चला अवयवदानाचा संकल्प करूया !
चला अवयवदानाचा संकल्प करूया !
गडचिरोली येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ )च्या तब्बल आठशे एकोन्नवद जवानांनी मरणोपरांत देहदानाचा संकल्प करणार वृत्त वाचलं आणि अभिमानाने पुन्हा भारतीय जवानांच्या ध्येर्याला व कर्तुत्वाला सलाम करावासा वाटला. ' जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी ' असं वचन घेतं, जो आदर्श त्यांनी अनेकांपुढे ठेवला तो निश्चितच अनेकांना प्रेरणादायक व अभिमानास्पद आहे. अवयवदान व देहदानाचा संकल्प करणाऱ्या या सर्वच वीर जवानांना व अवयवदान करणाऱ्या सर्वच देशबांधवांना जागतिक अवयवदिना निमित्य मानाचा मुजरा !13ऑगस्ट हा दिवस, जागतिक अवयवदान दिन म्हणून संपूर्ण जगात ओळखल्या जाते. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे वेगवेगळे अवयव इतर गरजू रुग्णाला देणे म्हणजे अवयवदान होय ! व्यक्तीचे मृत्यूनंतर त्याचे डोळे, हाड, त्वचा दान करता येते. तर एखाद्या आजारामुळे किंवा अफघातामुळे मेंदू निकामी झालेल्या व्यक्तीचे डोळे हृदय, लिव्हर, किडनी,त्वचा , व्हेन्स, बोन्स असे अनेक अवयव गरजू रुग्णाला दान केले तर जीवन मरणाच्या दारात उभ्या असलेल्या अनेक गरजवंतांचे प्राण वाचविण्यास ते नवसंजीवनी ठरू शकते. म्हणून अवयवदान हे जगातील सर्वश्रेठ दान आहे असे म्हटले जाते. पण आजही अवयवदानाचा निर्णय घेण्यास कमालीची उदासीनता समाजात दिसून येते.आपण आजही देहाची माती करून धन्यता मानतो, ही आपली शोकांतिका म्हणावी लागेल. त्याचं खुळ्या चालीरीती, स्वर्ग-नर्काची खुळचट कल्पना, स्वर्गोत्तर मोक्ष न मिळण्याची भीती,जुन्या चालीरीतींना न सोडण्याचा मोह इत्यादी कारणे अवयवदान न करण्यास आजही अडसर येतं आहे.खरं तर वास्तव जीवनाचा विचार न करता; स्वर्ग-नर्क, आत्मा - परमात्मा,मोक्ष, पुनर्जन्म अश्या खुळचट, बेगडी स्वरूपाच्या विचारात आजही आपण गुरफडून पडलो आहोत. मरोत्तर मोक्ष मिळो न मिळो पण आपल्या हयातीत मोक्ष मिळाल्याचं समाधान जर मिळवायचं असेल तर या खुळचट विचारातून बाहेर पडणं गरजेचं आहे.नवविचारांची रुजवणूक करून अवयव दानाचा संकल्प करणे आज गरजेचं आहे.त्यासाठी एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते.
ब्राझील देशातील थेन चिकानो स्कार्पा याने घोषित केले की त्याची करोडो किंमती डॉलर ची बेंटली कार तो जमिनीत दफन करणार ! का ?तर त्याच्या मृत्यू नंतर त्याचं जीवन एशोआरामात जावं म्हणून.....!त्याच्या या घोषणेमुळे त्याला अनेकांनी मुर्खात काढले,तर काहींनी चर्चा व टीका केली. कोणी त्याला ती कार दान करण्याचा सल्ला दिला तर काहींनी राष्ट्रीय संपत्तीचा नाश करणारा देशद्रोही म्हणून त्याला हिनवले. या सर्व टीकेला समोर जात त्या कारची दफनविधी करण्याची तारीख त्याने जाहीर केली. हा संदेश जाताच कार दफनविधीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने तिथे लोक जमा झाले. विविध प्रसार माध्यमे त्या ठिकाणी लाईव्ह पदर्शनासाठी सज्ज झाली. ती कार दफन होईल एवढा मोठा खोल गड्डा तिथे करण्यात आला... पण थोड्याच वेळात त्याने ती कार तिथे न पुरण्याचे जाहीर केले. हा दफन विधीचा कार्यक्रमाचा ड्रामा, मी राष्ट्रीय कार्यासाठी केल्याचे गुपित तिथे उपस्थित असलेल्या लोकांना त्याने सांगितले व असंख्य लोकांच्या टाळ्यांचा व जयजयकाराच्या तो मानकरी ठरला. आपल्या या दफनविधीमागे अवयवदानाचे महत्व आपल्या देशबांधवांना कळावे हाचं पवित्र उद्देश या दफनविधी मागे होता.चिकानो म्हणाला, "लोकांनी हि माहगडी कार मी दफन करणार म्हणून मला मूर्ख म्हटले;खरं तर हे आहे, की
कार पेक्षा किंमती अवयव म्हणजे किडनी, यकृत, फुफुसे, डोळे, मूत्रपिंड असे कित्येक महत्वपूर्ण , दुसऱ्यांना दान देणारे अवयव आपण मातीत पुरून टाकतो, तो मूर्खपणा नव्हे का ?"
