जागतिक पुस्तकं दिन :पुस्तकं माझा मित्र
जागतिक पुस्तक दिन
२३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. चौदाव्या शतकात चीनमध्ये कागदाचा शोध लागल्यानंतर जर्मनी मधील जोहान्स गुटेनबर्ग याने इ.स.1436 ला मुद्र्णाचा शोध लावला.त्याने अक्षराचे खिळे तयार करून आपल्याच मुद्राणालयात 'बायबल' ची छपाई केली.त्याबरोबरच लेखनाचे अनेक दालने खुली झालीत. लिखित, प्रायोगिक तंत्रज्ञानाचे ज्ञान क्षेत्रे व्यापक बनले. ज्ञानाच्या या अथांग सागरात अनेक शब्दरूपी मौल्यवान विचार तरंगायला लागले. या शब्दरूपी सागराची रुंदी इतकी विस्तारली की ज्ञानाच्या, विचारांच्या अनेक शाखा विस्तारल्या आणि त्यात अनेक ज्ञानयोगी, विचारवंत, अभ्यासक, तत्वचिंतक, लेखक, साहित्यिक,समीक्षक इतिहासकार आपली ज्ञानतृष्णा भागवू लागले.
रानटी अवस्थेत असलेल्या या मानवाने चंद्रावर पाय ठेवण्यापर्यंत जी मजल गाठली व जोकाही आमूलाग्र बदल घडवून आणला तो काही चमत्कार नव्हे, तर पृथ्वीच्या रहस्यांत जे निर्माण झालं, जे घडलं व जे घडण्याची शक्यता आहे.ते सर्व अभ्यासण्याची व लिहण्याची कला जेव्हापासून त्याने अवगत केली, तेव्हापासून मानवी जीवन प्रगत झालं असं म्हणायला हरकत नाही !
'अनंत आमची ध्येयशक्ती, अंनत आमची आशा '
या कुसुमाग्रजांच्या ओळीप्रमाणे अवघ्या मानवजातीने आपल्या बुद्धीच्या,ज्ञानाच्या बळावर रानटी अवस्थेतील कात टाकून आपली आधुनिक अवस्थेतील ज्ञानप्राप्तीची कात धारण केली, आणि आपले जीवन समृद्ध केले.या विशाल उत्क्रांतीमध्ये मानवाच्या जडणघडणीचा इतिहास इतका रोमहर्षक आणि पराक्रमी आहे, की तो कुणालाही वाचायला आवडेलच...आज साहित्य वाड्मयातील संत वाड्मयापासून ते पंत, तंत वाड्मयापर्यंतचे समृद्ध विचारधन ग्रंथ रूपाने उपलब्ध आहे. पुस्तकामुळे आपल्याला संत ज्ञानेश्वर,नामदेव,जनाबाई एकनाथ, तुकाराम आणि रामदास हे आध्यात्मिक संत कळले. पांडित्य साहित्यातून अलंकारिक शब्द समर्थ्य प्राप्त झाले तर शाहिरी वाडःमयाच्या पोवाड्यातून या देशातील शूरवीर, सामर्थ्यशाली राजांच्या पराक्रमाचा गौरव कळला...पुस्तकांमुळे फक्त अभ्यासाच्या ज्ञानशाखाच विस्तृत होतं नाही तर आपल्याला आपल्या संस्कृतीची,परंपरेची, मूल्यांची ओळख होते. जी येणाऱ्या अनेक पिढीला प्रेरणा देते, संस्कार देते.
पुस्तकांमुळे आपल्याला थोर क्रांतिकारी, समाजसुधारकांचे थोर महात्त्मे यांचे विचार कळतात जे येणाऱ्या अनेक पिढीसाठी दिशादर्शक, प्रेरक व आदर्शशाली ठरतात.ज्यामुळे समाजात चागले विचार, मूल्य रुजतात. आपल्या देशातील विचारांची खान इतकी समृद्ध आहे की त्या ज्ञानाच्या स्पर्शाने मानव आपलं जीवन सुवर्णमय करू शकतो.
आपल्याही जीवनातील सुखदुःखात माणसापेक्षा पुस्तकांची भूमिका महत्वपूर्ण असते. पुस्तकच आपल्याला घडवतात, यशाची वाट दाखवितात , एक नवी ओळख देतात. म्हणून जीवनातील वाईट प्रसंगावर,वाईट परिस्थितीवर मात करायची असेल आणि जीवनात सुखंसंपन्नता,आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला पुस्तकांची सोबती करायला पाहिजे.
