स्त्री अत्याचार

चल मानवा जागा हो, मानवतेचा धागा हो ..

         हैद्राबाद येथील महिला डॉक्टरची दुचाकी पंचर झाल्यानंतर तेथील एका टोलनाक्यावर मदतीच्या प्रतीक्षेत थांबलेल्या एका सव्वीस वर्षीय वेटरनरी महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार करून  तिला जिवंत पेटवून दिल्याची संतापजनक घटना शुक्रवारी उजेडात आली ,आणि पुन्हा एकदा निर्भया ,उन्नाव आणि कोपर्डी येथील अमानवीय अत्याचाराचे चित्र डोळ्यासमोर आले .डॉक्टर म्हणून आपलं कर्तव्य एका पशुवैद्यकीय रुग्णालयात करीत असतांना आपल्या जीवनाचा इतक्या निर्दयतेने अंत होईल असं तिच्या मनातही आलं नसावं ,पण वेळ आणि काळ दोन्ही तिच्यावर टपून बसला असावा ..मानवतेचा खोटा मुखवटा दाखवत हैवानांनी क्रूरतेचा कळस गाठत ,तिची अनपेक्षितपणे शिकार केली आणि तिला निर्दयतेने जाळूनही टाकले ..या विदारक घटनेने पुन्हा  एकदा भारतीय महिलांच्या  सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे निदर्शनास आले.
        स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही, स्त्री सुरक्षित नाही याचा दाखला पुन्हा अशा  अमानवीय कृत्याने समोर आला.पण त्या दुर्दैवी घटनेकडे आजही आपण सहजतेने बघतो आहोत ...याचे शल्य मनाला अस्वस्थ करते ,आणि एक प्रश्न निर्माण होतो ,तो म्हणजे आपल्या झोपलेल्या प्रसार माध्यमांचा ...गेल्या एक महिन्यापासून सत्तेच राजकारण रंगवत असतांना अग्रेसर असणारे इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे स्त्री अत्याचाराच्या बाबतीत ,अन्नदाताच्या आत्महत्येच्या बाबतीत वास्तव चित्र समाजाच्या ,शासनाच्या डोळ्यासमोर आणण्यास उत्सुक का होत नाहीत ?असाही प्रश्न पडतो  ..अनेक राजकीय मंडळींचे डिबेट ऑनलाईन दिवसभर रंगवून वादविदाचे सुसंवाद दाखवायला त्यांना वेळ मिळतो ..मग स्त्री अत्याचार  थांबण्यास,अन्नदात्याची आत्महत्या रोखण्यास, यावर चर्चा का केल्या जातं नाहीत ?जेवढ्या तिव्रतेने राजकीय विश्लेषण चॅनल वर होतात ,तेवढ्याच तिव्रत्येने स्त्री अत्याचारावर  ,शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा का केल्या जातं नाहीत ? आज प्रसार माध्यमांच्या दृष्टीने हे प्रश्न महत्वाचे नाहीत का ? महत्वाचे असेल तर  शासनाला ,समाजाला जागे करून ,दृष्ट  प्रवृत्तीच्या या विषारी सापांना ठेचायला ठोस उपाययोजना करायला हव्यात .
      आज सुरक्षतेच्या बाबतीत अनेक कडक कायदे करूनही, महिला अत्याचाराचा आकडा कमी न होता, वाढतच असल्याचे दिसून येतं आहे. मेट्रो, डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार करण्याचा वाटेवर असणाऱ्या आमच्या देशात ,स्त्री  देहाची विटंबना वारंवार  केली जात आहे . तिचा  जिवंत देह कधी जाळला जातो, कधी तिच्या देहात अमानुषतेने सळाख खुपसल्या जाते, तर कधी तिच्या चेहऱ्यावर अँसिड फेकून, दगडाने ठेचून तिला विद्रुप केला जातो  .पण तरीही आपण म्हणतो देश सुधरतोय ..आपल्या देशात अन्नदाता सुरक्षित नाही ,स्त्री सुरक्षित नाही ,लहान मुलं सुरक्षित नाही ,दिवसा ढवळ्या खून पडतात  तरीही आपण म्हणतोय देश प्रगती करतोय ...

