आणखी किती आसिफा.. ?


  

         10जानेवारी हा दिवस आसिफासाठी श्रापित ठरावा असा ठरला. नेहमीप्रमाणे आपल्या घोडयांना चराईसाठी नेलं असतांना तिच्यावर काही चांडाळाची दृष्टी पडली. शिकारीच्या तयारीने टपून बसलेल्या चंडोल पक्षाने एखाद कोवळं घारीच पिल्लू उचलून न्यावं, तशी शिकार त्या सुदंर, निरागस, कोमल, मासूम आसिफाची केल्या गेली. सतत 8 दिवस तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून 8वर्षाच्या असिफाला अंत्यत निर्दयीपणे मारल्या गेले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने अवघ समाजमन हादरून गेलं.  एखादया कागदाचे असंख्य तुकडे करून भिरकावून  द्यावे , त्या प्रमाणे तिच्याशी अमानवी कृत्य करून त्या राक्षसांनी तिला फेकून दिले होते.  तिला झालेल्या असंख्य यातना, तिचा झालेला अमानुष छळ, आवाजाला दाबतांना होणाऱ्या शरीराची तळमळ, तिला सात दिवस उपासी ठेवतांना तिच्या जिवाचा  आतंक, कसा झाला असावा, याचा विचार करताना मानवी मन  गहिवरून येते.  कोमजलेल्या देहाचे लचके तोडून तिच्यावर अमानुषतेने प्रहार करणाऱ्या त्या कसायांना कितीही कठोरातली  कठोर सजा दिली तरी कमीच आहे. कदाचित त्यांना फासावर लटकवल्या जाईल, जन्मठेप होईल पण प्रश्न आहे  आसिफाच्या दुःखाचं सांत्वन होईल का ?तीने  सोसलेल्या वेदनांना न्याय मिळेल का ?तिच्या निरागस आसवांना असह्य किंकाळ्यांना, वेदनांना न्याय मिळेल का ?रोज अश्या  कित्येक आसिफावर अत्याचार होतं राहतील? कित्येक निर्भया मारल्या जातील?कित्येक आईचा केविलवाणा आतंक ऐकायला येईल?हे कुठे तरी थांबायला हवं.मेट्रो, डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार करण्याचा वाटेवर असणाऱ्या आमच्या देशात अश्या कित्येक घटना रोजच घडत आहेत. आजही लहान मुलांचा खंडणीसाठी जीव घेतल्या जात आहे  , अमाप पैसे कमविण्याच्या नादाYत मानवी तस्करी केल्या जात आहे , स्रियांना देहव्यापारासाठी मजबूर केल्या जात आहे , स्त्रियांवर रोजच अन्याय अत्याचार केला जात आहे , स्त्रीभ्रूण हत्येचे पाप केल्या जात आहे.  तो देश प्रगतीपथावर आहे असं म्हणणे केवळ हश्यास्पद वाटतं.
सुजान, संपन्न व लोकशाहीप्रधान देशात स्त्रियांवरील अत्याचाराची मालिका रोज  वाढतच जावी यापेक्षा घृणास्पद व लाजिरवाणी गोष्ट कुठली असू शकते.  नवी दिल्लीतील निर्भया निकालानंतर व स्त्री अत्याचार कायद्यात कठोरता आणल्यानंतर कुठे तरी या  अत्याचारावर आळा बसेल  व स्त्रियांना स्वरक्षणाचं पाठबळ मिळेल असं वाटलं असतांना  समाजातील  चांगुलपणाचा व  अमानुषतेची पातळी पुन्हा खालच्या थराला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जगभरातअथवा भारतात  महिला, मुली उपभोग घेण्याची वस्तू झाली असल्याची सर्वसाधारण भावना समाजात वाढीस लागलेली असंच म्हणतांना हरकत नाही.
तेव्हा  महिला सबलीकरण, महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण हे वाक्यच मुळी फोल ठरत आहे.

