दुरावलेल्या सावल्या!

दुरावलेल्या सावल्या !

      पृथ्वीवरील जीवसृष्टीत मानव म्हणून जन्माला येणे म्हणजे आपलं भाग्यचं म्हणावं लागेल.मानवरूपी अस्तित्व म्हणजे जीवनातला खरा हर्षोल्हास... अभिव्यक्त होणे, मुक्तपणे हसणे , एकमेकांशी संवाद साधने , नातेसबंध मित्रभाव जोपासने,एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणे ,अडचणीत एकमेकांना साथ देणे हेच मानवी जीवनाचे मूल्ये....एकंदरीत मानव म्हणून जन्माला आलो तर या सर्व संवेदना आपल्यात असल्याचं पाहिजे...जीवन जगत असतांना जीवनाचा प्रारंभ आणि शेवट हेच मानवी जीवनाचे अंतिम सत्य....बाल्यावस्थेपासून  तर  वृद्धाश्रमापर्यंतचा प्रवास प्रत्येकांना काटायचा असतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी, प्रेमभाव, नात्यातील ओलावा हा राहायला हवाचं..मृत्यू हे जीवनातील अंतिम सत्य...अमरत्वाची संजीवनी अद्यापही कुणाला गवसलेली नाही.म्हणून जीवन जगतांना नातेबंधातील ओलावा हा असावाच.. पण हा ओलावा कुठेतरी आटत चाललेला दिसतो आहे. बालपण, तारुण्य, वृद्धत्व यातून सर्वांनाच प्रवास करायचा आहे .मग वृद्धवाच्या वळणावर येताच माणूस माणसाला का दुरावतो ? ज्या अवस्थेत माणसाला आपुलकीची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, साहानुभुतीची खरी गरज असते तिथेच त्यांना दुखावल्या जात, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. एवढेच नाही तर त्यांना वृद्धाश्रमात निराधार करून सोडल्या जाते. किंवा दोन मुलं असल्यास वृध्द दापत्याला वाटून दिल्या जात त्यांची विभागणी केली जाते. त्यांना एकमेकापासून तोडल्या जात. ज्या वयात एकमेकांच्या सहवासाची नितांत गरज असते. त्याच वेळी त्यांना एकमेकापासून दूर केलं जातं. तेवढच नाही तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवून निराधार केलं जाते.
          वृध्दाश्रम म्हणजे ज्यांना संतती नाही अशां साठी  निवाऱ्यासाठी केलेली सोय एवढी माझी समज होती. पण काही वृध्दाश्रमाला भेट दिली असता आधार असूनही निराधार झालेल्या वृध्दांना बघितलं  त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःखद भाव  बघितले, आपल्या हक्काची मायेची एखादी  सावली आपल्याला भेटायला येईल याकरिता अनेकांच्या नजरा भिरभिरत होत्या.
खरतर या नजरा निराधार नव्हत्या त्यांच्या आपल्या रक्ताने त्यांना निराधार केलं होत .
  वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या वृद्धांची मुलं सुटबुट मुलं कुणी साहेब , कुणी बँक मनेजर तर कुणी मेडिकल डीन या पदावर कार्यरत आहेत असं समजल.पद, पैसा, प्रतिष्ठा, यात वृद्ध आईवडिलांची जवाबदारी न पेलवणाऱ्या असंवेदनशील मुलांचे ते मायबाप होते. जे वृद्धाश्रमात आपल्याच सावल्यांचा शोध घेत होते.खरे तर त्या वृद्धाश्रमाला महिन्याचे तीन ते चार हजार रुपये देऊन आपल्या आईवडिलांचे म्हातार वयात पांग फेडणाऱ्या या मुलांचे मुलं कोडकौतुक करावे  तरी किती हेेचं समम्ही्ह्ही या भिरभिरत्या नजरेचा शोध घेतांना एका आईच्या  भावना समजून घेतल्या तेव्हा  मन निःशब्द झाले.