निर्ढावलेली विकृती
निर्ढावलेली विकृती
एकतर्फी प्रेम प्रकरणातून हिंगणघाट येथील जळीत काडांची दाह क्षमलेली नसतांना, छत्तीसगड येथील दोन चौदा वर्षीय विद्यार्थिनींना जिवंत जाळल्याची घटना नुकतीच वाचण्यात आली. बलात्काराच्या प्रयत्नातून यांच्यापेक्षा वरच्या वर्गातील मुलांनी हे कृत्य केल्याचे समोर आले. त्या दोघींचाही 80%जळाल्यामूळे मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूपूर्व बयाणात त्यांच्यावर घडलेल्या दुष्कृत्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचे समजते.
अशा मनाला सुन्न करणाऱ्या घटना वाचल्यात की आपला प्रगत देश कुठल्या मार्गाने जातोय याचं गांभीर्य लक्षात येतं. समाजात अशा घटना घडणे आता नित्यप्राय झालेल्या आहे. स्त्रियांवरील अत्याचाराच्या या निरंतर होणाऱ्या घटना अनेक कठोर कायदे करूनही थांबवू शकलो नाही हे आपल्या देशातील दुर्दैवंच म्हणावं लागेल. स्त्रियांवरील वारंवार घडणाऱ्या घटना या देशाची प्रतिमा कलंकित करणाऱ्या तर आहेच पण देशाला देशोधडीला नेणाऱ्या सुद्धा आहेत,हे विसरून चालणारं नाही.आधुनिकतेची झूल पांघरून आज मानव सूटबूट घालून
वावरतोय, मोठमोठ्या साधन सामुग्रीचा वापर करतोय, सुखसंपन्नेत जीवन जगतोय, आधुनिकतेचा आव आणतोय पण या सगळ्या बेगडी रचना त्याला सुसंस्कृत बनविण्यास अपुऱ्या ठरल्यात हे नाकारता येतं नाही.आपल्या आधुनिकतेचा ढोल त्याने कितीही वाजवला तरी तो निरपेक्ष,निर्भय, सुसंस्कारशाली आणि सुरक्षित समाज तो निर्माण करू शकला नाही हे शल्य त्याला कायम जोपासावे लागणार आहे.
आधुनिक समाजात वारंवार घडणाऱ्या स्त्री अत्याचाराच्या घटना या प्रगत संस्कृतीला लहुलोहान करणाऱ्या आहेत. त्यामुळे प्रगत संस्कृतीच्या यथार्थ मार्गक्रमाने वाटचाल करणारा हा समाज स्त्री अत्याचाराच्या सत्राला थांबवू शकला नाही यापेक्षा आपली अधोगती कुठली असू शकते ? स्त्री अत्याचाराने बरबटलेल्या या समाजव्यवस्थेला आधुनिक नावाच्या वांझोट्या वलयाची झूल पांघरून देणं योग्य ठरणारं नाही असं मला वाटतं.
स्त्री अत्याचाराच्या या कायमरूपी श्रुंखलेमुळे समोर येणारं माणसातील पशुत्व , समाजातील विकृतीचा निर्लज्यपणा चव्हाट्यावर येतोय. निर्ढावलेली विकृती ही माणसातली पशुत्वातली ओळख करून देणारी ठरतेय.हे सत्य किती दिवस आपण लपविणार... एकीकडे आपण आधुनिक भारताचा कांगावा करतो तर दुसरीकडे मात्र याचं देशातील आया बहिणीही अब्रू वेशीवर टांगल्या जाते. याला काय म्हणावं ? स्त्रीयांसाठी तीच ' स्त्रीयत्व ' असणं शाप ठरणारं असेल तर तीने स्त्री जन्म का घ्यावा ? कायम असुरक्षिततेच्या वलयात ती का गुदमरावी ? कायम घरकोंडीत तीने का जीवन जगावं ? या सर्व प्रश्नांच उत्तर कोण देणार... तिचा कायम पाठपुरावा करण्यास कोण समोर धजणार... वारंवार घडणाऱ्या घटनात तिचा काय दोष ? तिच्या मुक्त संचारावर कायम निर्बंध टाकावे का.... की निर्लज्ज विकृतीच्या छाताडावर बसून तिला न्यायदान करणारे समोर येणार.... आणि न्याय मागताही आला तरी निर्ढावलेली विकृत थांबणार कशी ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणार तरी कोण ?कायम अनत्तरितच...
