वर्तमान पत्राची भूमिका काल आणि आज

वर्तमान पत्राची भूमिका -काल आणि आज


***********************************


            वृत्तपत्रे हा मानवी जीवनाचा एक आवश्यक घटक आहे.म्हणुनच वृत्तपत्राला  लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हटले जाते.रोजच्या ताज्या घडामोडी घेऊन येणारे वृत्तपत्राचे स्थान आजही माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक वेगवान प्रसार माध्यमे असतांनाही टिकून आहे. यावरूनच आपल्याला वृत्तपत्राचे महत्व व भूमिका कळून येते.विश्वसनिय माहिती,ज्ञान,प्रबोधन आणि मनोरंजन करणारे विविधांगी मजकूर वृत्तपत्रातून प्रकाशित केले जाते.म्हणूनच वृत्तपत्राला समाज मनाचा आरसा सबोधला जातो.


        चौदाव्या शतकात चीन मध्ये कागदाचा शोध लागल्यानंतर जर्मनी मधील जोहान्स गुटेनबर्ग याने  इ.स.1436 ला मुद्र्णाचा शोध लावला.त्याने अक्षराचे खिळे तयार करून आपल्याच मुद्राणालयात 'बायबल' ची छपाई केली.त्याबरोबरच  लेखनाचे अनेक दालने खुली झाली व ज्ञानाचे क्षेत्रे व्यापक बनले.त्याच बरोबर जगातील पहिले वृतपत्र  इ.स.1780 ला  'लंडन गँझेट' इंग्लड मध्ये प्रसिद्ध झाले.भारतामध्ये पहिले वृतपत्र  जेम्स आँगस्टस हिक्कीने   'बेंगॉल  गँझेट' इ.स.1780मध्ये इंग्रजी भाषेत सुरू करून ईस्ट इंडिया कंपनीवर टीकात्मक लिखाणही केले. त्यासाठी त्याला शिक्षा करण्यात आली.तेव्हा पासून भारतात वृत्तपत्रसृष्टीचा पाया रोवला गेला.


'समाचार दर्पण' हे भारतीय भाषेतील प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र होय.त्यानंतर भारतीय लोकांना पश्चिमात्य ज्ञानाचा अभ्यास व्हावा,देशाची समृद्धी व कल्याण व्हावे या उद्देशाने 'दर्पण' ची सुरुवात  06जानेवारी 1832  मध्ये मराठी भाषेतून  आचार्य  बाळशास्त्री जांभेकर  यांनी  केली.व मराठी भाषिकांना विचार प्रवृत्त करण्यास भाग पाडले .तर  कृष्णराव भालेकर  यांच्या  दिनबंधू वृतपत्राने बहुजन समाजाच्या चळवळीत महत्वपूर्ण कार्य करून बहुजन समाजाला न्याय व अन्यायाची जाणीव करून देण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावली.


       भारतीय स्वातंत्र्य लढयात केसरी व  मराठा या वृत्तपत्राची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी जनतेच्या मनात ब्रिटिश शासनाच्या विरोधात असंतोष निर्माण करण्याचे महत्वपूर्ण कार्य वृतपत्रांतून  केले.


'राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नाही',शासनाचे डोके ठिकाणावर आहे का'? 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे'.अश्या आपल्या प्रखर लिखाणातून लोकमान्य टिळकांनी इंग्रज शासनाच्या विरोधात रणशिंग फुंकले. त्याचाच परिणाम म्हणजे तत्कालीन वृत्तपत्रावर बंदी  व कठोर निर्बंध लावण्यात आले. यावरूनच वृतपत्राची स्वातंत्र लढ्यात किती महत्वपूर्ण भूमिका होती, हे स्पष्ट होते.


