न उलगडणाऱ्या चेहऱ्याचे कोडे ...!!

न उलगडणार्‍या चेहऱ्याचे कोडे.....!!

       सृष्टीची निर्मिती कशी झाली व कधी झाली यावर अजूनही नेमकं संशोधन होऊ शकलं नाही .पण एक मात्र निश्चित की सर्वांग सुंदर सृष्टी निमार्ण झाली ती अनेक रंगबीरंगी चेहरे घेऊनचं  ...यात  खळखळणाऱ्या नद्या ,उंच पर्वतातून बेधुंद वाहणारे झरे,अमर्याद रत्ने ,वनस्पती आपल्या सखोल अतित्वात सामावून घेणारे समुद्र , दऱ्या खोऱ्यातून घडणाऱ्या सशक्त मनगटाची व इतिहासाची साक्ष देणाऱ्या सह्यांद्रीच्या पर्वत रांगा ...काश्मीर ते कान्यकुमारीपर्यंत पृथ्वीवर स्वर्गाची अनुभूती निर्माण करणारं नैसर्गिक सौदर्य ...हे सर्व काही मनाला भुरळ घालणारं ... सृष्टीचे  अगणित रूप  पानाफुलांपासून ते मानवी चेहर्यापर्यंत एक न उलगडणारे कोडंच जणू ...शेकडो वनस्पती ,विविध रंगांची पाखरे ,मनाला आकर्षित करणारे सुंदर रंगबिरंगी पक्षी , फुले ,पाने सर्वच अवर्णनीय ,अकल्पनीय ,अद्भुत ......यातील कुठल्याच घटकात साम्यता नाही . रंग रूप ,गधंही प्रत्येकांची वेगवेगळी !

         जसे नैसर्गिक घटकांचे रूप वेगवेगळे तसे  मानवी चेहरेही वेगवेगळे...चेहऱ्यावरती निरनिराळे भाव व्यक्त होतांना दिसतात .कधी दुसऱ्यांना हसवणारे चेहरे तर कधी फसवणारे ..कधी दुःख वाटून सावरणारे तर कधी हसवून रडवणारे चेहरे ....स्पर्श ही वेगवेगळा कधी दुःखात धीर देणारा तर कधी विश्वासाने गळा कापणारा ....हास्य ही वेगवेगळे ;कधी मनमोकळे हसवणारे तर कधी हसून डिवचणारे ...बघण्याची दृष्टी ही वेगवेगळी ,कधी आपुलकीने मदत करणारी तर कधी विकृतीने ग्रासलेली ....कुणावर विश्वास ठेवायचा या जगात? इथे भाऊच भावाचा गळा कापतोय ..रक्ताची  नाती  अविश्वासाने तुटायला लागली .आपलेच पाठीमागून घात करायला लागलेय .माणुसकी इथे अदृश्य व्ह्ययला लागली .सर्वत्र अविचारांचा काळोख ...!

जगणे क्षणाचे होते ,पण तेच रणाचे होते
मी बसले ज्या झाडा खाली ,ते झाड उन्हाचे होते
दोस्तांनो दोस्ती साठी ,मी दान दिले रे सारे ...
मग पाठीत वार करणारे ,ते यार कुणाचे होते ...
 
          असे हे भाव भावनांचे खेळ सर्वत्र दिसून येते . मानवी मन असंच अनेक रहस्यांनी दडलेलं ..'मी ', 'माझा','मला' यात गुरफडून पडलेलं.कधी खूप स्वार्थी तर कधी मदतीची परिसीमा गाठणार .कधी संपत्ती ,कधी पद ,तर कधी स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना मागे खेचण्याचा प्रयत्न करणारं..तर कधी स्वतःला सिद्ध करण्यासाठी  इतरांची  प्रतिमा मलीन करणारं ..किती स्वार्थी झालाय माणूस ?जन्माला आलो तर एक दिवस हे जग सोडून जाणे आहे .हे माहिती असतांनाही वाटेल तसा वागतोय .दुसऱ्यांच्या भावनेचा खून करतोय  ,दुसर्यांना आपल्या स्वार्थासाठी फसवतोय  ,दुसऱ्यांचा जीव घेतोय ,अत्याचार करतोय .अहो ! इथे माणसांना हिंस्त्र  जनावरांपेक्षा माणसांचीच भीती .माणूसच माणसाला घाबरायला लागलाय .तोच शत्रू आणि तोच मित्र ...कारण इथल्या चेहऱ्याचे रंगच वेगळे ...कधी ते बनवतात ,कधी बनतात . कधी ठगतात तर कधी ठगवतात ,कधी मिश्कीलपणे दुसऱ्यांवर हसून डिवचंतात ...वरपांगी आपुलकी दाखवणारे चेहरे कधी वार करून जातात हे लक्षातही येतं नाही .इथे आपलेच चेहरे फसवतात ,रडवतात मग दुसर्या चेहऱ्यांवर विश्वास टाकायचा तरी कुणावर ?

