अनाथांची माय

अनाथांची माय शोधतांना !

       पद्मश्री सिंधूताई सपकाळ अनाथांसाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेणाऱ्या माई आज आपल्यात नाहीत.एकचवेळी अनेकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आणि अनेक अनाथांना आपल्या हृदयाशी जोडणाऱ्या हृदयसम्राज्ञी आपल्यात नाहीत यावर विश्वास बसत नाही.न भुतो न भविष्यति.. असेच त्यांचे कार्य आणि कर्तुत्व ! जेव्हा असे महान कर्तृत्ववान व्यक्तीमत्व या समाजात  जन्माला येतात  तेव्हा अमौलिक कार्य सिद्धीस येते. भरकटलेल्या, दिशाहीन समाजाला योग्य दिशादर्शक त्या ठरतात. मरावे परी किर्तिरुपी उरावे.. असे त्यांचे लौकिक असते. अखंडपणे तेवत राहणाऱ्याना दीपस्तंभाप्रमाणे  समाजाला निरंतर कार्यतत्पर आणि प्रकाशमान करत असतात. अशा व्यक्ती लोकांच्या मनात कायम जीवंत असतात. सिंधूताई आपल्यात राहणार आहे युगानुयुगे!
             सिंधुताईने आपल्याला भरभरून दिलं. वाईट प्रसंगाशी लढण्याची वृत्ती , माणुसकी, परोपकारी भावना, दया, क्षमा , संस्कार,संवेदनशीलता, जिव्हाळा, प्रेम, मानवता काय काय नाही शिकवून गेल्या त्या आम्हाला..!! आज कुठल्या ग्रंथात, कुठल्या पुस्तकात त्यांच्या एवढा जीवंत आदर्श सापडेल का ? मानव असण्याचा गर्भित अर्थ काय असतो त्यांनीच आपल्याला उलगडून दाखविला आहे.
       संघर्षमय जीवनातून अनेक यातना त्यांनी सोसल्या होत्या पण त्या थोड्याही डगमगल्या नाहीत. उलट त्या अधिकच कणखर होत गेल्या. अल्पवयातच लग्न झालेल्या सिंधूताईच्या भोगवाट्याचे चटके असह्य होते. पण त्यांना स्वतःवर विश्वास होता. त्यांच्यासारखी आलेल्या प्रसंगाशी सामना करण्याची जिज्ञासा आपणं जोपासली तर जीवनातील सारे कठीण प्रश्न सुटतील... जेव्हां अनेक स्त्रिया मुकाट्याने अल्पश्या मोबदल्यात गाईचे शेण काढायच्या त्यावेळी सिंधूताईचं काळीज अन्यायाविरुध्द पेटून उठायाचं... तेवढा निर्भिडपणा आजच्या स्त्रियांमध्ये भिनला तर  होणाऱ्या अन्यायाला ती ठामपणे उत्तर देऊ शकेल.  सिंधूताई नियतीशी झुंज देणाऱ्या रणरागिणी होत्या...कुटुंबाने, समाजाने त्यांची जेव्हा हेटाळणी केली तेव्हा त्यांनी जगणं सोडलं नाही.स्वतःचा मार्ग त्या शोधत गेल्या.आलेल्या कठीण प्रसंगाला त्यांनी ठामपणे उत्तर दिले.आज कौटुंबिक छळाला घाबरून चिमुकल्या बाळाला पोटाशी धरून क्षणार्धात स्वतःला संपविणाऱ्या माता भगिनी आपण बघतोच..इतकी हतबलता, इतकी लाचारी  माईंनी दाखविली असती तर लोखो अनाथांची माई सिंधताई अनेकांचे छत्र बनू शकली नसती.  त्या निर्भय होत्या... जीवन संपवून त्यांनी स्वतःची पळवाट शोधली नाही. तर त्या स्वयंसिद्ध झाल्यात. इतरांना त्यांनी जगण्याची उर्मी दिली.
          सिंधूताईला जेव्हा पुण्यात रस्त्यावर एक अनाथ मुलगा दिसतो तेंव्हा त्या मुलाला छत्र देतात पुढे अनेक अनाथ  निराधार मुलांना त्या आपल्या पदराखाली घेतात. निराधार प्रवासाचे असंख्य चटके  त्यांनी अनुभवले असल्यामुळें  या यातना मुलांच्या वाट्याला येऊ नये याकरीता त्यांचं मातृहृदय पाझरते.निराश्रीतांच्या कल्याणार्थ त्या आपल्या पोटच्या मुलीला दुरावतात. अनाथ,निराधार मुलांच्या हितार्थ स्वतःच्या मुलीला दूर ठेवणारी अशी मायमाऊली पुन्हा आपल्याला भेटेल का?
        माई आपल्याला सोडुन जाताच अनेकांनी त्यांची मोबाईलवर डी पी ठेवली, अनेकांनी साश्रू नयनांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली, अनेकांनी सोशल मीडियावरून त्यांच्या कार्याचे व्हिडिओ प्रसारित केलेत. पण खऱ्या अर्थाने जर त्यांना आपल्याला श्रध्दांजली वाहायची असेल तर त्यांच्या कार्याचे दीपस्तंभ कायम तेवत ठेवायला हवेत...!!
                 आज नेक अनाथ , निराश्रित मुल सिंधुताई सारख्या आईची वाट बघत असतील.... अनाथ प्रेमाला पारखी झालेली मुलं माईंसारख्या प्रेमस्पर्शासाठी आतुरलेले असतील. कधी कचराकुंडीत, तर कधी नाल्याच्या , रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या नवजात बालकांच्या नजरा आपल्या रक्षणार्थ सिंधूताई सारखे हात आपल्याला मायेने  गोंजारत काळजाच्या जवळ घेतील का?.. याची वाट बघत असतील. ते हात, ते छत्र  निराधारांना कायम मिळणे गरजेचे आहे.सिंधूताई आपल्यात नाहीत मात्र प्रत्येकांच्या काळजात मात्र त्या जीवंत आहे.
त्यांच्या एवढं प्रगाढ कार्य आपणं करू शकणार नाही. पण असे एक एक हाथ एका एका निराधार हाताला पकडायला समाजात समोर आलेत. तर अनेकांचे जीवन घडू शकेल. निराधार बालकांना हक्काचं छत्र मिळेल. माईंना तीच खरी श्रध्दांजली ठरेल! 

प्रा.वैशाली रितेश देशमुख
मु. कुही, नागपूर
९०२११७२३६२

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?