          समाज परिवर्तन घडविण्यात वृत्तपत्रांची महत्वपूर्ण भूमिका दिसून येते .वृतपत्रांचे महत्वपूर्ण उद्देश म्हणजे समाजात लोकजागृती घडविणे,अयोग्य घटनांचा निषेध करणे,कमज़ोर घटकांना शक्तीशाली बनवणे व दैनंदिन घटना नोंदवणे हा होय. त्यामुळेच अनेक वाईट गोष्टीचा निषेध केला जातो.सत्य घटना व वास्तवचित्र समाजापर्यंत  पोहचवत असतांना पूर्वी सुद्धा अनेक वृत्तसंपादकांना शिक्षा देण्यात आली  होती,तर कधी वृतपत्रांवर बंदी घातल्या गेली. पण म्हणतात ना,


"जगण्यासारखे जोपर्यंत जवळ काही आहे.तोपर्यंतच मरण्यात मज्या आहे."हे खरंच!आजही वृतपत्रांतून वाईट गोष्टीचा निषेध केला जातो.पण त्यासाठी अनेक पत्रकारांना आपल्या प्राणाची आहुती व भ्याड हल्याला समोर जावं लागत आहे.डॉ.नरेंद्र दाभोळकर व गोविंद पानसरे ह्या समाज प्रवर्तकांच्या विचारानां बंदुकीच्या गोळ्यांची मारले जाते,त्यामुळे रामरहीम नावांची विषारी साप दंश करण्यास आपले डोके पुन्हा वर काढतात. याला आपल्या देशात नाविन्य नाही. ए.एम.कलबुर्गी व आताच झालेल्या कानडी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या म्हणजे भारतीय स्वातंत्र लोकशाही विचारांची हत्याच होय!नोटाबंदी,परराष्ट्र व्यवहारातील अपयश,वाढती महागाई, बेरोज़गारी व भ्रष्ट्राचारावर लेखन करणे हे  तिच्या भ्याड हल्यामागील कारण सोशल मीडियातून  समोर येतं आहे. गेल्या  मागील वर्षात 10पत्रकार मारल्या गेली, तर अनेक पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्या व हल्ले करण्यात आले .हे खऱ्या लोकशाहीची सरेआम केलेली हत्याच नाही का?


         वृतपत्र हे माहिती व मनोरंजनाचे एक प्रभावी माध्यम असून त्यातून ज्ञान, विज्ञान, वैचारिक व मनोरंजनात्म लिखाण केले जाते.समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे ,चांगल्या गोष्टींना न्याय देने,वाईट गोष्टीवर तीव्र प्रहार करून समाजातील वास्तवचित्र व सत्य घटना समाजासमोर आणण्यात वृत्तपत्राची महत्वपूर्ण भूमिका असून ती लेखणीतून मांडणे आज काळाची गरज आहे.


             तेव्हा समाजातील हे वास्तव चित्र पुन्हा खऱ्या अर्थाने समोर आणण्यास अनेक पत्रकारांनी अश्या भ्याड हल्याला न जुमानता समाजातील वाईट मनोवृत्तीच्या हल्याखोरानां कायम चपराक देण्यास समाजातील वास्तव्यचित्र समोर आणायला पाहिजे!आणि समाजातील  तळागाळातील लोकांनी या भ्याड हल्याचा जाहीर निषेध करायला पाहिजे. भविष्यात  अश्या घटना पुन्हा घडू नये,  यासाठी  शासनाने सुद्धा योग्य व निर्णायक उपाययोजना करून अश्या हल्राखोरांना कठोर शिक्षा करायला पाहिजे.


"अवकाशाच्या ओसाडितील,


पडसादमुके जे आजवरी


होतिल ते वाचाल सत्वरी


फुंक मारिता जीला जबरी


कोण तुतारी ती मज देईल"


          अश्या लेखणीच्या तीव्र तुतारीने आपणही चला तर समाजातील वाईट विचारांचा निषेध करूया!समाजातील खरे वास्तवचित्र आपल्या लेखणीने प्रकाशित करूया!


प्रा.वैशाली रितेश देशमुख


रा.कुही,नागपूर

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?