समाजव्यवस्थेतील वास्तव चित्र.... !!


  

          सोशल मीडियाने जग खूप जवळ आलं असं आपण म्हणतो. देशातील कोणत्याही कोपऱ्यात घडलेल्या घटना क्षणार्धात आपल्या समोर येते.मग ती चांगली घटना असो वा वाईट.अशीच एक मनाला पिळवून सोडणारी घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झाली आहे ती म्हणजे जळगांव जिल्हातील जामनेर तालुक्यातील वाकडी या गावातील. एकविसाव्या शतकात आधुनिक काळात आपण जगत असलो तरी पुन्हा एकदा जातीव्यवस्थेचा वास्तव चेहरा आपल्या सर्वांन समोर आला.  तारुण्य किंवा लहानपण म्हणजे मोज मस्ती करण्याचं,खेळण्याच  बागडण्याचं  वय...!त्यातच ग्रामीण भागातील बालवय म्हणजे नैसर्गिक घटकांचं  मनमुराद आनंद  घेणार !नदी,नाले,  विहिरीत पोहण्याचा छंद  गावातील  प्रत्येक मुलांना आवरता येणं अशक्यच...!अश्यातच गावाबाहेरील शेतातल्या विहिरीत काही मुलं पोहायला गेले असता,मातंग समाजातील तीन मुलांना पकडून शेतमालकानी त्यांना नग्न करून काठीने व पट्ट्याने बेदम मारहाण केली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना म्हणजे मानवतेला लाजवणारीच म्हणावी लागेल. जातीवादाच एक उग्र रूप घेऊन पुन्हा एकदा समाजातील हा विकृत मनोवृत्तीचा चेहरा पुन्हा एकदा आपल्या समोर आलाय... !

              महाराष्ट्र म्हणजे अनेक महान व्यक्तीच्या पदकमलाने पुलकित झालेलं राज्य !छत्रपती शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराने समृद्ध झालेली ही पावन भूमी.इथे अनेक बुद्धिवंत, ज्ञानी माहात्मे  होऊन गेले . अश्या समृद्ध विचाराने पाजळेल्या महाराष्ट्रात एकविसाव्या शतकात असे विकृतीजन्य घटना घडणे म्हणजे आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल. बुद्धीच्या बाजारात माणुसकी विसरत चालल्याचं हे जिवंत उदाहरणच होय.ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं तो सुद्धा मागासवर्गीय समाजातीलच, त्यांनी सुद्धा जातीय वादाचे चटके अनुभवलेले,मग असं कसं घडलं..? समोरच्याला ठेच लागली की, मागचा सावध होतो असं म्हणतात.पण याचा प्रत्येय या घटनेत कुठेही  पाहायला मिळाला नाही. ज्या अमानुषतेने व निर्लज्यपणे त्यांना नग्न करून बेदमपणे  मारल्या गेलं ते दृश्य मानवी मनाला हेलावून सोडणार आहे.

           या घटनेचा निषेध सर्वच समाजस्तरातून होत असला तरी या घटनेने अनेक नवे प्रश्न आपल्यासमोर येऊन ठाकले आहे.जातिद्वेषाच्या आवरणामुळे अनेक विकसित देशाच्या पाठीमागे राहलेल्या आपल्या देशात आज विकासाचे नवे रूप पाहायला मिळत आहेत.आर्थिक अर्थव्यवस्थेत भारत देश प्रबळ होतांना दिसतो आहे. देश समृद्धीच्या,विकासाच्या मार्गक्रमात असतांना देशात जातीय वादाच्या घटनांनीही उच्चांक गाठलेला आहे.खैरलांजी , कोपर्डी ,भीमा कोरेगांव प्रकरण याचे जिवंत उदाहरण होय !म्हणजेच एकीकडे विकास तर दुसरीकडे जातीय अधोगतीत होळपळणारा समाज..!समाजातील एकता अखंडतेला मारक ठरणाऱ्या ह्या घटना अतिशय चिंतनीय आहे. असं असतांना एक भारतीय नागरिक म्हणून देशाची अखंडता टिकवून ठेवायला प्रत्येक व्यक्तीने बंधुत्वतेच्या भावनेने वागायला हवं पण असं होतांना दिसून येतं नाही. तेव्हा पुन्हा एकदा बाराव्या व्या शतकात आपण वाटचाल तर करतं नाही ना ?असा प्रश्न निर्माण होतो.

