नकोशी होतेय हवीशी.. !!

वर्तमानपत्रावर सहज लक्ष फिरवले असता,पहिल्याच पानावर एक महत्वाची बातमी वाचली आणि मन थोडं का होईना आनंदित झालं. बातमी होती सहा वर्षात भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुलींची संख्या जास्त असल्याची. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सनी लियोन हिने देखील स्वतःची दोन मुले असतानादेखील एक मुलगी दत्तक घेतली. अशा अनेक घटना आता समाजात चांगुलपणाचा काही खुणा ठेवून जात आहेत.

रोज वर्तमानपत्र हातात घेतल की महिला अत्याचार, लैगिंक छळ, विनयभंगाचे अनेक प्रकार नजरेसमोरून जातात, मन अस्वस्थ होते. समाजात नेमक घडतंय तरी काय..?. कुठे चालली आपली भारतीय संस्कृती..?, असले अनेक प्रश्न मनाला विचंबित करतात. आणि वाटायला लागतं की मुलींचा जन्म आपल्याला शाप तर ठरणार नाही ना..?, असं जर आईवडिलांना वाटायला लागलं तर काय होईल..?. मुलींची ज्या पद्धतीने समाजात अवेहलना होते, तिला गर्भात मारले जाते, तिच्यावर अतिशय क्रूरपणे  हल्ला केला जातो, तिला अतिशय अमानुषतेने मारल्या जाते,  जन्माआधीच तिला नदी, नाली , गटारात फेकल्या जातं, तिला अपमानित भाषेत बोललं जातं. घाणेरड्या नजरेनं बघितल्या जातं , तिच्या शरीराचे विकृत दर्शन करणारे पोस्टर्स लावले जातात, असं चित्र दिसल्यावर वाटायला लागते. स्त्री जन्म अभिश्राप तर नसावा..?. एखाद्या योग्याने स्त्री जातीवर श्राप सोडावा की, जन्मोजन्मी तुला असाच  अत्याचार सहन करावा  लागेल. असंच झालंय हे सर्व..!

असं असतांना दुसरीकडे मात्र कौतुकास्पद गोष्ट कानावर येते ती म्हणजे मुलींचं दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. खरं तर आज समाजातील दृश्य बघितलं असता मूल असतांनाही  मुलीचं आईवडिलांचं संगोपन करतांना दिसून येत आहे. मूल असतांनाही आईवडिलांना सांभाळण्याची जवाबदारी तो नाकारतो. अशावेळी  वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येते. म्हाताऱ्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडल्या जाते.  पण मुलगी मात्र दोन्ही घराचं खांब बनते. आधार देते आज कित्येक मुली आपल्या बेघर आईवडिलांचं आधार बनलेल्या दिसून येत आहे. काही अपवाद वगळता मुलांना त्यांचेच आईवडील नकोशे झालेले दिसून येत आहे.

भारतात दत्तकविधान ही प्रक्रिया अगदी इतिहासकाळापासून चालत आली आहे. कालांतराने त्यात बदल होत गेले.  पूर्वी कौटुंबिक पातळीवर अथवा नात्यागोत्यात दत्तक प्रक्रिया व्हायची. मात्र आता त्यासाठी स्वतंत्र कायदा झाला. देशपातळीवर यासाठी 'कारा' तथा 'चाईल्ड  ऍडप्शन रिसोर्स ऍथॉरिटी 'ची स्थापना करण्यात आली. काराच्या माहितीनुसार २०१७-१८ मध्ये देशात ३२७६ मुले  दत्तक गेली. यापैकी १८५८ मुली तर १४१८ मुले आहेत. ही कौतुकाची आणि मुलींविषयी नकारात्मक भावना बदलत चालली असल्याचे उदाहरण आहे. विशेष म्हणजे मुली दत्तक घेण्यात महाराष्ट्र अग्रेसर असून ६४२ दत्तक मुलांपैकी ३५३ मुली आहेत. यावरूनच स्पष्ट होते की मुली आता लाडक्या होत चालल्या आहेत. आपण कुठे तरी मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहोत हे निश्चितच स्वागतास्पद आहे.

