साहित्यक्षेत्रातील झुंडीकरण


      साहित्यक्षेत्रातील झुंडीकरण ....

      महाराष्ट्राची माती ही थोर साहित्यिकांच्या पदस्पर्शने पुलकित झालेली आहे . संत ,पंत आणि तंत साहित्याची खान याचं मातीत रुजली आणि बहरली सुद्धा ... संतांची थोर अभंगे ,पंतांची आख्यानकाव्ये आणि तंत काव्याची ,ढोलकीच्या तालावर थिरकणारी,मदमस्त करणारी धडाकेबाज  लावणी ,पराक्रमाचे गौरवगीत गाजवणारे पोवाडे , महाराष्ट्राच्या मनामनावर आजही राज्य करीत आहे .याचं मराठी साहित्याच्या संस्कारावर मराठी माणूस घडला आणि लढलाही...
        मराठी सारस्वत थोर आहे .त्याचा पायाच मुळी  ज्ञानयोगी  ज्ञानेश्वरांनी घातला आहे .आणि म्हणून मराठी भाषेचं सामर्थ्य  आणि गोडवा कायम टिकवून ठेवणं हे प्रत्येक महाराष्ट्रीयांच आद्य कर्तव्य आहे .त्याकरिता वाचन संकृती ही विकसित होणे महत्वाचे  आहे .
         आज वाचनसंस्कृती विकसित होतं नसली तरी साहित्यिकांच्या झुंडशाहीत कमालीची वाढ होतांना दिसते आहे .म्हणून वाचन संस्कृती विकसित झाली असे आपल्याला म्हणता येणारं नाही .एकविसाव्या  शतकात खंडीने साहित्यिक जन्माला यावे यापेक्षा आपल्या देशाचं भाग्य कुठलं असू शकते ?पण इथे एक प्रश्न निर्माण होतो, की या झुंडीकरणात खऱ्या साहित्यिकांची संख्या कितपण आहे ? याचीही समीक्षाही  आज व्हायला हवी !..प्रसिद्धीच्या लालसेने लिहीलेले लेखक खरेतर लेखकच नसतात. स्वतः करून घेतलेले ते समाधान असते. ज्या लेखकाचे लेखन पुनः पुनः वाचावेसे वाटते, मनाच्या कोप-यात कायम घर करते ते खरे लेखन व तो खरा लेखक.
       जीवनानुभव, निरीक्षण, बहुअंगी प्रचंड वाचन व सहानुभाव आणि संवेदना यांच्या एकरूपतेतून  खरं अभिजात साहित्य निर्माण होतं.बाकी कुणी लिहून ओळख निर्माण करते म्हणून लेखन होत नाही, आतुन उचंबळून आले पाहिजे...तेव्हा लेखन प्रगट होते. जेष्ठ व श्रेष्ठ लेखक कविंनी कुणाकडे बघून कधीच लिहीले नाही.....अशा सारस्वतांनीच मराठी साहित्य समृद्ध केले, साहित्य म्हणून ओळख दिली.आज अनेक साहित्य संमेलने  होतात ,अनेक व्हाटअप ग्रुपवर साहित्यिकांचे समूह निर्माण झालीत ,पण त्यात बोटावर मोजण्याइतपण दर्जेदार  साहित्यिकांची संख्या असते हे विशेष ..  साहित्यक्षेत्रातील हे  झुंडीकरण कितपण साहित्याची प्रामाणिकपणे सेवा करते, की निव्वळ तो एक दिखावा असतो याचाही  विचार आपण करायला हवा . असे अनेक ,कवी कवियत्री ,लेखक ,लेखिका आम्ही आजूबाजूला बघतो ज्यांच्या व्यक्तिमत्वात कवित्वाचा अंशही  नसतो ,लेखकांची छापही नसते ,मात्र कित्येक काव्यपुस्तके,लेखपुस्तके त्यांची प्रकाशित होतात .ही सर्व धडपड असते ती प्रसिद्धीची ...मग दर्जेदार साहित्यिक निर्माण होईल कसा  ? हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो .
म्हणून  आपण प्रसिद्धीच्या मागे न लागता आपल्यातला प्रतिभासंपन्न , प्रतिभावंत, लेखक ,कवी कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे .
        कुठलीही कला ही सोपी नसते ,तेथे साधना लागते ,तपेची तपे द्यावी लागतात ,कला ही परिपूर्णतेची अपेक्षा करते .त्यामुळे प्राचीन ,अर्वाचीन ,आधुनिक साहित्याचा  अभ्यास करावा  ,थोर ग्रंथ  ,महाराष्ट्राचा थोर  इतिहास अभ्यासावा... गोविदाग्रज यांना मोरोपंतांच्या पाच हजार ओव्या पाठ होत्या .एक प्रतिभासंपन्न लेखक ,थोर कवी होण्यास एक साधना महत्वाची असते ती आपण करायला हवी  .महान साहित्यिक जेथून ज्ञान मीळेल तेथून तो घेण्याचा प्रयत्न करीत असतो .शेक्सपिअरने अनेक जुने कथानक घेऊन साहित्याचं सोनं केलं तर कालिदासाने महाभारतातुन शाकुंतल घेऊन ,त्यातून त्यांनी अभिनव साहित्य साकारलं ...आपण असंच करायला हवं ...खरं तर जुन्या साहित्यातूनच नवं साहित्य जन्माला येत असते .पण त्याला स्वतःच्या विचारांची नवसंजीवनी देणे गरजेच असते .प्रत्येक मानवी जीवन नवसाहित्य तयार करतो त्यासाठी त्या जीवनातील खोलवर अभ्यास करण्याचा प्रयत्न करायला हवा .आजच्या आधुनिक युगातील शेतकरी दुर्दैवी का ?झोपडपट्टीतील मुलं गुन्हगार का बनतात ?स्रिया वेश्यावृत्तीला वळण्यामागचं कारण काय ?गरिबी म्हणजे काय ?दरिद्रीनारायण काय असते ? अन्यायग्रस्त दृस्य काय असते, जुलूम ,उपासमार ,अज्ञान काय असते ?जोपर्यँत या गोष्टीच्या तळागळापर्यत आपण पोहचल पाहिजे . याचं सहानुभूतीतून आपलं साहित्य जन्माला येऊ शकतं तेव्हाच आपल्याला खऱ्या मराठी साहित्यिकांचा मान मीळेल, आपली साहित्यक्षेत्रात खरी ओळख निर्माण होईल ,आपल्याला लिहण्याची उर्मी मीळेल , यातून जिवंत साहित्य जन्माला येईल ,यात किंचितही शंका नाही .छोट्याश्या डबक्यातील बेडूक त्याचं डबक्यापुरता मर्यादित राहला तर त्याला समुद्राची खोली मापता येणारं नाही .'मी साहित्यिक झालो 'अशी भावना वाढीस लागलेली आहे .ते कुठेतरी थांबायला कुणाच्या लेखणीची कदर करणे हे प्रत्येक लेखकांचं कर्तव्य असते पण त्या लेखणीला विचारांची धार नसेल तर वाचकालाही ते रटाळ वाटायला लागतं .असं होऊ नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे .म्हणून  मायमराठीची  साधना करणे गरजेचे आहेत तरचं खरे  साहित्यिक निर्माण होतील .

प्रा .वैशाली रितेश देशमुख
90211 72362
रा .नागपूर

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?