स्त्री सक्षमीकरण :डॉ बाबासाहेब आंबेडकर

आदरणीय डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रक्रियेतून  स्त्री सक्षमीकरण 

        डॉ. बाबासाहेबांच्या विचार प्रक्रियेत स्त्री सक्षमीकरणाच्या तळामुळापर्यत आपल्याला जायचं असेल तर प्राचीनकाळापासून स्त्रीच्या दशा आणि दिशा या विषयाकडे  आपल्याला जावे  लागेलं .त्याचाच थोडक्यात परामर्श आपण घेऊयात.  भारतीय संस्कृती ही 
पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित असल्यामुळे, सुरवातीपासूनच स्त्री जातीची अवहेलना, उपेक्षा होतांना दिसून येते.पूर्वी पासून  स्त्रीला दुर्गा, काली, चंडी या देवता स्वरूपी स्त्रीयत्वाचे नावं दिलेले असले  तरीही  प्राचीन काळापासून भारतातील स्त्री ही शोषित व अन्यायग्रस्तच राहलेली होती. वेदकाळात स्त्रियांची स्थिती थोडी बरी दिसून येते.  गार्गी, मैत्रेयी, कात्यायनी, सुलभा या स्त्रिया ब्रह्मवादिनी होत्या.काही अंशी स्त्रीप्रधान संस्कृतीची छापही आपल्याला दिसून येते. म्हणून स्त्री ही सक्षम होती असं आपल्याला म्हणता येणारं नाही.  इतिहास-काळात जिजाबाई, ताराबाई, अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई इ. राजघराण्यातील स्त्रिया शूर  लढवय्या होत्या.त्याचबरोबर वाईट प्रसंगी त्या सक्षमपणे लढल्याचे दिसून येते. पण त्या अपवादात्मकच ! 

     मध्ययुगीन काळातही मुक्ताबाई, जनाबाई,  कान्होपात्रा इ. संतस्त्रियांनी अभंगरचनेतून स्त्रीच्या आध्यात्मिक मुक्तीची कल्पना मांडली,आपल्या अभंगातून प्रस्थापित समाजाविरुद्ध त्यांनी बंड पुकारले दिसून येते. तरीही तत्कालीन समाजाची विचारधारा आणि पुरुषी वर्चस्व इतके समाजात  मजबूत होते  की त्यांची ही सक्षम विचारधारा अभंगापुरतीच मर्यातीत राहली. त्यामुळे ही विचारधारा पंढरपुराच्या महाद्वाराचा उबंरठाही  ओलांडू शकली नाही.हे आपल्या संस्कृतीच शल्यच म्हणावं लागेल. त्यामुळे त्या काळी स्त्री सक्षमीकरणाचे दारे पूर्णपणे स्त्रियांना बंदिस्त होते हे म्हणायला हरकत नाही. 

       समाजात मनुवादी विचारसरणीच्या प्रभावामूळे  स्त्रीचे अस्तित्त्व परावलंबी,निष्क्रिय आणि अंधारलेले होतं.असे  दिसून येते.  त्या काळी स्त्रियांना धार्मिक कार्यात प्रवेश नव्हता. व्रतवैकल्यांचे ओझे तिच्यावर लादले जातं,  नवर्‍याच्या मृत्यूनंतर सती जाणे, बालवयातच  विवाह व मातृत्व स्वीकारणे,  बालाजरठविवाह तिच्यावर लादणे आणि त्यामुळे लवकरच  विधवां झालेल्या स्त्रियांचे  केशवपन करून त्यांना चार भिंतीत कोंडून जीवन जगण्यास भाग पाडणे  इ. क्रूप्रथा स्त्रीचे जीवन असह्य करीत...असमानतेचे हे धुके तिच्या मुक्त संचारावर निर्बंध लादत असतं....पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री ही  निष्क्रिय तर पुरुष क्रियाशील, स्त्री ही परावलंबी तर पुरुष हा पराक्रमी, स्त्री ही दासी तर पुरुष स्वामी अशा  भिन्न विचारधारेत  तोलल्या जातं असल्याचे चित्र दिसून येते. समाजात  स्त्रियांना  कमी दर्जा दिला जातं होता. स्त्री घरकाम आणि मुलं सांभाळण्यापुरती मर्यादित असायची तिच्या बुद्धी आणि विचारांना थारा नव्हता.   धर्मग्रंथातही आपल्याला  स्त्रियांना पुरुषाबरोबरीचे स्थान दिलेले दिसून येत नाही. 

' द हेड ऑफ एव्हरी विमेन इज मॅन ' (बायबल )तर 

'  न स्त्री स्वातंत्र्यम  अर्हति  l'(मनुस्मृती )

या ग्रंथातील वचने बघितले तर यातील विचार  स्त्रियांचे दुय्यम स्थान दर्शवितात. 

