भारतीय महिला सुरक्षित आहे का ?
( डिजिटल इंडियाचा वास्तव चेहरा )
आसिफा, निर्भया अत्याचाराची धग कायम लोकांच्या मनात धगधगत असतांना स्वातंत्र दिनाच्या आदल्या दिवशी नागपूर जिल्हातील, उमरेड तालुक्यामध्ये गोकुळ खदान परिसरात घडलेल्या सामूहिक बलात्कारामुळे संपूर्ण समाजमन पुन्हा एकदा ढवळून निघालं. आणि पुन्हा एकदा भारतीय महिलांच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे निदर्शनास आले.तर स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही आपल्या देशात स्त्री सुरक्षित नाही याचा दाखला पुन्हा अश्या अमानवीय कृत्याने समोर आला. देशात बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर असतांना, काम मिळेल तिथे घाम गाळण्याची तयारी आजच्या तरुणाईत असते.यात स्त्री सुद्धा मागे नाही.मुलता पुरुषांपेक्षा शरीर यष्टीने कोमल,नाजूक असलेली स्त्री मनाने,आत्मविश्वासाने व आपल्या कार्यसिद्धीने पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करू लागली आहे. कुटूंबाचा आधारवड होऊ लागली आहे. अश्याच उमरेड क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोकुल खदाणीमध्ये 165 कामगार कार्यरत आहेत. यापैकी आठ महिला असून त्यापैकी दोन महिला वजनकाट्यावर काम करीत होत्या . त्यातीलच हा दुर्दैवी प्रसंग एका 25वर्षीय तरुणीवर ओढवला.पुरुषांच्या बरोबरीने खदानमध्ये वजन काट्यावर मोठया आत्मविश्वासाने व हिंमतीने ती काम करीत होती.पण तिला काय माहिती;काही दुष्ट चांडाळांची नजर तिच्यावर खिळली होती. नेहमीप्रमाणे आपल्या कामावर कार्यरत असतांना दुपारी दोनच्या सुमारास ती लघुशंकेला गेली असतांना तिच्यावर हैवानी गिदाड तुटून पडले.अतिशय क्रूरतेने तिच्यावर सामूहिक अत्याचार करून, आपल्या राक्षसी कृत्याचे बिंग उघडे पडेल या भीतीने तिला अत्यंत निर्दयतेने दगडाने ठेचून जखमी अवस्थेत सोडून दिल्या गेले.आज ती जीवनमरणाच्या दारात मृत्यूशी झुंज देत असून अमानवीय पुरुषी वृत्तीचा निर्लज्य राक्षसी चेहरा पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे. तिच्यावर बीतलेल्या प्रसंगाची कदर न करता, तिच्या जखमी देहाची रक्तबंबाळ फोटो पासून ते तिच्यावर घडलेल्या कृत्याचे सर्वच मूक पुरावे सोशल मीडियातून प्रदर्शित केल्या गेले. डिजिटल इंडियाच्या भारतीयत्वाचे कौशल्य प्रताप यालाचं म्हणावे लागेल. या सर्वचं गोष्टीची जाण नसलेली ती दुर्दैवी तरुणी मात्र जीवनमरणासी झुंज देत आहे.
आज सुरक्षतेच्या बाबतीत अनेक कडक कायदे करूनही, महिला अत्याचाराचा आकडा कमी न होता, वाढतच असल्याचे दिसून येतं आहे. मेट्रो, डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार करण्याचा वाटेवर असणाऱ्या आमच्या देशात आजही अश्या अमानवीय घटना घडाव्या यापेक्षा लाजिरवाणी घटना कुठली असू शकते. आजही आपल्या
देशात लहान मुलांचा खंडणीसाठी जीव घेतला जातो, अमाप पैसे कमविण्याच्या नादात मानवी तस्करी केली जाते, स्रियांना देहव्यापारासाठी मजबूर केले जाते, स्त्रीभ्रूण हत्येचे पाप केले जाते, एवढेच नाही तर चांगल्या विचाराची रुजवणूक करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा खून केला जातो. कलबुर्गी, पानसरे, नरेंद्र दाभोळकर प्रख्यात पत्रकार गौरीलंकेश सारख्या विचारवंत याचे जिवंत उदाहरण आहे. नवे विचार, नवी दृष्टी स्वीकारण्यास समाज तयार नाही. नव्या विचारांचा इथे गर्भपात होतो,स्त्री देहाची विटंबना केली जाते, तिचा जिवंत देह जाळला जातो तर कधी तिच्या देहात अमानुषतेने सळाख खुपसल्या जाते तर कधी तिच्या चेहऱ्यावर अँसिड फेकून, दगडाने ठेचून तिला विद्रुप करण्याचा प्रयत्न केला जातो.तरीही आपण म्हणतो देश सुधरतोय!
आपल्या देशात धर्मजातीच्या कलहात पुतळे फोडली जातात, हिंसक मोर्चे काढून एकमेकांची जीव घेतली जातात ,देशातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतो. तरीही आपण म्हणतोय देश विकासाच्या व प्रगतीच्या मार्गावर आहे. तेव्हा अनेक डोळ्यासमोर प्रश्नचिन्हे निर्माण होतात आणि नाईलाज पणे म्हणावं वाटते की डिजिटल युगातील मानवापेक्षा अश्मयुगातील मानवचं खऱ्या अर्थाने स्वरक्षणात्मक जीवन जगतं असेल.कारण आज देशातील तरुण, लहान मुलं,स्त्री, शेतकरी जर सुरक्षित नसतील तर विकासाच्या सर्वच गोष्टी फोल ठरते. म्हणून ह्या दुष्ट प्रवृत्ती देशातून हद्दपार करणे गरजेचं आहे.