             भूतकाळात डोकावून पाहाल असता  12व्या शतकात चातुर्वण व्यवस्था अस्तित्वात होती.महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा कर्मकांडाकडे जात भक्तिपरंपरा विसरत चालला होता. अश्या वेळी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात झुंगारून ज्ञानेश्वर, नामदेव एकनाथांनी समाजातील व्यक्तींना भक्तीचा मार्ग दाखवीत मानवतेचे धडे दिले.माणूस धर्माने नाही तर कर्माने मोठा होतो. असा मूलमंत्र लोकांना त्यानी दिला.मराठेशाहीच्या अस्तानंतर पुन्हा जातीवादाचे पेव समाजात फुटले असतांना डॉ. आंबेडकरांनी समता, बंधुता, न्याय व अधिकार मुल्याची जोपसासना करीत मागे पडलेल्या वर्गाला समाजाच्या बरोबरीने आणण्यास सर्व मार्ग खुले करून दिले. याचेच फळ आम्ही एक जुटीने समाजात आज वावरत आहोत. तरीही समाजातील काही लोक जात व्यवस्थेच्या बाहेर आजही निघायला तयार नाही. समाजातील असे विघातक प्रकार भूतकाळाची पुन्हा पुन्हा आठवण करून देते. याला आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल.

         समाज हा गतिशील व परिवर्तनशील असतो. भूतकाळातील अनेक चांगले वाईट क्षण आपल्याला शिकवून जात असतात. आपल्या पूर्वजांच्या हाताने झालेल्या चुका आपल्या हातून घडू नये याची दक्षता आपण वर्तमानकाळात घेत असतो. त्यातूनच माणूस शिकतो, विकसित होतो. म्हणूनच जगंलात कंदमुळे खाऊन जगणारा मानव आज आकाशाला गवसणी घालतोय.इतके चमत्कारिक शोध मानवाने आपल्या बुद्धीच्या बळावर लावले. पण त्या बुद्धीच्या बाजारात तो माणुसकी विसरून बसलाय असं म्हणायला हरकत नाही. माणूस स्वार्थी झालाय !'माझं', 'मी 'व 'स्व ' च्या भावनेत तो समाजालाही आपले काही देणे आहे,हे विसरून बसलाय. समाजात चांगले -वाईट हे दोन्ही घटक आपले आपले कार्य करतात. पण अनेक चांगल्या कार्यावर एक वाईट कृत्य पांघरून जाते हे सुद्धा खरं !म्हणून आपल्या हातून कुणाचं वाईट घडू नये याची दक्षता आपण निश्चितच घ्यायला हवी.

         विसाव्या शतकातील मानव बुद्धीच्या जोरावर उद्धाराचा महामंत्र घोकीत चालला आहे. अनेक नवनवीन यंत्राचा त्यानी शोध लावला, विपुल यंत्र निर्माण केली परंतु संपूर्ण मानवजात ही सुखीसंपन्न झाली आहे. असे म्हणणे म्हणजे निव्वळ ओपचारिकता म्हणावी लागेल. याला कारण आपण बुद्धी जरी समृद्ध केली असली तरी विचार मात्र समृद्ध केले नाही. बुद्धीच्या बाजारात भावना हरवून बसलेल्या या समाजाला भावनेचा शोध घेणं गरजेचं आहे.
ज्याप्रमाणे जमिनीतील आतील ओलावा संपला तर जमिनीवरील हिरवळ नष्ट होते. त्याचप्रमाणे हृदयातील भावनेचा, माणुसकीचा ओलावा संपला तर समाजामध्ये असे अमानवीय कृत्य घडतात. त्यामुळे माणुसकीचा ओलावा संपू न देता.मानवतेचा धर्म आपण पाळायला हवा.यासाठी बंधुभावने आपण जातीपातीचे , धर्मपंथाचे राजकारण  न करता, एकजुटीने राहायला हवं !

प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही जि. नागपूर
7420850376

                

           

              
 

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?