कोरोना एक भीषण युद्ध
सध्या संपूर्ण जगाच्या पाठीवर कोरोनाच्या विरोधात एकच भीषण, महायुद्ध सुरु आहे ;ते म्हणजे 'कोरोना युद्ध' होय. जगाच्या पाठीवर अनेक महायुद्धे झालीत पण त्या युद्धाचा उद्देश वेगळा असायचा. देशाच्या परिसीमा वाढविणे, अनेक देश हस्तगत करणे , आर्थिक लूट करणे, दुसऱ्या देशावर राज्य करणे; असे कितीतरी कारणे त्या युद्धामागे असायची. हळूहळू युद्धाचे रूपांतर दहशतवाद, आतंकवाद मध्ये झाले . त्या स्वरक्षणार्थ वेगवेगळे शक्तिशाली अणुबॉंब, हॅड्रोजन बॉंब, प्रगत अस्त्रेशस्त्रे निर्माण झालीत . अनेक देशानी अणुबॉंब चाचण्या करून आपल्या शक्तीचे पदर्शन केलेत. आपण किती बलाढ्य, बलशाली आहोत हे दाखविण्याची विविध अणुचाचणी प्रयोग करण्यात आले. एकमेकांकडे बोक्यासारखे बघून गुरगुरनारे महाबलशाली देश मात्र आज कोरोनाच्या प्रकोपाने असह्य पडलेत, रोज होणारे मृत्यूचे तांडव ते थांबवू शकले नाही. हे युद्ध प्रत्येक राष्ट्रासाठी एक सबक आहे. या युद्धात ना कुठल्या राष्ट्राचा अणुबॉंब कामी आला ना प्रबळ राष्ट्राची संपत्ती.. एका कोरोना नावाच्या विषाणूने संपूर्ण जगाशी एक युद्ध छेडलं, आणि त्या युद्धामध्ये अनेक बलाढ्य देश धारातीर्थी पडले, हतबल झालेले आहेत. अनेक देशात सावट पसरवणार हे कोरोना युद्ध आपल्याही देशाला सोडणार कसे ? कोरोनाने आपल्याही देशात प्रवेश केला. गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना, कोरोनासारखा जीवघेणा आजार महाराष्ट्रात बळकावला. सुरवातीला भारतात कोरोना आला तो केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये. पण सध्याचं चित्र काही वेगळच आहे. आज देशातील जवळपास सर्वच राज्यामध्ये कोरोना आपली दहशत पसरवतोय.आज नुसत्या महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात 4एप्रिल पर्यंत 537 तर देशात 3482रुग्ण कोरोनाचे पोहचलेले आहे.तर आतापर्यंत 96लोकांचा मृत्यू झालेला आहे. परंतु जेव्हा जेव्हा भारतावर कुठलेही संकट येते तेव्हा तेव्हा या विरोधात आपण सर्व भारतीय लढलेलो आहोत...मग कोरोना सारख्या युद्धात आपण हरणार कसे ? या संकटावर मात करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने योग्य व तातडीचे निर्णय घेतले. त्यात आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय व जिल्हास्तरीय प्रवेश बंदी असो,वा संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय. हा अगदी तातडीचा आणि योग्य राहलेला आहे. ज्या निर्णयासाठी अमेरिका सारख्या प्रबळ देशानी वेळ लावला तो निर्णय आपल्याकडे त्वरित झाल्यामुळे आपण इतर राष्ट्रापेक्षा कोरोनाच्या प्रलयातून खूप अंशी स्थिर आहोत. कोरोना विषाणूची चाहूल लागताच जी सुरक्षा यंत्रणा देशात राबविल्या गेली ती निश्चितच स्वागतास्पद आहे.लोकांच्या स्वरक्षणार्थ देशाचे जागोजागी पोलीसयंत्रणा तैनात झालीत , आरोग्य साधने सजग झालीत , देशाच्या पंतप्रधानाने एकवीस दिवसाचे लॉकडाउनकरण्याचे जे देशाला आवाहन केले ते परिपूर्णतेने यशस्वी होतांना दिसताहेत. देशातील डॉक्टर टीम कोरोनाग्रस्त लोकांची सेवा करीत आपले कर्तव्य पार पाडीत आहे. वेळोवेळी जनतेला दक्षता घेण्याची आवाहन , देशातील लोकांना बाहेर निघू नये अशी विनंती आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी केली.जी देशाच्या हितासाठी महत्वपूर्ण ठरलेली आहे. देशातील संकट दूर करण्याकरिता त्यांची निर्णयक्षमता, कार्यत्परता, सजगता, नियोजन व्यवस्था, सदृढ, सशक्त कार्यप्रणाली ही खरंच उल्लेखनीय ठरलेली आहे.