चला माणूस बांधूया !
चला माणूस बांधूया !
जीवन जगतं असतांना ,माणसाची जडण घडण ही संवादाच्या माध्यमातून होते .संवाद साधण्याचे महत्वपूर्ण साधन म्हणजे भाषा .भाषेच्या माध्यमातून माणूस आपल्या भावभावना एकमेकांशी वाटून घेऊ शकतो .एकमेकांच्या थेट मनापर्यंत पोहचू शकतो . संवादाच्या माध्यमातून माणूस घडतो आणि दुसऱ्यांना घडवितो सुद्धा .. कुठल्याही देशाची प्रगती ही समाजातील सांघिक शक्तीवर अवलंबून असते आणि त्यासाठी माणसाचं एकमेकांशी बांधून असणं तितकंच महत्वाचं असते . परंतु आजचा शिक्षित माणूस एमेकांपासून दुरावत चाललेला आहे . एकमेकांशी असणारा संवाद तो विसरून बसलेला आहे . पैसा कमविण्याच्या धावपळीत आणि इंटरनेच्या संवाद माध्यमात गुरफडून पडतांना दिसतो आहे . इंटरनेटच्या माध्यमाने त्याला कधीचच जेरबंद केलं आहे.हे आपल्या लक्षात वेळीच यायला हवं ...कारण मन ही मनानी जोडली जाते धनाने नाही . आज इंटरनेटच्या माध्यमातून आपण कित्येक तास एकमेकांशी संवाद साधतो परंतु खूप तास बोलूनही काळीज न ओलावणारा हा संवाद आपल्या जीवनावर किती खोलवर परिणाम करू शकतो हे आपल्या लक्षातही येत नाही .
पूर्वी लहान मुलं खूप खेळायची,धावायची कुदायची मनसोक्तपणे बागडायची यातच त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास व्हायचा ... शरीराला ते पोषक ठरायचं पण ते खेळच जणू कालबाह्य झालेले आहेत ,त्या जागेवर पबजी ,व्हिडीओ गेम ,कार्टून शो सारख्या जीवघेण्या कार्यक्रमात तो तासनतास एकाकी बसून आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती हरवून बसतो आहे .हे आपण वेळीच जाणलं पाहिजे .घरातील आईवडिलांनी आता आपल्या मुलांकडे आणि स्वतःकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे .
माणूस पैसा कमविण्यासाठी दिवसरात्र धडपडतो .श्रीमंताला अधिक श्रीमंत आणि धनवंताला अधिक धनवंत बनण्याच्या या स्पर्धेत तो स्वतः एकाकी जीवन जगतं आहे .आज प्रत्येक क्षेत्रात व्यवहारिकता दिसून येते .श्रद्धा ,भक्ती ,पूजा साहित्य,कलानिर्मिती यातही दुकानदारीने प्रवेश केलाय .लोकांनी देवालाही सोडलं नाही,. त्याचं कारण म्हणजे माणसातली वाढलेली व्यवहारिकता होय !
असंवादाची वलय आज घरातही उमटायला लागली आहेत .कारण आता घरेही अबोल व्हायला लागली आहे . आई-वडिलांच्या स्पर्शातून मिळणारा प्रेमाचा ओलावाही आटत चाललेला आहे . प्रेमाच्या ,वात्सल्याच्या स्पर्शाने भरलेलं उबदार घर आज इंटरनेटच्या बुलडोजर खाली भुईसपाट होतं चाललेलं आहे .घरात होणारा संवाद फक्त एकमेकांच्या अपेक्षापूर्ती पुरता मर्यादित झालेला आहे .संवाद होतात ते फक्त व्यवहारिकतेचे ....आईवडील आज पैशांच्यामागे... तर मुलं ही सकाळपासून होणाऱ्या जीवघेच्या क्लासमध्ये पळताहेत... घर फक्त एक डोकं टेकवायच एक रात्रीचा लॉज प्रमाणे होऊन बसलंय ...
आज ओलाव्याच्या संवादपासून आपण कोसो दूर जात आहोत . यंत्र संवादाच्या जाळ्यात आपण गुरफटत जात आहोत . शिक्षित झालेल्या एकविसाव्या शतकातील हा माणूस संवाद शून्य एकाकी जीवन जगत आहे .हे कुठेतरी थांबायला हवं .. एकमेकांच्या संवादामुळे जी संवेदनशीलता तयार होते .ती माणसातील संवेदनशीलता मरायला लागली आहे .माणूस मतलबी ,स्वार्थी आणि निष्ठुर व्हायला लागलाय .कारण माणसाची मने एकमेकांशी दुरावत चाललेली आहे .
संवादातूनच थेट मनाचा मार्ग मोकळा होतो . मनाच्या खोलीपर्यंत पोहोचण्यासाठी एकमेकांच्या हृदयातील गोष्टी जाणून घेणं महत्वाचं असते . पण त्याची जागा आता आधुनिक संवादप्रणालीने घेतली आहे .इंटरनेट ,मोबाईल द्वारे ई-मेल ,चॅटिंग ,एस एम एस द्वारे फोनवर बोटांनी बटनांचा अनेक तास खेळ करून बोलणे म्हणजे संवाद नव्हे ! तिथे एकमेकांची सोबत नसते ,साथ नसते ,तिथे फक्त एकाकीपण असतो .तो संवाद कसला ?माणसाच्या एकाकीपणामुळे मनाची दुर्बलता निर्माण होऊ शकते ,माणूस मानसिक आजाराला बळी पडू शकतो .नैराश्याकडे वळू शकतो .कारण एकाकीपणा हा माणसाच्या जीवनातील सर्वांत मोठा शत्रू आहे .त्यामुळे मनसोक्त जगा ,मनसोक्त हसा ,आपल्या भावभावना एकमेकांशी बोलून मोकळ्या करा ,आपल्या घरातील लोकांना वेळ दया ,माणूस माणसापासून तुटणार नाही याची दक्षता घ्या ...मोठया मोठया इमारती ,मोठी मोठी धरणे ,मोठं मोठी मॉल बांधणं आता पुरे झाली .....
चला माणूस बांधूया !
अंतरीच्या उमाळ्याने -
संवादातील जिव्हाळ्याने !
प्रा .वैशाली रितेश देशमुख
रा .नागपूर ,जि .नागपूर
फो नंबर 90211 72362
Comments
Post a Comment