आजही मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, वारसदार, कुलदीपक, घराण्याचा नावं चालवणारा राजवंशज म्हणून आईवडील लहान वयापासूनच लाड पुरवितात. मुलगा झाला की घरात आनंदोत्सव साजरा केला जातो आणि मुलगी होताच मात्र घरात नैराश्याचं वातावरण निर्माण होते. जन्म देणारी आई, वडिलांना सुद्धा वाटायला लागत, "पहिला मुलगा झाला असता तर नंतर काळजी वाटली नसती." किंवा दोन मुली ज्यांना असतात, त्यांना "मुलगा नाही का ?"असले फाजूल प्रश्न विचारले जातात.याचा अनुभव मला सुद्धा आहे. मुली म्हणजे परक्याचं धन म्हणून तिला कायम दुर्लक्षितच  केल्या जाते. एकविसाव्य शतकात मुलींनी अनेक क्षेत्रात कमालीची झेप घेतली असतांनाही मुलीचा जन्म होताच तिच्यासाठी आजही नाक मुरडले जाते. एवढंच नाही तर दुसऱ्यादा मुलगी व्हायला नको यासाठी तिचा गर्भातच जीव घेतला जातो. तिला नद्या, नाल्यात, कचरा कुंडीत फेकले जाते. हे आपलं दुर्दैवच म्हणावं लागेल.

पण ज्यांना नियतीने मुलगा व मुलगी या दोन्ही पैकी काहींचं दिलं नाही अशा दांपत्याला याचं मोल समजतं. अनेक नवस सायास त्यासाठी केल्या जाते. मातृत्त्वाचा अनुभव तिला हवा असतो, एक प्रेमळ साद घालणारा आवाज तिला हवा असतो, तो प्रेमरूपी नाजूक वात्सल्याचा स्पर्श तिला  हवा असतो. आणि या स्पर्शासाठी ती सदैव धडपडत असते. अशावेळी तिच्या वात्सल्याचा झरा दत्तक घेण्याच्या मार्गाकडे वळत असतो. निराधार मुलांना सुद्धा मातृत्वाच्या वात्सल्याची गरज असते आणि अशावेळी एक सुदंर नातं तयार होत. तेव्हा मुलांपेक्षा तिला मुलीचा आधार योग्य वाटतो. कारण स्त्री हि जन्मताच हळवी,भावनिक, निरागस, संवेदनशील आणि निसर्गतःच  प्रेमळ, मायाळू व संहनशीलतेची उदारक मूर्ती असते. आणि म्हणून की काय तीच आपल्या वृद्धत्वाचा आधार होऊ शकते असा विश्वास तिचावर आज टाकला जात असावा..!

स्त्री-पुरुषसमानतेमुळे आज स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळालेलं आहे आणि तितक्याच तत्परतेने ती प्रत्येक क्षेत्रात पुरुष्याच्या बरोबरीने  यशाची पायरी ओलांडीत आहे. देशातील सर्वोत्तम पदापासून ते टॅक्सी चालक पर्यंतचे सर्वच पदभार तेवढ्याच सक्षमतेने व आत्मविश्वासाने ती सांभाळीत आहे. जन्मजात नाजूक शरीर घेऊन जन्माला आलेल्या स्त्रीने पुरुषांच्या बाबतीत कुठेच कमी न पडता प्रत्येक क्षेत्रात आपल्या नांवाचा ठसा उमटविला आहे. असं असतांना स्त्री जन्माचा शोक समाजात का गेला जातो..?, तिला जन्माच्या आधीच का संपविल्या जाते..?. हा गहन व खेदजनक प्रश्न आपल्या समोर उभा आहे.

तेव्हा गरज आहे. आपल्या विचारांना  बदलायची, मुलीच्या बाबतील विचार प्रगल्भ करण्याची, त्यांच्याकडे एक मुलगा म्हणून बघण्याची, तिच्या इच्छा, स्वप्न व आकांक्षेला बळ देण्याची. तिच्या पंखांना विश्वासाची बळकटी देऊन तिला मुक्तपणे संचार करू देण्याची. आणि यासाठी आवश्यकता आहे.  मुलींकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची! आज काही प्रामाणात का असो ना मुलींकडे आशेच्या नजरेनी बघितलं जात आहे.हाच तिचा खरा सन्मान आहे.

प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, नागपूर
7420850376

Comments

Popular posts from this blog

स्त्री मना तुझी कहाणी!

आठवणीतील भेट ...

बळीराजा सुखावेल का ?