संघर्षमय जीवन आणि मी ...

संघर्षमय जीवन आणि मी

जिंदगी जिना आसान नही होता ,
बिना संघर्ष , कोई महान नही होता l
जब तक ना पडे,हतोडे की चोट ,
पत्थर भी भगवान नही होता l

       खरचं कुणीतरी या ओळी किती खऱ्या लिहल्या आहे ...देवाला देवपण येते ते टाकीचे घाव सोसल्याने आणि माणसाला माणूसपण येते ते संघर्षमय जीवन सोसल्याने ...असंच म्हणावं लागेल ! माझ्याही जीवनातील संघर्ष काहीसा असाच ....
         संघर्षमय जीवनातूनच माणूस घडतो हे जरी सत्य असलं तरीही जीवनात संघर्ष काय असतो ? गरिबी काय असते ?अडचणी काय असतात ?या प्रश्नाचे उत्तर शोधायची कधी वेळच आली नाही...कारण माझ्या वयाचे वीस वर्ष मी ह्या अडचणी कधी अनुभवल्याचं नाही .घरातील एकुलती एक लेक सर्वांत लाडाची ,वडील शिक्षक ,घरी शेतीवाडी त्यामुळे सधन घरात माझं बालपण गेलं ...दोन भाऊ मोठे आणि मी सर्वांत लहान त्यामुळे सर्वांच्या लाडाची ...पहिली ते चौथीच शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून ...नंतर पाचवी ते बारावी वडिलांच्याच शाळेत ...फार आनंदाचे ते दिवस ...मनसोक्त खेळायचं , आपल्याला आवडलं ते हट्टाने मिळवायचं आणि बाबांना आवडेल ते घेऊन मागायचं ...असेच दिवस उडून गेले ...माझी आई फार साधी कुणालाही मन लावणारी ...बाबा शिक्षक असल्यामुळे दरवर्षी आमच्याकडे एक तरी शिकायला पडून राहायचं ...आईवडिलांनी नातेवाईकांच्या मुलांना शिकवलं आणि तेच संस्कार आमच्यावरही पडत गेले ...कुणीही दुःखात अडचणीत असले की त्यांना मदत करायची ...कुणावरही आपलं म्हणून जीव लावायचा ....अशातच माझं बालपण संपलं ...मी तारुण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली ...एक वेगळं विश्व , तारुण्याचे ते दिवस खूप आल्हादायक असतात ,सर्व काही भासमान ....
         याचं काळात जग फार जवळ वाटायला लागतं ...सर्व काही सहज ,सोपं वाटायला लागतं ...मी बी ए च्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला ...नव्या मैत्रिणी ,मिळाले त्यातच बी ए फायनल ला असणाऱ्या मित्राची ओळख झाली ....फारचं  हुशार ,वक्तृत्व गूण असलेला ,मधुर आवाज असलेला एक हुशार विद्यार्थी आमचा मित्र  झाला त्याचं नावं रितेश  ...माझ्या तीन मैत्रिणी पैकी एकीने त्याला आपला भाऊ मानला त्यानिमित्याने त्याच्या घरी कुठलाही कार्यक्रम असला की आम्हांला बोलावल्या जायचं ....असेच दिवस निघत गेले ...माझी मैत्री असतांना कधी त्याच्या मनात माझ्याविषयी प्रेमाचे भाव उमटले माहीतच पडलं नाही ....एक दिवस त्यानी आपल्या मनातील भावना चिठ्ठीवर व्यक्त केल्या.त्यावर लिहलं होत तू माझी अर्धांगिनी होणार का ? सांग माझ्या मुलांची आई होणार का ?...कधीच विचार केला नसतांना आपल्या मैत्रीचा कुणी असा फायदा घ्यावा याची मनात फार चीड आली ...त्यानंतर बी ए फायनल पर्यंत मी कधीच त्याच्याशी बोलली नाही ...आणि असंच एकदा त्यानी सॉरी म्हटलं आणि कुठल्यातरी कार्यक्रमाला आम्हांला घरी बोलावलं ...माझी इच्छा नसतांना दोघी मैत्रिणीने मला त्याच्या घरी नेलं ...तो काका काकूंकडे राहत होता ,घरी आईवडील कुठेच दिसतं नव्हते आम्ही त्याला विचारायचो तर त्यावर काहिच बोलतं नव्हता ...कुठे तरी काहीतरी गोष्ट आहे हे आम्हांला कळलं ...एक दिवस आम्ही त्याला मैत्रीची शपथ दिली आणि त्यानी आपल्या भावना ओल्या डोळ्यांनी व्यक्त केल्या ...त्याचे वडील नवव्या वर्गात त्यांना सोडून गेले होते तर आई नी त्याच्या दोन वर्षातच दुसरं लग्न केलं होत ...हे सर्व सांगातांना त्याच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या ...त्याचे एक एक शब्द अंतरंगाला भिडून जातं होते ...इतकं दुःखी जीवन आणि त्यात रितेश एकटा फरफटत चालला होता ...कुठे तरी त्याच्या घावावर मीठ चोळल्याची  अनुभूती आम्हांला येत होती ....बस तोच दिवस माझ्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला ...
