डॉ .बाबासाहेब आंबेडकर
डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा माझ्या जीवनात झालेला प्रभाव.
..
आपल्या जीवनात आपल्याला प्रेरणादायी ठरावी अशी आपली भारतीय संस्कृती थोर आहे . प्राचीन काळापासून अनेक पराक्रमी ,शूर वीर ,धाडसी राजे महाराजे याच भूमीत होऊन गेलेत .त्यांचा इतिहास निश्चितच आपल्याला प्रेरणा देणारा असतो त्यामुळे पूर्वीपासून आपला ऐतिहासिक प्रवास मला अभ्यासाला आवडते .खरं आपल्या थोर संस्कृतीचा प्राचीन ,अर्वाचीन आणि आधुनिक विचारांचा साज आहे .तो जगातील कुठल्याही संकृतीला नसावाच .
आपल्या जीवनात अनेक लेखकांचे विचार आपल्या मनावर ,आपल्या व्यक्तिमत्वावर छाप ठेऊन जातात .त्यापैकी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे अथांग सागरच ....या अथांग सागरात विचारांची इतकी मौल्यवान रत्ने आहेत की कुठलाही मानव सुवर्णमय विचारांनी आपली तृष्णा भागवू शकतो .त्यांचा विचारांचा प्रभाव माझ्याही विचारांना सुवर्णमय करून गेला .
त्यांना अभ्यासतांना आपल्या विचारांचे अनेक पैलू खुले होतात.फुले दांपत्यानंतर डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संपूर्ण समाजाला न्याय देणारे आहे .त्यांनी समाजातील पारंपारिक समाजव्यवस्थेला ,विषमतावादी न्यायव्यवस्थेला छेद देतं माणसाला माणूस म्हणून जगणे शिकविले .वर्षोनुवर्षे गुलामगिरीत ,अस्पृश्य म्हणून जीवन जगणाऱ्या समाजाला त्यांनी नवक्रांतीचे धडे दिले .ते एक चालतेबोलते विद्यापीठ होते . हे आपल्याला त्यांच्या लक्षणीय अभ्यासावरून लक्षात येते .
त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्याही जीवनात एक संजीवनी म्हणून कार्य करून गेला. समाजातील ऐकलेली अनेक संकुचित विचारसरणी क्षणार्धात पुसल्या गेली .त्यांच्या उद्दात ,व्यापक विचारांवर जितके लिहले तितके अपुरेच आहे .खरं तर डॉ .बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही एका धर्माला ,जातीला मर्यादित नाहीत ...ते संपूर्ण विश्वाचे न्यायदाते आहेत ...हे आपण जाणून घेतले पाहिजे .पगल्भ बुद्धिमत्ता असणारे, न्यायनिष्ठ प्रक्रियेला समानतेने एक सरळ रेषेत जोडणारे ते एक दिपस्तंभ होते .आकाशगंगेतील अनेक ग्रहांपैकी सूर्यग्रहाइतके प्रगल्भ ,समतावादी ,न्यायनिष्ठ विचारांचे किरणे घेऊन अनेकांच्या अंधारमय जीवनात प्रकाश ओतणारे ते क्रांतिसूर्य होते .हे त्यांच्या व्यापक दृष्टिकोनातून दिसून येते .आपल्याला याचा अभिमान असायला हवा की याचं पावन भूमीत डॉ .बाबासाहेब आंबेडकरांसारखा मौल्यवान हिरा आपल्याला गवसला आणि आपली भारतभूमी पुन्हा एकदा विचारसौदर्याने नटली .भारतीय संविधानाचे ते शिल्पकार होते .हे संविधान भारतातील कुठल्याही महान ग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे असं मला वाटते .कारण त्यात हजारो वर्षांपासून मळगलेल्या विचारांची सावली नाही .भारतीय न्यायव्यवस्थेला बळकट करणारे ,सर्वांना समान हक्क ,न्याय देणारे ,समता ,बंधुता आणि स्वातंत्र यांचा पुरस्कार करणारे विचार यात आहे .ज्यामुळे विविधतेने नटलेला भारत आज अखंड ,एकसंघ म्हणून टिकून आहे .सर्वांना एकसूत्रतेत बांधून ठेवणारा हा पवित्र संविधान रुपी ग्रंथ कुठल्याही देशपातळीवर सापडणार नाही .याचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा ..आज भारताने चंद्रावर ,मंगळावर पाऊलं ठेवले आहे .