निर्भया, खैरलांजी, कोपर्डी असो की काही दिवसांपूर्वी घडलेल्या उनाव असो अथवा कठूवा असो, एकूणच सर्व घटनांवर नजर टाकली तर अमानवी चेहरे समोर आले आहेत. परिणामी देशभरातील स्त्रियांमध्ये कुठेतरी भीतीचे  वातावरण निर्माण होतांना दिसून येत आहे. स्त्रियांची सुरक्षितता,अत्याचार आणि बलात्कार या तिन्ही गोष्टींकडे थोड्या वेगवेगळ्या दृष्टीने पाहावे लागणार आहे.

भारतात दरवर्षी बलात्कार वाढत आहेत. यासाठी कोणत्या विशेष दाखल्याची गरज नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो तथा एनसीआरबीच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर त्याची प्रचिती येते. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडीतांमध्ये दहा ते अठरा या वयोगटातील मुलींची संख्या अधिक आहे. यावर आणखी खोलात जाऊन चर्चा केली तर नात्यातील लोकांकडून झालेले अत्याचार जास्त आहेत. एकूणच सर्व घटना आणि आकडेवारी चिंताजनक आहे.

२०१४ पासून जर एनआरसीबीच्या क्राईम आकडेवारीनुसार नजर टाकली तर देशात बलात्काराचे ३३,७०७ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ९४.४ टक्के घटना या नात्यातील व्यक्ती अथवा पीडीतेची निकटवर्तीय, परिचयाच्या व्यक्तीने केल्याचे उघड झाले आहे. ३३.९ टक्के प्रकरणात पीडीत महिलेच्या शेजारी तर ७.३ टक्के प्रकरणात ओळखीच्या व्यक्तीने अत्याचार केले आहेत. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे आणि मानवी घटकाला विचार करायला लावणारी आहे. भारतात प्रत्येक २२ मिनिटाला एक बलात्कार होतो.

लांब कशाला, अमिरिकेच्या पर्यटन विभागाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला असून तो भारतासाठी मोठा झटका आहे. भारतात पर्यटनास गेला तर काळजी घेण्याची विनंती करण्यात आले आहे. कारण आपल्या देशात बलात्कार, विनयभंग या सारख्या हिंसक घटना पर्यटनस्थळावरच घडू लागल्या आहेत. परिणामी भारतात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलांनी पर्यटनस्थळांवर अधिक काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. जागतिक स्तरावर भारताची महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने निर्माण झालेली ही प्रतिमा देशाच्या नावलौकिकास मलीन करीत आहे.

कॉमनवेल्थ हूमन राईट्स इनिशिएटीव्ह तथा सीएचआरआयने २००१ ते २०१३ या कालावधीत भारतात घडलेल्या बलात्काराच्या घटनांवर एक अहवाल प्रकाशित केल्यानंतर अनेकांची मती गुंग झाली. कारण या तेरा वर्षात आपल्या देशात २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. प्रत्येक वर्षाचा जर आढावा घेतला तर २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये ५३ टक्के बलात्कार वाढले होते.
महाराष्ट्रातही त्याला अपवाद नाही. आपल्या राज्यातही बलात्कार वाढतच आहेत. २००१ मध्ये १,३०२ तर २०१३ मध्ये ३,०६३ गुन्हे नोंद झाले. याचाच अर्थ महाराष्ट्रात बलात्काराचे गुन्हे १३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
ही आकडेवाडी बघितली तर देशावर सध्या अराजकतेचं, असुरक्षतेचं दुःखद सावट निर्माण झालेलं आहे .तेव्हा यावर शासनाने डोळे झाक न करता यावर काही ठोस निर्णायक पाऊले उचलणे गरजेचे आहे.तसेच आपल्या स्वरक्षणार्थ मुलींनी, आईवडिलांनी सजग राहणे गरजेचे आहे.अन्यथा पुन्हां किती आसिफा अश्या कृत्याला बळी ठरेल सांगता येत नाही. 

प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपुर
7420850376

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?