झेप वादळातली !

      झेप वादळातली !

         स्त्रियांच्या शोषक वृत्तीच्या कथा आपण बऱ्याच वाचल्या असणारं !मग त्या  रामायणातील सीतेच्या वाटेला आलेल्या  भोगवाटा असो किंवा  महाभारतातील द्रौपदीच्या वाट्याला  आलेलं अग्निदिव्य!अनादी अनंत काळापासून स्त्रियांनी शोषलेले दुःखकष्टाचे चटके आणि तिच्या  असाह्यतेची  वाटचाल निरंतर सुरूच आहे.कधी ती  अबोलतेने सारं काही सहन करते तर कधी आत्मबळाच्या साह्यतेने तटस्थपणे येणाऱ्या वादळाशी झुंज देते! एकप्रकारे स्त्रीला आपलं स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्यातून तावून  सुलाकून  जीवनाच्या वाटा शोधाव्या लागतात.अशाच एका धैर्यशील , स्वयंस्फूर्त तेजाने आत्मनिर्भर झालेल्या स्त्रीचे व्यक्तिमत्व उलगडण्याचा प्रयत्न मी केला आहे. 
    शीतल नुकतीच अकरावीतून बारावीला  गेली होती. सरळ नाक, सुदंर चेहरा , लांब सडक केस, सडपातळ अंगकाठी आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य..अनेकांना आकर्षित करणारं !  तारुण्याच्या वाटेवर नुकतेच टाकलेले तिचे पाऊलं अनेकांना भुरळ पाडणारं असंच होतं . त्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये जात असतांना नेहमीच तिच्याशी भेट व्हायची. रस्त्यावर  दिसली की "ताई कॉलेज सुटलं का ?",असं विचारून  छान सुदंर हास्य द्यायची. तशी माझी आणि तिची फारशी ओळख नाही... तरीही तिला बघीतलं तर मनाला ती आपलीशी वाटायची. लहानशा  गावखेड्यातून ती सायकलने कॉलेजला  यायची.त्यामुळे आमच्यासाठी नवीनच... नंतर आम्हांला कळलं की काही वर्षांपूर्वीच आपल्या आईसोबत ती नव्या घरी, म्हणजे आपल्या सावत्र वडिलांकडे आली होती. अगदी लहान असतांनाच तिचे वडील वारले.  एका लहानशा  मुलीला घेऊन एकटं जगणं किती असह्य असते स्त्रीला ? समाजातील जागोजागी दडलेली विकृती स्त्रीला जगू देतं नाही. समाजातील वाईट  विकृतीच्या नजरा अशाच हतबल, निराधार सावजाच्या शोधात असतात.अशा वेळी ती माऊली करणारं तरी काय ?
        नातेवाईकातील एकाने  स्थळ सुचवलं आणि ती लग्नाला तयार  झाली. आपल्यापेक्षा पंधरा वर्षाने मोठा असलेल्या, व्यवसायाने शिक्षक असलेला, आणि त्यालाही बरोबरीचा एक मुलगा व मुलगी असलेल्या कुटुंबात शीतलचा इवलासा  हात पकडून तिच्या आईने नवीन  कुटुंबात  प्रवेश घेतला . साहजिकच मोठं मोठी मुलं असलेली त्या दुसऱ्या नवऱ्याची मुलं तिला व तिच्या मुलीला स्वीकारणार  कशी ?तरीही हळूहळू शीतलच्या आईने घरातील दोन्ही मुलांचे व कुटुंबातील  आप्तस्वकियांचे राग, लोभ गिळून, मनातील दुःख, अपमान पचवून सर्वांना जुळवून घेतले..... शीतललाही अनपेक्षितपणे वडिलांचं व मोठ्या भावाबहिणीच प्रेम मिळू लागलं. शीतलचा  गोड हसरा चेहरा बघून अल्पावधीतच ती सर्वांची लाडाची झाली . याचं प्रेमाच्या छायेत तीच बालपण सरल आणि ती तारुण्याच्या उंबरठ्यावर वावरू लागली. आणि मनात येणारे भाव भावनांचे खेळ सुरु झाले !