जगातील चार विकसित देशाच्या पंगतीत आपण येऊन बसलो आहोत ;ते फक्त आणि फक्त संविधानामुळेच होय .आज स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने सर्व हक्क ,अधिकार मिळालेत ते त्यांनी लिहलेल्या संविधामुळेच .त्यांच्या विचारातील स्त्रीशक्तीचे धडे वाचतांना माझ्यातली स्त्री त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करते . पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्मम स्थान असतांना डॉ . आंबेडकरांनी स्त्री जातीचा पुरस्कार केला .त्यामुळे माझ्या जीवनात ते प्रेरणादायी ठरते .आज समाजात ,आजूबाजूला स्त्रियांसोबत होणारा अन्याय माझ्यातील स्त्री सहन करू शकतं नाही .आणि मन पेटून उठते ,लेखणी अलगतपणे शब्दांनी व्यक्त होते .ती स्त्रियांच्या अन्याय ,अत्याचारावर लिहू लागते. याचे श्रेय मी या महान विभूतीलाच देईल . आत्मविश्वासाचे खरे मानकरी डॉ .बाबासाहेब आहेत .
त्रास देणाऱ्यापेक्षा त्रास सहन करणारा जास्त दोषी असतो .हे त्यांनीच शिकविले .त्यामुळे जिथे खऱ्या अर्थाने अन्याय होत असेल , जिथे आपल्या अस्तित्वासाला न्याय मिळत नसेल तिथे न्याय ,हक्क ,अधिकारासाठी मला लढावे वाटते हेही त्यांच्यामुळेच .
"समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्री पुरुष समानतेवर आधारलेली असून कोणतीही एक बाजू कमकुवत असल्यास समाजाची प्रगती ढासळते." असे त्यांनी सांगितले हे त्रिकाल सत्य आहे .या त्यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे . स्त्रियांच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ते स्त्रीशिक्षणाचे कट्टर पुरकर्ते होते. भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता, स्त्री पुरुष असमानता, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांच्यावर बळजबरीने लादलेले विवाह, कमी वयात लादलेले मातृत्व याविरोधात त्यांनी आवाज उठवला जो रास्त वाटते . जोखडी समाजव्यवस्थेतून स्त्रियांना बाहेर पडायचं असेल तर तिने शिक्षित व्हायला हवं, तोच त्यांच्या उन्नतीचा खरां मार्ग होय. असा जळजळीत संदेश त्यांनी दिला .जो खऱ्या अर्थानी माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना स्पुर्ती देणारा आहे .ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूरमंत्री असतांना त्यांनी कामगार स्त्रीला प्रसूती रजा, काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुषांबरोबरची मजुरी, बहुपत्नी विवाहाला पायबंदी तसेच स्त्रियांना एकवीस दिवसाच्या किरकोळ रजा, प्रसूती रजा मिळवून देण्याची तरतूद करून दिली. स्त्रियांना प्रसूती रजा मिळवून देणारे जगातील ते पहिले व्यक्ती होते.समाजातील एका वर्गातील लोकांपुरते ते मर्यादित आहेत ,असा कांगावा करणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छिते की त्यांनी त्यांचा विचारांचा पुन्हा एकदा डोळ्यात अंजन घालून अभ्यास करावा.महिला प्रसूतीची रजा मिळून देणारे ते जगातील पहिले न्यायदाते ठरले होते .त्यांच्यानंतर अनेक देशांनी महिला प्रसूती रजा लागू केल्या. स्त्रियांच्या अंत्यत संवेदनशील काळातील ही प्रसूती रजा तिच्यासाठी जणू पर्वणीच ठरली आहे.आज माझ्यासारख्या अनेक नोकरी करणाऱ्या स्त्रिया त्यांचे हे उपकार विसरू शकणार नाही. त्यांच्यामुळेच तिला मातृत्वाचा पुरेपूर आंनद उपभोगता आला . यासाठी ती सदैव त्यांची ऋणी राहील.
