ती अजूनही असुरक्षितच ....
ती अजूनही असुरक्षितच.......
(हुंडा बळी देशात सुरूच )
26नोव्हेंबर हा दिवस ' हुंडाबंदी दिन ' म्हणून ओळखला जातो .याचं निमित्याने देशातील महिलांच्या खून प्रकरणात हुंडाबळी महिलांची संख्या ही लक्षणीय असल्याची बातमी नुकतीच वृत्तपत्रात वाचण्यात आली. आणि पुन्हा एकदा देशातील कायदा व सुव्यवस्थेला कशाप्रकारे सुरुंग लागलाय हे स्पष्ट झालं.1961च्या हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हुंडा देणे आणि घेणे हा अपराधीय गुन्हा असतांना देखील आपल्या देशात आजही हुंडा प्रथेमुळे महिलांचा इतक्या मोठया प्रमाणात जीव जावा , ही आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल .
घरचा उंबरठा ओलांडायची ज्या समाजाने स्त्रीला मान्यता दिली नव्हती ,ती स्त्री आज प्रत्त्येक क्षेत्रात आपली भूमिका मोठया विश्वासाने पार पाडीत आहे .अंतराळवीर ते देशातील राष्ट्रपती ,पंतप्रधान पदापर्यंतची सर्वच महत्वपूर्ण जवाबदारी ती पेलण्यास सक्षम आहे ,हे तिने सिद्ध करून दाखविल्या नंतरही देशात हुंडा प्रथेमुळे स्त्रियांचा जीव जावा यापेक्ष दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकते .हुंडापद्धती ही समाजातील एक जटिल समस्या असून आजही समाजात पाय रोवून बसली आहे . स्त्री अस्तित्वाला ग्रहण लावणाऱ्या हुंडापद्धतीला समाजातून जोपर्यँत आपण हुसकावून लावणार नाही तोपर्यँत स्त्री हिंसाचाराचे सत्र सुरूच राहणारं आहे .तेव्हा याविरोधात आपण आवाज उठवायला हवा .
समाजात वाईट दुष्कृत्याला पायबंद बसविण्यासाठी अनेक कायदे अमलात आणले जातात .पण तरीही कायदासुव्यवस्थेला पायदळणी तुडवून हुंडापद्धती सारख्या जीवघेण्या प्रथा समाजात आजही जिवंत आहे . समाजातील वास्तव चित्र बघितलं तर एकीकडे श्रीमंतवर्ग वरपक्षाच्या वाटेल त्या मागण्या मान्य करून ,लाखो रुपये लग्नात उधळतात . मुलीच्या सु:खासाठी वाटेल ती रक्कम मोजून ; चारचाकी गाडीपासून दागदागिन्यांपर्यंच्या सर्वच इच्छा पूर्ण करतात . दुसरीकडे मात्र गरीब व मध्यवर्गीय कुटूंब यात भरडला जातो ,कुटूंबाची जवाबदारी आणि मुलींच्या लग्नाची चिंता त्याला मनोमन ग्रासते. हुंडा पद्धतीमुळे जवळ असलेला जमीनजुमला सावकाराजवळ गहाण ठेवतं,कर्ज काढत तो कसाबसा आपल्या मुलीचं लग्न उरकवतो .पण तरीही पैशाची भूक गरीबाच्या मुलीला समाधानाने जगू देत नाही .आणि नंतर खऱ्या अर्थाने तिच्या सासुरवासाला सुरुवात होतो. तिला पैश्यासाठी छळलं जाते ,मारलं जाते ,जाळलं जाते . अश्या वेळी एकतर ती पतीच्या आणि नातेवाईकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करते .किंवा हुंडा न मिळल्यामुळे तिचा जीव घेतला जातो .असे स्त्रियांवर अत्याचार करणारे ,मानवी विकृतीचे अनेक घृणास्पद चेहरे रोजच आपल्या समोर येतं असतात .
