प्रेम म्हणजे?

शाश्वत प्रेमाची परिभाषा!
(वेलेन्टाइन स्पेशल)

      
      शाश्वत प्रेमाबद्दल सांगतांना  'ययाति ' या पौराणिक कादंबरीत  सौदर्यपूर्ण शब्दात वि .स .खांडेकरांनी प्रेमाची खरी परिभाषा उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्यात ते म्हणतात," प्रेम माणसाला स्वत:च्या  पलीकडे पाहण्याची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो , मात्र ते खरंखुर प्रेम असायला हवं ! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नये .खरं प्रेम नेहमीच निस्वार्थी असतं ,निरपेक्ष असत; मग ते फुलावरल असो ,प्राण्यांवरल असो ,सृष्टीसौदर्यावरलं असो, आईवडिलांवरलं असो ,प्रियकर किंवा प्रेयसीवरलं असो,कुल ,शांती ,राष्ट्र यांच्यापैकी कुणावरही असो .... निस्वार्थी ,निरपेक्ष ,निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्माच्या विकासाची पहिली पायरी असते असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो."
          खरं तर खऱ्या प्रेमाची परिभाषा अशीच असायला हवी...पण बदलत्या आधुनिक काळाबरोबर प्रेमाचीही  परिभाषा बदलत चाललेली आहे.
प्रेम हे अकल्पित उत्पन्न होणारी भावना आहे. ती मोजून, मापून, ठरवून करता येत नाही.ती हृदयाच्या गाभ्यातून उस्फुर्तपणे निर्माण होत.माया, ममता, आपुलकी, सहानुभूती हे प्रेमाचे स्त्रोत आहे .प्रेम हे कुठेही, कधीही, आयुष्याच्या शेवटच्या टप्पापर्यंत मनात उत्पन्न होणारी प्रक्रिया आहे . त्याचा काळ वेळ ठरलेला नसतो. धर्म, भाषा, प्रांत, देश याच कुठलं बंधन नसते .ते सातासमुद्रा पलीकडेही डोकावत असतं. "ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन,जब प्यार करे कोई तो देखे केवल मन !" अशी ही प्रेमाची उत्कट भावना अनादी अनंत काळापासून चालत आलेलं मानवी मनाची एक सुंदर प्रचिती आहे. ज्याची व्याप्ती अमर्याद आहे.ती संकुचित भावनेत बंदिस्त नसतेच.
     तीच उत्कट भावना प्राण्यांतही दिसून येते.आपल्या मिठीत घेऊन झेप घेणारी वानरीन कशी पिल्लाला जपते ,आपल्या छोट्याश्या वासराला दुरावलेल्या गाईची व्यथा  हंबरण्यातून व्यक्त होते तर आपल्या चिमुकल्या पाखरांना घरट्यात न बघताच पक्षिणीची चिवचिवाट,तिच्या पंखातून होणारी फडफड तिचं प्रेम दर्शवते. हे सर्व सृष्टीतील  शाश्वत प्रेमाचं खरं रूप नाही का?
        खरं तर निसर्गातील या निर्लेप प्रेमाची मनुष्य जातीने शिकवण घ्यायला हवी.. पण दुर्दैव असं की मनुष्य जातीतील प्रेमभावना रोडावत चाललेली आहे. आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या प्रतिष्ठित मुलांच्या यादीकडे बघितलं तर आपल्या जन्मदात्या आईवडीलांना निराधार करणाऱ्या या पिढीला पुढल्या पिढीकडून कुठलीच अपेक्षा करण्याचा अधिकारचं उरणार नाही;अस मला वाटतं.
आधुनिक युगात आपण सुशिक्षित झालो, मॉर्डन झालो पण असंवेदनशील झालो हे तेवढेच वास्तवशील आहे.
      प्रेमाचा सुकाळ पडत चाललेल्या आपल्या देशात देशप्रेमाचाही सुकाळ पडतांना दिसतो आहे.देशातील राजनैतिक,समाजनैतिक, धर्मनैतिक विचार लुप्त होत त्यावर व्यवहारीकतेचा,गलिच्छ राजकरणाचा मुलामा चढतांना दिसतो आहे.तेव्हा राष्ट्रीय एकता, बंधुता टिकवायची असेल तर  राष्ट्रप्रेम हे सुद्धा निरामय, निरपेक्ष ,शाश्वत असायला हवं!
