एक हात मदतीचा
एक हात मदतीचा !
मला शिक्षण क्षेत्रात नोकरी करून जवळपास दहा वर्ष पूर्ण झालीत.या दहा वर्षात अनेक विदयार्थी हाताखालून शिकून गेलेत.हालाखीच्या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण 'कमवा आणि शिका' या तत्वावर अवलंबून असते. बरेच विदयार्थी मोल, मजुरी करून आपल्या शिक्षणाची आणि घरची जवाबदारी स्वतः उचलत असतात. शाळेसाठी लागणारे पुस्तके , कपडे, येण्याजाण्याची सोय या सर्व गोष्टी त्यांच्याच मिळकतीवर अवलंवून असते .असे अनेक विदयार्थी मी बघितले जे स्वतःला स्वतःच घडवितात. बारावीच्या बोर्ड परीक्षेची फी भरायची सोय बऱ्याच विद्यार्थ्यांकडे नसते. अशा वेळी बरेचदा आमची त्यांना मदत असतेच.त्यांच्यात प्रामाणिकपणा इतका असतो की पैसे येताच ते परतही करतात.कॉलेजमध्ये सकाळी आलेले बरेच विदयार्थी सुट्टी होताच मिळेल त्या कामावर जात असतात. कुणी घरच्या शेतात आईवडिलांना मदत करतात तर कुणी मोल मजुरी करून घरची आर्थिक परिस्थिती सावरतात. कॉलेजमधून सरळ कामावर जाणाऱ्या मुलांच्या घामाने आणि श्रमाने चिंब भिजलेला शर्ट लवकरच फाटते आणि मग त्यावर सुईदोऱ्याचे धागे सारं काही मूकपणे सांगून जातात. आर्थिक विवंचनेत होळपळणारे विदयार्थी आणि पालक यांच्यावर कुठलीही शिस्त लादतांना विचारच करावा लागतो.ना त्यांच्या जवळ शाळेचे बूट , ना शहरातील दोन जोडी गणवेश, ना टिफिन, ना पाण्याची बॉटल आणि ना कॉलेजला येण्याजाण्यास बाईक हे सारं काही त्याच्याजवळ नसतंच. सकाळचं कॉलेज आटोपलं की मिळेल ते काम करून मिळालेल्या पैशात शिक्षण आणि आईवडिलांना मदत करण्याची धडपड त्यांच्यात दिसून येते. मग कुणी लग्नाच्या पंगती वाढण्याचे ऑर्डर घेतात तर कुणी कुठल्याही दुकानात दोन पैसे मिळतील या आशेने काम करतात. अशा परिस्थितीत आमच्या ग्रामीण भागातील विदयार्थी घडत असतो. अशाच एक परिस्थितीने पिचलेल्या विद्यार्थिनीची ही कथा...जी अनेकांना बिकट परिस्थितीत शिकण्याची उर्मी देऊन जाते.
आमच्या महाविद्यालयात अकरावीत दोन वर्षाआधी मनिषाने प्रवेश घेतला होता. वडील मूळचे छत्तीसगडचे मोल मजुरी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात स्थाईक झालेले. मनीषाच्या पुन्हा दोन बहिणी त्यातील मोठीच लग्न वयाच्या अठराव्या वर्षीच निपटलेलं होत. घरच्या बिकट परिस्थितीमुळे मनीषा व तिच्यापेक्षा दोन वर्षाने मोठ्या असलेल्या बहिणीच शिक्षण आजीकडे झालं. तिची बहीण दहावी होताच आईवडिलांकडे छत्तीसगडला निघून गेली. तर सहावीनंतर मनीषाला दहावीपर्यंत वडिलांनी आश्रमशाळेत टाकले. मनीषाला घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे ती मन लावून अभ्यास करू लागली. दहावीत तिला 60%गूण मिळाले. यानंतर तिला शिक्षणाची इच्छा असूनही वडिलांनी छत्तीसगडला नेले. त्यामुळे मनीषाच शिक्षण बंद झालं व ती मोल मजुरी करू लागली. शिकण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्या मनीषाचं मन मात्र शाळेत गुंतलं होत.तिच्यातली शिकण्याची जिज्ञासा तिला स्वस्थ बसू देतं नव्हती. वडिलांच्या रोज मागे लागून शेवटी एका वर्षानंतर पुन्हा वडिलांसोबत ती महाराष्ट्रात आली.वडील कुहीजवळच पाचगाव खदाणीत काम करायचे.त्यांनी मनीषाला आमच्या कॉलेजला अकरावीला ला प्रवेश देऊन तिला हॉस्टेलला ठेवले . जिथे कुठलीच शासकीय सोय नसल्यामुळे एक वेळच्या जेवणावरच तीने दिवस काढले.
