आसिफाला मिळाला न्याय ...
आसिफाला मिळाला न्याय ...
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पठाणकोट येथील कथुआ जिल्हातील रासना या गावातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात न्यायालयाने सहा जणांना दोषी ठरवत मुख्य आरोपी संजीराम ,पोलीस क्षेत्राला काळिमा फासणारा धूर्त पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि परवेश कुमार यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तर इतर तीन आरोपीला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा पठाणकोट जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सुनावल्यामुळे निरागस आसिफाला सरते शेवटी न्याय मिळाल्याचे समाधान सर्वीकडून व्यक्त केल्या जात आहे .
10जानेवारी 2018रोजी आठ वर्षाच्या आसिफाचे अपहरण झाले होते . नेहमीप्रमाणे आपल्या घोडयांना चराईसाठी नेलं असतांना काही नराधमांनी तिच्यावर डाव साधला तिचे अपहरण करून तीला एका गावाच्या मंदिरात बंदिस्त करून ठेवले होते .त्यानंतर तिच्यावर अमानुषतेने अत्याचार करून तिची हत्या करण्यापूर्वी चार दिवस बेशुद्धावस्थेत ठेवण्यात आले होते . आठवडाभरानंतर आठ वर्षाच्या निरागस असिफाचा मृतदेह जंगलात आढळून आला होता .तीला अंत्यत निर्दयीपणे मारल्या गेले होते . माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने अवघे समाजमन हादरून गेलं होते . एखादया कागदाचे असंख्य तुकडे करून भिरकावून द्यावे , त्या प्रमाणे तिच्याशी अमानवी कृत्य करून त्या राक्षसांनी तिला फेकून दिले होते . या घटनेने अवघा देश हादरून गेला होता .संपूर्ण देशात या घटनेच्या निषेधार्त आवाज उठवला गेला .आसिफाला लवकरच न्याय मिळावा यासाठी जागोजागी मोर्चे काढण्यात आले होते .नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेतं सर्वोच्य न्यायालयाने कथुआ खटला जम्मू -काश्मीरबाहेर चालविण्याचे निर्देश दिले .आणि त्यानुसार 7में 2018 रोजी पठाणकोट न्यायालयात हा खटला स्थानांतरित केला गेला होता .अखेर या खटल्याची सुनावणी बंद खोलीत 3 जून रोजी पूर्ण झाली .यात ऐकून 114साक्षीदारांचे बयान तपासण्यात आले .10जून ला सकाळी सर्व आरोपीना दोषी ठरवित आले .यातील तीन नराधमांना जन्मठेप तर तिघांना पाच वर्षाची सक्त कैद सुनावण्यात आली .नराधमांना शिक्षा होताच निरागस आसिफाला अखेर न्याय मिळाला व या प्रकरणावर पूर्णविराम देण्यास न्यायालयाला यश आले आहे .
दिसायला सुंदर असलेल्या आसिफा तर पुन्हा परत मिळणारं नाही,तिच्या आईवडिलांना पुन्हा आसिफा दिसणार नाही .परंतु काही प्रमाणात निर्दयी नराधमांना शिक्षा मिळाल्याचे समाधान सर्वांना मिळेल हे निश्चित ! आसिफासावर झालेला अमानुष छळाला आठवून आजही अवघा समाज गहिवरून आला अंगावर काटे येतात . आठ दिवस नराधमांनी तिचा अमानुष छळ केला होता ,तीला उपाशी ठेऊन तिच्यावर अमानुषतेने प्रहार करण्यात आले होते .असे कृत्य करणाऱ्या कसायांना कठोरातली कठोर शिक्षा झाली तरी कमीच आहे.
मेट्रो, डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार करण्याचा वाटेवर असणाऱ्या आमच्या देशात अश्या कित्येक घटना रोजच घडत आहेत .आजही लहान मुलांच्या अत्याचाराचे प्रकरण कमी झालेले नाहीत .कठोरातले कठोर कायदे करूनही अत्याचाराचे ,बलात्काराचे प्रकरण दिवसेनदिवस वाढतच चाललेले आहे .कुठे खंडणीसाठी जीव घेतल्या जातो तर कुठे अमाप पैसे कमविण्याच्या नादात मानवी तस्करी केल्या जाते .महिलांवरील बलात्काराचे ,हिंसाचाराचे ,अत्याचाराचे प्रकार रोजच वृत्तपत्रात वाचायला मिळतात . आपल्या सुजान, संपन्न व लोकशाहीप्रधान देशात स्त्रियांवरील अत्याचाराची मालिका रोज वाढतच जावी यापेक्षा घृणास्पद व लाजिरवाणी गोष्ट कुठली असू शकते. नवी दिल्लीतील निर्भया निकालानंतर व स्त्री अत्याचार कायद्यात कठोरता आणल्यानंतर कुठे तरी या अत्याचारावर आळा बसेल व स्त्रियांना स्वरक्षणाचं पाठबळ मिळेल असं वाटलं असतांना समाजातील चांगुलपणाचा व अमानुषतेची पातळी पुन्हा खालच्या थराला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरातअथवा भारतात महिला, मुली उपभोग घेण्याची वस्तू झाली असल्याची सर्वसाधारण भावना समाजात वाढीस लागलेली आहे अस म्हणतांना वावगं ठरणार नाही .तेव्हा आसिफा निकालासारखे अन्य प्रकरणही लवकरात लवकर मार्गी लावून आरोपी नराधमांना कठोरातील कठोर सजा द्यायला हवी .तरचं या प्रकरणाला आळा बसू शकेल .