       अभी नावाच्या  मुलाच्या प्रेमात ती  पडली. हळूहळू एकमेकांशी बोलणं, भेटणं सुरु झालं... कॉलेज न करतात त्याच्या गाडीवर सैरावैरा ती फिरू लागली. ज्यांच्यावर ती प्रेम करायची तोही एक चांगल्या घरातील, दहावी होताच पॉलिटेक्निक करून चांगल्या कंपनीत नोकरीवर लागला होता. दिसायला सुंदर, आकर्षित आणि घरचा सधन... त्यामुळे शीतलला त्याच आकर्षण वाटावं  यात नवल नव्हतं! 
    दोघांनीही सोबत जगण्यामरण्याच्या  आणाभाका घेतल्या... याची चाहूल घरच्या लोकांपर्यंत पोहचली.घरचे लोक सहजासहजी  प्रेमाला स्वीकारेल असं क्वचितच घडत असावं... आणि त्यात अभी  आणि शीतल यांच्यात जाती धर्माची दरी तर होतीच.. ! त्यामुळे खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. शीतलचे कॉलेज बंद झाले. तिला घरातून निघायची, कुणाशी बोलायची, बाहेर पडायची बंदी झाली. इकडे अभी  बैचेन व्हायला लागला. आपल्या प्रेमाला कसं भेटावं... त्याच्या मनाची तगमग त्याला स्वस्थ बसू देतं नव्हती.. तिच्याशिवाय त्याला जगणं असह्य होतं होतं. शीतलही त्याला भेटायला वेडीपिशी झाली होती.  आणि अशातच एक दिवस योग्य वेळ साधून ते दोघेही पळून गेले...लग्न करून आपला संसार थाटला. शीतल दिसायला सुदंर,हुशार, गुणी, सुशील असल्यामुळे तिला अभिच्या  आईवडिलांनी स्वीकारले.. 
हळूहळू दोघांचाही संसार बहरू लागला. लहान वयातच वडिलांपासून पोरकी झालेली पोर आनंदात संसारात रमू लागली. अभीचे आईवडील तिला पोटच्या पोरीसारखे प्रेम देऊ लागले. शीतलनेही त्यांना आपल्या प्रेमळ स्वभावाने जिंकून घेतले होते . अभीने शीतलला पुढे शिकवायचा निर्णय घेतला. तिला  डी. एड. केले.अचानक एकदा अशीच तिची आणि माझी भेट नागपूरला झाली. तिच्या चेहऱ्यावरील  अतीव आनंदाचे भाव तिच्या आनंदी,सुखी संसाराची साक्ष देतं होते.  नेहमी प्रमाणे हसून "ताई !ओळखलं का मला ?" म्हणून मला साद घातली. तुला कोणी विसरू शकतं का गं ?कशी आहेस ?कुठे चालली ?या सर्व गप्पा गोष्टी करीत लगेच आम्ही  निरोप घेतला ! त्यानंतर तिची आणि माझी भेट कधीच झाली नाही. 
पण एक दोन वर्षातच एक धक्का देणारी दुःखद बातमी कानावर पडली. 
        डी. एड. होताच लग्नाच्या तब्बल तीन वर्षानंतर शीतल आई होणार होती.घरात इतक्या दिवसानंतर छोटं बाळ येणारं याचा आनंद सर्वांना सुखावून गेला  होता... काही दिवसातच शीतल एका  सुंदर मुलीची आई झाली.पण ती एक महिन्याची होताच नियतीला तीच सुखं बघवलं नाही. अनपेक्षितपणे नियतीने शीतलच्या  आयुष्यात दुसरा वार केला होता. अभिच्या  गाडीचा  घराकडे येतांना रस्त्यात अपघात झाला, आणि तो जागीच गेला होता . काळ आणि नियती कुणाला सांगून येतं नाही. हेच खरं !सकाळी निघतांना आपल्या गोंडस मुलीचा पापा घेऊन निघालेला अभी काळाच्या आड कायम गडप झाला होता. 
