तेरा कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प... !!
राज्याचे वनमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात 13कोटी वृक्षलागवडीचा संकल्प नुकताच जाहीर केला. कृषी दिनाचं औचित्य साधून 1जुलै ते 31जुलै पर्यंत ही मोहीम संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. या वृक्षलागवडीच्या मोहिमेत मोठया संख्येने जनतेनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलेलं आहे. देशात वृक्षलागवडीची ही मोहीम नक्कीच प्रशंसनीय आहे.वृक्ष तोडण्याच्या हातापेक्षा वृक्ष लावणारे हात जास्त असले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले असून 12कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यात प्रत्येक व्यक्तींनी किमान दोन वृक्ष लावण्याचा जरी संकल्प जर केला तरी 24कोटी झाडांची लागवड राज्यात होऊ होऊ शकते.असे महत्वाचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. वृक्षलागवडीची ही मोहीम निश्चितच स्वागतास्पद असून यासाठी आपणही तितकंच सहकार्य करणे गरजेचं आहे.असं मला वाटतं.
5जून जागतिक पर्यावरण दिन आपण नुकताच साजरा केला. देशपातळीवर मोठया आनंद व उत्सवात पर्यावरण स्वरक्षणार्थ देशात आणाभाका घेतल्या गेल्या. परंतु देशावरील पर्यावरणाचं संकट निव्वळ पर्यावर दिन साजरा करून व कागदोपत्री संमेलने घेऊन दूर होणार नाही. तर त्यावर योग्य उपायोजना मनामनातून राबवणं महत्वाचं आहे. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे..... असे संत तुकाराम महाराज आम्हांला सांगून गेले. पण वृक्ष संवर्धनाचं महत्व आजही आपल्याला कळलं आहे का.... ? असा महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. पर्यावरणाचे स्वरंक्षण करणे ही देशातील प्रत्येक व्यक्तीची नैतिक जवाबदारी असून ती प्रत्येकाने पार पाडणं गरजेचं आहे.पण असं होतांना दिसून येतं नाही.उलट मानवाने पर्यावरणावर सतत हल्लाच केल्याचे दिसून येते. शहरीकरण, औद्योगिकरण व जागतिकरणाच्या प्रभावामुळे पर्यावरणाचं अतोनात नुकसान होतांना दिसून येते . रस्ते काम, रेल्वे काम, शहरीकरण व मानवाच्या अमर्याद गरजा वृक्षतोडीला जवाबदार ठरत असून दिवसेनदिवस याचा उच्यांक वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे चक्र उलटया गतीने फिरतांना दिसून येतं आहे. अवेळी पाणी येणे, उन्ह तापने, दुष्काळ पडणे, जागतिक तापनात कमालीची वाढ होणे. या सर्व पर्यावरणाच्या असंतुलित क्रियेला कुठेतरी आपणच जवाबदार आहो....असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आज संपूर्ण जगतात पृथ्वीची बिकट अवस्था झाली असून वातावरणातील समतोल दिवसेनदिवस ढासळत चाललेलं आहे. पूर्वी पृथ्वीचा सुमारे 60%भाग वनाने व्यापलेला होता . पण आजच्या सर्वेक्षणानुसार आज 21%भागच वनाने व्यापलेला आहे. परिणामी जंगलतोडीमुळे अपरिमित हानी मानवाला भोगावी लागत आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरणाचा हा संकल्प पूर्वत्वाला नेणं तितकंच गरजेचं आहे. पर्यावरणाचे समतोल जागेवर आणण्यासाठी किमान 400कोटी झाडे लावण्याची गरज असून ती टप्याटप्याने पूर्ण करण्याचा संकल्प जरी आपण केला असला तरी तो युद्धपातळीवर कार्यान्वित होणे तितकेच महत्वाचे आहे. आज जंगलतोडीमुळे संपूर्ण मानव जात संकटात आली असून त्याचे परिणाम आपण भोगत आहो व भविष्यात ते अधिकच भोगावे लागणार आहे यात दुमत नाही. आज विविध प्रकारची वनऔषधी, पशुपक्षांचे, प्राण्यांचे आश्रयस्थान नष्ट झाले झालेले दिसून येतं असून जंगलतोडीमुळे अनेक प्राणिजाती नष्ट झालेल्या दिसून येतं आहे. प्राण्यांची वहिवाट आता मानवी वस्त्याकडे होत असल्याचे अनेक उदाहरण आपण बघतच आहो.माळीण हे गावं दरडी कोसळल्यामुळे कसं नाम शेष झालं याचंही जिवंत उदाहरण आपल्या समोर आहे. हे सर्व परिणाम जंगलतोडीमुळेच.... !