      एकोणिसाव्या शतकात प्रबोधनात्मक चळवळीअस्तित्वात आल्या आणि समाजातील जोखडी व्यवस्थेला समाजातून हाकलून लावण्याचा संकल्प करू लागल्या. त्याबरोबरच समाजातील स्त्री स्वातंत्र्याची ज्वाला पेटायला लागली.  राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा जोतीराव फुले, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे इ. समाजसुधारकांनी सतीबंदी, बालाजरठविवाह प्रतिबंध, संमती वयाचा कायदा, विधवा पुनर्विवाह, केशवपनाला विरोध, स्त्रीशिक्षण इ. संदर्भांत विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अनेक वैचारिक व कृतिशील चळवळी उभ्या केल्या.या चळवळी बरोबरच स्त्री सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ समाजात रुजली.  १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा काढून महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे द्वार खुले केले.प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या अन्यायाला  न जुमानता  सावित्रीबाईंना शिकवून त्यांनी महिलांना अज्ञानातून बाहेर काढण्याचा विडा उचलला. आणि भारतातीय स्त्रीमुक्तीच्या  चळवळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.एका भारतीय स्त्रीने सक्षमपणे  समाजलातील पाखंडी, धर्मदाय विचारांना न जुमानता स्त्री सक्षमीकरणाचे धडे स्त्रियांना दिले आणि अवघ स्त्रीयत्व जाग झालं. त्यानंतर त्यांच्याच विचारांची धुरा खांद्यावर घेत एक महामानव जन्माला आले आणि त्यांनी स्त्री सक्षमाची ही ज्योत अखंडपणे तेवत ठेवली. 

           समाजातील पिचलेल्या, अन्यायग्रस्थ, अस्पृश्य समाजल्या जाणाऱ्या  लोकांना त्यांनी तिमिराकडून तेजाकडे नेले. ते  थोर भारतीय विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतीय समाज क्रांतीचे मुकुटमणी, दलितोद्धारक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क ,अधिकारच दिले नाही  तर त्यांच्यात स्वाभिमान जागविण्याचा महत्वपूर्ण विडा उचलला .समाजातील उपेक्षित घटकांना त्यांनी  न्यायचं मिळवून दिला  नाही तर त्यांच्यात आत्मविश्वासाची महत्वपूर्ण फुंकर घातली . स्त्री मुक्तीचे ते पक्के  समर्थक होते.

' समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्री पुरुष समानतेवर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांनाही प्रत्येक अधिकार मिळायला हवा.'

असे ते म्हणतं. यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले .समाजातील शोषित स्त्रियांना काळोखाच्या अंधारातून प्रकाशाच्या उजेडात आणणारे  ते  क्रांतिसूर्य होते .ज्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना  दुय्मम स्थान होते.ज्या  स्त्रियांना प्रत्येक अधिकारापासून ,हक्कापासून वंचीत ठेवल्या जात  ,ज्या स्त्रीला ती जन्मताच  कपटी, धूर्त, लबाड, निष्क्रिय अश्या कितीतरी पालुपदाने नेहमी अपमानित केल्या जाई ,ज्या समाजाला ती  अध्यात्म मार्गातील धोंड ,अविवेकी, चरित्रहीन वाटायची त्या समाजात  तिला मानाचे स्थान हक्क मिळून देणारे ते न्यायदाते ठरले .
      फुले दांपत्याच्या कार्याची व विचारांची धुरा सांभाळण्याची  महत्वपूर्ण जवाबदारी बाबासाहेबांनी पार पाडली .

' समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्री पुरुष समानतेवर आधारलेली असून कोणतीही एक बाजू कमकुवत असल्यास समाजाची प्रगती ढासळते.' 

असे  त्यांचे  स्पष्ट मत होते . त्यामुळे समाजात स्त्रियांच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ते स्त्रीशिक्षणाचे कट्टर पुरकर्ते होते. भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता, स्त्री पुरुष असमानता, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांच्यावर बळजबरीने लादलेले विवाह, कमी वयात लादलेले मातृत्व ,हे सर्व समाजव्यस्थेचे रूप बघून त्यांचे मन  अस्वस्थ होतं. अश्या या सर्व  जोखडी समाजव्यवस्थेतून स्त्रियांना मुक्त व्ह्ययचे असेल तिला सक्षम व्हायचे असेल तर तिने शिक्षित व्हायला हवे ; तोच त्यांच्या उन्नतीचा खरां मार्ग होय. असा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यान व लेखणीतून दिला.हे त्यांचे  विचार स्त्रियांना सक्षम होण्यास खऱ्या अर्थाने  मार्ग दाखविणारे ठरतात. 
         स्वतंत्र भारताचे पहिले मजूरमंत्री असतांना स्त्रिया सक्षम होण्यास त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यामध्ये कामगार स्त्रीला प्रसूती रजा, काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुषांबरोबरची मजुरी, बहुपत्नी विवाहाला पायबंदी तसेच स्त्रियांना 21दिवसाच्या किरकोळ रजा, प्रसूती रजा मिळवून देण्याची तरतूद त्यांनी करून दिली. स्त्रियांना प्रसूती रजा मिळवून देणारे जगातील ते पहिले व्यक्ती होते. त्यानंतर अनेक देशांनी महिला प्रसूती रजा आपल्याही देशात लागू केल्या. म्हणजेच जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला स्त्रियांच्या या संवेदनशीलतेची जाणीव नव्हती त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्यातल्या मातृत्वाला हेरून तिला न्याय देण्याचे कार्य केले. स्त्रियांच्या अंत्यत संवेदनशील काळातील ही प्रसूती रजा तिच्यासाठी जणू पर्वणीच ठरली आहे. स्त्रियांवरील हे उपकार कोणतीही भारतीय आणि जागतिक स्त्री  विसरू शकणार नाही . त्यामुळे तिला मातृत्वाचा पुरेपूर आंनद घेता आला यासाठी ती सदैव त्यांची ऋणी राहील.