त्याचबरोबर कोरोनाग्रस्ताच्या सेवेत असणारे अधिकारी, पोलीस यंत्रणा, डॉक्टर,नर्स,स्वच्छता कर्मचारी व जीवनावश्यक वस्तूंची सेवा देणारे सर्वच व्यवसायी व या सर्व साखळीला मदत करणारी देशातील संयमी जनता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीत आहे. त्यांचा आत्मविश्वास,आत्मबळ वाढविण्यास प्रत्येक भारतीय सजग आहेत. यासाठी देशभरात टाळ्यांचा, थाळीचा, घंटानाद करून त्यांचं अभिनंदन करण्याचं माननीय पंतप्रधानांनी केलं हो ते निश्चितच त्यांना आत्मबळ देणार ठरलं आहे.आता दुसरं आवाहन येत्या 5 तारखेला रात्री 9 वाजता ; नऊ मिनीटांसाठी दिवे, टॉर्च, मेणबत्ती पेटवून करावं व या देशातील एकता, अखंडता तसेच अंधाराकडून उजेडाकडे जाण्याची एकवटलेली शक्ती प्रदर्शित करावी हाच हेतू यामागील असावा. पण नेहमीप्रमाणे यातही अनेक विकृत वायरस नी जखडलेले विचार समोर येऊ लागले आहे. देश संकटात असतांना आपली पक्षनिष्ठता जागृत करून हे निर्णय कसे चुकीचे आहेत हे सांगण्यात अनेक पर्याय निवडीत आहेत. कोरोना सारख्या संकटाच्या काळात आपली नैतिक जवाबदारी विसरून असे वागणारे लोक काय सिद्ध करणारं हे त्यांनाच माहिती. खरं तर या काळात सर्व भारतीयांनी एकत्र यायला हवे. कोरोना विषाणू कुठल्याही धर्माला, जातीला बांधील नाहीत. तो सर्वांना गिळंकृत करणारा विषाणू आहे.म्हणून वेळ आहे. कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूला हाकलून लावण्यासाठी स्वरंक्षण कवचाची ! यातून सावरायचं असेल तर सर्वांनी मिळून लढा देणं महत्वाचं आहे.सडक राजकारण करून काहिच हाती लागणार नाही. उलट आपल्यालाही इतर देशासारखी किंमत चुकवावी लागेल.देशात सर्व धर्म समभावनेने एकत्रित येणे आज गरजेचे आहे. आज इतर देशापेक्षा आपल्या देशातील परिस्थिती फार चांगली आहे.अमेरिका, ब्रिटन, स्पेन, इटली, फ्रांस यासारखे प्रगत देश कोरोनाच्या विषाणूसमोर हतबल झालेले आहे.अत्याधुनिक आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरली आहे. या सर्व देशात होणारा रोजचा मृत्यूचा आकडा काळजाचं पाणी करणारा आहे. तेव्हा 135कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात या देशाप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली तर ते दृश्य किती भयावह राहिलं याचा विचार आपण करायला हवा. "यथा राजा तथा प्रजा "या बिरुदाप्रमाणे आपण आपल्या शासन प्रणालीवर विश्वास ठेऊन राष्ट्राच्या कल्याणार्थ एकत्र यायला यायला हवे. जात,धर्म, प्रांत, पक्ष विसरून एकजुटीने आपण एकत्र येऊन कोरोना विषाणूच्या या लढ्यात एकत्र व्हायला हवे. 135कोटी लोकसंख्या असलेला देशातील जनता जेव्हा लॉकडाउनमूळे घरी बसतो, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था बिघडेलच, आपल्याला काहीप्रमाणात त्रास होईलच. पण यावर दुसरा इलाज नाही. आजच्या घडीला घरातचं आपण सुरक्षित आहोत. कोरोनाच्या संकटातून निघायचं असेल तर आपण सजग, कर्तव्यदक्ष जनतेप्रमाणे आपल्या राष्ट्राच्या कल्याणार्थ कार्य करायला हवे. या संकटाच्या काळात अनेकांचा मदतीचा हात समोर येत आहे. देवाच्या मंदिरातील पैसा कामी येत आहे, भुकेल्यानां अनेक हात अन्नदान करीत आहेत. कारण जिवापेक्षा पैसा, संपत्ती महत्वाचं नाही हे कोरोनाने का होईना संपूर्ण मानवजातीला समजून दिले आहे. तेव्हा आपल्यात सामंज्यस्य ठेवण्याची, एकता ठेवण्याची, आपल्या घरात सुरक्षित राहून आपले कर्तव्य पार पाडण्याची आज वेळ आलेली आहे. चला तर आपल्या एकजुटीने राष्ट्राला सुरक्षित ठेवण्याचा संकल्प करूयात !
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. नागपूर
फोन नंबर 9021174362
Comments
Post a Comment