तब्बल एक वर्षाचा शिक्षणात खंड पडल्या नंतर शिकण्याच्या ओढीने आलेली मनीषा मन लावून अभ्यास करू लागली. तिची मूळ भाषा छत्तीसगडी असल्यामुळे तिला मराठी फारशी समजत नव्हते. अशा परिस्थितीत तीने लवकरच भाषेला अवगत केलं. वर्गात सर्वात शांत,अभ्यासू वृत्ती असलेली मनीषा प्रत्येक तास लक्षदेऊन ऐकायची . दिलेला अभ्यास, वाचन ती निरंतर करायची. अभ्यासाशिवाय कुठल्याच गोष्टीत ती फारस लक्ष घालायची नाही. अशातच तिचे दोन वर्ष निघून गेले. बारावीच्या विद्यार्थांना निरोप देण्याची वेळ आली. वर्ग शिक्षीका या नात्याने अनेक विदयार्थी सोडून जाण्याचे दुःख मनाला होतच असते .त्यामुळे त्यांच्याशी शेवटचा संवाद साधतांना जीवनात खूप मोठे व्हा, कर्तृत्ववान व्हा, आलेल्या वाईट परिस्थितीशी लढण्याची प्रबळ इच्छा ठेवा... तुमचे कर्तृत्व तुम्हांला घडवेल, आणि जीवनात कधीही कठीण प्रसंग आला तर खचून न जाता माझ्याशी नक्की संपर्क साधा.असा सर्वाशी संवाद साधून सर्व विद्यार्थांना निरोप दिला. जातांना प्रत्येक विद्यार्थांनी माझा फोन नंबर नोंदवून घेतला. बारावीची परीक्षा होताच मनीषाही वडिलांबरोबर छत्तीसगडला निघून गेली होती.
काही दिवसातच बारावीचा निकाल लागता. एक दोन दिवसांनी मला एक फोन आला.
"हॅलो मॅम में मनीषा सोरी !"
नावं एकताच बोल बेटा मनीषा कशी आहेस. असं मी म्हटलं...
"मॅम तुमच्याशी मला बोलायचं आहे.
मनीषा 58%मार्क घेऊन पास झाली होती. हे मला माहिती असल्यामुळे मी प्रथमतः तीच अभिनंदन केलं.
असं म्हणताच समोरून मला रडायचा आवाज आला.
मी तिला विचारल, "काय झालं बेटा.. काही अडचण आहे का ?"
ती हुंदके आवरत बोलायला लागली.
"मॅम मुझे पढना है."
लेकिन पापा बोलत है..
"पढाई करके कोणसा मार नोकरी में लग जाबे ;अठरा साल तक जतना करेन ते बहुत हवे... अब तुमन खुद अपण कमाई से पढाई करो..नही तो में तोर शादी करावा दुहू l"
हं बोल मी ऐकत आहे .असं म्हणतं मी तिला पुन्हा बोलत केलं.
"मॅम मुझे शादी नही करना है... मै और पढना चाहती हू,अपने पैर पे खडा होना चाहती हू!"
तिचे हे शब्द ऐकून आपल्याकडून तिची काय अपेक्षा आहे. हे मी जाणून घेण्याचा मी पुन्हा प्रयत्न केला.
