स्त्री सक्षमीकरण
जागतिक महिलादिन :स्त्री शक्तीचा जागर
खांद्यावर घेऊन, आकाश अर्धे
चला जाऊया पुढे, नव शतकाच्या
पाठीवर लिहू समानतेचे धडे
असे म्हणत 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहाने जगभऱ्यात साजरा करण्यात येतो .महिलांनी महिलांच्या हक्कासाठी ,अधिकारासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस विशेष महत्वाचा आहे .जागतिक पातळीवर महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या जगभऱ्यातील रणरागिणीला आजच्या दिवशी माना2!चा मुजरा...ज्या समाजव्यवस्थेत स्त्रियांना उपभोगाचे व कष्ट करण्याचे साधन समजल्या जायचे त्या समाजातील महिलांना मतदानाचा हक्क ,संपत्ती हक्क ,समानतेचे हक्क ,शिक्षणाचे हक्क मिळून देण्यासाठी जागतिक पातळीवर लढा दिला ,आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्याची सजगता दाखवून स्त्रियांच्या आत्मभानाला जागृत केले ,त्या स्त्रियांच्या नेतृत्वाला नतमस्तक होण्याचा हा दिवस !त्यांच्याच या लढ्यामुळे आज स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांदयाला खांदा लावून पुढे जात आहे. नवनवीन क्षेत्रात तिने आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करून दाखविले आहे .अवघड क्षेत्रातही तिनी आपल्या जिद्दीने आणि परिश्रमाने यशाचे कर्तृत्व गाजविलेले आहे ,प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केले आहे .असे सकारात्मक चित्र सर्वत्र असतांना दुसरीकडे मात्र वर्तमान पत्रात स्त्री अत्याचाराच्या मनाला सुन्न करून टाकणाऱ्या घटना रोजच वाचायला मिळतात .स्त्री अत्याचाराच्या मानव जातीला कलंकित करणाऱ्या घटना जेव्हा आपण वाचतो ,आजूबाजूला बघतो तेव्हा वाटते .... खरंच स्त्री आजही सक्षम ,आत्मनिर्भर झाली आहे का ?तिच्याकडे आजही समानतेच्या दृष्टीने समाज बघतो आहे ,का ?तिला खऱ्या अर्थाने विचार करण्याचं स्वातंत्र मिळालं आहे ,का ?असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर येतात .आणि एकच भीषण सत्य डोळ्यासमोर येत ते म्हणजे आजही स्त्रियांना समाजात दुय्यमचं स्थान आहे .स्त्रियांचा होणारा कोंडमारा ,सतत भीतीच्या दहशतीत जगणं ,अन्याय ,अत्याचार मूकपणे सहन करणं,रडणं ,कुढनं ....हेच तिच्या वाट्याला आलेलं भोगदान !हेच त्रिकाल सत्य !त्यामुळे स्त्री सक्षमीकरणाचे व स्त्री समानतेचे सर्वच नारे फोलचं ठरतात .
म्हणून आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने या विषयावर खऱ्या अर्थाने चिंतन होणे गरजेचे आहे . आज समाजातील प्रत्येक विदारक चित्रात जवळच्याच माणसांनी तिचा घात केलेला दिसून येतो .मग ते हुंडा बळीचे प्रकरण असो ,स्त्री भ्रूण हत्येचे किंवा स्त्री अत्याचाराचे इथे आपलेच शत्रू आणि आपलेच वैरी ....कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही.... असं असतांना प्रत्येक स्त्रियांनी स्वतःला सक्षम करणे गरजेचं आहे ,स्वतःच्या आत्मस्वरक्षणार्थ कणखर बनणं महत्वाचं आहे .यासाठी तिने सजग असायला हवं .महिला नोकरी करते ,ती स्वतः कमविते किंवा तिला पूर्णपणे आर्थिक स्वातंत्र असणे ,म्हणजे ती सक्षम आहे असं म्हणता येणारं नाही . तर खऱ्या अर्थाने ती मानसिक ,शारीरिक ,भावनिक,वैचारिक दृष्ट्या सामर्थ्यशाली बनणे म्हणजे सक्षम असणे होय .स्त्रियांना समान हक्क ,समान अधिकार ,निर्णय घ्यायला पूर्णपणे स्वातंत्र ,घरातील प्रत्येक निर्णयामध्ये तिला मिळालेलं बरोबरीचं स्थान ह्या गोष्टी जर तिला पूर्णपणे मिळालेल्या असेल तर ती पूर्णपणे सक्षम झाली असं म्हणता येईल .पण असं चित्र आपल्या देशात दिसून येतं नाही .स्त्री ही जन्मजात ,अबला नाजूक ,अनिर्णयक्षम,अविवेकी तिने एक स्त्री म्हणून आपल्या मर्यादेत रहायला हवं ,तिने फक्त आपल्या निर्णयाच्या बाजूला झुकायला हवं असंच पुरुषप्रधान संस्कृतीचे चित्र ...जे आजही वास्तव आहे .तिच्या निर्णयक्षमतेच कोणालाही देणंघेणं नसतं कारण एकच ,ती एक स्त्री आहे म्हणून ....हे विचार आज समाजातून पूर्णपणे नष्ट होणे गरजेचं आहे .याकरिता खऱ्या अर्थाने प्रत्येक महिलांनी लढा उभारायला हवा ....!!