विकासित राष्ट्रांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा हेवा करावा इतपत आपली प्राचीन संस्कृती महान आहे.पण सुजाण, संपन्न व लोकशाहीप्रधान देशात रोजच स्त्रियांवरील अत्याचाराची मालिका वाढत जावी यापेक्षा घृणास्पद व लाजिरवाणी गोष्ट कुठली असू शकते. नवी दिल्लीतील निर्भया निकालानंतर व स्त्री अत्याचार कायद्यात कठोरता आणल्यानंतर कुठे तरी या अत्याचारावर आळा बसेल व स्त्रियांना स्वरक्षणकवच प्राप्त होईल असं वाटतं असतांना समाजातील चांगुलपणाचा व अमानुषतेची पातळी दिवसेनदिवस खालावतचं जातं असल्याचे दृश्य अगतिकपणे बघावं लागतं आहे. निर्भया, खैरलांजी, कोपर्डी असो की काही दिवसांपूर्वी घडलेल्या उनाव असो अथवा कठूवा असो, एकूणच सर्व घटनांवर नजर टाकली तर अमानवी चेहरे समोर आले आहेत. परिणामी देशभरातील स्त्रियांना आता असुरक्षित वाटू लागले आहे.ही अतिशय चिंताजनक
बाब आहे.
भारतात दरवर्षी बलात्कार वाढत आहेत. यासाठी कोणत्या विशेष दाखल्याची गरज नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो तथा एनसीआरबीच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर त्याची प्रचिती येते. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडीतांमध्ये दहा ते अठरा या वयोगटातील मुलींची संख्या अधिक आहे. यावर आणखी खोलात जाऊन चर्चा केली तर नात्यातील लोकांकडून झालेले अत्याचार जास्त आहेत. एकूणच सर्व घटना आणि आकडेवारी चिंताजनक आहे.
२०१४ पासून जर एनआरसीबीच्या क्राईम आकडेवारीनुसार नजर टाकली तर देशात बलात्काराचे ३३,७०७ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ९४.४ टक्के घटना या नात्यातील व्यक्ती अथवा पीडीतेची निकटवर्तीय, परिचयाच्या व्यक्तीने केल्याचे उघड झाले आहे. ३३.९ टक्के प्रकरणात पीडीत महिलेच्या शेजारी तर ७.३ टक्के प्रकरणात ओळखीच्या व्यक्तीने अत्याचार केले आहेत. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे आणि मानवी घटकाला विचार करायला लावणारी आहे. भारतात प्रत्येक २२ मिनिटाला एक बलात्कार होतो. लांब कशाला, अमिरिकेच्या पर्यटन विभागाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला असून तो भारतासाठी मोठा झटका आहे. भारतात पर्यटनास गेला तर काळजी घेण्याची विनंती करण्यात आले आहे. कारण आपल्या देशात बलात्कार, विनयभंग या सारख्या हिंसक घटना पर्यटनस्थळावरच घडू लागल्या आहेत. परिणामी भारतात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलांनी पर्यटनस्थळांवर अधिक काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. जागतिक स्तरावर भारताची महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्माण झालेली ही प्रतिमा खूपच चिंताजनक व देशाची प्रतिमा मलिन करणारी आहे.
कॉमनवेल्थ हूमन राईट्स इनिशिएटीव्ह तथा सीएचआरआयने २००१ ते २०१३ या कालावधीत भारतात घडलेल्या बलात्काराच्या घटनांवर एक अहवाल प्रकाशित केल्यानंतर अनेकांची मती गुंग झाली. कारण या तेरा वर्षात आपल्या देशात २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्येक वर्षाचा जर आढावा घेतला तर २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये ५३ टक्के बलात्कार वाढले होते.
महाराष्ट्रातही त्याला अपवाद नाही. आपल्या राज्यातही बलात्कार वाढतच आहेत. २००१ मध्ये १,३०२ तर २०१३ मध्ये ३,०६३ गुन्हे नोंद झाले. याचाच अर्थ महाराष्ट्रात बलात्काराचे गुन्हे १३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
ही आकडेवाडी बघितली तर देशावर सध्या अराजकतेचं, असुरक्षतेचं दुःखद सावट निर्माण झालेलं आहे .तेव्हा यावर शासनाने डोळे झाक न करता यावर काही ठोस निर्णायक पाऊले उचलणे गरजेचे तर आहे. शिवाय स्त्रियांनी आपल्या स्वरक्षणार्थ दक्ष असणे गरजेचं आहे.
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपुर
7420850376
अगदी रास्त
ReplyDeleteवैशाली ताई.... प्रथमतः आपलं अभिनंदन...💐
ReplyDelete- स्त्री हा विषयचं या देशात अभिव्यक्ती च्या आडोश्याला अडलेले दिसतोय...
- स्त्री म्हणजे पुरुष प्रधान व स्वतंत्र देश्यातील ही भोगवस्तूच ठरली..
-स्त्री ला प्रत्यक्षात सती जावे लागत नसले तरी,अप्रत्यक्षपणे ती सती जातेय.. ही बाब ओल्या लिखाणातून व देश्यात माजलेल्या दहाकतेतून समोर येतच आहे.
-कोपर्डी असो व दिल्लीच्या निर्भया हे सगळे प्रकरण एकाच धाग्यातले आहेत..देशात प्रत्येकी 20 मिनटाला एक बलात्कार होतो, हे लाजिरवाणी बाब आहे... काही काळ असेच चालत राहिल्यास ही मिनटचा सेक्सनदात रूपांतर व्हयला काही कालावधी लागणार नाही.
- या विषयांवर जरूर चर्चा झाली पाहिजे...👍