"मॅम आप पापा के साथ बात करिये ना.. ओ आपकी बात सुनेंगे.. मुझे बी ए को ऍडमिशन करना है.. आप मुझे अपने घर रखेंगे क्या ?"
आपल्या मुलीने आपल्या आईकडे जशी कळ्वळीने विनंती करावी, अशा प्रकारे मनीषा माझ्याशी बोलत होती. तिच्या संवेदना तिच्या शब्दा शब्दातून प्रकट होत होत्या. आपण हिला काय उत्तर द्यावं कळतं नव्हतं... मनीषासाठी आपण काही करायला हवं यासाठी माझं मनही मला स्वस्थ बसू देतं नव्हतं.. त्यामुळे आपण एकदा तरी तिच्यासाठी प्रयत्न करावा असं मनापासून वाटलं. आणि मी लगेच दुसऱ्या तिच्या वडिलांशी संवाद साधला.
वडील म्हणाले," मॅडम हम गरीब लोग, मजुरी करके पेट भरते है... तीन बेटीयों की जवाबदारी है क्या करेंगे ?आपको मालूम है... आजकल लडकियों की कुछ ग्यारंटी नही..लडकीया भाग जाती है... उससे पहले उनकी शादी करावा देना ही ठीक है l"
मी शांततेने ऐकून त्यांना उत्तर दिले.
"भैय्याजी आपकी लडकी वैसी नही है.. ओ शांत है, दो साल से उसको मैने देखा है... ओ सिर्फ पढाई में ध्यान देणे वाली है..
देखिये आपकी जिंदगी गिट्टी खदान में मजुरी करणे में गुजर गई... क्या आप चाहते है, आपकी लडकी की जिंदगी भी आपकी जैसी जाये.... आप आदिवासी वर्ग में आते हो.. आपकी लडकी अगर अच्छेसे पढेंगी तो उसको नोकरी लग सकती है.. क्या आप नही चाहेंगे की आपकी लडकी खुद के पैरो पे खडी हो जाये?..देखिये मनीषा आपकी लडकी है.. आपही उसका निर्णय लिजिए... अगर आप तयार होंगे तो में सामने उसकी पढाई की जवाबदारी उठाणे के लिए तयार हू... लेकिन आप की सहमती उसके लिये जरुरी हैl"
असं म्हणतं मी फोन ठेवला.
खरं तर एका बरोबरीच्या मुलीची जवाबदारी घेणे खूप जोखमीदारीच काम होत. त्यामुळे आपण घेतलेला निर्णय योग्य ठरेल का ?याचा विचारही मनात घोळत होता. मनीषाला मी सांगून दिले होते की तुझ्या वडिलांच्या सहमतीशिवाय मी काहीही करू शकतं नाही.
त्यानंतर मनीषाचा तब्बल आठ दिवसांनी फोन आला. ती खुशीत सांगायला लागली
"मॅम पापा आपके यहा भेजने तयार हो गये है.. में कल यहांसे निकल रही हू !"
ठरल्या प्रमाणे माझं कॉलेज सुटताच ती माझ्यासोबत सर्व सामान घेऊन नागपूरला माझ्या घरी आली.मी घरच्यांनाही या बाबतीत सांगितलेच होते. माझ्या मिस्टरांनी पण त्याकरिता होकार दिला होता. "आपली तिसरी मुलगी म्हणून आपण तीच शिक्षण पूर्ण करू "हे त्यांचे शब्द मला पुन्हा बळ देऊन गेले होते.शिवाय माझ्या दोन्ही मुलींनी तिच्या प्रेमळ स्वभामुळे तिला जुळवून घेतले होते.
ती येताच तिच्या सर्व प्रवेशाची जवाबदारी मी पार पाडली...