       आता माझं विश्व फार बदलायला लागलं रितेशचे सर्व दुःख माझे वाटायला लागले ...आपणही त्याच्यावर प्रेम करायला लागलो हे कळायला लागलं ...त्यालाही ते कळलं आम्ही आता वेगळ्या विश्वात रमायला लागलो ..बी ए फायनल होताच घरी लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या ...रितेश आणि माझ्यात आर्थिक ,सामाजिक आणि जातीय दरी होती ...त्याला वडिलांची सर्विस मिळणारं एवढंच त्याचं विश्व ...घरी वडिलोपार्जीत शेती होती पण त्याचाही काही ठाव ठिकाणा नाहिच ...जातीत सुई भऱ्याचही अंतर नाही पण माझ्याप्रती आईवडिलांचं स्वप्नं वेगळं होत ...त्यातच कुटूंबातील सिनिअर कॉलेजच्या हेड क्लर्क नी मला मागणी घातली ...आता सर्व गोधळात मी फसल्या गेली एकीकडे रितेश तर दुसरीकडे आईवडील ...रितेशने आईला माझा हात मागितला पण हे शक्य नाही असं बोलून ती मोकळी झाली ..मोठया भावालाही ते मान्य नव्हतं ...अश्यातच दिवस जातं होते ...आईवडील की दुःखात सापडलेलं आपलं प्रेम या दोन्ही गोष्टीतून माझं मन निघत नव्हतं ....काय करावं तेच समझेना !
             नियती आणि वेळ आपल्या हातात नसते तशीच वेळ माझ्यावर आली आणि काय ?कसं? घडलं ते आजपर्यतही कळलं नाही .मी आणि रितेशने लग्न केलं.आणि खऱ्या अर्थाने माझ्या जीवनातील संघर्षाला सुरुवात झाली ....रितेश परिवहन मंडळात वाहक म्हणून रुजू झाला त्याचा पगार पाच हजार होता. दोन हजार एकला अर्पिता नावाचं फुल माझ्या अंगणात बागडायला लागलं ...ती एक वर्षाची होताच मी पाचशे रुपयाने कॉन्व्हेंट मध्ये शिकवायला जाऊ लागली .माहेर आणि सासर एकाच ठिकाणी त्यामुळे आईवडिलांना दिलेलं दुःखही मनाला बोचत होत ...आपण या छोट्याश्या डबक्यातून निघायला हवं ..स्वतःच एक वेगळं विश्व निर्माण करायला हवं ..या विचारात मी रहायला लागली .रितेशला पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली .त्यानेही मला पुरेपूर साथ दिला आणि समाजशास्त्र या विषयात मी एम ए झाली .घरी बसून आपण शिक्षण करू शकतो यावर पुन्हा आत्मविश्वास वाढायला लागला ...लगेच बी एड पुर्व परीक्षा पास झाली ...नंबर सावनेरला लागला ..तीन वर्षांची मुलगी आणि कॉलेज ला जाण्याइतपण वेळ आणि पैसा दोन्ही पुरेसा नसतांना मी घरीच अभ्यास करायचा ठरवला ...रितेशने योग्य ते अभ्यासाच्या नियोजना पासून ते टाईम टेबल पासून मला मदत केली .मी वेड लागल्यासारखा अभ्यास करायला लागली .घरचे कामं आटपून दिवसभर अभ्यास ..त्या काळात नातेवाईकाचे लग्न ,बारसे सर्वच काही सोडलं आणि मी 63%घेऊन उत्तीर्ण झाली .त्यानंतर लगेच पर्यावरण हा विषय शिकवायला सिनिअर कॉलेज जॉईन्ड केलं .त्याचं कॉलेजला मराठीचे घड्याळी तासिकेप्रमाणे सात पिरेड मला आठ हजार पगाराप्रमाणे मिळू शकते हे कळलं ..आता पुन्हा नवीन लढाई माझ्यासमोर उभी होती .M.A.मराठी मध्ये बी प्लस होणं फार कठीण होतं तरीही M .A.मराठीचा फार्म भरला आणि घरीच अभ्यासाला सुरुवात केली .दोन वर्षातील M.A.मराठीतील  50ते 60पुस्तकांचा अभ्यास करतांना दिवसाची रात्र कधी व्ह्यायची कळतं सुद्धा नव्हतं...माझ्या मेहनतीचं फळ मिळालं मला बी प्लस पेक्षा जास्त म्हणजे 59%मिळाले .लगेच मला सिनिअर कॉलेज ला व्याख्यान तासिका मिळाल्या ...पाच वर्ष सिनिअर कॉलेजला शिकविल्या नंतर पुन्हा जुनिअर कॉलेज ला इतिहास आणि मराठीची पर्मनंट जागा आहे हे कळलं आता माझ्या समोर पुन्हा नवीन आव्हान होतं ...त्यात दुसरी मुलगी अतिशय लहान असतांना मी M.A.इतिहास 50%पास झाले ...आणि माझ्या जीवनातील परीघ मला मिळालं 2015मध्ये मला पर्मनंट जुनिअर कॉलेज ची पोस्ट मिळाली ....हे सर्व करीत असतांना समाजातील गेलेलं स्थान परत मिळवायचं होतं ...आईवडिलांना माझा निर्णय चुकीचा नव्हता हे सिद्ध करायचं होतं ...तर समाजातील लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलायचा होता ...हे सर्व शक्य झालं ते रितेश मुळे ...मला अभिमानाने सांगावं वाटतं की संघर्षातून तर मी घडलीच पण माझ्या जीवनसाथीने मला घडवलं ...मी गावातही ग्रामपंचायला सर्वात जास्त मतांनी निवडून आली ....आज आईवडील भाऊ माझ्या सोबतीला आहे .गावातील अनेक चांगल्या कार्यक्रमात मला मान सन्मान दिला जातो ...असंख्य विद्यार्थ्यांच्या प्रेमाने माझ्या जीवनातील वाटचाल सुरू राहिलं .....शेवटी एकच सांगावं वाटतं ....

मुश्किल नही है कुछ दुनिया में
तू जरा हिंमत तो कर l
ख्वाब बदलेंगे हकीकत में
तू जरा कोशिश तो कर ...ll

प्रा .वैशाली रितेश देशमुख
(कनिष्ठ व्याख्याता )
ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय ,कूही
जिल्हा .नागपूर
7420850376

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?