मानवी जीवन व पर्यावरण हे एकमेकांना पूरक असून त्याचा समतोल राखणे गरजेचं असते, परंतु मानवाने आपल्या स्वार्थासाठी व इच्छेसाठी पर्यावरणाचा कायम छळच मांडला आहे. त्याचे वाईट परिणाम भविष्यात मानवाला भोगावं लागणार असल्याचे भाकीत पर्यावरण संशोधकांनी व्यक्त केलेलं आहे.तेव्हा वेळीच मानवाने पर्यावरणाचे संवर्धन व स्वरंक्षण करण्यासाठी वृक्ष लागवडीच्या या संकल्पाला हातभार लावला नाही तर भविष्यात याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार हे नक्की... ! आपण राहत असलेल्या स्थानिक क्षेत्रात मग ते गावं असो, शहर असो, राज्य असो वा देश असो, त्या त्या भोगोलिक क्षेत्रात किमान 33% वृक्षलागवड करणे गरजेच असते.परंतु तेवढे झाड लावल्याचं जात नाही.त्यामुळे पर्यावर संतुलन बिघडण्यास ते कारक ठरते. एक संशोधनानुसार लावलेल्या वृक्षलागवडीपैकी किमान 70%ते 80%वृक्ष मरतात. त्यामुळे झाडे तोडण्याच्या प्रमाणापेक्षा झाडे जगण्याचे प्रमाण कितीतरी पटीने कमी असते. त्यामुळे 13कोटी झाडे लावण्याची घोषणा जरी मंत्री महोदयांनी केली असली तरी ते झाडे जगण्यासाठी नेमकी कोणती योजना राबवली जाते यावर या वृक्षलागवडीची यशस्विता अवलंबिली आहे. ही मोहीम जर पूर्णपणे यशस्वी करायची असेल तर स्थानिक पातळीपासून तर देशपातळीपर्यंत सर्वोतोपरी जवाबदारी स्वीकारणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
एका सर्वक्षण आकड्या नुसार राज्यात अवैध्य वृक्षतोडीचे वाढते प्रमाण लक्षात घेतले तर 2015-16या वर्षात 15हजार 447वृक्षतोडीचे प्रकरणे निदर्शनास आले आहे. यात 1लाख 414झाडे दोडण्यात आल्याचे स्पष्ट झालेलं आहे. तर राज्यात 2007ते 2016या कालावधीत सुमारे 15लाख झाडे तोडण्यात आलेले आहे. यात 60%झाडे हे सागाचे असून ऐकून यात 100कोटीची हानी झाली असल्याचे सांगण्यात येतं. राज्यात गडचिरोली, यवतमाळ, धुळे या शहरात सर्वाधिक वृक्षतोड झाल्याचे दिसून येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तेव्हा देशपातळीवर वृक्षतोडीची अवैध्यरित्या केलेली कत्तल थांबवण तितकंच महत्वाचं आहे. यावर सरकारने कठोर पावले उचलायला हवी... !
आज जागतिक तापमान वाढीचा सर्वांत मोठा प्रश्न आपल्या समोर उभा असून बेसुमार झाडांची कत्तल व औद्योगिक प्रकाल्पामुळे होणारे हवेचे प्रदूषण, त्यापासून होणारे विविध आजार....ओझोन वायूच्या थरातील होणारी कमालीची कमतरता व त्यापासून होणारा विध्वन्स...जागतिक तापमान वाढीमुळे हिमच्छादीत पर्वताचे होणारे हिमखलन, यामुळे संपूर्ण पृथ्वी जलमय होण्याचं भीती... असे सर्वच प्रश्न आपल्यासमोर आ वाचून उभे आहे. तेव्हा संपूर्ण मानवी जीवनच संपुष्ठात येण्याची भीती वर्तवली जात असून त्यावर उपायोजना होणंही तितकंच महत्वाचं आहे. वृक्षतोड थांबवने व वृक्षाची मोठया प्रमाणात लागवड करणे हे दोन यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभे असून त्यासाठी योग्य त्या उपायोजना करायला हव्या. वृक्ष हे मानवाचे जीवन असून तेच जर नष्ट होत गेले तर मानवी जीवन सुद्धा नष्ट होण्याच्या मार्गक्रमाला लागेल.तेव्हा भारतातील प्रत्येक व्यक्तीची ही जवाबदारी आहे की त्यांनी वृक्षाच्या संवर्धनाकरिता व स्वरक्षणाकरिता आपण सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे....!!
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
7420850376
Comments
Post a Comment