       कसा हा नियतीचा खेळ ?तो कुणाला कळला ?शीतलने ती छोटी असतांना जो घाव कोवळ्या हृदयावर झेलला होता. तोच घाव आता तिच्या एक महिन्याच्या मुलीवर नियतीने केला होता.  तिची एक महिन्याची लहानगी पोर पोरकी झाली होती. नियतीने एकाच माणसाकडून किती सूड उगवावा? किती क्रूरपणे परीक्षा घ्यावी ?.. हे रहस्य न समजण्यापलीकडेच होतं. पण काय करणारं ?आयुष्य हे असंच, कधी थांबेल याची शाश्वती  नाही....
      आता शीतल समोर एक नवा संघर्ष ठाकलेला होता.  जीवनातील मिळालेला घाव कधीही न भरणारा होता. पण आता तिला त्या चिमुकल्या मुलींसाठी जगायचं होत! हळूहळू तिने स्वतःला सावरलं. मुलगी थोडी मोठी होताच तिला एका शिक्षण संस्थेत नोकरी लागली.हृदयाला पडलेल्या अगणित जखमा तिने झाकून ठेवल्या होत्या ! पुढे जीवनातील अवघड वाट सर करायची होती. सोबतच अभिच्या म्हाताऱ्या आईवडिलांचा आधार व्हायचा होता. आणि तिच्या हृदयाच्या तुकड्याला प्राणापलीकडे जपून मोठं करण्याचं होतं...वडील या नात्याचं मर्म न कळणाऱ्या त्या इवलाश्या जीवाला प्रेमाची,  मायेची उब देतं तिला मोठं करायचं  ध्येय  तिच्यासमोर उभ होतं.आता तिच सर्वस्व त्यांच्यासाठी होतं.. ती आत्मविश्वासाने जगू लागली.मुलगीही हळू हळू मोठी होतं गेली. अनेकांनी तिला दुसरं लग्न कर...इतकं जीवन एकटी कशी घालवणारं...तुझ्या समोर तुझं पूर्ण जीवन पडलं आहे तेव्हा एक जीवनसाथी शोध.... हे एकदा नाही अनेकदा तिच्या कानांनी ऐकले... पण  शीतलच मात्र एकच लक्ष होतं... जीवनात आलेल्या भोगवाटा पुन्हा तिला सोसायच्या नव्हत्या..त्यामुळे आलेला प्रत्येक क्षण ती मुलींसाठी जगणार होती. दिवस पुढे सरकत गेले. आता तिची मुलगी सातवीत आहे. त्या दिवशी अचानक फेसबुकला तिची भेट झाली  आणि लगेच संवाद साधला शीतल आत्मविश्वासाने म्हणाली, ताई जीवनात खूप दुःख सोसले , पण त्या दु:खालाही  पचवून मी जगत आहे... ते माझ्या अभिच्या  आठवणीकडे बघून ! आता माझी मुलगीच माझे सर्वस्व आहे. तिचे हे शब्द ऐकून नकळत माझ्याही डोळ्यातून अश्रु मोकळे झाले.
    आयुष्य कसं  प्रत्येकालाच हळू हळू बदलून टाकत... आयुष्याने दिलं ते स्विकारणं हेच मानवी जीवन आहे. यातलं गूढ मला उमगलं  !पण एक मात्र खरं !स्त्रीच्या जीवनातील सत्वपरीक्षा  हीच तिची खरी  दिव्यपरीक्षा असते,त्यातून तावून सुलाखून निघाल्याशिवाय तिच्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतं नाही. 

प्रा. वैशाली रितेश देशमुख 
9021172362

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?