ऐसे कैसे झाले भोंदू .....
अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड !
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे गुप्तधन मिळून झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी दोन वर्षाच्या युग अशोक मेश्रामचा नरबळी दिल्याची घटना नुकतीच वाचण्यात आली आणि आपण 21व्या शतकात वाटचाल करीत असतांना नरबळीसारखे अमानवीय कृत्य आजही समाजात घडत आहेत ;यावर पुन्हा विश्वास ठेवावा लागला. गडचिरोली जिल्ह्यातील रमाळा या गावात गुप्तधन आहे. व ते मिळविण्यासाठी डोक्यावर तीन भोवरे असलेल्या मुलाचा नरबळी दिला तर ते गुप्त धन आपल्याला प्राप्त होऊ शकते असा दूषित विकृतीचा विचार गावातीलचं काही स्वयंघोषित मांत्रिकाला झाला. आणि ते त्या तीन भोवरे असलेल्या मुलाच्या शोधात लागले. असं असतांना गावातीलच युगच्या डोक्यावर तीन भोवरे असल्याची माहिती त्यांच्या कानावर काही स्त्रियांद्वारे आली. याचाच फायदा घेतं 22 ऑगस्ट रोजी युगआपल्या भावाबरोबर खेळत असतांना त्याचे त्यांनी अपहरण केले व त्याला एका निर्जनस्थळी असलेल्या एका झोपडीत बंद करून 22 ऑगस्टच्या रात्री, त्याचं झोपडीत अघोरी पूजा करून त्याचा बळी देण्यात आला. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात व अंधश्रद्धेचं भूत आपल्या मनगुटीवर बसवून नाचविणाऱ्या ह्या दुष्कर्मी कृत्य करणाऱ्या नराधमाच्या अंगाला एका निरागस मुलाला मारतांना घामही फुटला नसावा म्हणजे ही कृत्य राक्षसी कृत्यच म्हणावं लागेल. मात्र अंधश्रद्धेच्या विचारांनी बरबटलेल्या या कृत्यामुळे युगचा मात्र यात नाहक बळी गेलेला आहे. एकविसाव्या शतकात वावरत असतांना अश्या अंधश्रद्धेने बरबटलेल्या विचारांना जेव्हा आजही समाज अविचाराचे खतपाणी घालतो ; तेव्हा युगसारख्या कित्येक निरागस बालकांचे यात नाहक बळी जातात. ही आपल्या समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
या सर्व घटनेला जवाबदार कोण ?तर उत्तर एकच मिळेल ती म्हणजे अंधश्रद्धा जी समाजमनावर युगाणीयुगे अधिराज्य गाजवीत आहे. समाज हा परिवर्तनशील असतो असं आपण म्हणतो अनेक मळगतीतील विचार आपण जाळून टाकतो आणि समाजात समाजाला साधक अश्या नवविचारांची रुजवणूक होते असं असतांना अंधश्रद्धेची वंशावळ संपुष्ठात न येता पुन्हा ती वाढतच जाते .याचं कारण म्हणजे अंधश्रद्धेच्या झाडाला आपण विश्वासाचे खतपाणी घालतचं आहोत.
हेच आपण समजू शकलो नाही. म्हणूनच आज रामरहीम, आसाराम आणि अनेक भोंदू बाबा आपल्या लाचारीचा फायदा घेतांना दिसून येत आहे. ही आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल.ऐसे कैसे जाले भोंदू l कर्म करोनि म्हणती साधू ll अंगा
लावुनिया राख l डोळे झाकूनी करिती पाप ll
वरील ओळी लिहून सोळाव्या शतकात संत तुकारामांनी असल्या भोंदू बाबांचं जाहीर निषेध केला होता. मात्र आज 21व्या शतकात विज्ञान युगात आपण ती भोंदूगिरी ओळखू शकलो नाही, सर्वसाधारणच नाही तर देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती असल्या भोंदूबाबाचे पद्स्पर्श करण्यास धन्यता मानत अस
ल्याचे दिसून येते. ही शरमेचीच बाब आहे.
संत सज्जन दिसतील जेथे l लाटांगने जावे तेथे l असे आपले संत सांगून गेलेत , पण ते संत अखंड विश्वशांतीसाठी जप करणारे असावे, मानवतेचे मंत्र देणारे असावे, स्वत:च ऐहिक सु:ख सोडून मानवतेच्या सेवेसाठी समस्त जीवन अर्पण करणारे असावे, मानवसेवा हाच त्यांचा धर्म असावा पण आज असं दिसून येत नाही, स्वार्थी भोंदू बाबांची गर्दी समाजात वाढलेली आहे. आणि आपणही त्यांच्या मागे तितक्याच तत्परतेने धावत आहोत. ते सोन्याचांदीच्या रथात, बंगल्याच्या ऐषोआरामात, एसी च्या थंड हवेत वैभवशाली जीवन जगतं आहेत, आपण मात्र गर्दीत, गर्मीत घाम गाळत ;अनवाणी पायाने त्यांच्या मागे मेंढरांच्या कळपाने मागे धावत आहोत. आपल्या समस्येचे, आपल्या अडचणीचे कुठे तरी निवारण व्हावे म्हणून !
समाजातील अंधश्रद्धारुपी अज्ञान, दूर व्हावा यासाठी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद अश्या अनेक थोर महंतांनी मानव सेवा हिच ईश्वर सेवा आहे,देव देवळात नाही तर माणसात आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला पण आपल दुर्दैवं असं की तो देव शोधण्याचा कधी प्रयत्नच आपण केला नाही. आणि तोच परमेश्वरी अंश शोधण्याचा नादात राम रहीम, आसाराम बाबा सारखे विषारी नाग डोके वर काढू शकले.व त्यांनी अनेकांची शिकारही केली. याला जवाबदार कोण ?तर आपणच.. हे कुठे तरी थांबायला हवं !
गाडगेबाबांसारखे फाटके तुटके कपडे घालून , अनवाणी पायाने, हातात खंजेरी, झाडू घेऊन समाजातील वाईट मनोवृत्तीची धूळ साफकरणारे संत आहेत तरी कुठे ? आपल्या समाजाला ज्यांनी संस्कार दिले, मानवतेची शिकवण दिली, रामराज्याची संकल्पना दिली, राष्ट्रीय एकता व अखंडता टिकविण्याचे मंत्र दिले असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज समाजात सापडतील का ?या सर्व विचारांचे विवेचन आणि विरेचन आपण प्रत्येकाने केले तर आजच्या विकृत बाबांचे खरें रूप आपल्या समोर यायला वेळ लागणार नाही असं मला वाटते.
मानवसेवा हिच ईश्वर सेवा आहे.हा मंत्र जपून देशातील दिन, दुबळ्या,अनाथ, गरीब लोकांना जर आपण काही प्रमाणात काही मदत करू शकलो तर ती ईश्वर सेवा होईल. आज समाजात अश्या लोकांची खरंच गरज असून माणुसकीची ज्योत विझू न देता त्याला अखंड पणे तेवत ठेवणं प्रत्येकाची जबाबदारी आहे.मानवता हा एकच धर्म असून ईश्वर हा मानवाचा अंश आहे. असं मानून माणसेवा हिच ईश्वर सेवा आहे. हा मंत्र जपायला हवा !!
प्रा. वैशाली रितेश देशमुख
कुही, नागपूर
7420850376
Comments
Post a Comment