मानव सेवा हिच ईश्वर सेवा.. !!
ईश्वर हा शब्द आपण भगवान, अल्ला, मसीहा, परमेश्वर, गॉड
अश्या कितीतरी नावाने उच्चारत असतो. मंदिर, मस्जित, चर्च, गुरुव्दारा हे आमचे श्रद्धेचे, विश्वासाचे स्थान असून जीवनातील सुखदुःखाचे चागले वाईट क्षण आपण ईश्वराशी मनोमन संवाद साधून वाटून घेत असतो. ईश्वर आणि मानवाचे हे नातं कल्पित असलं तरी आपल्याला हवंहवंस वाटतं असतं. ईश्वर या नावातच संस्कार, शांती, दया, भक्ती, विश्वास, परोपकार, अहिंसा, सदाचार असे कितीतरी संस्कारित मूल्य दडलेले असतात. ते आपल्यावर संस्कार टाकतात, वाईट परिस्थितीशी लढण्याची शक्ती देतात, आपल्याला घडवतात व कठीण प्रसंगात मनशांती सुद्धा देतात.
ईश्वर म्हणजे चांगले कर्म, सत्याचे आचरण आणि मानवतेची सेवा होय !गीता, कुराण, बायबल, गुरूग्रंथामध्ये हेच संस्कारित मूल्य दडलेले आहे. परंतु ते विचार समजून न घेता आपआपल्या परीने त्याचा अर्थ शोधून ईश्वर या शब्दाचे मूल्यच आपण हरवून बसलोय. त्यामुळे आज ईश्वराच्या नावाने एकमेकांच्या जीवावर उठलोय,देशात भक्तीच्या नावावर हिंसाचार, अत्याचार, जाळपोळ, दंगे घडवलेले जातात. कुणी हिरवा, कुणी निळा, कुणी भगवा तर कुणी लाल अश्या किती तरी रंगाच्या वलयात आज ईश्वर नावाची परिभाषाच आपण बदलवून टाकलेली आहे.आज धर्माच्या नावावर एकमेकांशी वैरत्व पत्करून दगडफेक, जाळपोळ, आणि अनेक महान विभुतींचे पुतळे फोडून धार्मिक विद्वेषाचे दाट जाळे निर्माण करीत आहोत.
या सर्व गोष्टीला जवाबदार कोण ?ईश्वराची खरी भक्ती कशात असते ?हिंसाचारात की मानवसेवेत ?श्रद्धेत की अंधश्रद्धेत ? हेच आपण समजू शकलो नाही. म्हणूनच आज रामरहीम, आसाराम आणि अनेक भोंदू बाबा आपल्या लाचारीचा फायदा घेतांना दिसून येत आहे. जातीय विद्वेषाचे लढे आपण नाहक लढत आहोत. ही आपली शोकांतिकाच म्हणावी लागेल.ऐसे कैसे जाले भोंदू l कर्म करोनि म्हणती साधू ll अंगा
लावुनिया राख l डोळे झाकूनी करिती पाप ll
वरील ओळी लिहून सोळाव्या शतकात संत तुकारामांनी असल्या भोंदू बाबांचं जाहीर निषेध केला होता. मात्र आज 21व्या शतकात विज्ञान युगात आपण ती भोंदूगिरी ओळखू शकलो नाही, सर्वसाधारणच नाही तर देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती असल्या भोंदूबाबाचे पद्स्पर्श करण्यास धन्यता मानत अस
ल्याचे दिसून येत आहे.ही शरमेचीच बाब आहे.
संत सज्जन दिसतील जेथे l लाटांगने जावे तेथे l असे आपले संत सांगून गेलेत , पण ते संत अखंड विश्वशांतीसाठी जप करणारे असावे, मानवतेचे मंत्र देणारे असावे, स्वत:च ऐहिक सु:ख सोडून मानवतेच्या सेवेसाठी समस्त जीवन अर्पण करणारे असावे, माणसेवा हाच त्यांचा धर्म असावा.
समाजातील अंधश्रद्धारुपी अज्ञान, दूर व्हावा यासाठी संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद अश्या अनेक थोर महंतांनी मानव सेवा हिच ईश्वर सेवा आहे,देव देवळात नाही तर माणसात आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न केला पण आपल दुर्दैवं असं की तो देव शोधण्याचा कधी प्रयत्नच आपण केला नाही. आणि तोच परमेश्वरी अंश शोधण्याचा नादात राम रहीम, आसाराम बाबा सारखे विषारी नाग डोके वर काढू शकले.व त्यांनी अनेकांची शिकारही केली. याला जवाबदार कोण ?साक्षात्कारी बाबा म्हणून मेंढराप्रमाणे झुंडीने त्यांच्या मागे अनवाणी पायाने धावत सुटणारे कोण तर आपणच !हे कुठे तरी थांबायला हवं !
आजच्या बाबांचं आधुनिक रूप बघता जीन्स, गॉगल, एसी, गाडी, बंगला, चांदीच्या रथात, विमानात भ्रमण करणारे बाबा व फाटके तुटके, अनवाणी पायाने, हातात खंजेरी, झाडू घेऊन समाजातील वाईट मनोवृत्तीची धूळ साफ करीत आपल्या समाजाला ज्यांनी संस्कार दिले, मानवतेची शिकवण दिली, रामराज्याची संकल्पना दिली, राष्ट्रीय एकता व अखंडता टिकविण्याचे मंत्र दिले त्यांच्या कडे बघितलं तर आजच्या या विकृत बाबांचे खरें रूप आपल्या समोर यायला वेळ लागणार नाही असं मला वाटते.तेव्हा आपण खरें व विषारी चेहरे ओळखून सावध व्हायला पाहिजे.
मानवसेवा हिच ईश्वर सेवा आहे.हा मंत्र जपून देशातील दिन, दुबळ्या,अनाथ, गरीब लोकांना जर आपण काही प्रमाणात काही मदत करू शकलो तर ती ईश्वर सेवा होईल. असं मला वाटते. आज समाजात अश्या लोकांची खरंच गरज असून माणुसकीची ज्योत विझू न देता त्याला अखंड पणे तेवत ठेवणं प्रत्येकाची जबाबदारी आहे.मानवता हा एकच धर्म असून ईश्वर हा मानवाचा अंश आहे. असं मानून माणसेवा हिच ईश्वर सेवा आहे. हा मंत्र जपायला हवा !!
प्रा. वैशाली रितेश देशमुख
कुही, नागपूर
7420850376
Comments
Post a Comment