स्त्री सक्षमीकरण आणि स्त्री सशक्तीकरण जर पूर्ण पणे आपल्या देशात घडून आणायचं असेल तर स्त्रियांनी पूर्णपणे शिक्षित होणं गरजेचं आहे .त्यासाठी अर्धवट शिक्षण न सोडता तिने पूर्णपणे शिक्षण घ्यायला हवं .कारण शिक्षणातूनच हक्काची ,अधिकाराची आणि महिलाविषयक कायद्याची माहिती मिळतं असते .दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या विचाराचे स्वातंत्र ...एक स्त्री जेव्हा आपल्या पोटातील गर्भ तपासायला तयार होते तेव्हाचं तीचा गर्भपात होत असतो .स्त्री भ्रूण हत्येची स्वत:ही ती अपराधी असते .तेव्हा घरच्यांच्या निर्णयाला झुंगारून तिने अशा वेळी खंबीर राहायला हवं ....तेव्हाच स्त्री भ्रूण हत्येचे पाप समाजात होणार नाही .कामाच्या ठिकाणी मानसिक छळ ,सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असेल तर तिला पेटून उठले पाहिजे ,मुकाट्याने कुठलाही विकृत स्पर्श किंवा घाणेरडी शिवी ,विकृत नजर या गोष्टी सहन करू नये .तिने पुरेपूर आपल्या स्वरक्षणार्थ आवाज उठवायला हवा ...आज स्त्री स्वरक्षणार्थ अनेक कडक कायदे अमलात आलेले आहे .त्याचा फायदा घेतं हे विकृत मनोवृत्तीचे साप ठेचायला हवे !
स्त्री सक्षमीकरणाकरिता 1991पासून आपल्या देशात धोरण राबविल्या जातं आहे .2001मध्ये त्यात आमूलाग्र बदल केल्या गेले .त्यात महिलांना कृषिक्षेत्रात सबसिडीज ,बारावीपर्यंत मोफत शिक्षण ,मोफत प्रवास ,आरोग्य विषयक योजना ,सबला योजनेत वयाच्या 11ते 18वर्षा पर्यतच्या किशोरवयीन मुलींसाठी विशेष योजना ,मुलींसाठी हॉस्टेल योजना ,प्रियदर्शनी योजना ,बेटी बचाओ ,बेटी पढाओ योजना ...या सर्व योजनेचं योग्य तो उपयोग करून आजच्या प्रत्येक स्त्रियांनी सक्षम व्हायला हवं .
आजच्या काळात प्रत्येक स्त्रीने सक्षम होणं गरजेचं आहे .त्याकरिता पुरुष वर्गानेही स्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा .आपल्या बरोबरीने तिच्या विचाराचा सन्मान करायला हवा ,तिच्याकडे आदराने बघायला हवे .
समाजव्यवस्थेत स्त्रियांचा आणि पुरुषांचा बरोबरीचा वाटा असल्यामुळे दोन्ही घटकांचा सार्वांगिक विकास होणं गरजेचं आहे .त्यावरच या देशातील समृद्धी आणि विकास अवलंबून असतो .त्यासाठी प्रत्येक स्त्रियांनी शिक्षणाची कास धरणे ,हक्कासाठी लढणे ,आणि जिथे जिथे अन्याय होतोय तिथे आवाज उठवणे गरजेचं आहे .यासाठी प्रत्येक महिलांनी महिलांचं सहकार्य करायला हवे .
सरते शेवटी एकच सांगावं वाटते
दरिया की कसम ,मौजो की कसम
ये ताना ,बाणा बदलेंगा
तू खुद को बदल, तू खुद को बदल
तब हि तो जमाना बदलेंगा
प्रा .वैशाली रितेश देशमुख
रा .कुही ,नागपूर
7420850376
Comments
Post a Comment