माणूस द्या मज माणूस द्या!

*माणूस द्या मज माणूस माणूस द्या...

माणूस द्या मज माणूस द्या
ही भीक मागता प्रभू दिसला 
लोक दर्शना जाती देव दिसावा म्हणूनिया
तर देव बोले मज माणूस न दिसे
अजब तमाशा हा कसला
माणूस द्या मज....

      राष्ट्रसंत तुकडोजी  महाराजांच हे भजन आजच्या युगाला अगदी तंतोतंत लागू पडतो. अस नाही का वाटत? आज माणूस नावाचा प्राणी दिसेनासा झाला हो...! कुठे हरवलाय हा माणूस? कुठे शोधता येईल का त्याला?.. देवालाही तो दिसेनासा झाला असं असल्यावर आपण तर सामान्य माणूस मग भेटल का कुणाला हा माणूस ? 

हृदयाचा जो सरळ असे
सर्वांवरी जो प्रेम करी
कुटील नको असला तसला
माणूस द्या मज...

         माणूस शोधतांना  राष्ट्रसंत म्हणतात. तो सर्व जीवसृष्टीवर प्रेम करणारा असावा, तो सरळ मनाचा, ह्रुदयात कुठल्याही वाईट भावना ठेवणारा नसावा, त्याच मन हे कुटील भावनेने पछाडलेलं नसावें, त्याने कुणाचं वाईट चिंतू नये.. कुणालाही फसवू नये, तो सोज्वळ, सहृदयी, संवेदनशील , प्रांजळ मनाचा असावा.. तो कपटी, स्वार्थी, क्रोधी, लोभी, अहंकारी वृत्तीचा नसावा... त्याच्या हृदयात प्रेम, माया, ममता, आपुलकी असावी.... ही शिकवण सर्व संत मंडळीनी आपल्याला दिली. प्रपंच आणि परमार्थ कसा साधावा, स्त्री सन्मान आणि परोपकारी वृत्ती कशी जोपासावी याची जाणीवही भजन, कीर्तनातून त्यांनी करून दिली... एवढच नाही तर देव देवळात नाही तर माणसात असतो हेही समजवून सांगितले. पण आपल दुर्दैव असे की माणूस माणुसकीचा गहिवर  विसरून बसला. म्हणूनच तर महाराष्ट्राच्या या पावन भूमीत रोजचे स्त्री अत्याचार होतात, रोजच खून पाडले जातात , लहान मुलांची तस्करी केल्या जाते, कित्येक लोक भुकेने तडफडून मरतात, भ्रष्टाचाराचा पुर वाहतो , इथे रोजची हिंसा, चोरी, लबाडी, फसवणूक, जीव घेणे, जीव देणे याचीच रेलचेल.... हेच आमच्या सुधारित, सुसंस्कृत, देशाचं वास्तव चित्र...सगळ काही मनाला सुन्न करणारं..!!

        माणसा माणसा कधी होशील माणूस
         लोभासाठी कसा झाला रे कानुस..

