चला मानवतेचा मंत्र जपूया.. !!

गेल्या काही दिवसापासून समाजात जे सामाजिक जातीयाव्. हिंसाचार, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि त्यातून निरपरधा लोकांचा जीव या बाबी नित्याच्या बनल्या आहेत. परिणामी ही परिस्थिती सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेला मारक ठरत आहे. जातीयवादाला मूठमाती देण्याऐवजी अशा घटना त्यास थारा देत संघर्षाची नवीन नांदी घडवून आणण्यास पोषक ठरत आहे. सामाजिक अस्मितेला  मूठमाती देऊन राष्ट्रीय  एकात्मतेच्या वाटेत काटे पेरण्याचे काम सुरु असल्याची मोठी भीती आता आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. हे कोणीतीर घडवून आणत असलेले षडयंत्र तर नाही ना..?, असाच प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. यावर मात करावयाची असेलतर मानवतेचा मंत्र जपून सकारात्मक विचारानेच वाटचाल करणे आपल्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे अधोरेखित करावे लागते.

ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चा, बदलाची मागणी या साऱ्या घटना गेल्या काही दिवसांत हिंसक वृत्ती वाढण्यास जबाबदार ठरतो आहे. आजमितीस या कायद्यात झालेल्या सुधारणा आणि नव्याने काही होणारे बदल काही निरपराध लोकांच्या जीवावर उठतोय, अशीही भीती आता व्यक्त केली जात आहे. या गोष्टीला हिंसक वळण देणाऱ्यांचे उद्देश नेमके सामाजिक आहेत की राजकीय आहेत की अन्य कोणत्या घातकी वृत्तीला पुढे नेणारे आहेत, याचाही विचार करण्याची वेळ आता आपणा सर्वांवर येवून ठेपली आहे. लोकशाही व्यवस्थेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कोणतीही व्यक्ती त्याच्या हक्कांसाठी व्यक्त होवू शकते आणि सनदशीर मार्ग स्वीकारु शकते. असे असताना नेमका हिंसक मार्ग कशासाठी असा, प्रश्न आहे.

ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू होण्यापाठीमागे काही तत्कालीन कारणे होती. भारतीय समाजव्यवस्था वर्णव्यवस्थेवर आधारलेली होती. समाजातील एका वर्गाला अमानवी वागणूक दिली जात होती. त्यांना माणूस म्हणून मानलेच जात नव्हते. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या या  वर्गाला वेठबिगारी किंबहुना त्याच्याहीपेक्षा घाणेरडी कामे करण्यास भाग पाडले जात होते. मानवाला अमानवी वागणूक दिली जात होती. ही वागणूक जनावरापेक्षाही वाईट होती. जाती-पातीचे समाजात मोहोळ माजले असताना कायद्याच्या चौकटीत या वर्गाला संरक्षक कवच देणं आवश्यक होते. यासाठी १९८९ मध्ये ॲट्रॉसिटी ॲक्ट (अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) संमत करण्यात आला आणि समािातील दलित तसेच मागास घटकांना या माध्यमातून 'सुरक्षा कवच' देण्यात आहे. यामुळे समाजातील अमानवी कृत्यांना आळा बसेल, अशी स्पष्ट भूमिका त्यापाठीमागे होती. या कायद्याअंतर्गत जातीय भावनेतून शारीरिक इजा करणे, वेठबिगारी करण्यास सक्ती करणे, धाक दाखवून मतदान करण्यास भाग करणे, सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे, प्रार्थनास्थळे, नदी, विहिरी, पाणवठे आदी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे, महिलांचा विनयभंग करणे, लैंगिक अत्याचार करणे, घर अथवा गावं सोडून जाण्यास भाग पाडणे, नग्न धिंड काढणे आदी गंभीर प्रकारातील गुन्हे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये मोडले जावू लागले. हा गुन्हा करणाऱ्यास भारतीय दंडविधानानुसार  कोणत्याही गुन्हास दहा वर्षे शिक्षा त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तीच्या संबंधित असेल तर जन्मठेपही होऊ शकते, अशी तरतूद करण्यात आली. वास्तविक हा कायदा चागंला व परिणामकारकही ठरला. या कायद्यामुळे पिढ्या न पिढ्या शोषित वर्गाला संरक्षण मिळाले.

