द रिअल फायटर यंग मॅन

द रिअल फायटर यंग मॅन !
(मृत्यूला हरविणारा माणूस )
    
          ही कहाणी आहे, बारा वर्षापासून मृत्यूला झुंज देणाऱ्या एका जाहाबाज तरुणाची...मृत्यूला हरविणाऱ्या ' द रिअल फायटर यंग मॅन ' ची दखल आपण सर्वांनी घ्यावी हाच  या कथेमागचा उद्देश  !!
        तेरा वर्षांपूर्वी गोविंदला एका खाजगी सहकारी संस्थेत नोकरी लागली होती. अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाने त्याने  अधिकाऱ्यांचे मन जिंकून  घेतले होते. सुरेख हस्ताक्षर, कॉप्युटरच विशेष ज्ञान, हसमुख, सर्वांना आपलं करणारा स्वभाव आणि मेहनत करण्याची जिद्द बघून त्याला लवकरच नोकरीमध्ये बढती मिळाली. नागपूरहून उमरेड शाखेला त्याची नियुक्ती करण्यात आली . याचंबरोबर त्याचा रोजचा नागपूर ते उमरेड प्रवास सुरु झाला. काहीवर्षे सुरळीत  गेले पण  नियतीला मात्र काही वेगळंच साध्य करायचं होत .एखादा चातक पक्षी उंच उंच भरारी घेऊन आपल्या विश्वात रमावा आणि अलबत त्याचं वेळी त्याच्या पंखावर अनपेक्षितपणे  वार होऊन  तो क्षणार्धात खाली कोसळावा असंच काहीस गोविंदशी झालं. 
         नेहमीप्रमाणे गोविंद  उमरेडला जायला निघाला. एका खाजगी ट्रक्सद्वारे प्रवासाला  सुरुवात झाली.तो दिवस होता अकरा जानेवारी दोन हजार सात. घड्याळीमध्ये नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटे झाली  होती.  तीच ती भयानक वेळ ...ज्यामुळे गोविंदच हसतं खेळत आयुष्य क्षणार्धात उध्वस्त झालं.त्यानंतर नियतीने त्याला कधीही उठू दिले नाही.  क्षणार्धात त्याच्या डोळ्या समोर अंधार दाटला.अनपेक्षितपणे  काळाने त्याच्यावर फार मोठी झडप घातली होती. सर्वत्र किंकाळ्या, रडण्याचा आक्रंद , रक्ताचे लोट वाहू लागले होते. कुणी जखमी अवस्थेत रक्तबंबाळ तर कुणी बेशुद्ध अवस्थेत निपचित पडलेले होते.  गोविंद सीटच्या आतमध्ये  बेशुद्ध अवस्थेत फसला गेला होता.लगेच बघणाऱ्यांनी गर्दी केली. जमेल त्यांच्या घरी फोन लावले . जखमी अवस्थेत असणाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी गोविंदाच्या   घरच्यांना कळताच गोविंदला  खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचाराला सुरवात झाली. डॉक्टरच्या निकषात  मनाला सुन्न करणारी धक्कादायक माहिती पुढे आली. गोविंदच्या पाठीमागच्या मणक्याचे तंतू  पूर्णतः तुटल्या  गेले होते . मणक्यातील तंतूंच्या निष्क्रियतेमूळे  त्याच्या कंबरेखालील शरीर पूर्णतः निष्क्रिय, निर्जीव  झाला  होता. आता त्याला इथून कधीच जीवनात उभ राहता येणार नव्हतं. आपल्याकडून जे उपाय होईल ते सर्व डॉक्टरांनी करून चुकले होते. देश परदेशात यावर आता कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता. आता पुढचा प्रवास पूर्णतः थांबला होता. 
         क्षणार्धात उडणाऱ्या पक्ष्याचे पंख गळून पडावेत आणि शरीर पूर्णतः निपचित पडावं, अगदी तसंच गोविंदशी घडलं होत. गोविंद या दुःखातून पूर्णतः सावरलाही नव्हता. अशा वेळी त्याची पत्नी आपल्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन  कायमची घरातून निघून गेली.ज्या नात्याने या अवस्थेत सर्वांत जास्त हिंमत, धीर, सहानुभूती दाखवायला हवी होती तेच नातं दुरावलं होत.  कदाचित तीने त्याच्या जागेवर स्वतःला ठेवून बघीतलं असतं तर शरीरापेक्षा मनाची हाक तिला ऐकू आली असती. पण या जगात सर्वच त्याग, समर्पण करणारे असतात  तरी कुठे ?  
   