स्त्रियांच्या समान हक्क कायद्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले .त्यामध्ये 1947चा निर्णय महत्वपूर्ण ठरतो . पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्मम स्थान असतांना ,स्त्रिया प्रत्येक अधिकारापासून वंचीत असतांना समाजाच्या या संकुचित विचाराला शह देतं त्यांनी तिला तिच्या यशाचे मार्ग खुले करून दिले.जे महत्वपूर्ण आहे . 1947मध्ये कायदेमंत्री असतांना त्यांनी हिंदू कोड बिलाचा महत्वपूर्ण प्रस्ताव लोकसभेत मांडला होता , ज्यामध्ये स्त्रियांच्या न्याय हक्कासंबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या.स्त्रियांना मुलं दत्तक घेता येत नव्हते, तिला वारसाहक्कापासून वंचीत ठेवल्या जात, तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हते , ती असाह्य जीवन जगत होती. अशी दैनीय अवस्था स्त्रियांची असतांना त्यांना पाठबळ देणारे हिंदू कोड बिल त्यांनी लोकसभेत मांडले होते .पण तिथेही हिंदू कोड बिल पास करण्यास विरोध झाला होता . त्यामुळे त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. डॉ .बाबासाहेब आंबेडकरांसारखे आजच्या घडीला स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे नेतृत्व आणि आपल्या पदाचा राजीनामा देणारे नेते आज भेटणार का ?आज सर्वत्र स्त्री अत्याचाराचे सत्र सुरु असतांना किती राजकीय नेते पेटून उठतात.. हे आपण बघतचं आहोत .त्यामुळे आज खऱ्या अर्थाने समाजाला डॉ .आंबेडकरांसारख्या नेतृत्वाची गरज वाटते .
त्यांचा 1927चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असो , अथवा 1930चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह किंवा 1942ची नागपुरातील महिला परिषद असो या सर्वच चळवळीमध्ये त्यांनी महिलांना हिरहिरीने सहभागी करून घेतले होते . यावरून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने चालण्याचं सामर्थ्य डॉ .आंबेडकरांनी मिळवून दिले होते .यामागे फक्त दलित स्त्रियांचा उद्धार करणे एवढाच उद्देश नसून संपूर्ण स्त्री जातीला उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा होता हे दिसून येतो . तिला बौद्धिक, आर्थिक, मानसिक विकास करणे व तिला न्याय अधिकाराचे पाठबळ मिळवून देणे हा त्यांचा महत्वाचा उद्देश होता. आज स्त्रिया अनेक क्षेत्रात झेप घेत आहे .देशातील सर्वोच्य पदाची ती मानकरी ठरली आहे .ते केवळ त्यांनी लिहलेल्या संविधानाच्या हक्कामुळेच ...
एकंदरीत स्त्रियांच्या सदर्भात राजकिय ,सामाजिक,शैक्षणिक,प्रादेशिक ,शेतीविषय धोरण,सर्वसमावेशक हक्कासाठी केलेले कायदे ,या सर्वांचा सक्षमपणे त्यांनी विचार करुन शोषित स्त्रीवर्गाला अन् वंचित घटकांना सक्षम उभे राहता यावे यासाठी त्यांची भूमिका माझ्या जीवन जगण्याच्या प्रवासात प्रेरणादायी ठरलेली आहे.जनहिताच्या अन् जन हक्कच्या कायद्यांचा सक्षमपणे घटनेत मांडून आजच्या महिला वर्गाला खूप मोठ्ठा अधिकार प्राप्त करुन दिलेला आहे.
एवढेच नव्हे तर शैक्षणिक संस्था काढून,दलित , वंचित वर्गाला शिक्षणाची दारे खुली करून दिली.गुलाम म्हणून अपमानीत जीवन जगणाऱ्या दलितांच्या जीवनाला नवआकार दिला ,जगण्याला नवा अर्थ दिला.दलितांना जगण्याची शाश्वत दिशा दिली.
आज खऱ्या अर्थाने जो काही जगण्याचा मोकळा श्वास घेतोय तो त्यांच्याच विचारसणीमुळे ....!!
प्रा. वैशाली रितेश देशमुख
कुही, नागपुर
9021172362
Comments
Post a Comment