गतिशीलतेच चक्र !
गतिशीलतेचे चक्र !
मानवी जीवनात गतिशीलतेला फार महत्व आहे. गतिशीलतेचे हे चक्र अनादीअनंत काळापासून सातत्याने फिरत आहे. त्यामुळेच पूर्वी रानावनात भटकणारा मानव डोळे दिपून टाकणारे आमूलाग्र बदल करू शकला. मोठं मोठी प्रकल्पे, औद्योगिक क्षेत्रे विकसित करून मानवी जीवनाला आरामदायी,सुखसंपन्न करणारी सर्व आधुनिक साधने त्याने परिपूर्ण केली. आपल्या बुद्धीच्या प्रयत्नशील गतिशीलतेमुळे तो झपाट्याने विकास साधू शकला. मानवी जीवनाची कार्यशीलता हीच त्याच्या यशाचे गमक आहे. पण कोरोनाच्या जागतिक संकटामुळे मानवी जीवन स्थिर झाले. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर खीळ बसली.
कोरोनामुळे लॉकडाउन होताच सुरवातीचे काही दिवस सर्वांना सुखदायक वाटलेत . दिवसरात्र धावपळीच्या जीवनातून थोडा मोकळा श्वास घ्यायला उसंत मिळाली. जिव्हाळ्याचे नाती जुळली, अदृश्य झालेल्या संवादाचे वारे घरभर वाहू लागले.. चिमुकली मुले स्वछंदपणे चित्र साकारू लागले.नवनवीन कलाकृती साकारल्या जाऊ लागल्या.साहित्यातून कथा, कल्पना, कवितेची निर्मिती होऊ लागली . घराघरातून कलाकौशल्य विकसित होऊ लागले. कधी नव्हे ते चवदार पदार्थांचे खमंग घरभर पसरू लागले . घरातील सदस्यांनी एकत्रित येत, स्थिर, आनंददायी क्षण एकमेकांसोबत अनुभवले पण माणसाच्या बाह्य जीवनशैलीला जणू ब्रेकचं लागला. दिवसभर गजबजणारी बाजारपेठे ओसाड माळरानासारखी भासू लागली . वाहनांनी व्यापलेले रस्ते त्यातून निघणारे हॉर्नचे कर्कश आवाज शांत झाले. हवेला प्रदूषित करणारे विषारी वायू नष्ट होऊन शुद्ध हवेचे वारे वातावरणात वाहू लागले. चौकाचोकातील माणसाला सूचित करणाऱ्या पथदिव्यांनी, रस्त्याच्या कडेला असलेल्या विस्तीर्ण झाडांनी हे निरव शांततेचे क्षण साक्षीदार म्हणून अनुभवले. अपघाताचे दृश्य , वाहनातून निघणारे तीव्र प्रकाश, लांबसडक चोफेर रस्त्यांसाठी झाडांची होणारी कत्तल सारकाही थांबल होत. पक्षी, प्राणी मुक्तपणे आकाशात रस्त्यावर मानवी वस्तीत संचारु लागले. हवा, पाणी, जलाशये सर्व काही काही शुद्ध झाले.एकंदरीत नैसर्गिक घटकाला मोकळा श्वास घेता आला. जणूकाही माणसाच्या संचारबंदीने सर्व नैसर्गिक घटक सुखावून गेले होते .
माणसाची गतिशीलत ही माणसाला घडवते,जीवनाला आकार देते हे मात्र तितकेच खरे.. हे आपल्याही लक्षात आल असावं... कोरोनामुळे स्थिर झालेलं जीवन हळूहळू मन अस्वस्थ करायला लागलं होत. घरात घुसमट व्हायला लागली होती. जीवन कंटाळवाणं वाटायला लागले होते . स्थिर जीवन माणसाच्या जीवनाला किती हतबल,निरस बनविते, जीवनाचा अर्थच हिरावून घेते याची यथार्थ जाणीव मानवी मनाला झाली.
गतिशीलतेशिवाय मानवी जीवनाला अर्थ नाही.याची अनुभूती आता क्षणाक्षणाला होऊ लागलेली आहे. घरकोंडीत राहून तो पुरता गुदमरायला लागलेला आहे असं प्रत्येकाच्या मनातून जाणवतं...
