'ती ' ने ओलांडला उंबरठा !

'ती' ने ओलांडला उंबरठा !
     

     सर्वोच्च न्यायालयानं शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर कनकदुर्गा (वय ४४)आणि बिंदू (वय ४२)या दोन रणरागिणींनी इतिहास घडवतं २/११/२०१९ ला बुधवारी पहाटे तीन वाजून ३८मिनिटांनी मंदिरात प्रवेश घेतला तो खऱ्या अर्थाने स्वागतास्पद आहे .या आधीही भूमाता बीग्रेड  च्या तुप्ती देसाई यांच्या नेतृत्वाखाली शबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला होता .मात्र तो अयशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा मंदिरात प्रवेश करण्याचं आवाहन त्यांनी स्वीकारलं होतं  आणि ते पूर्णत्वाला नेलं. पारंपारिक समाजव्यवस्थेच्या नियमांना
झुंगारून पुन्हा एकदा एक नवा इतिहास घडवतं पारंपारिक पद्धतीला छेद देत ,आम्ही सावित्रीच्या लेकी आहोत हे  तीने सिद्ध करून दाखविले . एकोणिसाव्या शतकातील क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी  पांढरपेशा समाजव्यवस्थेला झुंगारून जेव्हा स्री शिक्षणासाठी घरचा उंबरठा ओलांडला, तेव्हा  तत्कालीन  समाजव्यवस्थेने त्यांच्यावर चिखल गोट्यांचा ,शिव्यांचा वर्षाव केला .परंतु त्या डगमगल्या नाहीत .स्त्री शिक्षणाचा विडा उचलून स्त्री जातीला शिक्षणाचे दार खुले करून दिले .स्त्रीशिक्षणाचे बीज ज्या मातीत त्यांनी रुजविले, त्याचीच आमूलाग्र फळे समस्त स्त्रिजातीला आज चाखायला मिळत आहे .आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मजल मारली असून , रिक्षा पासून अंतरिक्षापर्यंतची झेप  तीने घेतलेली आहे .अस असतांनाही काही  धार्मिक ठिकाणी आजही तिला मंदिराचा उंबरठा ओलांडायला पायबंद घातला जातो.. का ? तर ती एक स्त्री आहे म्हणून !
       कायद्यानुसार स्त्री पुरुष समानता प्रत्येक क्षेत्रात लागू झाली असतांनाही तिला काही ठिकाणी आजही मंदिराच्या उंबरठ्याबाहेर  ठेवलं जाते. शबरीमाला मंदिरातही वयाच्या १०ते ५० वर्षापर्यँत स्त्रियांना मंदिरात प्रवेश वर्षोनुवर्षे नाकारला जातं होता. ह्याच पारंपारिक पद्धतीला फाटा देत गेल्या काही वर्षापासून कायदा आणि श्रद्धा या विरोधातील ही चळवळ सुरु होती .ती नेमकी कुणाच्या बाजूने यशस्वी होईल ?याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती .पारंपारिक विचाराला श्रद्धेचं कवच देत काही महिलांनाही मंदिरात स्त्रियांना प्रवेश नकोच असा दुजोरा दिला होता .परंतु  असमानतेच्या या चक्रव्यूव्हातून निघण्याची नांदी काही महिलांनी घातली होती .ती खऱ्या अर्थाने यशस्वीही झाली .आम्हालाही पुरुषाप्रमाणे पूजा करण्याचा अधिकार आहे .हे सांगत केरळ सरकारचा सुरक्षतेखाली दोन जानेवारीला नवीन वर्षाच्या पर्वावर व सावित्रीबाईंच्या जन्मदिनाच्या आदल्या दिवशी सावित्रीच्या  लेकिंनी त्यांचा वसा कायम ठेवून  पुन्हा एकदा नवा इतिहास घडवला तो म्हणजे शबरीमाला मंदिरातील महिला प्रवेश होय .