स्त्री अत्याचाराचे वारंवार घडणारे हे सत्र थांबणार तरी कधी ?एकीकडे माणसाने डोळे दिपवून टाकणारी प्रगती साकारली...तर दुसरीकडे मात्र माणूस जातीला कलंकित करणाऱ्या घटना रोजच घडतात. समाज झपाट्याने सुधारतोय असा बागुलबोवा आपणचं करतो मग माणसाला अधोगती कडे नेणाऱ्या घटना रोजच का घडाव्यात ?..लहान, निरागस मुली, महिला या क्रूरतेच्या बळी ठरव्यात ?
महिला अत्याचारांतर दोन दिवस मोर्चे काढून, मेणबत्या पेटवून, अभिवादन करून, जाळपोळ, रास्तारोको आंदोलन करून ही गोष्ट नेस्तरायची नाहीत हे आपल्याला कळून चुकलेत ! मग आपण वारंवार तेच का करतो ?
अनेक संशोधनाअंती सत्य समोर आलंय की हे निर्दयी कृत्य करणारी विकृती आपल्याच आजूबाजूची , ओळखीच्या नातेसंबंधातील असते. मामा, काका, दादा, अक्कल, भैया या नावावर विश्वास ठेवून जेव्हा निरागस मुली या विकृती नराधमाच्या कृत्याला बळी पडतात. आपल्याच आजूबाजूच्या , जवळच्या व्यक्तीकडून तिच्या निरागसतेचा फायदा उचलून तिच्यावर अत्याचार केला जातो आणि हे पाप उघड पडू नये यासाठी क्रूरतेने जीव घेतला जातो. आजूबाजूंच्या विकृतीने केलेला हा विश्वासघात असतो. मग विश्वास ठेवायचा कुणावर ?समाजातील चांगुलपणा कुठे हरवलाय?असे बेगडी चेहरे ओळखणार तरी कसे? हे सर्व न समजण्यापलीकडेच.
एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ला केला जातो, जिवंत जाळलं जात.. हे सर्व दृश्य पुन्हा आपण किती दिवस उघड्या डोळ्यांनी बघणार... एका घटनेची आग शांत होते ना होते दुसरी घटना पुन्हा आगेत लोटली जाते. आपल्या वासनेसाठी लहान निरागस मुलींना सावज बनून तिला मारणं म्हणजे मर्दुमकी का ?अशा हलकट प्रवृतींना समाज का पोसतो ? असे कृत्य केल्यानंतरही त्या आरोपीच्या पाठीमागे संपूर्ण त्याचे कुटूंब का उभे राहते ?त्यामुळे ही विकृती निर्ढावली तर नाही ना ?
निर्भया कांडातील आरोपींना पाच वर्षानंतर फाशी झाली.. त्या आरोपींच्या मागे असणारे वकील, त्यांचे कुटूंब होणाऱ्या फाशीला स्थगिती मिळावी यासाठी किती प्रयत्नशील होते. हे आपण बघितलंच आहे. अशा कित्येक गुन्हेगारांच्या पाठीशी त्यांच कुटूंब उभ असत... अनेकांना पुराव्या अभावी सोडलं जात.ज्यांच्यावर अत्याचार होतात त्यांना न्यायासाठी वर्षोनुवर्षो न्यायालयाच्या चौकटीवर टाचा झिजवाव्या लागतात....त्यामुळे ही विकृती निर्ढावली जाते. असे कृत्य केल्यानंतरही आपली सुटका होऊ शकते. अशी समज आरोपीला होत असावी म्हणून पुन्हा अनेक गुन्हे त्याच्या हातातून घडत असतात.
स्त्री अत्याचाराच्या घटना थांबवायच्या असेल तर त्या फक्त कायद्याने थांबणार नाही. अशा विकृतीचा बहिष्कार हा घराघरातून व्हायला हवा... मग हे कृत्य करणारे तुमचे जवळचे का असोनात... त्यांना त्यांच्या कृत्याची कठोर शिक्षा मिळायलाच हवी.. त्यांना सोडवायला कुठलेही नातेसंबध जोपासू नयेत.त्याने हे वाईट कृत्य केलंय त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी अशी भावना कठोरतेने का होईना जोपासायला हवी. केलेला गुन्हा अक्षम्य आहे अशी समज गुन्हेगाराला मिळायला हवी. त्याकरिता त्याची विकृती पुन्हा निर्ढावणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे.
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
9021172362
Comments
Post a Comment