कुंभार फिरत्या चाकावरच मडक्याला आकार देऊ शकतो. तसंच मानवी जीवनाच ! जीवन थांबलं तर त्याला आकार देणार कोण ?
मानवी जीवनचक्र हे असंच बेधुंद वाहणाऱ्या नदीसारखं असतं.. ते कधी संथपणे थांबत, वाहतं तर कधी वेडावून खळखळत सुद्धा....माणसाच्या जीवनाचही असेच त्याचे थांबणे, चालणे, धावणे हे अपेक्षित...म्हणून 'थांबला तो संपला' हे तितकेच खरे !
मानवी जीवनाची गती क्षीण झाली की ती अधोगतीकडे वळतो हे मात्र निश्चित.जीवनाची वाटचाल थांबते.त्याचा विकास खुंटतो. कोरोनामुळे माणूस स्थिर झाला, त्याला आराम झाला हे खरे... पण 'देगा हरी पलंगावरी' हे पण त्रासदायकच नाही का ? चारभिंतीत दडून राहणं किती असह्य असते ते माणसाने अनुभवलं... रिकामं बसून कष्ट, मेहनत न करता दोन वेळच आयत गिळणंही माणसाच्या जीवावर येत याचीही प्रचिती यायला लागली. सर्व काही घरात मिळतं असतांना सुद्धा माणूस घरात घसमटतो .पण घरकोंडी शिवाय पर्याय नव्हता, करणारं काय ?
आता हळूहळू आपल्याला कोरोनासोबत जीवन जगायची मानसिकता तयार होत गरजेचं आहे. सारं काही हळूहळू सुरु होत आहे. हळूहळू रस्त्यावरची वर्दळ, सर्व क्षेत्रातील व्यवहार सुरु झाली आहे.जगण्यासाठी कामाशिवाय पर्याय नाही.पोटाची भूक त्याला जास्त दिवस घरात बंदिस्त ठेऊ शकतं नाही.आणखी काही दिवस कोरोना विषाणू जाईल याची शाश्वती नाही. लॉकडाऊन निरंतर ठेवणे शक्य नाही.मानवी जीवनात
गतिशीलतेला फार महत्व असून ती लोकउन्नतीची पायरी आहे. ती ओलांडणे गरजेचे आहे.ती स्थिर झाली तर कोरोनामुळे उदभवलेल्या माहामारीपेक्षाही ती घातक ठरेल.जीवनचक्र निरंतर फिरत राहाल तरचं अर्थचक्र टिकू शकतं.अर्थचक्रावर माणसाच्या जीवनाची भिस्त व्यापलेली आहे. म्हणून आता आपल्याला शिस्तीत जगायला हवं.. आपल्या अनियंत्रित जीवनाला नियंत्रित करून त्याची ब्रेक आपल्या हातात घ्यायला हवी . माणसाच्या गतीचा वेग आवेग बनून माणसाला जीवनातून उठवू शकणार नाही याची काळजीही आपल्यालाच घ्यावी लागेल. सृष्टीवर आपण अधिराज्य गाजवू शकतो, बेभानतेने सैराचाराने वागू शकतो, संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवू शकतो, पण त्याचा अतिरेक झाला तर प्रकृतीला संकटात टाकणाऱ्या मानवजातीलाही निसर्ग सोडत नाही.आरंभी माणूस निसर्गावर स्वार झाला, आता निसर्ग माणसावर स्वार होतांना दिसतो आहे. मानवाने आपल्या हव्यासापोटी निसर्गावर केलेल्या आक्रमणामुळे निसर्गाची साखळी बिघडली आणि निसर्गही नियंत्रणात राहलेला नाही!अवेळी पडणारा पाऊस, वारंवार येतं असलेले चक्रीवादळे, टोळघाट किड्यांचा हल्ला आणि कोरोना विषाणूचा जागतिक प्रकोप याला निसर्गाचे अक्राळ विक्राळ रूपच म्हणावे लागेल...
जे एक प्रकारे मानव जातीला चेतावणी देण्यास सज्ज झालेले आहेत. त्यामुळे आता दक्ष होणे गरजेचे आहे. प्रकृतीने मानवाच्या गतिशीलतेला जो आवर घातला तो त्याला योग्य समज देण्यासाठीच ! म्हणून यापुढे त्याला प्रत्येक पाऊलं सावधतेने टाकाव लागेल.
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
9021172362
Comments
Post a Comment