        प्रिय व्यक्तीच्या दोषासह स्वीकार     करण्याची शक्ती खऱ्या प्रेमात असते. अस म्हटल्या जातं .मग हेच प्रेम ! आजच्या युगात मरणे आणि मारण्याला का कारणीभूत ठरतं आहे ? जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, तीलाचं संपवायच,तिच्यावर ऍसिड हल्ला करायचा हे प्रेम नव्हेच. खरं प्रेम कधीच कुणाला संपवत नाही. आपल्या प्रेमाला दुःखात लोटत नाही. खरं प्रेम आवडत्या व्यक्तीच्या आनंदासाठी, सु:ख समाधानासाठी त्याग ,समर्पण  करण्यासही तयार असतं.प्रेमाची परिभाषाच बदलली की सगळंच बदलत त्या जागी आकर्षकतेला ,व्यव्हारीकतेला महत्व दिलं जात. मर्यादेच भान विसरून प्रेमवीर मोठ्यांचाही आदर विसरतात आणि निर्लज्जपणे वागतात .आंधळ्या प्रेमात आपलं सर्वस्व झोकून देणाऱ्या मुलींचा फायदा घेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला जातो.घाणेरड्या चित्रफिती तयार केल्या जातात .तेव्हा आजच्या तरुणींनीही सावध असायला हवं. प्रेम स्वार्थी ,फसवं आणि लोभी नसावं..पण ते प्रेम आजच्या तरुण पिढीच्या प्रेमात दिसून येत नाही. ते शाश्वत प्रेम नव्हेच.. प्रेम निर्भेळ, निकोप, निर्लेप असलं पाहिजे. ते एकमेकांना आनंद, विश्वास, सहानुभूती,आदर, हिंमत देणारं असावं. ते फसवं,लोभी,स्वार्थी नको. प्रेम माणसाला घडवत आणि आयुष्यातून उठवतही... !
     आज वयाच्या चौदाव्या सोळाव्या वर्षीच मुलंमुली प्रेमात पडतात .प्रेम म्हणजे काय ? हे समजण्याचंही हे वय नसतं ,अल्लडता ,विचारांची अपरिपकवत्ता ,निर्णयक्षमता या वयात नसते . फक्त आकर्षकता म्हणजे प्रेम नव्हे...अवेळी केलेल्या प्रेमात आपण आपले ध्येय ,स्वप्नं विसरून बसतो आणि मग जीवनाशी कशी राखरांगोळी होते हे कळतही नाही.जे वय शिकण्याचं ,स्वप्नं साकार करण्याचं असतं,आयुष्य घडवण्याचं असतं ; त्याचं वयात साकार न होणाऱ्या प्रेमाची धुंदी चढते.    बुद्धीला ,वयाला न पेलवणार हे प्रेम फारस टिकत नाही.परंतु जीवनाचा खरा अर्थ उलगडल्यानंतर वेळ मात्र निघून गेलेली असते. प्रेम करणे हा गुन्हा नव्हे पण तो योग्य अयोग्यतेच भान ठेवून करायला हवं.. ते संयमित असायला हवं, ते एकमेकांना आनंद, सुख, समाधान देणार हवं.. विंदा करंदीकर संयमित प्रेमानुभव व्यक्त करतांना म्हणतात या जन्माला फुटे न भाषा ;निदान पुढच्या फुटेल का ती ?
मनातील प्रेमभाव ओठापर्यंत येतो पण ते  तो प्रकट करू शकतं नाही ..हीच संयमित प्रेमाची उत्कटता असते. जी जबरदस्तीने लादल्या जात नाही.अविवेकी प्रेमातून काहीच मिळतं नाही .समाजही ते स्वीकारत नाही .कुटुंब तुटत ,नाती दुरावतात... प्रेमाच्या आणाभाका घेऊन जीवन जगता येत नाही.त्यासाठी आर्थिक समृद्धताही महत्वाची असते. प्रेम होणे ही नैसर्गिक क्रिया असली तरी मनावर अंकुश ठेऊन त्या प्रेमासाठी स्वतःला घडवणं हाच शाश्वत प्रेमाचा उद्देश असला पाहिजे.जीवन घडलं की प्रेमही मिळतं .जीवन सुखी संपन्न आणि आनंदी होते पण आपलं हे अवेळी ,अविवेकीपणाने केललं प्रेम आपलं जीवन उध्वस्त करणारं नाही ना?याचा विचारही आजच्या तरुण पिढीने नक्कीच करायला हवा!!

प्रा .वैशाली रितेश देशमुख 
रा .नागपूर 
9021172362

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?