ही विकृती थांबणार तरी कधी ?
ही विकृती थांबणार कधी ?
सात दिवसानंतर मृत्यूशी झुंज देतं असतांना अखेर हिंगणघाट येथील दारोडा या गावातील निर्भयानी अखेरचा श्वास घेतला. निर्भयाचा हा सात दिवसाचा वेदनेचा प्रवास शेवटी अखेरचा ठरला. शरीराचा होणारा दाह अखेर थांबला. 3फेब्रुवारीला तिला आरोपी विकेश नगराळे या नराधमाने मृत्यूच्या दरीत लोटले होते . अंत्यत हुशार, अमाप बुद्धिमत्ता असणारी अंकिता प्राध्यापिका म्हणून आपल्या आईवडिलांचा आधारवड बनली होती. अत्यंत गुणी, देखणी, निरागस अंकिता विद्यार्थीप्रिय होती. त्याबरोबरच पुढे नेट सेट ची परीक्षा उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्नं होते . पण ते पुर्ण होण्याच्या आधीच आरोपी नराधमाने तिला कायमच संपवलं. असं करीत असतांना आपणही एका मुलीचा बाप आहो.. हे सत्य त्या नराधमाच्या डोळ्यासमोर आलं नाही ...किती ही नीच प्रवृत्ती... आणखी मुलींचे असे किती बळी जाणारं ?किती अशा निरागस, निरपराध मुली जाळल्या जातील, मारल्या जातील... तिच्या देहाची विटंबना होणे कधी थांबेल का ?अशा कित्येक निर्भया मारल्या जाणारं आहेत ?हे सर्व प्रश्न निरुत्तरित आहेत.
दिवसा उजेडात हातात टेंभा घेऊन, पेट्रोल टाकून, एका स्त्री देहाला क्षणार्धात जाळल्या जाते....हा अनपेक्षितपणे केलेला हल्ला असतो. त्यामुळे ती कुठलाही प्रतिकार करू शकतं नाही. ती हतबल होते, निपचित पडते. अखेर तिचा प्रतिकार थांबतो... आणि त्यातच तिचा कायमचा अंत होतो . किती निर्दयी, मनाला विषन्न करणाऱ्या या घटना. हैद्राबाद मधील जळीतकांडाची, मनाला हादरून सोडणारी घटना दृष्टीआडही झाली नव्हती.पुन्हा तीच मालिका समोर आली. कधी थांबणार हे रोजचे अत्याचार ... समाजमन सुन्न करणाऱ्या ह्या घटना आपण रोजच ऐकत राहणारं का ?...स्त्री अत्याचाराची ही मालिका किती काळ पुन्हा आपल्याला सहन करावी लागणार आहे? स्त्री ही कुणाची स्वातंत्र जाहागिरी नाही... किंवा
ती कुणाची खाजगी मालकी नाही. मग नेहमी तिचीच उपेक्षा का होते ?तिनी हो म्हटलं तर ठीक... नाही तर तिला जाळून टाकायच, मारून टाकायच, तिला आयुष्यातून कायमच उठवण्यासाठी कुरूप करायच.. इतकी लयाला गेलेली ही विकृती आली तरी कुठून ?..
हीच आपली भारतीय संस्कृती का..?
ज्या समाजात आपण राहतो तिथेच आपण सुरक्षित नाही...या विकृतीला जवाबदार तरी कोण ?
झपाट्याने लयाला जाणारी ही आपली विकृती पुन्हा किती मुलींचे जीव घेणार आहे ?किती निरागस मुली पुन्हा जाळल्या जाणारं आहे ?रोजचे बलात्काराचे, अत्याचाराचे सत्र थांबणार तरी कधी ?