माणसाच्या वाईट प्रसंगात जवळचे मित्र दुरावू शकतात, जवळचे नातेवाईक दूरावू शकतात.पैसा माणसाजवळ येतो आणि जातो पण पुस्तकांची मात्र आपल्याला वेगळी साथ असते. पैसा आणि माणूस यांच्याप्रमाणे ते कधीही विश्वासघातकी ठरू शकतं नाही. म्हणून माणसांनी पुस्तकांशी जवळीक केली पाहिजे. अशी अनेक पुस्तके आहेत जी माणसाच्या मनात कायम घर करून राहतात. पुन्हा पुन्हा त्यांचा वाचावंसं वाटत. ही पुस्तकं आपल्याला हिंमत देतात, प्रेरणा देतात जीवनातील वाईट प्रसंगात जगायला शिकवतात.
आज आधुनिक तंत्रज्ञानाची पकड मजबूत झालेली आहे. क्षणार्धात इंटरनेटच्या माध्यमातून कुठलीही जागतिक माहिती आपल्या समोर येते. पण ज्ञानाच्या या आधुनिक रूपात ते समाधान नाही जे पुस्तकाच्या सानिध्यात आहे.. पुस्तकं हे त्या दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे आहेत जी कायम मनात दळवळ्त राहतात. न बोलताही संवाद साधणारा संवाद त्यात असतो, त्यामुळे पुस्तकांशी कायम मैत्री करावी वाटते.कुठलंही पुस्तकं वाचतांना मनाची एकाग्रता महत्वाची असते.त्यात आपले पाचही ज्ञानेंद्रिये एकवटलेले असली की त्या ज्ञानप्रवाहात स्वतःला झोकून देतं आपल्या बुद्धीला समृद्ध करतात येते. पुस्तकं माणसाला आत्मचिंतन करायला भाग पाडते.बौद्धिक विकासाला चालना देते. आपली जडणघडण करते.पुस्तकं हे असं ज्ञानरूपी अस्त्र आहे ज्यामुळे आपण जीवनातील कुठलीही कठीण लढाई जिंकू शकतो. अनेक तत्वज्ञानी,विचारवंत घडलेत ते पुस्तकाच्या सानिध्यात राहूनच. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलामांच्या व्यक्तिमत्वाला घडविण्यात पुस्तकांची महत्वपूर्ण भूमिका होती. ते नेहमी म्हणायचे,
"आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टी समजून घ्यायला हव्या, पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी ,महत्वकांक्षा हवी ;दुसरी, तिचा द्यास घ्यायला हवा, आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल असा दृढ विश्वास हवा."
हे विचार आजच्या तरुण पिढीला जोपासणं महत्वपूर्ण आहे. पुस्तकांच्या सानिध्यात राहून आपल्या ध्येय, स्वप्नांना पूर्ण करण्याचा ध्यास आजच्या पिढीला महत्वपूर्ण आहे. स्मार्ट फोनच्या सानिध्यात राहून आजची पिढी पुस्तकांपासून भरकटलेली दिसून येते. राष्ट्रहिताच्या दृष्टीने आजच्या पिढीने अपार ध्येये , विशाल स्वप्ने जोपासायला हवीत. पुस्तकांच्या सानिध्यात राहून, पुस्तकांशी मैत्री करून आपले जीवन सर्व बाजुंनी समृद्ध व तेजस्वी करायला हवे !
"सही किताब वह नहीं है, जिसे हम पढ़ते हैं. सही किताब वह है, जो हमें पढ़ती है,"
वरील ओळी प्रमाणे जी पुस्तकं आपल्यात चांगले विचार, चांगली शिकवण, चांगले मूल्य रुजवू शकतात त्या पुस्तकांची जोपासना आपण करायला हवी. चांगले मित्र जसे चांगले मार्ग दाखवितात तसे चांगले पुस्तक आपले जीवन घडवितात. बाजारात अनेक वाईट, गलिच्छ पुस्तकांची निर्मिती होतांना दिसून येतात .त्यामुळे आपल्यात वाईट विचार रुजु नये याची दक्षता आपण घ्यायला हवी !
'मूर्खहस्ते न दातव्यम, एवं वदति पुस्तकम'
असे एका संस्कृत सुभाषितात म्हटले आहे म्हणजे मुर्खांच्या हाती मला देऊ नका.असे पुस्तक म्हणतो . तेव्हा चांगले पुस्तकं आणि चांगले वाचकं एकमेकांना पूरक असायला हवे... तरचं आपली बुद्धी पारंगत, वैचारिक दृष्टीने प्रबळ व समृद्ध होऊ शकते .म्हणून कायम असेच मित्र व पुस्तकं जोपासा जे आपल्याला योग्य व सकारात्मक मार्ग दाखवेल व आपल्या जीवनात उपयुक्त ठरेल. एवढंच मी या जागतिक पुस्तकं दिनाच्या निमित्याने सांगू इच्छिते !
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कूही, नागपूर
9021172362
Comments
Post a Comment