शिक्षक हा राष्ट्र उन्नतीचा ठेवा !
शिक्षक हा राष्ट्र उन्नतीचा ठेवा !
भारताचे पहिले उपराष्ट्र्पती व दुसरे राष्ट्र्पती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण् यांचा जन्म दिवस 5 सप्टेंबर देशभरात शिक्षक दिन म्हणून मोठया उत्साहात साजरा केला जातो.शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचा, गौरवाचा सन्मनाचा हा दिवस ! आपल्या समृद्ध संस्कृतीच्या जडण घडणीत ज्यांचा सिहांचा वाटा आहे अश्या संस्कृतीच्या रक्षकाच्या कर्तुत्वाला प्रणाम करणारा हा दिवस.ज्याच्या ज्ञानरुपी स्पर्शाने असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन सुवर्णमय होते, अश्या ज्ञानपिपासू व्यक्तिमत्वाचा गौरवाचा हा दिवस!
*गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुदेवो महेश्वरा
गुरु :साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम:
भारतीय संस्कृतीत गुरूला परमेश्वरापेक्षाही मोठं स्थान दिल्या गेलं. प्राचीन काळापासून आपल्या महान संस्कृतीला गुरु शिष्य परंपरा लाभली आहे. गुरु आणि शिष्याचं नातं हे निरंतर वाहणाऱ्या नदीसारखंच ! शिक्षकास पूर्वी 'आचार्य ' म्हणतं, आचार्य म्हणजे आचारवान. स्वतः आदर्श जीवन आचरणात आणून विद्यार्थांकडून आचरवून घेणारा तो आचार्य. तर वेदामध्ये गुरूला अत्यंत शक्तिशाली मार्गदर्शक व अज्ञान दूर करणारा असं म्हटलं आहे.
खरा शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांच्या जीवनातला अंधकार दूर करतो. म्हणून राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचा महत्वाचा वाटा समजल्या जातो .आज काळाच्या ओघात जरी शिक्षण क्षेत्रात अनेक आमूलाग्र क्रांती घडून आली असली तरीही शिक्षकांची जवाबदारी कुठलाही संगणक पूर्णपणे हाताळू शकतं नाही. कारण संगणक ज्ञान, बुद्धी समृद्ध करू शकतो पण त्या ज्ञानाला आकार देत संस्काराची रुजवणूक जर कोणी करू शकतं असेल तर तो म्हणजे फक्त शिक्षक आणि शिक्षकच होय !
प्लेटो म्हणतो, "आदर्श राज्याच्या निर्मितीत शिक्षकांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असतो." कारण मानवी जीवन अनुकरणशील असते इथे दिसतं तसं रुजतं म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात आवड, जिज्ञासा,आत्मविश्वासाची उर्मी निर्माण करू शकतं असेल तर तो म्हणजे शिक्षकचं होय. शिक्षकांमध्ये विद्यार्थांना ज्ञानाबरोबरच मानवी मूल्यभाव देण्याची, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची त्यांच्या विचारविश्वाला आकार देण्याची महत्वपूर्ण जबादारी असते. आणि म्हणूनचं शिक्षक हा केवळ ज्ञानदाता असून भागत नाही तर त्याला माणूस बनविणारा शिल्पकार सुद्धा व्हावं लागतं. कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना आकार देण्याची महत्वपूर्ण जवाबदारी शिक्षकांवर असते. विकसित राष्ट्राची निर्मिती जर व्हायची असेल तर त्या देशाचा प्रत्येक व्यक्ती एक उत्तम नागरिक होणं गरजेचं आहे.आजची सामाजिक परिस्थिती अतिशय विदारक आहे. देशात वाईट मार्गाने, वाईट विचारांनी जाणाऱ्यांची संख्या जास्त वाढत चाललीय,माणसातली दुष्ट प्रवृत्ती वाढायला लागलीय, माणसातील प्रेमाचा ओलावा नष्ट व्हायला लागला आहे. नातेसंबंध खालावत चाललेले आहे.सोबतच विद्यार्थ्यांमध्ये नकारात्मकता, नैराश्यवृत्ती वाढीस लागून आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेण्यास तो प्रवृत्त होत आहे. असं असतांना जीवनाला सकारात्मक बघण्याची व आत्मविश्वाची रुजवणूक करण्याची महत्वपूर्ण जवाबदारी शिक्षकांवर आहे. ती भूमिका प्रत्येकांनी पार पाडायला हवी.प्रेम, प्रज्ञा, करुणा, शील, विनम्रता, मानवता, सहृदयता या सर्व नीतिमूल्यांची रुजवणूक जर कुणी करू शकतं असेल तर तो शिक्षकच होय.
आईवडील आणि शिक्षक हे माणसाच्या आयुष्यातील महत्वपूर्ण त्रिकोण आहे. त्या त्रिकुटातूनच त्याला जीवनाची योग्य आयुष्याची दिशा मिळू शकते.ती योग्य दिशा आपण दाखवायला हवी.