स्त्री अत्याचाराचे सत्र पाहता शाळेतील मुलींपासून घरातील स्त्रियांपर्यंत आज असुक्षिततेची भावना निर्माण झाली आहे .असं असतांना आपण मात्र आजही स्त्री समानतेच्या व स्त्री सक्षमीकरणाच्या उत्साहात मग्न आहोत .एकीकडे स्त्री सामर्थ्याचा जल्लोष तर दुसरीकडे स्त्री आकांताचे ,मनाला लज्जित करणारे दृश्य ...एकमेकांच्या किती विसंगत हे चित्र ! समाजातील अन्याय ,अत्याचाराचे हे चित्र दूर करायचे असेल तर आपल्याला स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी ,समाजातील स्त्री अन्यायकारक जुन्या प्रथा, परंपरा ज्या समाजाला घातक आहे ,त्या समाजाबाहेर काढायला हव्या ...नवे विचार समाजात रुजवायला हवे ...स्त्री अस्तित्वाला पोखरून टाकणारी हुंडा पद्धतीसारखी दुष्ट वाळवी पेटवून द्यायला हवी . यासाठी आजच्या नवीन पिढीने एकत्र यायला हवे .
पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समानतेचे हक्क ,अधिकार मिळावे ,तिला प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने,आत्मसन्मानाने कार्य करता यावे , यासाठी कायद्याच्या अंतर्गत तिला सुरक्षात्मक कवच दिल्या गेले .पण स्त्री अत्याचाराचे सत्र मात्र थांबू शकले नाही .याचे कारण आपणचं शोधायला हवे .कुठलाही कायदा हा समाजव्यवस्थेच्या हिताचा असतो .पण समाज तो सहजासहजी स्वीकारतांना दिसून येतं नाही .मग तो तिहेरी तलाक कायदा असो वा शबरीमला मंदिरात स्त्री प्रवेश किंवा हुंडाबंदीचा . समाज तो बदल सहजासहजी स्वीकारत नाही .आणि मग याचेचं दुष्परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागतात . स्वातंत्र्याच्या पूर्वी अनेक कुप्रथा समाजात होत्या. सतीप्रथा ,बालविवाह ,केशवपन ,विधवा विवाहाला विरोध ,देवदासी या प्रचलित प्रथापरंपरेमुळे समाजस्थिती खिळखिळी झाली होती . समाजाला त्यातून निघायला किती तरी काळ लागला .कायद्यांनी बंदी आणल्यानंतरही अनेक सती गेल्याचे उदाहरण समाजात पाहायला मिळतात .म्हणजे समाजात कुठलेही नवविचारांचे वारे वाहू लागले की समाज सहजासहजी ते स्वीकारत नाही.हुंडापद्धती ही सुद्धा समाजाला चिपकून बसलेली गोम आहे .जी सहजासहजी निघू शकणार नाही .ती समाजाच्या मनामनातून निघणे गरजेचे आहे .
स्वातंत्र्याला सातदशके लोटूनही काही कृप्रथा समाजाबाहेर आपण घालवू शकलो नाही, हे खेदाने सांगावं वाटते .समाजात आजही कोमार्य चाचणी प्रथा प्रचलित असल्याचे उदाहरण नुकतेच पिंपरीच्या भाटनगर ,पुणे येथील ऐश्वर्या भाट ह्या कोमार्य चाचणीला विरोध पत्करणाऱ्या बंडखोर तरुणीच्या माध्यमातून समोर आली तर ह्याच पिंपरीमध्ये हुंड्यासाठी एका डॉकटर पत्नीने तिच्या शरीरामध्ये ती आजारी असतांना एच आय व्ही चे विषाणू सोडल्याचा आरोप डॉक्टर पतीवर व सासूसाऱ्यांवर केल्याची घटना नुकतीच मीडियाच्या माध्यमातून बघण्यात आली .तर वरोरा तालुक्यातील पवनी या गावी शुभांगी पिसे या नवविवाहितेने 30नोव्हेंबर ला विष प्राशन करून आत्महत्या केल्याची बातमी नुकतीच वाचण्यात आली .आपल्या मुलीला सासूसासरे व पती ,अमावस्येच्या रात्री मुलीला जन्म दिल्यामुळे त्रास देत होते.असा आरोप तिच्या आईवडिलांनी तक्रार करतांना लावला
