अग्निदिव्य !
अग्निदिव्य !
शकीला एका मुस्लिम परिवारात जन्माला आलेली एक चुणचुणीत मुलगी. लहानपणापासूनच आमची ओळख. तिची आई आमच्याकडे घरकामाला यायची. आईच बोट धरून येणारी शकीला आणि माझी लवकरच मैत्री जमली.आईसोबत ती घरी आली की आम्ही मनसोक्त भाहुल्या, खेळभांडे खेळायचो. जवळपास दहावीपर्यंत ती माझ्या संपर्कात होती. शकीलाच्या परिवारात आणखी तिच्यापेक्षा मोठ्या चार बहिणी होत्या . वडिलांच छत्र लहानपणीच हरवलेले होत . त्यामुळे पाचही मुलींची जवाबदारी तिच्या आईवर होती. असं असतांना चार घराच्या मिळकतीवर चार बहिणीचे लग्न तीने लवकरच उरकवले . तीच घर माझ्या घराजवळच इंदिरानगरातील झोपडपट्टी मध्ये होत. सरकार कडून मिळालेल्या थोड्या जागेत शकीलाचा पूर्ण परिवार राहायचा. चार घरची धुणीभांडी करून तिच्या आईने अगदी लहान वयातच सर्वांचे लग्न उरकून टाकले होते. त्यामुळे शकिलाचही लग्न उरकवून आपण मोकळं व्हाव असं तिला वाटायचं . आणि तसा योगही लवकरच आला. एका जवळच्या नातेवाईकासोबत अब्दुल शकीलाच्या घरी काही कामानिमित्य आला असतांना. चुणचुणीत असलेल्या शकिलाकडे त्याच लक्ष गेलं आणि काही दिवसातच त्याने शकिलाशी आपण लग्न करायला इच्छुक असल्याचे सांगितले. तिच्या आईला तिचा हात मागितला. आपण लवकरच जवाबदारीतून मुक्त व्हावं या उद्देशाने कुठलीही चौकशी न करता तिचा विवाह उरकवून टाकला. केवळ अठरा वर्षांची शकीला जेव्हा अब्दुलच्या घरी त्याची पत्नी म्हणून गेली तेव्हा अब्दुलचा खरा चेहरा तिच्यासमोर आला. अब्दुल अस्सल दारुड्या होता. आणि विशेष म्हणजे त्याच शकिलाशी हे दुसर लग्न होत.ही गोष्ट जेव्हा शकीलाला कळली तेव्हा शकीला एका मुलीची आई झाली होती. त्यामुळे तिला आता त्याच्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता.सतत मानसिक त्रास सहन करून ती दिवस काढू लागली. पाहता पाहता दिवस निघू लागले ती तीन मुलीची आई झाली. तरीही नवरा सुधरण्याचे कुठलेच चिन्ह दिसतं नव्हते. रोजचा मानसिक छळ, मारझोड करणं हे सर्व असह्य होऊ लागल.आणि शेवटी तीने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला तिन्ही मुलींना घेऊन ती आईकडे परतली.