           विकासित राष्ट्रांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा हेवा करावा इतपत आपली प्राचीन संस्कृती महान आहे.पण  सुजाण, संपन्न व लोकशाहीप्रधान देशात रोजच  स्त्रियांवरील अत्याचाराची मालिका वाढत जावी यापेक्षा घृणास्पद व लाजिरवाणी गोष्ट कुठली असू शकते.  नवी दिल्लीतील निर्भया निकालानंतर व स्त्री अत्याचार कायद्यात कठोरता आणल्यानंतर कुठे तरी या  अत्याचारावर आळा बसेल व स्त्रियांना स्वरक्षणकवच प्राप्त होईल असं वाटतं असतांना  समाजातील  चांगुलपणाचा व अमानुषतेची पातळी दिवसेनदिवस खालावतचं जातं  असल्याचे दृश्य अगतिकपणे बघावं लागतं आहे. निर्भया, खैरलांजी, कोपर्डी किंवा  उनाव ,कठूवा अशा सर्व घटनांवर नजर टाकली तर अमानवी चेहरे समोर आले आहेत. परिणामी देशभरातील स्त्रियांना  आता असुरक्षित वाटू लागले आहे.ही अतिशय चिंताजनक
बाब आहे.
         भारतात दरवर्षी बलात्कार वाढत आहेत. यासाठी कोणत्या विशेष दाखल्याची गरज नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो तथा एनसीआरबीच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर त्याची प्रचिती येते. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडीतांमध्ये दहा ते अठरा या वयोगटातील मुलींची संख्या अधिक आहे. यावर आणखी खोलात जाऊन चर्चा केली तर नात्यातील लोकांकडून झालेले अत्याचार जास्त आहेत. एकूणच सर्व घटना आणि आकडेवारी चिंताजनक आहे.

२०१४ पासून जर एनआरसीबीच्या क्राईम आकडेवारीनुसार नजर टाकली तर देशात बलात्काराचे ३३,७०७ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ९४.४ टक्के घटना या नात्यातील व्यक्ती अथवा पीडीतेची निकटवर्तीय, परिचयाच्या व्यक्तीने केल्याचे उघड झाले आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे . भारतात प्रत्येक २२ मिनिटाला एक बलात्कार होतो .हे आकडीवाडीनुसार स्पष्ट झाले आहे .अमिरिकेच्या पर्यटन विभागाने त्यांच्या देशातील लोकांना , भारतात पर्यटनास गेले  तर काळजी घेण्याची विनंती केली  आहे. भारतात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलांनी पर्यटनस्थळांवर अधिक काळजी घ्यावी यासाठी विशेष  सूचना दिल्या गेली आहे . जागतिक स्तरावर भारताची महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने, निर्माण झालेली ही प्रतिमा खूपच  चिंताजनक व देशाची प्रतिमा मलिन करणारी आहे.

कॉमनवेल्थ हूमन राईट्स इनिशिएटीव्ह तथा सीएचआरआयने २००१ ते २०१३ या कालावधीत भारतात घडलेल्या बलात्काराच्या घटनांवर एक अहवाल प्रकाशित केल्यानंतर अनेकांची मती गुंग झाली. कारण या तेरा वर्षात आपल्या देशात २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्येक वर्षाचा जर आढावा घेतला तर २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये ५३ टक्के बलात्कार वाढले होते.
महाराष्ट्रातही त्याला अपवाद नाही. आपल्या राज्यातही बलात्कार वाढतच आहेत. २००१ मध्ये १,३०२ तर २०१३ मध्ये ३,०६३ गुन्हे नोंद झाले. याचाच अर्थ महाराष्ट्रात बलात्काराचे गुन्हे १३५ टक्क्यांनी वाढले आहेत.देशात २०१७ मध्ये महिला अत्याचाराचे तीन लाख ५९ हजार गुन्हे घडले होते. २०१६ च्या तुलनेत या गुन्ह्यांत २१ हजारांनी वाढ झाली. मात्र २०१८ पासून केंद्र सरकारने अहवालच प्रसिद्ध केला नसल्यामुळे त्यात किती वाढ अथवा घट झाली याची कल्पना न केलेली बरी ...हैद्राबादच्या या हैवानीयत घटनेमुळे आज समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागा होत या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवायला हवा, तेव्हा ...
चल मानवा जागा हो ,मानवतेचा धागा हो ...असं म्हणतं , स्रियांच्या सूरक्षात्मक दृष्टीने ठोस पाऊले उचलायला हवे !

प्रा. वैशाली रितेश देशमुख
नागपुर
9021172362

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?