अलीकडच्या काळात काहीजण या कायद्याचा गैरफायदा घेत आहेत. त्याचा गैरवापर करत आहेत. परिणामी याची झळ काही निरपराध लोकांना सहन करावी लागत आहे. त्यामुळे समाजव्यवस्थेत ज्या ज्या व्यक्तींवर हा अन्याय अत्याचार होतो त्याला हा कायदा लागू व्हावा तसेच याचा गैरवापर होत असल्यास तो कायदाही रद्द करावा, अशी मागणी समाजातील काही वर्गानी केली आणि काहीप्रमाणात बदलही करवून आणले. याचे काही ठिकाणी गंभीर तर काही ठिकाणी अतिशय अवघड असे पडसाड उमटले. बदल हा काळाचा नियम आहे. या अनुषंगाने आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीनी त्याकडे पाहिले तर कदाचित हे हिंसक चित्र निर्माणच झालं नसतं. पण आपलं दुर्दैव असं की आपण भावनेपेक्षा बुद्धीला महत्व देतो. न्यायापेक्षा कायद्याची किंमत जास्त करतो. नीतीपेक्षा भीती आपल्या मनात उत्पन्न होते. त्यामुळे उन्नतीच्या मार्गाने धावणारा हा मानव भावनेला विसरून असले कृत्य करण्यास बाध्य होतो. खरं तर या देशाची अखंडता टिकवून ठेवणं हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. हीच अखंडता आपण जात, धर्म, हक्क, अधिकाराच्या नावाखाली धोक्यात आणतो आहे. ओबडधोबड गुहेत, अरण्यात राहणाऱ्या प्राचीन मनुष्याच्या वंशजानेच कमालीच्या गगनचुंबी इमारती तयार केल्या आहेत. गारगोटीवर गारगोटी घासून अग्नी उत्पन्न करणाऱ्या मानवजातीच्या वंशजानेच सूर्यप्रकाशालाही लाजविणारा विद्युत प्रकाश निर्माण केला. पण विज्ञान कितीही पुढे गेले अथवा कितीही मोठमोठी यंत्र निर्माण झाली म्हणून मानव सुखी संपन्न झाला असे म्हणणे योग्य ठरेल का, असाही प्रश्न आहे.

आज समाजात जातीय द्वेष वाढत आहे. माणूसपणे हरवत चालले आहे. माणूसच माणसाचा शत्रू बनत चालला आहे. चीन, पाकिस्तान सारख्या देशाचे दुष्ट सावट घेरून असतांना आपली एकता, अखंडता टिकवून ठेवणे, ही प्रत्येक भारतीय नागरिकाची नैतिकता आहे. मग आपण असं का वागतो..?, असाही प्रश्न आहे. भारतीय संस्कृती महान असून इतर राष्ट्रांसाठी ती आदर्शवत आहे. तरीही आपल्याच बांधवांच्या जीवावर आपण उठत आहे. आपला बळीराजा आत्महत्या करत आहे. आपल्या भगिनींवर रोज अत्याचार होत आहेत.देशात चोरी, डकेती, खून लुटपाट, नक्षलवादासारखे गहन प्रश्न अजूनही आपल्या समोर असतांना जातीय कलह निर्माण करून आपल्याच हाताने आपल्याच पायावर धोंडा मारून घेणे नाही का ?तेव्हा आपल्याला गरज आहे मानवतेचा मंत्र जपण्याची. बंधुभावाने, गुण्यागोवींदाने मानवतेच नातं जपण्याची. देशात शांतात प्रस्थापित करून राष्ट्रीय अखंडता जपण्याची, आपल्या देशाचं नावं जागतिक सुवर्ण अक्षरात कोरण्याची आणि यासाठी गरज आहे, मानवतेचा महामंत्र जपण्याची !!

प्रा. वैशाली रितेश देशमुख
रा. कुही, जि. नागपूर
7420850376

Comments