"जेथे जेथे शिक्षकाचा होतो बहुमान तो देश ठरतो महान. "असं कुसुमाग्रजांनी सांगितलं आहे. पण आज चार दोन शिक्षकांच्या अविवेकी वागण्यामुळे शिक्षकांचा पदाचा बहुमान खालावत चाललेला आहे. मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी इथे व्यावहारिक विद्येचे दुकानदारी खुले आम मांडलेली दिसून येतेआहे. स्वार्थापोटी प्रामाणिक लोकांच्या विचाराला दाबल्या जातं आहे.गुणवंत शिक्षकांपेक्षा धनवंत शिक्षक विद्यादानासाठी निवडला जातं आहे. असं चित्र असतांना देशात गुणवंत विद्यार्थी घडणार कसा ? हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे.
" शिक्षक हा मित्र , तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असतो. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी योग्य त्या वातावरण निर्मितीची कुशलता शिक्षकाजवळ असते त्याला सामाजिक समस्यांची , गरजांची तसेच जबाबदारीची जाणीव असते.”
असे जॉन ड्यूई म्हणतो. त्या परिस्थितीला अनुसरून त्याच्या मनावर योग्य संस्कार टाकण्याची महत्वपूर्ण जवाबदारी त्या शिक्षकावर असते. वर्गातील पहिल्या बाकापासून शेवटच्या बाकावरील विद्यार्थाच्या मनापर्यंत जर तो शिक्षक पोहचू शकला तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनावर तो राज्य करू शकतो हेही तितकंच खरं !म्हणून कुसुमाग्रज आपल्या कवितेतून दुःखात सापडलेल्या एका विद्यार्थ्यांच्या भावना जेव्हा आपल्या 'कणा 'या कवितेतून व्यक्त करतात तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थाच्या नात्यातील ऋणानुबंध आपल्या डोळ्यासमोर जिवंतपणे उभा राहतो.
" मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर नुसतं लढं म्हणा." अशी पाठीवरची आत्मविश्वासाची थाप आजच्या विद्यार्थांना हवी
आहे.त्यांच्या अडचणींना समजून घेत, त्यांच्या भावनेला उजाळादेत, त्यांच्यात आत्मविश्वासाची योग्य रुजवणूक करतं त्यांना योग्य दिशा दाखविणारा शिक्षक हवा आहे. तो शिक्षक आपण आपल्यात बिंबवायला हवा ! त्यामुळे शिक्षक हा त्या पदाला न्याय देणारा हवा असतो तो प्रतिभासंपन्न, ज्ञानसंपन्न,विचारसंपन्न असून भागत नाही तर तो विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेणाराही असायला हवा. कारण आजचे विद्यार्थी हे उद्याचे जागृत, जवाबदार, समर्थ व सक्षम नागरिक तयार व्हायला हवे आहेत ;म्हणून ती महत्वपूर्ण जवाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे. म्हणूनचं शिक्षकला राष्ट्राचा अनमोल ठेवा म्हटलं जाते. तो अनमोल ठेवा जोपासायला हवा.
'अविवेकाची काजळी l झाडुनि विवेकदीप उजळी l योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll'
असे संत ज्ञानेश्वर सांगून गेले. तोच शिक्षक रुपी ज्ञानदीप अविरत तेवत राहायला हवा.विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार टाकून त्यांच्या कल्पनाविकासाला चालना देत त्यांच्या समोर आपलं आदर्श ठेवण्याची महत्वपूर्ण जवाबदारी आपल्यावर असून ती आपण प्रामाणिकपणे निभवायला पाहिजे असं मला वाटते. समाज घडविणारे आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण, माझ्या युवक मित्रांनो... अशी हाक देत आपल्या प्राचीन, अर्वाचीन आधुनिक, स्वरस्वत:च्या अथांग साहित्यसागरात ज्ञानाची डुबकी मारायला लावणारे, साहित्य हे रक्ताने निर्माण व्हायला हवे, त्यासाठी समाजातील दुःख, दारिद्र्य, समस्यां जाणून घेतं त्या दरिद्री नारायणापर्यंत आपण पोहचलं पाहिजे, तरचं समाजतील संवेदना वाटून घेता येतील असा महत्वाचा संदेश विद्यार्थांना देणारे सानेगुरुजी, सर्व समाजातील लोकांना विद्येच माहेर घरं खुले करून देणारे महात्मा फुले , आमच्या महिलांच्या आत्मविश्वासाला जागविणाऱ्या सावित्राबाई फुले आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांन कडून भव्यदिव्य उज्ज्वल राष्ट्राचं स्वप्नं पाहणाऱ्या व त्यांना योग्य मार्ग दाखविणाऱ्या आधुनिक राष्ट्राचे शिल्पकार, भारतरत्न, माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम या गुरूंचे आदर्श घेतं त्यांच्याचं कार्याला समोर नेण्याचा संकल्प आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्याने आपण करायला पाहिजे असे मला वाटते. आम्हांला प्रेरणा देत शिक्षादानाचे महान कार्य करून जाणाऱ्या सर्वच महान विभूतीस शिक्षक दिनानिमित्य शतशः प्रणाम !
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
7420850376
खूपच छान विवेचन आहे
ReplyDeleteसुंदर लेख मँडम ...अप्रतिम
ReplyDeleteशिक्षक दिनानिमित्त, आपल्या भारतीय संस्कृती तील गुरुचे महत्व विशद करणारा लेख. विचारप्रवर्तक लेख. अभिनंदन आणि शुभेच्छा !!💐💐💐
ReplyDeleteधन्यवाद !
ReplyDelete