तू बन रणरागिणी


तू बन रणरागिणी!

खांद्यावर घेऊन, आकाश अर्धे
चला जाऊया पुढे, नव शतकाच्या
पाठीवर लिहू समानतेचे धडे

        महिलांनी महिलांच्या हक्क अधिकारासाठी दिलेल्या  लढ्याच्या स्मरणार्थ आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.जागतिक पातळीवर महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या जगभऱ्यातील रणरागिणीला आजच्या दिवशी मानाचा मुजरा ! महिलांना मतदानाचे हकक,संपत्ती हक्क ,समानतेचे हक्क ,शिक्षणाचे हक्क मिळून देण्यासाठी जागतिक पातळीवर स्त्रियांनी लढा दिला .आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची सजगता दाखवून स्त्रियांच्या आत्मभानाला जागृत केले. त्या सर्व स्त्रियांच्या नेतृत्वाला नतमस्तक होण्याचा हा दिवस !
      त्यांच्याच या लढ्यामुळे आज स्त्रिया या  प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांदयाला खांदा लावून पुढे जात आहे. अवघड क्षेत्र तिनी आपल्या जिद्दीने आणि परिश्रमाने  पादाक्रांत केले आहे . घराचा उंबरठा न ओलांडू शकणारी स्त्री आज अनेक अवघड क्षेत्रातही आपल्या कार्य कर्तृत्वामुळे भरारी घेत आहे . असे सकारात्मक चित्र असतांना  दुसरीकडे मात्र अनेक कौटुंबिक आणि सामाजिक समस्येला तिला नेहमीच समोर जावं लागत.  आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक स्त्री ही झटत असली तरी  तिला समाजात आजही दुय्यम स्थानच दिल्या जाते . सातत्याने तिच्यावर होणारे अन्याय, अत्याचार थांबलेले नाहीत ; म्हणुन ती खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाली आहे का ?...तिच्याकडे आजही समानतेच्या दृष्टीने समाज  बघतो आहे ,का ?...तिला पुर्णतः विचार करण्याचं स्वातंत्र मिळालं आहे का ? जागतिक महिला दिनाच्या निमित्याने या विषयावर खऱ्या अर्थाने चिंतन व्हायला हवे!!

             आज स्त्रिया पूर्णतः स्वातंत्र आहे. हे जरी खरे असले तरी ती स्वसामर्थ्याने आणि स्वनिर्णयतेने जगत आहे. असं म्हणणे काहीसे फोल ठरेल.कारण आजही अनेक क्षेत्रात कार्यरत असतांना तिने  मूकपणे आपल कार्यक्षेत्र सांभाळावं , कार्यक्षेत्रात होणारा अन्याय तिने गडेगुप सहन करावा, कौटुंबिक वादात तिने दोन पाऊल मागे घ्यावे, पतीच्या प्रत्येक निर्णयात तिने होकार दर्शवावा अशा एक नाही अनेक इच्छा  तिच्याकडून केल्या जातात . याच अपेक्षांचं ओझ वाहत ती कायम समाजाच्या, कुटुंबाच्या दबावाखाली जगत असते. आणि जिथे वैचारिक, भावनिक आणि सामाजिक स्वातंत्र नसते तिथे स्त्रियांच्या मनाचा होणारा कोंडमारा कायम असतो. मग ती पूर्णपणे स्वातंत्र झाली आहे; असं कस म्हणता येईल?