हाच मूर्खपणा पिढानपिढ्या आपण करीत आलो आहोत. याचं मुर्खपणामुळे पीडित गरजवंतांना आपल्या देशात पुरेशे अवयव पुरवू शकतं नाही;त्यामुळे कित्येकांचे नाहक बळी जातात. अवयवदानाच्या संकल्पपूर्तीतून आपण फक्त जीवनदानच देवू शकतं नाही तर त्याहीपलीकडे जातीधर्माच्या बंधनातून मुक्त होत बंधुभावाची संकल्पना आकारास आणू शकतो.ज्याप्रमाणे रक्तदान करतांना त्या व्यक्तीचं रक्त हे कोणत्या धर्माचं, जातीचं आहे, हे पाहल्या जात नाही त्याप्रमाणे गरजवंतांना अवयवदान देतांना एकच धर्म पाळला जातो, तो म्हणजे मानवतेचा धर्म ! आपले अवयव हे कुणाच्या जीवनाला अभय देवू शकते, तर वेळप्रसंगी आपल्यावर किंवा आपल्या कुटूंबियांवर अशी वेळ आली तर त्या गरजेची पूर्ती सुद्धा होणं महत्वाचं असते.
त्यामुळे अवयवदान हे एकमेकांना पूरक असे घटक आहे. अवयवदान आपण कुठल्याही वयात करू शकतो. याला वयाचं बंधन नसते.पण आपल्या जिवंतपणी अवयवदानाचा निर्णय घेतं आपल्या जवळच्या नातेवाईकांना याची माहिती आपण देणे गरजेचं असते.आज अवयवदान काळाची गरज असून अवयवदानाचा निर्णय प्रत्येकांनी घ्यायला हवा !
भारतात दरवर्षी पाच लाख लोकांचा अवयव न मिळाल्यामुळे नाहक बळी जातो. यातील दोन लाख यकृताच्या आजारमुळे दगावतात तर पन्नास हजार रुग्ण हृदयाच्या आजाराने दगावतात. दरवर्षी सुमारे दीड लाख जणांना किडनीची गरज असते, परंतु फक्त पाच हजार किडनी लागणाऱ्या रुग्णाची गरज पूर्ण करू शकतो.आपल्या देशात दहा लाख अंध रुग्ण अजूनही नेत्रदानाच्या प्रतिक्षेत आहे. यावरूनआपल्या देशात अवयवदानाची गरज किती मोठया प्रमाणात गरज आहे, हे लक्षात येते. आज जगातिक पातळीवर अवयवदानाच्या बाबतीत आपण बरेच मागे आहोत. श्रीलंकेसारख्या देशात अवयवदानाची स्वतःची गरज भागवून इतर देशाला नेत्रांचा पुरवठा होऊ शकतो; मग आपण अवयवदानाच्या बाबतीत असे उदासीन का ?याचा विचार आपण करायला हवा. आपल्या एका निर्णयाने कित्येक तरुणांचा, लहानग्या मुलांचा जीव वाचू शकतो. आपल्या जवळच्या जीव गमावलेल्या माणसाच्या अवयवरूपी अस्तित्वाची प्रतिमा आपण जीव वाचलेल्या त्या व्यक्तीमध्ये बघू शकतो.
यवतमाळ जिल्हातील वणी तालुक्यातील मोहर्ली -विरखुंड या गावातील सुरेश बळीराम डुकरे(35)या शेतकरी बंधूंचा अपघातात ब्रेनडेड झाल्यामुळे पत्नीने लगेच अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यामुळे लगेच त्या मृत शेतकऱ्याचं हृदय चेन्नईमध्ये गरजूच्या शरीरात प्रत्यारोपित केल्या गेलं तर नागपुरातील दोन गरजवंतांना दोन किडन्या दिल्या गेल्या. नेत्रपेढीला दोन नेत्र दान करून एक नव्हे तर तब्बल चार लोकांना अवयवदानामुळे जीवनदान मिळालं.तर इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालत,नागपूर 43 वर्षीय रुग्णाच्या यकृतासह दोन किडनी दानातून तीन लोकांना जीवनदान मिळाल्याचं वृत्त वाचण्यात आलं ! जीवनदान दिल्याचा अनुभव त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कुटूंबियांनी ' याची देही, याची डोळा ' अनुभवला यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीचं शकतं नाही.जन्म मृत्यूच्या पारंपारिक धर्म खुळ्या विचाराला छेद देत मानवतेचा धर्म जपणाऱ्या कटुंबाच्या धाडसी कर्तुत्वाला सलाम करावासा वाटतो.आज अवयवदानासाठी अनेक मदतीचे हात समोर येतं आहे. पण समोर येणाऱ्या हातांपेक्षा अवयव गरजवंतांची संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे अवयवदानाविषयी जनजागृती होणं गरजेचं आहे. आधुनिक युगात मानवाने अनेक यंत्र शोधून काढले, अनेक गोष्टींचा शोध लावला पण मानवाला लागणाऱ्या महत्वपूर्ण घटकाची म्हणजेच रक्ताची किंवा अवयवयांची निमिर्ती करण्याचं तंत्र अजूनही तो शोधू शकला नाही. कारण ते तंत्र फक्त माणुसकीच्या बाजारातच मिळू शकते. ती माणुसकी आपण निर्माण करायला हवी यासाठी अवयवदानाचा संकल्प आपण प्रत्येकाने करायला हवा.
चला तर माणुसकीचा मंत्र जपूया, अवयवदानाचा संकल्प करूया !!
प्रा. वैशाली रितेश देशमुख
(कनिष्ठ व्याख्याता -ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय कूही, नागपूर )
फोन नंबर- 7420850376
Comments
Post a Comment