हता .मी थकून येताच माझ्यासमोर पाण्याचा ग्लास ती घेऊन यायची.कॉलेज ला जातांना माझा टिफिन, पाण्याची बॉटल घेतली की नाही याची काळजी घ्यायची.तिच्या या कृतीमुळे तिच्यातील आमच्या विषयीच्या जिव्हाळा न बोलताही दिसून येत होता. कोरोना काळातही ती मन लावून अभ्यास करू लागली.आय टी आय चांगल्या मार्कने पास होताच तिला अप्रेंटिससाठी पाचगाव येथे विद्युत मंडळात नोकरी लागली.आज ती आपल्या पायावर उभी होण्यास सक्षम झाली आहे. सोबत बी. ए. पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी सुद्धा ती करीत आहे.आज मनीषा आठ हजार रुपये महिना कमवीत आहे.याचा आनंद मनाला होतो.तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर माणूस कुठल्याही परिस्थितीवर मात करीत आपलं जीवन घडू शकतो. हे मनिषसारख्या होतकरू मुलीने सिद्ध करून दाखवील. अशा अनेक मुली वाईट परिस्थिती अभावी शिकू शकत नाही. पण सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आपण थोडी मदत केली तर त्यांच्या जीवनाला निश्चितच आकार मिळू शकतो.माणूस स्वतःसाठी जीवनभर जगतोच पण इतरांसाठी थोडं आपल्याला जगता आलं तर त्यातून मिळणार समाधान शब्दात सांगता येत नाही.
प्रा. वैशाली रितेश देशमुख
मु. कुही, नागपूर
9021172362
Comments
Post a Comment