         स्त्रियांच्या  समान हक्क
कायद्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यापैकी एक म्हणजे 1947मध्ये कायदेमंत्री असतांना त्यांनी हिंदू कोड बिलाचा महत्वपूर्ण प्रस्ताव लोकसभेत मांडला ज्यामध्ये स्त्रियांच्या न्याय हक्कासंबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या.स्त्रियांना मुलं दत्तक घेता येत नव्हते,  तिला  वारसाहक्कापासून वंचीत ठेवल्या जात होते , तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार नसल्यामुळे ती असाह्य जीवन जगत होती. अशी स्त्रियांची दैनीय अवस्था असतांना त्यांना पाठबळ देणारे हिंदू कोड बिल त्यांनी लोकसभेत मांडले , त्यामध्ये  अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबधातील स्त्रीपुरुष समानता, स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार, वारसाहक्क, मतदानाचा हक्क, दत्तक घेण्याचा अधिकार यासारखे अनेक स्त्री उद्धारक तरतुदी करण्यात आल्या होत्या. पण तिथेही हिंदू कोड बिल पास करण्यास विरोध झाल्यामुळे  त्यांनी कायदेमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला. यावरून हे लक्षात येते की ते स्त्रीहक्काचे व स्त्री सक्षमीकरणाचे  किती कट्टर पुरस्कर्ते होते .
       
    बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक चळवळीत स्त्रियांना पुरुषांबरोबरीने सहभागी केलं होते. मग तो 1927चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असो ,  अथवा 1930चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह असो  किंवा  1942ची  नागपुरातील महिला परिषद असो या सर्वच चळवळीमध्ये त्यांनी महिलांना हिरहिरीने सहभागी करून घेतले होते .यावरून हे लक्षात येते की ज्या समाजव्यवस्थेमध्ये बालविवाह अस्तित्वात होती ,देशातील लग्नपद्धिती अत्यंत घातक होती,जठरविवाह पद्धतीमुळे बळजबरीने कमी वयाच्या मुलीशी तिच्यापेक्षा तीनपटीने मोठया असलेल्या पुरुषाशी  लग्न करून दिल्या जात होते.अशा समाजव्यवस्थेत  तिच्यात आत्मशक्तीची फुंकर घालण्याचे काम बाबासाहेबांनी केले . स्त्रियांचे  मनोध्येर्य वाढविले. 

' स्त्रीचे  कमी वयात लग्न करणे म्हणजे, तिच्या प्रगतीत खूप मोठी अडचण निर्माण करणे होय. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या हक्क अधिकारासाठी स्वतः पुढे यायला हवे .' 
       असे मत त्यांनी समाजासमोर मांडले.यामागे फक्त दलित स्त्रियांचा उद्धार करणे एवढाच उद्देश नसून संपूर्ण स्त्री जातीला उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा, त्यांच्यात  बौद्धिक, आर्थिक, मानसिक  विकासाची रुजवणूक करून , तिला न्याय अधिकाराचे पाठबळ मिळवून देणे  हा होता.  स्त्री सक्षमीकरणाचे मार्ग त्यांनी  दाखविले.आणि तिला न्याय, हक्काने आणि समानतेने जगणे शिकविले. आज स्त्रिया त्यांच्या या कार्यामुळे अनेक क्षेत्रात झेप घेत आहे.स्त्री ही सक्षमपणे आपले निर्णय घेऊ शकतं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर या देशातील संविधानाची निर्मिती झाली आणि स्त्रियांना या पुरुषप्रधान समाजातील बंदिस्त विचारसनी बंदिस्त करू शकली नाही.  आज  स्त्री बौद्धिक,भावनिक, वैचारिकरित्या स्वातंत्र झाली असून ती प्रत्येक क्षेत्रात स्वातंत्रपणे, मुक्तपणे,सक्षमपणे  विहार करीत आहे. तिला आज प्रत्येक क्षेत्रात न्याय, हक्क, अधिकार मिळालेले आहे. हे सर्व शक्य झाले ते या महामानवामुळेच !

प्रा. वैशाली रितेश देशमुख
कुही, नागपुर
9021172362

-

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?