मी नागपूरवरून रोज कुहीला अपडाऊन करत असल्यामुळे तिला कुहीतील सर्व सुखं सुविधा असलेल्या हॉस्टेल ला प्रवेश मिळवून दिला. प्रवेशाच्या वेळी एक पालक म्हणून मी तिची प्रवेश प्रक्रिया पार पाडली. बी ए प्रथम वर्षाचा प्रवेश फॉर्म भरून त्यासोबतच आय टी आय ला फॉर्म भरला. आय टी आय ला फार्म भरायच कारण म्हणजे .ती आदिवासी वर्गातील असल्यामुळे तिचा प्रवेश यादीत नंबर लागेलच हे मला माहिती होते. कमी वर्षात तिला एखादी नोकरी लागावी आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहावी असं तिच्यासाठी मनापासून वाटतं होत. शिवाय तिच्या वडिलांचा मूड केव्हा पलटेल याची ग्यारंटी नव्हती. अपेक्षेप्रमाणे आय टी आय मध्ये तिचा पहिल्याच यादीत नंबर लागला पण काही कागदपत्र तिचे तयार नसल्यामुळे तिला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे बी ए प्रथम वर्षाला मी तिला प्रवेश मिळवून दिला. मनीषा कुहीला मुलींच्या वसतिगृहात राहू लागली. दिवाळी, पोळा, दसरा व इतर सर्वच सुट्यात ती माझ्याकडे यायची. आता तिचे आईवडील, पालक तीच सर्वस्व आम्हीच होतो. तिला मी नियोजित अभ्यासाचं टाईमटेबल बनवून दिला त्याप्रमाणे ती अभ्यास करू लागली. बी ए प्रथम वर्षाला चांगल्या मार्कानी ती पास झाली. तिला सोबतच कॉम्पुटर क्लास लावून दिले होते.पण कोरोनाच्या प्रवेशामुळे कॉलेज, कॉम्युटर बंद झालं. आता ती माझ्याकडे आहे. तिच्या सर्व शालेय खर्चापासून सर्वच जवाबदारी आम्ही उचलत आहोत. गेल्या एक वर्षांपासून तीच पालकत्व माझ्या परिवाराने स्विकारलं..माझी तिसरी मुलगी म्हणून ती आमच्या घरची एक सदस्य झाली आहे. माझ्या मुलींनीही तिला बहीण म्हणून स्विकारलेल आहे.तीपण आम्हांला खूप जिव्हाळा लावते. एक सालस, शांत, हुशार असलेली आणि आपल्या स्वप्नांना उभारी देतं आपल्या पंखावर विश्वास ठेऊन ध्येय गाठण्याची प्रबळ इच्छा बाळगणारी मनीषा नक्कीच एक दिवस गगन भरारी घेईल याचा मला ठाम विश्वास आहे. मनीषाला पुन्हा आय टी आय ला प्रवेश मिळेलच आता सर्व कागतपत्रे तिचे तयार आहेत .या एका वर्षात तिने कुठेही माझ्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही.मी थकून येताच माझ्यासमोर पाण्याचा ग्लास ती घेऊन येते. कॉलेज ला जातांना माझा टिफिन, पाण्याची बॉटल ती तयार ठेवते.तिच्या या कृतीमुळे तिच्यातील आमच्या विषयीच्या जिव्हाळा न बोलताही दिसून येतात. कोरोना काळातही ती मन लावून अभ्यास करीत आहे. मला आशा आहे ती जीवनात नक्कीच यशस्वी होइल. येत्या 15जुलै ला तिचा वाढदिवस आहे त्यामुळे तिच्यावर आपण काहीतरी लिहावं असं मनातून उचंबळून आलं.जीवनात कुठल्याही पुरस्काराने जितका आनंद होत नसेल तितका आनंद मला मनीषासाठी काही करू शकली यासाठी होतो.
असे अनेक विदयार्थी असतात ज्यांना थोड्या फार आधाराची गरज असते. आपण त्यांना थोडी फार मदत केली तर निश्चितच त्यांच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळू शकते .म्हणून थोडा का होईना एक हात मदतीचा म्हणून आपण नक्कीच समोर करायला हवा ! यातच जीवनाचं खरं साफल्य लपलेलं आहे.
प्रा. वैशाली रितेश देशमुख
मु. कुही, नागपूर
9021172362
Comments
Post a Comment