         खरं तर  पारंपरिक प्रथा परंपरेला झुंगारून जेव्हा जेव्हा समाजात नवविचाराचे वारे वाहू लागतात तेव्हा तेव्हा समाज ते सहजासहजी स्वीकारायला तयार होतं नाही .दलित चळवळ ,स्त्री समानतेची चळवळ ,काळाराम मंदिर प्रवेश ,चवदार पाण्याचा सत्याग्रह ह्या सर्व चळवळी याचे जिवंत उदाहरण होय . प्रस्थापित समाजव्यवस्थेतील काही मूठभर लोकांनी समाजातील लोकांना जे पारंपरिक विचारात जखडून ठेवले आहे.त्यातून बाहेर पडायला समाजाला बराच वेळ लागतो .ज्याप्रमाणे शबरीमाला मंदिरात महिलांकडून  अयप्पाचे दर्शन झाल्यानंतर शुद्धीकरणासाठी मंदिर काहीकाळ बंद करण्यात आले होते ,त्याचप्रमाणे पूर्वी सुद्धा सोवळ्या ओवळ्याचे सावट समाजात पसरले होते .माणसाच्या स्पर्शाने विटाळीत झालेल्या मंदिराचे  शुद्धीकरण करण्याची रीत समाजात होतीच ती एकविसाव्या शतकातही गेली नाही याचं उदाहरण शबरीमला बघायला मिळालं . माणसाला जनावरा पेक्षाही नीच वागणूक दिली जात असतांना डॉ .आंबेडकरांनी प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात नेतृत्व स्वीकारून लोकांना समानतेचे अधिकार मिळवून दिले .त्याचं कार्याची प्रचिती शबरीमाला मंदिरातील महिलाप्रवेशाने पुन्हा एकदा करून दिली कायद्याच्या अनुषंगाने प्रत्येक भारतीयांना समानतेचे हक्क ,अधिकार देण्यात आले.तरीही स्त्री ही मासिक पाळीच्या दरम्यान  विटाळीत असते ,अपवित्र असते अशा   विटाळीत विचारच्या बाहेर आपण आजही निघू शकलो नाही,ही आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल... माणसाने माणसासाठी केलेले हे नियम समानतेला बंदिस्त करणारे नाहीत का ? याचाही विचार आपण करायला हवा.श्रद्धेच्या दृष्टीने बघितले तर आंघोळ करायच्या आधी देवपूजा आपण  करीत नाही ,मंदिरात मासिक पाळीच्या दिवसात प्रवेश करीत नाही ,कारण स्वतःचं मन त्या प्रवेशाला अनुमती देत नाही .पण याला अपवित्रेचा मुलामा देणे योग्य ठरणार  नाही .स्त्रियांची मासिक पाळी ही तिच्या शरीरातील एक प्रक्रिया आहे .तो मासिक धर्म नैसर्गिकपणे येणारचं म्हणून ती त्या दरम्यान अपवित्र असते हे विचार निश्चितच तिच्या अस्तित्वाला अपमानित करणारा ठरतो .बाराव्या शतकात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री .चक्रधर  स्वामींनी स्त्रियांना मासिक धर्मात अपवित्र समजले नाही, त्या  काळातही  ती पूजेस पात्र ठरते ,एवढे पुरोगामी  विचार त्यांनी त्या शतकात मांडले पण आपण मात्र आजही पवित्र-अपवित्र्याच्या विचारात  गुरफटलो आहोत .ही मानसिकता आपणं कुठेतरी बदलावयला हवी .
        शबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देतांना म्हटले आहे की  ‘महिलांना मंदिर प्रवेश नाकारणं हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे. त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही.असा निर्णय दिला असतांनाही यावर पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली ,हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल .वर्षानुवर्षे शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाला बंदी होती .कारण त्या मंदिरात  विराजमान असणारे अयप्पा ब्रह्मचारी आहे .त्यामुळे  मंदिरात १० ते ५० वर्षं वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता, गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर प्रशासनानं ही भूमिका घेतली व न्यायालयानं धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये इथे कुठलाही स्त्रीपुरुष भेद केला जातं नाही .असे मंदिर प्रशासनाचे मत होते .शबरीमाला यात्रेच्या आधी ४१ दिवस कठोर व्रत करण्याचा नियम आहे. मासिक पाळीमुळे महिला सलग ४१ दिवस व्रत करू शकत नाहीत. त्यामुळेच १० ते ५० या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता.हे कारण मुख्य होते .पण महिलांच्या मासिक पाळीमुळे ती अपवित्र होते ,असे विचार समाजाने धारणच का करावे ?आणि मग ती मासिक पाळीमुळे अपवित्र समजल्या जातं असेल तर तिच्या नऊ महिन्याच्या गर्भाचं काय ?ज्यामुळे या सृष्टीची सृजनक्षमता टिकलेली आहे.

२००६मध्ये इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनने महिलांच्या प्रवेशबंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या १२ वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. अखेर सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने निर्णय दिला.गेल्या सुनावणीत मंदिराच्या मुख्य पुजारींचे वकील साई दीपक यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला होता. ‘हे सामाजिक न्यायाचं प्रकरण नाही. मंदिर ही पर्यटनाची जागा नाही. तिथे येण्यापूर्वी देवाविषयी आस्था ही पहिली अट आहे. ज्यांना देवाच्या सर्वमान्य रुपावर विश्वास नाही, त्यांच्या याचिकांवर न्यायालय सुनावणी करत आहे,’ असा युक्तिवाद साई दीपक यांच्याकडून करण्यात आला होता.
“महिला या पुरुषांपेक्षा दुय्यम नाहीत. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जातात. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केलं आहे.या पार्श्वभूमीवर स्त्रियांना मंदिर प्रवेश नाकारणे म्हणजे त्यांचे मूलभूत अधिकार पायदळी  तुडवणे नाही का ? प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या जाळ्यात किती दिवस स्त्रीशक्ती बंदिस्त राहू शकेल? याचाही विचार आपण करायला हवा .तेव्हा शबरीमाला मंदिरात प्रवेशाच्या बाबतीत महिलांच्या  बाजूने जो सवोच्च
न्यायालयाने निर्णय दिला आहे ,तो अगदी  स्त्री अस्तित्वाला न्यायनिष्ठ असा आहे .त्याचं स्वागत आपण करायला हवे .

प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
७४२०८५०३७६

L

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?