             आllज महिला नोकरी करते ,ती कमविते , तिला आर्थिक स्वातंत्र आहे. म्हणुन ती पुर्णतः सक्षम आहे . असं म्हणता येणार नाही तर खऱ्या अर्थाने सर्वांग दृष्टीने सामर्थ्यशाली बनायला हवी असं मला वाटतं. म्हणून  तिचा  हक्क ,समान अधिकार ,निर्णय स्वातंत्र , प्रत्येक निर्णयामध्ये तिला मिळालेलं बरोबरीचं स्थान ह्या सर्व गोष्टी महत्वपर्ण ठरतात.स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सशक्तीकरण जर पूर्णपणे आपल्या देशात घडवून आणायचं असेल तर  तिने तेवढ्याच निर्भयतेने , निढरतेने , धाडसाने प्रत्येक संकटाशी सामना करीत आत्मविश्वासपूर्वक जगायला हवे !
 समाज काय म्हणेल..लोक काय म्हणतील.. असा विचार करीत जगणे म्हणजे ती स्वतःच्या अधोगतीला कारक ठरणे होय...
     आपल्या महाराष्ट्राला अनेक शूरवीर , पराक्रमी महिलांचा वारसा लाभलेला आहे.हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा पराक्रमी पुत्र निर्माण करणाऱ्या शूर माता जिजाऊंच्या कार्याचा सुवर्ण इतिहास आपल्या पुढे आहे.त्यांचे धैर्य , कर्तृत्व,कर्तबगारी,धाडस,
 खंबीरपणा आणि नेतृत्व हे गुण जरी आपणं आत्मसात केले.तरी आपल्या मुलांना घडविण्यासाठी आणि कठीण प्रसंगाला तोंड देण्यासाठी कुठल्याही व्रत-वैकल्य करण्याची  गरज पडणार नाही.महिलांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा कळस गगनभेदी आहे. अनेक स्त्रियांनी आपले सर्वस्व व कर्तुत्व पणाला लावून आपल्या राष्ट्राला घडविण्यासाठी मोलाचे कार्य केलेले आहे . राष्ट्रमाता जिजाऊ, महाराणी येसूबाई ,राणी लक्ष्मीबाई ,अहिल्याबाई होळकर अशा कित्येक महिलांनी आपल्या धैर्यशीलतेचे आणि वीरवृतीचे दर्शन देत आपला इतिहास सुवर्णमय केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि स्वातंत्र्यासाठी सावित्रीबाईंनी जो तत्कालीन समाज व्यवस्थेविरुद्ध धाडसाने लढा उभारला तो लढा म्हणजे एकप्रकारचे अग्निदिव्यचं होते.स्वातंत्र्योत्तर काळातही सर्वोच्च पदापासून तर सर्वसामान्य पदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा कर्तुत्वशाली महिलांनी उमटवलेला आहे. त्यामुळे आधुनिक काळातील सर्वांग दृष्ट्या सक्षम असणाऱ्या स्त्रियांनी निर्भयतेने जगातला हवं!
         अनेक अडचणींना सोडविण्याचा सुवर्णमध्य म्हणजे शिक्षण....शिक्षणातून हक्काची ,अधिकाराची आणि महिला विषयक कायद्याची माहिती होते. कुठल्याही चांगल्या वाईट गोष्टीत निर्णय घेण्याचं धाडस निर्माण होते.एक स्त्री जेव्हा आपल्या पोटातील गर्भ तपासायला तयार होते तेव्हाचं तीचा  गर्भपात होत असतो .स्त्रीभ्रूण हत्येचं पाप हे तिच्या अज्ञानातून घडून येत. त्यामूळे ती पुर्णपणे शिक्षित व्हायला हवी.  तेंव्हाच ती निर्णायकदृष्ट्या  खंबीर होईल.कामाच्या ठिकाणी मानसिक छळ ,सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर तिला पेटून उठले पाहिजे . मुकाट्याने कुठलाही विकृत स्पर्श ,घाणेरडी शिवी ,विकृत नजर तिने मुकाट्याने स्वीकारू नये .आपल्या स्वरक्षणार्थ तिने आवाज उठवायला हवा ...आज स्त्री स्वरक्षणार्थ अनेक कडक कायदे अमलात आलेले आहे .त्याचा फायदा घेतं हे विकृत मनोवृत्तीचे साप ठेचायला हवे ! 
     
        पुरुष वर्गानेही स्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा .आपल्या बरोबरीने तिच्या विचाराचा सन्मान करायला हवा.तिच्याकडे आदराने बघायला हवे .समाजव्यवस्थेत स्त्रीपुरुषांचा महत्वपूर्ण वाटा असल्यामुळे दोन्ही घटकांचा सार्वांगिक विकास होणं गरजेचं आहे .यावरच या देशातील समृद्धी आणि विकास अवलंबून आहे त्यामूळे महिलांना समाजात तेवढाच मानसन्मान मिळायला हवा. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना समान वागणूक मिळायलाच हवी. याकरिता आपल्या स्वाभिमानाच्या संरक्षणार्थ तिने आत्मनिर्भयतेने आणि खंबीरतेने रणरागिणी बनून जगायला हवे!!
म्हणून महिला दिनाच्या निमित्याने एकच सांगावस वाटत...

दरिया की कसम ,मौजो की कसम 
ये ताना ,बाणा बदलेंगा
तू खुद को बदल, तू खुद को बदल 
तब हि तो जमाना बदलेंगा

प्रा .वैशाली रितेश देशमुख 
रा .कुही ,नागपूर 
९०२११७२३६२
         
       

    

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?