आहे .खरं तर अश्या कित्येक निष्पाप मुलींचा जीव समाजातील वाईट विचारांमुळे ,वाईट प्रथेमुळे जातो .आणि जेव्हा आईवडिलांचे डोळे उघडतात .तेव्हा वेळ निघून गेलेली असते .स्व:ताच्या पायावर उभी राहण्याच्या आधी कित्येक मुलींना लग्नाच्या बाहुल्यावर उभे केल्या जाते .मुलाला लग्नाच्या बाजारात उभे करून मुलांची सरेआम ,निर्लज्जपणे बोली लावणाऱ्या आईवडिलांचीही संख्या समाजात कमी नाही .हे कुठेतरी थांबायला हवं .आज प्रत्येक आईवडिलांनी हुंडा पद्धतीला विरोध करायला हवा.आपल्या आजूबाजूने जर हुंड्यासाठी कुठल्याही स्त्रीवर अन्याय अत्याचार होतं असेल तर आपण तिच्या स्वरक्षणार्थ एकत्र यायला हवे .या नैतिक जवाबदारीचे भान जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने ठेवले तर घरेलू हिंसाचाराला नक्कीच आळा बसेल .
शिर्डी येथील कोपरगांव या तालुक्यात मुलगी वाचवा हा उपक्रम राबवण्यात आला .तिथल्या प्रत्येक घराच्या समोरच्या दाराला मुलीचं नावं लावून तिथल्या लोकांनी जो अनेकांपुढे आदर्श ठेवला तो खरंच कौतुकास्पद आहे .असे उपक्रम प्रत्येक गावांत राबवले तर निश्चितच मुलींना आत्मबळ मिळेल.यात शंका नाही .
हुंडा प्रथेसाठी भारत सरकारने स्वतंत्र कायदा करूनही यात फरक पडला नसल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासातून नुकतेच स्पष्ट झाले आहे. जगभरातील महिलांसाठी घर हेच सर्वाधिक धोकादायक ठिकाण असल्याचे असल्याचेही अहवाल सांगतो आहे.मागील वर्षभरात 87 हजार महिलांना विविध कारणासाठी ठार मारण्यात आले त्यातील 85 टक्के म्हणजेच 50,000 महिलांचा खून जवळच्या व्यक्तीकडूनच झाल्याचे उघड झाले आहे .दर तासाला सहा महिलांचा खून त्यांच्याच ओळखीच्या माणसाकडून होतो . असे राष्ट्रसंघाच्या अमलीपदार्थ आणि गुन्हेविभागाच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे .
भारतामध्ये महिलांच्या हत्येचे प्रमाण 2016 मध्ये 2.8 ते एवढे होती . जी केनियापेक्षाही अधिक आहे .यानंतर तांझानिया 2.5, अझरबैजान 1.8 ,जॉर्डन 0.8आणि ताजिकिस्तान 0.4 या देशाचा क्रम लागतो. भारतामध्ये 15 ते 49 वर्ष वयोगटातील 33.5 टक्के महिला शारीरिक हिंसाचाराला बळी पडतात.यावरून देशातील हुंडाबळी चे प्रमाण विषण्ण करणारे आहे. यासंदर्भात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार हुंडाबळीचे प्रमाण हे चाळीस ते पन्नास टक्के एवढे आहे .आंतरराष्ट्रीय स्तरावर दर एक लाख महिलांमध्ये 1.3एवढी आहे .हुंडाबळीचा वरील आकडा अतिशय भयावह असून ,देशातील प्रत्येक व्यक्तीने हुंडाबंदीचा संकल्प करणे गरजेचं आहे .
प्रा .वैशाली रितेश देशमुख
ग्राविकास कनिष्ठ महाविद्यालय (कनिष्ठ व्याख्याता )कुही ,नागपूर
7420850376
Comments
Post a Comment