      जगात सर्व काही हरेल पण  कितीही वादळवारं आल तरीही आपल्या पिल्लांच रक्षण करणाऱ मातृत्व मात्र हरतं नाही.  जगातील सर्व नात्यापलीकडील नातं म्हणजे आईवडिलांचं प्रेम ! ज्या नात्याला जगातील कुठतीच किंमत तोलू शकतं नाही.गोविंदला आईवडिलांच्या प्रेमाने तुटू दिल नाही. आपल्या तरुण मुलाचे दुःख त्यांनी वाटून घेतले. त्याच्या पंखात जगण्याची उर्मी जागवली.  त्याला धीर दिला. जीवनाशी संघर्ष करण्याची चेतना जागवली. जीवनाच्या या रंगमंचावर उमेदीची एक आस जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची शक्ती माणसाला देते.याबरोबरच आता फायटर यंग मॅन आपल्या न सोसणाऱ्या दुःखाच्या कळा सोसू लागला. आपल्या जीवनात आलेलं दुःख पचवून आपल्यावर जीवापाड प्रेम, दिवसरात्र सेवा करणाऱ्या आपल्या  आईवडिलांचं दुःख आपल्या दुःखापुढे त्याला मोठं दिसू लागलं. "आज मी जगतो आहे ते फक्त माझ्या आईवडिलांच्या हिमंतीमुळे ;नाहीतर कधीचच मी हरलो असतो. " हे शब्द गोविंदाचे होते. आपलं आभाळाएवढं दुःख पचवून तो हसून जीवन जगायला शिकला तो त्याच्या  जन्मदात्यामुळेच !!
    आलेलं दुःख  त्याने समर्थपणे स्वीकारलं . गोविंदाच्या मनाची खोली  सागरापेक्षाही मोठी ठरवी अशीच आहे. त्यात किती दुःख, किती वेदना, किती विरह त्याने पचवले असतील त्याचा ठाव कुणीही घेऊ शकणार नाही. आजही  आपल्या चेहऱ्यावरचं दुःख तो  कुणाला दिसू देतं नाही.अशा अवस्थेला लढा देतं  त्याने बारा वर्ष काढलीत.  खचून न जाता, निराश न होता, एकाच जागेवर स्थीरतेचे  जीवन जगणं किती अवघड असते ? पण गोविंद आजही त्याचं उर्मीत जगतांना दिसतो आहे. चौदा वर्ष रामाने वनवासात काढले.त्यानंतर वनवास संपला पण गोविदांचा वनवास अजूनही  संपलेला नाही. त्याच्या उपचारास अनेक प्रयत्न झालेत,भरपूर पैसा खर्च झाला पण सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.  आधुनिक उपचारही फेल ठरलेत .तरीही नशिबाला कोसत न बसता, आजही गोविंद दुसऱ्याशी सन्मानाने बोलतो आहे. जीवनात अनेक दुःख बघितले पण गोविंदचे दुःख अनेकांना दुःखाच्या खऱ्या परिभाषेची ओळख करून देते. अनेकांना दुःखाला  हरविण्याची शक्ती देते. 
     आपल्या तरुण मुलाची सातत्याने बारा  वर्षांपासून छोटया बाळाप्रमाणे सेवा करणाऱ्या आईवडिलांची हिंमत त्याच्या पाठीशी आहे. अशा अवस्थेत मुलाला बघतांना मनाची होणारी  घालमेल, होणाऱ्या वेदना, दुःख त्यांनी कसे पचवले  असतील ? मुलाची अविरत सेवा करणारे हे मातापिता धन्य आहेत.  पण नियतीला तेही बघवलं नाही. बारा वर्ष सेवा करणाऱ्या पित्यावरही काही दिवसापूर्वी काळाने झडप घातली.आता गोविंद आपल्या मायेच्या सावलीत जगतो आहे.  कोण म्हणतं देवी देवता फक्त मंदिरात असतात , ते आईवडिलांच्या रूपात आपल्या जवळ असतात फक्त त्यांना बघण्याची दृष्टी आपल्या जवळ   असायला हवी! 
         गोविंदने जीवनाला घाबरून  पळवाट शोधली नाही.तर त्याने दुःखाशी समर्थ लढा दिला.  ऐश्वर्य, वैभव असूनही मनात नकारात्मक भाव आणून आपलं जीवन संपवून टाकणाऱ्या सुशांतसिंग राजपूतलाही त्याने हरवले. पण सर्वसामान्य रिअल हिरोची दखल घेईल कोण ?  कदाचित सोशल मीडियाने अशा रियल हिरोची दखल जर घेतली असती तर समाजातील अनेक हात त्याच्या मदतीला धावून आले असते. तो ' द रिअल फायटर हिरो ' ठरला असता.सुशांतसिँग  पेक्षा अशा रिअल  हिरोला समाजासमोर आणणे महत्वाचे आहे. कारण  गोविंदपासून  असंख्य तरुणांना वाईट परिस्थितीला झुंज देण्याचं सामर्थ्य गवसू शकते.आजच्या घडीला तरुणांची सहनशीलता हरवत चाललेली आहे. जीवनाविषयी नकारात्मक बाळगून स्वतःला संपवून टाकण्याची  टोकाची भूमिका तरुण क्षणार्धात घेतात
गोविंदमात्र यातला तरुण नाही.आतून कितीही दुःख, वेदना असल्या  तरीही बाहेरून आनंदाची उधळणं कशी करावी हे गोविंदकडून शिकायला हवं.तो अनेकांना प्रेरणा देणारा दिपस्तंभ आहे.  अनेकांच्या मनाला चेतना देणारा स्फुर्तीदाता आहे . तीव्र दुःखाची खोली त्याने अनुभवली पण तो हरला नाही, खचला नाही, नियतीला दोष देतं रडत बसला नाही. त्याने दुःखाला पचविल, म्रुत्युला हरवल, नियतीशी दोन हात करणारा तो ध्येर्यवान शिपाई ठरला आहे.  या  रियल हिरोची लढाई आजही सुरूच आहे. त्याच्या या लढाईत त्याला स्पुर्ती, सामर्थ्य नेहमीच मिळतं राहिलं अशीच प्रार्थना आपण  करूयात.म्हणून साक्षात मृत्यूला  हरविणाऱ्या या लढवयाला खूप शुभेच्छा ! 'द रिअल फायटर यंग मॅन' ला मनापासून सलाम !!

आपण जर या फायटर मॅनला आर्थिक मानसिक मदत करू असाल तर त्याच्याशी प्रत्येक्षात संपर्क करा : 
गोविंद इंगोले 
फोन नंबर : 94221 25237

प्रा. वैशाली रितेश देशमुख 
रा. कुही, नागपूर 
9021172362

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?