यासोबतच शकीलाचा खरा संघर्ष सुरु झाला . तिच्यावर आता तीन लहान मुली आणि म्हाताऱ्या आईची जवाबदारी आली होती. फक्त दहावी झालेली शकीला करेल तरी काय ?हा सर्वांत मोठा प्रश्न तिच्या समोर होता. पण म्हणतात ना कठीण परिस्थितून मार्ग शोधले तर त्यातून निघण्याचा मार्ग पण गवसतो. तीने आपल्याच आईचे भांडीधुनी करण्याचे काम स्वीकारलं. हे काम करतांना समाज काय म्हणेल याचा विचार न करता हातात मिळेल ते काम ती करू लागली. अनेक घरची धुणीभांडी आटोपली की शकीला उरलेल्या वेळेत लोकांचे कपडे प्रेस करायची. हळूहळू मुली मोठ्या होऊ लागल्या. आपल्या आईच्या मेहनीतीची त्यांना जाणीव होऊ लागली. त्यामुळे शाळा शिकत असतांना तिघीपण बहिणी आईला कुठलीही लाज न बाळगता कामात मदत करू लागल्या. साजिया, मुस्कान आणि आल्फीया रोज सकाळी उठून मन लावून अभ्यास करू लागल्या. शाळा करून अभ्यास आणि आईची मदत करून सर्वांत मोठी मुलगी दहावीला 90%गूण घेऊन उत्तीर्ण झाली. बहिणीचाच आदर्श घेत इतर दोन बहिणीनेपण मिरीट येण्याचा वसा कायम ठेवला. तिघीही हुशार बहिणी आणि बिकट परिस्थिती शिकण्याची प्रबळ इच्छा झपाटलेली असतांना. या ध्येयशील हिरकणींना शिक्षकांची सुद्धा थोडी फार मदत होत गेली. शकीला आणि माझी भेट आईकडे गेली की व्हायची.तिच्या चेहऱ्यावर कमालीचं आत्मविश्वास दिसायचा. आपल्या मुलींनी इतके मार्क घेतले. हे मोट्या उत्साहाने ती सांगायची परवा तिची आणि माझी भेट झाली आणि तिचा फोन क्रमांक मी घेतला. खूप दिवसानंतर तिच्याशी भेट खाल्यानंतर तिच्या मुली काय करतात हे जाणून घेण्यास माझा उत्साह होताच त्यामुळे मी रात्री निवांतपणे तिच्याशी संवाद साधला. आणि तिच्याकडुन संपूर्ण माहिती घेऊन मी लिहण्यास सुरवात केली. आता तिच्या मुली मोठया होऊन स्वताच्या पायावर उभ्या झाल्या होत्या. लहान पिलांमध्ये उडण्याच बळ यावं तसं तिच्या तिन्ही मुली आपल्या पायावर सक्षम झाल्या होत्या.
मोठी मुलगी साजियाला डॉक्टर बनण्याची इच्छा होती पण आर्थिक परिस्थितीमुळे तीने बारावी बी एस सी ला प्रवेश घेतला. त्यात ती उत्तम श्रेणीत पास होऊन. एम एस सी (रसायनशास्त्र )झाली. बी एड प्रथम श्रेणीत केलं. आपल्या घरी क्लास घेऊ लागली. सोबतच दोन कॉलेज मध्ये जॉब करू लागली. आणि आपल्या आईला आपल्या बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावू लागली.
दुसरी मुलगी मुस्कान ही बी एस सी होताच ह्युमन स्टडी या विषयात एम ए होऊन नेट परीक्षा उत्तीर्ण झाली. आणि आता (NGO)ला जॉब करीत आहे. शिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी सुद्धा करीत आहे. तिसरी मुलगी दहावी होताच. पॉली व त्यानंतर इंजिनियर होऊन एका कंपनीत नोकरी करीत आहे. मोठया मुलींचे लग्न आटोपले असून ती तिच्या पायावर उभी आहे. आताही शकीलाने आपले घरकाम,प्रेस करणे हा व्यवसाय सोडलेला नाही. अजून दोन मुलींच्या लग्नाच्या जवाबदारीची जान तिला असून मुलीच्या आयुष्यासाठी ती आजही झटत आहे.
शकीलाने बिकट परिस्थितीशी लढून तीन मुलींची जवाबदारी फक्त पारच पाडली नाही तर त्यांच्या पंखात कर्तृत्वाचं बळ निर्माण केलं. परिस्थितीच डोंगर पेलवत तीने मुलींचे जीवन घडविले आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. हे कुठल्याही अग्निदिव्यापेक्षा कमी नव्हते.
अशा अनेक निराधार महिलांन समोर शकीला आदर्श ठरेल असंच तीच व्यक्तिमत्व आहे. जे बिकट परिस्थिशी कसं लढावं याचा आदर्श अनेकांपुढे ठेवून जाते. अशा या रणरागिणीला मनापासून सलाम !
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
9021172362
Comments
Post a Comment