       अशा वेळी बहिणाबाई चौधरींच्या वरील ओळी आठवतात. माणसाने आपल्या  बुध्दीच्या कौशल्याच्या बळावर देशाचं नंदनवन  तर केलं.पण तो याच नदांवणात आपली अभ्यता, संवेनशीलता हरवून बसलेला आहे. रोज घडत असलेल्या स्त्री अत्याचाराच्या  घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. पाशवी वृत्तीने झपाटलेल्या ह्या विकृत माणसाच्या टोळ्या  निरपराध , निरागस मुलींचा , अगतिक स्त्रियांचा जीव घेऊन जातात.आपल्या कौर्याची  परिसीमा गाठून स्त्री देहाची विटंबना करतात. आणि असं करतांना हे नराधम आपणही स्त्री देहातूनचं जन्माला आलो  हे पण विसरून बसतात.  
               आपला प्रगत देश कुठल्या मार्गाने जातोय याचं गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवं...अशा अमानुष घटना घडणे आता नित्यप्राय झालेल्या आहे.  स्त्रियांवरील अत्याचाराच्या या निरंतर होणाऱ्या घटना अनेक कठोर कायदे करूनही थांबवू  शकलो नाही हे आपल्या देशातील दुर्दैवंच म्हणावं लागेल. स्त्रियांवरील वारंवार घडणाऱ्या घटना या देशाची प्रतिमा कलंकित  करणाऱ्या  तर आहेच पण देशाला देशोधडीला नेणाऱ्या सुद्धा आहेत,हे विसरून चालणारं नाही.आधुनिकतेची  झूल पांघरून आज मानव सूटबूट घालून वावरतोय, मोठमोठ्या साधन सामुग्रीचा वापर करतोय, सुखसंपन्नेत जीवन जगतोय, आधुनिकतेचा आव आणतोय पण या  सगळ्या बेगडी रचना त्याला सुसंस्कृत बनविण्यास अपुऱ्या ठरल्यात हे नाकारता येतं  नाही.आपल्या आधुनिकतेचा ढोल त्याने  कितीही वाजवला तरी तो निरपेक्ष,निर्भय, सुसंस्कारशाली आणि सुरक्षित  समाज तो  निर्माण करू शकला नाही हे शल्य त्याला कायम जोपासावे लागणार आहे. स्त्री अत्याचाराने बरबटलेल्या या समाजव्यवस्थेला आधुनिक नावाच्या वांझोट्या वलयाची झूल पांघरून देणं योग्य ठरणारं नाही असं मला वाटतं.  स्त्री अत्याचाराच्या या कायमरूपी श्रुंखलेमुळे समोर येणारं माणसातील पशुत्व ,   समाजातील विकृतीचा निर्लज्यपणा चव्हाट्यावर येतोय. निर्ढावलेली विकृती ही माणसातली पशुत्वातली ओळख करून देणारी ठरतेय.हे सत्य किती दिवस आपण लपविणार...?
               समाजात चागलं वाईट असतच पण वाईट प्रवृत्ती जेव्हा वाढायला लागतो तेव्हा समाजाची अधोगती होते. देशात आजची राजकीय परिस्थिती बघता पक्षापक्षाची अंतर्गत लढाई, वादविवाद, आरोप प्रत्यारोप, एकमेकांना खाली खेचण्याची स्पर्धा, कुस्तीच्या आखाड्यात रंगावी तशीच आहे. माझा पक्ष इतर पक्षापेक्षा कसा श्रेष्ठ आहे. हेच दाखविण्यात आजचं खरं राजकारण रंगल असून देशातील सर्वसामन्याच्या अनेक प्रश्न दुर्लक्षित होत आहे. एकीकडे आपल्या कृषी संपन्न देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या , बेरोजगारीला कंटाळून उमद्या तरुणांच्या आत्महत्या, स्त्री आत्याच्याराचे सातत्याने न थांबणार्या घटना, वाढती माहागाई ,बेकारी,गरिबी, उपासमारीच्या समस्येने कायम होळपळणाऱ्या देशात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न  बाजूला सारून कुजक, सडक राजकारणाचे चित्र रोजच पाहायला मिळतात.. खरं तर वरील सर्व जटिल प्रश्नावर एकत्र येऊन देशाची गरिमा टिकवून ठेवण्याची नैतिक जबाबदारी आज सर्वांवर आहे. देशाला कलंकित करणारे प्रश्न एकत्र येऊन सोडवायला हवेत. माणसाला माणूसपण शिकविणारे उपक्रम इथे राबवायला हवेत... सुसंस्कृत, सभ्य माणूस कसा घडेल यावर भर द्यायला हवे,न्यायव्यवस्था सुदृढ व्हायला हव्यात, गुन्हेगारीला पांघरूण घालण्याच काम इथे होऊ नये... देशातील तरुण पिढी  चांगल्या दिशेने वाटचाल करेल यावर भर द्यायला हवेत. माणसातल पशुत्त्व संपुष्टात कस आणता येईल यावर उपाययोजना करून कठोर शिक्षेचे प्रयोजन व्हायला हवेत... एकंदरीत माणूसपण टिकवायचे प्रत्येक प्रयत्न आजच्या घडीला करणे गरजेचे आहे. एकंदरीत माणसाने  सु:खंसंपन्न, आनंदी, सुखी,समाधानी, संतुष्ट  होणे गरजेचे आहे;अन्यथा येणारा काळ  यापेक्षाही भायान, भीतीदायक असेल हे नाकारता येणार नाही!
  
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
9021172362

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?