त्यांचे शब्द दाटून आलेत पण मुलांना दोष न देता आपल्याच नशिबाचा हा भाग असावा असं म्हणत आपल्या लेकरांच्या वागण्यावरही पांघरून घालतांना आम्ही बघितले.पण घरापासून दूर असण्याचं शल्य ,नातवाच्या भेटीची आतुरता,नात्यातील ताटातूट, वेदना, विरह मात्र लपवू शकले नाहीत. मुलगा मनेजर असून आईवडिलांना दोन वेगळ्या वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या , एका असंवेदनशील मुलाच्या वृद्ध आईचीही भेट झाली .वार्धक्यात जिथे दोघांनाही एकमेकांच्या सहनुभूची गरज असते,  अशावेळी जन्मदात्याला दूर करतांना काळजातला ओलावा कुठे आटला असावा ? ..एका रिटायर्ड झालेल्या  वृद्ध जोडप्याने स्वतःहून नेहमी होणाऱ्या हेटाळणीमुळे , कटकटीमुळे आपलं घर सोडलं होत..."आता मुलगा सून आनंदी राहोत म्हणजे झालं;आम्ही इथे सुखी आहोत!"असे म्हणणारे वृद्ध जोडपेही  दिसलेत .ज्यांनी  एकमेकांना सावरत वृद्धाश्रमाला आपलं कुटुंब मानलं होत. एका वृद्ध आजोबांची एकच मुलगी होती जी फॉरेन ला गेली होती . म्हणून वृद्धाश्रमात ते दखल झाले होते. मुलीची आठवण आली की ते तिला भेटून येतात. इंग्लिश मध्ये कॉमेडी करून ते तिथे असणाऱ्या सर्वांना हसवून बघतात .असे वेगवेगळे अनुभव घेत. आम्ही परत फिरलो. पण अनेक विचार मनात घोंगावत होते .ज्यांना आधार नाही ,जी एकटी आहेत,अशा वृद्धांना वृद्धाश्रमात निवारा शोधने मान्य आहे.जे परदेशात आहेत त्यांचीही अडचण मान्य आहे. पण ज्यांना कुठलीच अडचण नाही अशा मुलांनी  आपल्या आईवडिलांना निराधार करणं, म्हणजे माणसातल्या बोथट होत चाललेल्या वृत्तीची ओळख करून देणे होय. जे फारचं वेदनादायी आहे .
       जगात चांगलं वाईट हे असतच... आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देणारे हात जिथे आहेत ; तिथे मायेचा ओलावा देणारे अनेक हात सुद्धा आहेतच.वृद्धाश्रमाला अनेक लोक भेटी देतात. मृत्यूनंतर वृद्धांच्या  दशक्रियेची जवाबदारी कुणी उचलेली आहे .तर कुणी  वर्षभऱ्याच्या साखरेची... अनेक लोक आपले वाढदिवस तिथल्या लोकांना अन्नदान करून साजरा करतात. कपडे, किराणा, गो दान,अनेक गरजेच्या वस्तू तर कुणी रोख रकमेच्या मार्फत वृद्धाश्रमाला भरभरून देतात.तिथे जात, धर्म, पंथ यातील हेवेदावे नाही. प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी बंधुभावणे राहतात. आता हेच त्यांच कुटूंब...  भेटायला येणाऱ्या अनेक मायेच्या सावल्या आपलं प्रेम, जिव्हाळा ,आपुलकी, आदर त्यांना देऊन जातात.पण जवळच्या सावल्या मात्र दुरावलेल्या असतात .कधीही जवळ न येण्यासाठी..!!
सरते शेवटी एकच म्हणावसं वाटतं

क्यू बोझ हो जाते है वो झुके
हुए कंधे साहब,
जिन पर चढ कर कभी तुम दुनिया,
देखा करते थे...

प्रा .वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
7420850376 

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?