निर्भया, खैरलांजी, कोपर्डी असो किंवा उनाव असो अथवा कथुआ प्रकरण व असो, एकूणच सर्व घटनांवर नजर टाकली तर अमानवी चेहरे आपल्यासमोर येत आहे . माणुसकीलाही लाज वाटेल असे कृत्य समाजात घडतं आहे .भारतात दरवर्षी बलात्कार वाढत आहेत. यासाठी कोणत्या विशेष दाखल्याची गरज नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो तथा एनसीआरबीच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर त्याची प्रचिती येते. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडीतांमध्ये दहा ते अठरा या वयोगटातील मुलींची संख्या अधिक आहे. यावर आणखी खोलात जाऊन चर्चा केली तर नात्यातील लोकांकडून झालेले अत्याचार जास्त आहेत. एकूणच सर्व घटना आणि आकडेवारी चिंताजनक आहे.
२०१४ पासून जर एनआरसीबीच्या क्राईम आकडेवारीनुसार नजर टाकली तर देशात बलात्काराचे ३३,७०७ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ९४.४ टक्के घटना या नात्यातील व्यक्ती अथवा पीडीतेची निकटवर्तीय, परिचयाच्या व्यक्तीने केल्याचे उघड झाले आहे. ३३.९ टक्के प्रकरणात पीडीत महिलेच्या शेजारी तर ७.३ टक्के प्रकरणात ओळखीच्या व्यक्तीने अत्याचार केले आहेत. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे आणि मानवी घटकाला विचार करायला लावणारी आहे. भारतात प्रत्येक २२ मिनिटाला एक बलात्कार होतो.
लांब कशाला, अमिरिकेच्या पर्यटन विभागाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला असून तो भारतासाठी मोठा झटका आहे. भारतात पर्यटनास गेला तर काळजी घेण्याची विनंती करण्यात आले आहे. कारण आपल्या देशात बलात्कार, विनयभंग या सारख्या हिंसक घटना पर्यटनस्थळावरच घडू लागल्या आहेत. परिणामी भारतात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलांनी पर्यटनस्थळांवर अधिक काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. जागतिक स्तरावर भारताची महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्माण झालेली ही प्रतिमा देशाच्या नावलौकिकास मलीन करीत आहे.
कॉमनवेल्थ हूमन राईट्स इनिशिएटीव्ह तथा सीएचआरआयने २००१ ते २०१३ या कालावधीत भारतात घडलेल्या बलात्काराच्या घटनांवर एक अहवाल प्रकाशित केल्यानंतर अनेकांची मती गुंग झाली. कारण या तेरा वर्षात आपल्या देशात २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्येक वर्षाचा जर आढावा घेतला तर २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये ५३ टक्के बलात्कार वाढले होते.
महाराष्ट्रातही त्याला अपवाद नाही. आपल्या राज्यातही बलात्कार वाढतच आहेत. २००१ मध्ये १,३०२ तर २०१३ मध्ये ३,०६३ गुन्हे नोंद झाले. याचाच अर्थ महाराष्ट्रात बलात्काराचे गुन्हे १३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
ही आकडेवाडी बघितली तर देशावर सध्या अराजकतेचं, असुरक्षतेचं दुःखद सावट निर्माण झालेलं आहे .तेव्हा यावर शासनाने डोळे झाक न करता यावर काही ठोस निर्णायक पाऊले उचलणे गरजेचे आहे.तसेच आपल्या स्वरक्षणार्थ मुलींनी, आईवडिलांनी सजग राहणे गरजेचे आहे.अन्यथा पुन्हां किती आसिफा अश्या कृत्याला बळी ठरेल सांगता येत नाही.
प्रा. वैशाली रितेश देशमुख
कनिष्ठ व्याख्याता
ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय ,कूही
742085037
Comments
Post a Comment