शोषित बालिकेच वय, निरागसता पाहून इतके नीच काम करणारे नराधम कुठल्या शाळेत शिकलेले असतात.. त्यांच्यावर कुणी संस्कार करणारे नसावेत का ?अजाण बालिकांना मारतांना ,तरुण मुलींना जाळतांना त्यांना कुठलं असं समाधान मिळतं... ?..ही दुष्ट विकृती मानवी असू शकते का.. . असुरी आनंद मिळवणारे हे विकृत नराधम मानव नाही, राक्षस आहेत. असं म्हणावं वाटते....
सत्तर वर्ष स्वातंत्र्याला झाली असतांना आपण माणूस घडवू शकलो नाही. हीच आपली खंत.. या आधुनिक युगात हल्ली मानवाचा दानव करणारे यंत्र तंत्र तर विकसित होत नाहीत ना.. ? यमदूताची ही मानसिकता मानवी देहात संचारली तरी कुठून ? ही विकृत मानसिकता आपल्या आधुनिक युगात झपाट्याने जन्म घेतं आहे.हे सत्य आपण लपवणार तरी कुठे..? रोजचे खून, हिंसा, लुटमारी, स्त्री अत्याचार हे सारे चित्र याच याचेच सूचक आहेत. आपण सुशिक्षित म्हणून जगतोय पण आधुनिक यंत्रसामुग्री आपल्यावर संस्कार टाकू शकली नाही.. आपल्यातला माणूस घडायला कुठेतरी कमी पडत आहे. असं जर नसतं तर ही विकृती निर्माण झाली नसती... आम्हीच आमचे वैरी झालो नसतो... आपल्यातीलच माणसातले खून पडले नसते, आपल्यातीलच महिलांवर अत्याचार झाले नसते.नवीन समाज, नवीन युग कुठल्या मार्गाने जातोय याचे चिंतन होणे आज गरजेचे आहे. समाजातील ही हीन प्रवृत्ती
कुठल्या मार्गाने सरकतेय याचा शोध आपण घ्यायला हवा... मग हे सर्व चित्र थांबवायचे असेल तर काय करायला हवे... याचे चिंतन आज संपूर्ण सामाजिक स्तरावर होणे गरजेचे आहे.
आज सर्वांत मोठा प्रश्न महिला सुरक्षतेचा असून तो ऐरणीवर आहे. महिलांना सुरक्षा कवच द्यायचं असेल तर फक्त कठोर कायदे करून भागणार नाही तर ते तितक्याच कठोरतेने अमलात आणणे महत्वाचे आहे.निर्भयाच्या मारेकऱ्यांना आजही फाशी होण्यास वेळ लागतो आहे. आपल्या देशातील कायद्याची चौकट कडक व्हायला हवी... इतक्या निर्दयतेने मारणाऱ्या नराधमांना कुठलाही मार्ग नसावा...सात वर्ष त्या नराधमांना जगण्याचा निश्चितच अधिकार नाही.. असे संथ गतीने चालणारे कायदे आपल्याला नको आहेत. गुन्हेगाराने गुन्हा केला, एक जीव घेतला हे अंतिम सत्य आहे. ज्या दिवशी तो गुन्हेगार आपल्या कृत्याची ग्वाही देतो... गुन्हा कबूल करतो त्याच दिवशी तो गुन्हेगार ठरतो मग इतके वर्ष पीडितेला न्याय मिळायला का लागते ?यामुळेच गुन्हेगाराची हिंमत निर्ढावलेली आहे. अशा विकृत माणसांना समाजात जगण्याचा अधिकार नसावा, न्याय मागण्याचा अधिकार नसावा.. हिंगणघाटच्या निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळावा हेच समाजाची मागणी आहे. कायद्याच्या चोकटीत राहून हिंगणघाटच्या निर्भयालाही लवकरात लवकर न्याय मिळणे गरजेचं आहे.. अन्यता हैद्राबाच एन्काउंटर लोकांना न्यायप्रिय वाटावं यात गैर वाटणारं नाही.
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कूही, नागपूर
9021172362
Comments
Post a Comment