          असेच एक म्हातारे गृहस्थ आयुष्याच्या शेवटच्या क्षणी फार नाराज होतात .आयुष्यभर प्रामाणिकपणे  वागलेल्या या गृहस्थाला अप्रामाणिकपणा खपत नाही .मृत्यूनंतर स्वर्गात त्याचं स्वागत होते. त्यावेळी देवाला एक प्रश्न विचारतो आणि म्हणतो ,"देवा तूच मानव जातीला जन्माला घातलंस ना ?मग इथे प्रत्येकाची वागणूक अशी वेगळी का केलीस ?"देवानी त्यावर उत्तर दिलं होय ;सर्व माझीच लेकरं .तरी ती वेगवेगळी वागतात .त्याला कारण आहे .प्रत्येक माणूस पृथ्वीवर जातांना जगासाठी एक नवा संदेश घेऊन जातो .या संदेशातूनच प्रत्येक जन आपलं जीवन जाणतो व त्यानुसार तो वागत असतो.तेव्हा त्या गृहस्थांनी विचारलं ते कसं ?तेव्हा उत्तर देतांना देव त्यांना समजवून सांगतात . माणसाने माणसाकडूनच काही शिकावं म्हणून ,'मी इथे चांगलं वाईट दोन्हीची निर्मिती केली '.सांगण्याचं तात्पर्य म्हणजे वाईट निर्माण झालं नसतं तर माणसाला चांगलं कळलं नसतं,असत्याची निर्मितीच झाली नसती तर सत्याचं महत्व मानवाला कळलं नसतं .इथे दुःख म्हणजे काय हेच कळलं नसतं तर मानवाने दुःखात आनंद शोधण्याचा प्रयत्नच कधी
केलाचं  नसता .मानवाला चांगल - वाईट कळावं हाच यामागचा उद्देश आहे .खरं तर माणसाला ठेच लागणार नाही तर तो समोर सावध होणार कसा ?यावरून एवढं लक्षात येते की या सृष्टीत चांगलं आणि वाईट दोन्ही आहे .तेव्हा आपण प्रत्येक वेळी सावध असायला हवं .बस वाईटामधून चांगलं काय घेता येईल याचा प्रयत्न आपण प्रयत्न करायला हवा .

   रोज भेटणारे चेहरे ,रोज हसणारे चेहरे
ही बेगडी वाटतात कधी कधी ....त्यातील  किती खरे आणि किती खोटे शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपल्यासमोर भीषण सत्य समोर येईल .सु:खंदुःखात जवळ येणारी माणसंही आता मुखवट्यांनी सजलेली असावी का ?असा प्रश्न पडतो .चांगुलपणाची झूल पांघरून कित्येक चेहरे  सन्मानाला पात्र होत असतात .वरून सोन्याचा मुलामा  देऊन चकाकणाऱ्या दागिन्यासारखे ,आतून मात्र काळवंडले .तेही चेहरे ओळखता यायला हवे !याचं चेहऱ्यानी तर घात होतो मानवी मनाचा...मन  तुटतात ,दु:खवली जातात ,नेतात दूर एकमेकांच्या कधीही जवळ न येण्यासाठी ...चेहऱ्याचं वास्तव स्वरूप ओळखायला वेळ लागतो .कधी कधी आयुष्य निघून जातं चेहरे ओळखण्यात आणि जेव्हा खरा चेहरा येतो समोर तेव्हा तुटतात मने एकमेकांची ..नातं तुटतं मैत्रीचं ,नात्याचं आणि प्रेमाचं होतात तुकडे  ..वेदनेने साठवलेले चेहरे लक्षात राहतात आयुष्यभर..कधीही न विसरण्यासाठी .....!!

      

प्रा .वैशाली रितेश देशमुख
रा .कुही ,जि .नागपूूूर

9021172362

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?