प्रेमाची बदलती परिभाषा

शाश्वत प्रेमाची बदलती परिभाषा

      काही दिवसापूर्वी नागपूर जिल्ह्यामधील मधील सावनेर तालुक्यातील सावळी शिवारात एका तरुणीचा मृतदेह मिळाला .त्या युवतीची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा विद्रुप केला होता .तर एका हाताचा पंजा सुद्धा कापला  होता .खुशी परिहार तीच नावं वय फक्त एकोणीस वर्ष ..आईवडील मोलमजुरी करणारे पण खुशीने मात्र लहान वयातच मोठं मोठी स्वप्नं रंगवली आणि ती मॉडेलींग च्या क्षेत्रात यशस्वी सुद्धा झाली...पण काळाने तिच्यावर झडप टाकावी तसा तिचा घात झाला ...तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रियकरानेच तीला संपवले  आणि ती कायमची या जगाला पारखी झाली ...प्रेमप्रकरणातून अशा कित्येक घटना आपल्या आजूबाजूने घडतांना दिसतात .कधी एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीच्या चेहऱ्याला ऍसिड नी जाळल्या जाते , कधी तिचा खून केला जातो , कधी एकतर्फी प्रेमाकरीता स्वतःला संपवल्या जाते तर कधी प्रेमीयुगल स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतात .हीच आपल्या आधुनिक युगातील प्रेमाची परिभाषा ...
      खरं प्रेम कस असावं हे सांगताना  'ययाति ' या पौराणिक कादंबरीत  सौदर्यपूर्ण शब्दात वि .स .खांडेकर लिहतात , खरं प्रेम नेहमी निस्वार्थी असावं ;मग ते फुलावर असो ,प्राण्यावर असो ,सृष्टीसौदर्यावर असो ,आईवडिलांवर असो ,प्रियकर किंवा प्रेयसीवर असो ,कुल ,शांती ,राष्ट्र यांच्यापैकी कुणावरही असो .... निस्वार्थी ,निरपेक्ष ,निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्माच्या विकासाची पहिली पायरी असते असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो.
मग मनुष्य असा निष्ठुर कसा असू शकतो ?आपल्याच प्रेमाचा गळा कसा घोटू शकतो ?हे न समजण्याच्या पलीकडे आहे .प्रिय व्यक्तीच्या दोषासह स्वीकार     करण्याची शक्ती खऱ्या प्रेमात असते अस म्हटल्या जातं मग हेच प्रेम आजच्या युगात मरणे आणि मारण्याला का कारणीभूत ठरतं आहे ?का खरं प्रेम अस असतं?जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो, तीला आपण कस संपवू शकतो ? मग यालाच प्रेम म्हणावं का ?आज प्रेमाची वास्तव वृत्ती बदलेली आहे .प्रेमात वासना ,आकर्षकता ,फसवेगिरी दिसून येते आहे .आज शहरातील उद्याने ,पर्यटक स्थळे ,मंदिरे हे प्रेम वीरांचे आवडते स्थान झालेले आहे .अनोळख्या,निर्जन स्थळी ,हातात हात घेतं एकमेकांवर विश्वास टाकत मर्यादेचं भान विसरून  आपलं सर्वस्व अर्पण करून आपल्याच बर्बादीला कारक ठरतात .

