निकाल हातात घेतांना.. !!
नुकताच बारावीचा सर्वच शाखेतील निकाल घोषित केला गेला. वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत कितपत यशस्वी झाली याची सर्वच विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. निकालाची वाट पालकवर्ग सुद्धा आतुरतेने बघत असतो.आपल्या पाल्यांने वर्षभर केलेल्या अभ्यासाचं फलित काय असणारं ?याची हुरहूर प्रत्येक आईवडिलांना लागली असते. आपला मुलगा गुणवत्ता यादीत यावा,तो डॉक्टर, इंजिनिअर, वकील बनावा.असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. शिक्षण घेऊन तो एक यशस्वी उद्योजक किंवा शेतकरी बनावा असं कोणत्याही पालकांच्या तोंडून ऐकायला आजकाल मिळत नाही.मुलाची आवड,निवड व बुद्धिमत्ता लक्षात न घेता आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर बनण्याचा त्यांचा अट्टहास असतो . त्यासाठी महागडे शिकवणी वर्ग सुद्धा लावून दिल्या जातात.पण निकाल जेव्हा हातात लागतो, तेव्हा सर्वस्वी मुलांच्या डोक्यावर अपयशाचे खापर फोडल्या जाते . 'वर्षभर अभ्यास केला नाही' 'टवाळक्या केल्या ' ,'झोपा काढल्या' असल्या शब्दांचा भडीमार करून त्याची हेटाळणी केली जाते.पण तो या दरम्यान कुठल्या मानसिकतेतून प्रवास करीत असतो, याचा अंदाज ते लावू शकत नाही. याचाच परिणाम विद्यार्थी आई-वडिलांची इच्छा पूर्ण न करण्याचं शल्य मनात जोपासतात व आपण जीवनात काहीच करू शकत नाही या मनोवृत्ती कडे वळतात. प्रसंगी आत्महत्या सारखे पाऊल सुद्धा उचलतात.
आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर बनावं असं कोणत्याही पालकाला वाटण गैर नाही. पण मुलांच्या बोद्धिक क्षमतेला जर ते झेपत असेल तरंच ! कारण मुलांच्या जिवापेक्षा काहिच महत्वाचं नाही. काही मूल अपयशाच्या भीतीमुळे नैराश्याकडे वळतात. तर काही आपण जीवनात काहीच करू शकत, नाही असा खुळा समज करून आत्मविश्वास हरवून बसतात. त्यासाठी निकाल हातात घेतांना प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना समजून घेणं तितकंच महत्वाचं असते. परीक्षेचा काळापासून ते निकालापर्यंत चा काळ हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा असतो. एका दडपणाखाली त्या काळात तो वावरत असतो तेव्हा मुलांना आईवडिलांनी धीर देत त्यांच्या भावना समजून घेणे महत्वाचे असते.अपयश किंवा कमी टक्केवारी मिळाल्यामुळे तो किंवा ती समोर काहिच करू शकणार नाही ही नकारात्मताच आपण काढून टाकायला पाहिजे.
"failure is not the opposite of success.It's part of success!" आपल्या समोर जगातील अनेक उदाहरण देता येतील, ज्यांनी अपयशानंतर यशाची उत्तुंग शिखर पार करीत अवघ्या जगावर आपल्या कीर्तीची छाप सोडली. याचे कित्येक उदाहरण आपल्याला देता येतील. 'थॉमस एडिसन' नावाच्या शास्त्रज्ञाने विजेच्या दिव्याचा शोध लावला, त्यांनाही अपयशाचा कित्येकदा सामना करावा लागला होता, तेव्हा कुठे ते विजेचा शोध लावू शकले. 'अब्राहण लिंकन'हे राजकारणात सलग आठ वर्ष निवडणूक हरले पण जिद्द न सोडता त्यांनी आपलं कार्य सुरुच ठेवलं व सलग तीस वर्षानंतर त्यांना अमेरिकेचा राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अंत्यत हालाखीच्या परिस्थितीत स्वतःला घडवलं व देशातच नाही तर अवघ्या जगावर आपल्या विचारांची छाप सोडली. धीरुभाई अंबानी सारखा सामान्य माणूस आपल्या मेहनतीच्या बळावर आपल्या देशातील कोट्याधीश यशस्वी उद्योजक बनू शकले , देशाच्या सर्वोच्य पदापर्यंत एक सामान्य घरातील चाय विक्रेता या देशाचा यशस्वी पंतप्रधान होऊ शकले . ए पी जे अब्दुल कलाम आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोरावर अवकाशयंत्र तयार करीत, राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकले. तर आपण का नाही ?फक्त गरज आहे. सातत्याची,मेहनतीची व आत्मविश्वासाची.....आपल्यालाही यशाचं उत्तुंग शिखर गाठायचं आहे. याचं विचारांनी आपण जगायला हवं !
यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी अपयशाच्या मार्गक्रमावरून प्रवास करणं अंत्यत गरजेचं असते. जीवनात जे काही अपयश येतात तेच आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जात असतात.अपयशातच यश लपलेलं असतं तेव्हा अपयशाचा सामना करायला आपण शिकलं पाहिजे.मानवी जीवन हे मौल्यवान आहे. ते आपल्याला मिळालंय हे लक्षात घेत आपण संकटातही जगणं शिकायला हवं . अपयश हे यशाचं गमक असते, तेव्हा कमजोर न पडता आपण पुन्हा प्रयत्न करायला हवा .
जीवनात सकारात्मक विचार ठेवणं गरजेचं असते. वर्षभर केलेला अभ्यास व त्यानुषंगाने मिळालेल्या गुणांची कमतरता. हिच नकारात्मक मनोवृत्ती कडे घेऊन जाण्यास कारक ठरते. त्यामुळे ही नकारात्मता उत्पन्न होऊ न देता कायम सकारात्मक विचाराने आपण विचार करायला हवा. खरतर दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे जीवनातील शेवटची परीक्षा नसतेच, पण तरीही पालक आणि विद्यार्थी त्याला आपलं संपूर्ण जीवन समजून बसतात.व याचं नैराश्यातून आत्महत्येसारखी टोकाचे पाऊल उचलले जातात . त्यामुळे याचं काळात मुलांना सावरणे गरजेचं असते.
आशा सोडायची नसते,
निराश कधी व्हायचं नसते.
अमृत मिळालं नाही म्हणून
विष कधी प्यायचं नसते.
बारावी बरोबरच आता दहावीचा निकाल घोषित करण्यात येइल, तेव्हा निकाल हातात घेतांना, आईवडिलांनी मुलांना शाब्दिक आधार देत त्यांच्यात आत्मविश्वासाची पेरणी करणे गरजेचं आहे . मुलांवर कुठलंही दडपण न आणता त्याला जे क्षेत्र हवं आहे, ज्यात त्याला आवड आहे. ज्यात तो यशस्वी होऊ शकतो, आपलं करिअर करू शकतो, तीच फिल्ड त्यांना निवडू दया. काही विद्यार्थांना खेळात गोडी असते तर काहींना चित्र काढण्यात काहींना डॉक्टर बनायचं असतं तर काहींना इंजिनिअर,काहींना या कशातच गोडी नसते तर शेती उद्योग धंद्यात त्याला रुची असते. प्रत्येकाची आवड वेगळी , निवड वेगळी, बुद्धिमत्ता वेगळी मग आपण डॉक्टर, इंजिनिअर बनायचेच स्वप्न का पाहावे ?मुलांची रुची कशात आहे, हे लक्षात घेऊन समोरच क्षेत्र निवडून देणे ही आईवडिलांची जवाबदारी आहे.तेव्हा आपल्या मुलांची रुची कशात आहे. हे जाणून घेत त्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याची वाटचाल सुरु करावी असं मला वाटतं.मुलांचे विचार समजून घेत, त्यांच्या इच्छेला पाठबळ देत कायम आत्मविश्वासाची पेरणी आपण करायला हवी. 'थ्री इडियट्स ' सारख्या चित्रपटातून आपण खूप काही शिकून जातो. पण ते आपल्या मुलांच्या बाबतीत लागू करायला मागेपुढे का बघतो ?याचा सारासार विचार आपण एक जवाबदार पालक म्हणून निश्चितच करायला हवा!
प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
7420850376
Comments
Post a Comment