"खरं प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहण्याची शक्ती देते.मग ते प्रेम कुणावरही जडलेलं असो.मात्र ते खरंखुर प्रेम असायला हवं ! ते स्वार्थी ,लोभी किंवा फसवं असता कामा नये."
     प्रेम स्वार्थी ,फसवं आणि लोभी नसावं हे वाक्य फक्त पुस्तकापुरतं मर्यादित असलेलं दिसून येते . आज वयाच्या चौदाव्या सोळाव्या वर्षीच मुलंमुली प्रेमात पडतात .प्रेम म्हणजे काय ? हे समजण्याचंही हे वय नसतं ,अल्लडता ,विचारांची परिपकवत्ता ,निर्णयक्षमता या वयात नसते . फक्त एकमेकांपुरती आकर्षकता म्हणजे प्रेम हा त्यांचा गोड गैसमज काढणार तरी कोण ? ..अवेळी केलेल्या या प्रेमात आपण आपल्या जीवनातील  ध्येय ,स्वप्नं हरवून बसलो  आहोत याची जाणीवही त्यांना नसावी . अभ्यासाकडे लक्ष न देता ; कायम प्रेमाच्या  धुंदीत ते वाहवत जातात .जे वय शिकण्याचं ,स्वप्नं साकार करण्याचं ,आयुष्य घडवण्याचं त्याचं वयात न साकार होणाऱ्या प्रेमाची धुंदी प्रेम वीरांमध्ये बघायला मिळ्ते ...खरं तर येवढी परिपकवता या आंधळ्या प्रेमात नसतेच .ज्या वयात स्वतःला पेलण्याची जवाबदारी त्यांच्यात नसते त्या वयात सोबत आयुष्य जगण्याचे स्वप्नं ते रंगवतात .आणि दोघांच्याही बुद्धीला ,वयाला न पेलवणार हे प्रेम अवेळी पळून जाण्याचा निर्णय घेतं ..सुरवातीचे काही क्षण चांगले गेल्यानंतर जीवनाचा खरा अर्थ उलगडतो ,खरी जवाबदारी काय असते ती कळायला लागते.जेव्हा आईवडील ,कुटूंब आणि समाज हे प्रेम स्वीकारत नाही. आर्थिक प्रपंचाचे चटके बसायला लागतात ,जेव्हा पैशाशिवाय आपल्या इच्छा ,आकांक्षा दाबाव्या लागतात, तेव्हा प्रेमाची उर्मी उतरते आणि त्याजागेवर पच्छाताप करण्याची वेळ येते .
      प्रेम करणे हा गुन्हा नव्हे पण तो योग्य वेळी ,योग्य वयात होणे गरजेचं असते...स्वतःच करियर करून आपण कुणाच्या मुलीला सुखी ठेवू शकणार का ?याचा विचार आपण करायला हवा ...प्रेम हे प्रेयसीच्या सुखात आहे .म्हणून विंदा करंदीकर आपल्या संयमित  प्रेमानुभव अभिव्यक्त करतांना म्हणतात
या जन्माला फुटे न भाषा ;
निदान पुढच्या फुटेल का ती ?
मनातील प्रेमभाव ओठापर्यंत येतो पण ते  तो प्रकट करू शकतं नाही ..याच शल्य जोपासत , आपल्या संयमित प्रेमाची साक्ष  ते या कवितेतून करून देतात .प्रेम असंच असावं ..
अविवेकी प्रेमातून काहीच मिळतं नाही .समाजही ते सहजासहजी स्वीकारत नाही .आपलं कुटूंब तुटल्या जाते ,नाती दुरावली जातात ...नुसत्या प्रेमानी पोट भरता येतं नाही त्यासाठी आर्थिक दृष्टयासुद्धा मजबूत असणं हवं असतं ...आर्थिक चणचण निर्माण झाली की कुटूंबाची घडीच विस्कटली जातात ...सैराट चित्रपट जेव्हा आपल्यासमोर येतो  तेव्हा त्यातून खूप काही सांगून जातो...प्रेम होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.पण मनावर अंकुश ठेवत स्वतःला घडवण्याचा द्यास आपण या वयात घ्यायला हवा .. आपल्या जीवनातील महत्वाचं लक्ष म्हणजे स्वतःच आयुष्य घडवणं...जीवन घडलं की प्रेमही मिळतं .जीवन सुखी संपन्न आणि आनंदी होते पण अवेळी ,अविवेकीपणाने केललं प्रेम आपलं जीवनही उध्वस्त करू शकत.अस घडू नये; याची खबरदारी आपण निश्चितच घेतली पाहिजे .

प्रा .वैशाली रितेश देशमुख
रा .नागपूर
7420850376

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?